05-05-24    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   15.11.99  ओम शान्ति   मधुबन


बाप समान बनण्याचा सोपा पुरुषार्थ - ‘आज्ञाधारक बना’


आज बापदादा आपल्या होली हंस मंडळींना पाहत आहेत. प्रत्येक मुलगा होलीहंस आहे. सदैव मनामध्ये ज्ञान रत्नांचे मनन करत राहतात. होली हंसाचे कामच आहे व्यर्थ (निरुपयोगी) खड्यांना बाजूला करणे आणि ज्ञान रत्नांचे मनन करणे. एक-एक रत्न किती अमूल्य आहे. प्रत्येक मुलगा ज्ञान रत्नांची खाण बनला आहे. ज्ञान रत्नांच्या खजिन्यांनी सदैव भरपूर असतात.

आज बापदादा मुलांमधील एक विशेष गोष्ट चेक करत होते. ती कोणती होती? ज्ञान आणि योग सहज धारण करण्याचे सोपे साधन आहे - बाबांचे आणि दादांचे आज्ञाधारक बनून चालणे. पित्याच्या रूपामध्ये देखील आज्ञाधारक, शिक्षकाच्या रूपामध्ये सुद्धा आणि सद्गुरूच्या रूपामध्ये सुद्धा. तिन्ही रूपामध्ये आज्ञाधारक बनणे अर्थात सहज पुरुषार्थी बनणे कारण तिन्ही रूपामध्ये मुलांना आज्ञा मिळाली आहे. अमृतवेलेपासून रात्री पर्यंत प्रत्येक वेळेसाठी, प्रत्येक कर्तव्यासाठी आज्ञा मिळालेली आहे. आज्ञे प्रमाणे चालत राहिलात तर कोणत्याही प्रकारची मेहनत करावी लागणार नाही किंवा अवघड वाटणार नाही. प्रत्येक क्षणाचे मनसा संकल्प, वाणी आणि कर्म तिन्ही प्रकारची आज्ञा स्पष्टपणे मिळालेली आहे. विचार करण्याची देखील गरज नाही कि, हे करू का नको करू. हे राईट आहे कि रॉंग आहे. विचार करण्याची सुद्धा तसदी घ्यावी लागणार नाही. परमात्म आज्ञा आहेच सदैव श्रेष्ठ. तर सर्वजण कुमार जे पण आले आहात, तुमचे संघटन खूप चांगले आहे. तर प्रत्येकाने बाबांचे बनताच बाबांसोबत वायदे केले आहेत ना? तुम्ही जेव्हा बाबांचे बनला तेव्हा सर्वात पहिला वायदा कोणता केला होता? बाबा, तन-मन-धन जे काही आहे, कुमारांजवळ धन तर फारसे काही असत नाही तरी देखील जे आहे, सर्व तुमचे आहे. हा वायदा केला आहे ना? तन सुद्धा, मन सुद्धा, धन सुद्धा आणि संबंध सुद्धा सर्व तुमच्या सोबत - हा देखील वायदा पक्का केला आहे ना? जेव्हा तन-मन-धन, संबंध सर्व तुमचे आहे तर माझे काय राहिले! मग काही ‘माझे’पणा आहे? असतेच काय? तन-मन-धन, जन… सर्व बाबांच्या हवाले केले. प्रवृत्तीमध्ये असणाऱ्यांनी केले आहे का? मधुबनवाल्यांनी केले आहे? पक्के आहे ना! जर मन सुद्धा बाबांचे झाले, ‘माझे’ मन तर नाही ना! का मन माझे आहे? माझे समजून यूज करायचे आहे? जर मन बाबांना दिले आहे तर ते सुद्धा तुमच्यापाशी अमानत म्हणून आहे. मग युद्ध कशाला करता? ‘माझे मन अस्वस्थ आहे, माझ्या मनामध्ये व्यर्थ संकल्प येतात, माझे मन विचलित होते…’ जर माझे नाहीच, अमानत आहे मग अमानत असलेले पुन्हा माझे समजून यूज करणे, हा तर विश्वासघात झाला ना? मायेचे दरवाजे आहेत - ‘मी आणि माझे’ तर तन सुद्धा तुमचे नाही, मग देह-अभिमानाचा ‘मी’ कुठून आला! मन सुद्धा तुमचे नाही, तर ‘माझे-माझे’ कुठून आले? तुझे आहे कि माझे आहे? बाबांचे आहे का फक्त म्हणण्यापुरते आहे, करण्यासाठी नाही? म्हणायचे बाबांचे आणि मानायचे माझे! फक्त पहिला केलेला वायदा आठवा कि, ना बॉडी कॉन्शसवाला ‘मी’ आहे, ना ‘माझे’ आहे. तर जी बाबांची आज्ञा आहे, तनाला देखील अमानत समजा. मनाला सुद्धा अमानत समजा. मग मेहनत करण्याची गरज आहे का? कोणतीही कमजोरी येते ती या दोन शब्दांनी येते - ‘मी आणि माझे’. तर ना तन तुमचे आहे, ना बॉडी कॉन्शसवाला ‘मी’ आहे. मनामध्ये जे काही संकल्प चालतात जर आज्ञाधारक आहात तर बाबांची आज्ञा काय आहे? पॉझिटिव्ह विचार करा, शुभ भावनेचे संकल्प करा. फालतू संकल्प करा - अशी बाबांची आज्ञा आहे का? नाही. तर जर मन तुमचे नाहीये तरीही व्यर्थ संकल्प करता याचा अर्थ बाबांच्या आज्ञेला प्रॅक्टिकलमध्ये आणलेले नाही ना! फक्त एक शब्द लक्षात ठेवा, ‘मी परमात्म्याचा आज्ञाधारक मुलगा आहे’. बाबांची हि आज्ञा आहे कि नाहीये, त्याचा विचार करा. जो आज्ञाधारक मुलगा असतो तो वडिलांना नेहमी आणि आपोआप आठवत असतो. आपोआप वडिलांचा प्रिय बनतो, आपोआप वडिलांच्या समीप असतो. तर चेक करा की, मी बाबांच्या समीप, बाबांचा आज्ञाधारक आहे? अमृतवेलेला एक शब्द तर आठवू शकता - ‘मी कोण?’ आज्ञाधारक आहे का कधी आज्ञाधारक आणि कधी आज्ञाभंग करणारा आहे?

बापदादा नेहमी म्हणतात की, कोणत्याही रूपामध्ये जर एका बाबांचाच संबंध लक्षात राहिला, हृदयातून निघावे बाबा, तर समीपतेचा अनुभव कराल. मंत्र म्हटल्यासारखे म्हणू नका, “बाबा-बाबा”, ते ‘राम-राम’ म्हणतात तुम्ही ‘बाबा-बाबा’ म्हणता, परंतु हृदयापासून निघायला हवे - ‘बाबा’. प्रत्येक कर्म करण्या अगोदर चेक करा कि मनासाठी, तनासाठी किंवा धनासाठी बाबांची आज्ञा काय आहे? कुमारांपाशी धन भले थोडेसे आहे परंतु बाबांनी जशी आज्ञा दिली आहे कि धनाचा पोतामेल (हिशोब) कोणत्या प्रकारे ठेवावा, त्या पद्धतीने ठेवला आहे? का जसे येते तसे चालवता? प्रत्येक कुमाराने धनाचा सुद्धा पोतामेल ठेवला पाहिजे. धनाला कुठे आणि कसे यूज करायचे आहे, मनाला सुद्धा कुठे आणि कसे यूज करायचे आहे, तनाला सुद्धा कुठे लावायचे आहे, हा सर्व पोतामेल असायला हवा. तुम्ही सर्व दादी जेव्हा धारणेचे क्लास घेता तेव्हा समजावून सांगता ना कि, धनाला कसे यूज करायचे! कसा पोतामेल ठेवायचा! कुमारांना माहित आहे का कि कसा पोतामेल ठेवायचा आहे, धन कुठे लावायचे आहे, हे माहित आहे? थोडेजण हात वर करत आहेत, नवीन सुद्धा आहेत, यांना माहीत नाहीये. यांना जरूर सांगा कि काय-काय करायचे आहे! निश्चिंत होतील, ओझे वाटणार नाही कारण तुम्हा सर्वांचे लक्ष्य आहे, कुमार अर्थात लाइट. डबल लाइट. कुमारांचे लक्ष्य आहे ना की आम्हाला नंबर वनमध्ये यायचे आहे? मग लक्ष्य आहे तर त्या सोबत लक्षण सुद्धा हवे. लक्ष्य खूप उच्च असेल आणि लक्षण नसेल तर लक्ष्यापर्यंत पोहोचणे अवघड आहे म्हणून बाबांची जी आज्ञा आहे त्याला सदैव बुद्धीमध्ये ठेवून मग कर्मामध्ये आणा.

बापदादांनी या अगोदर सुद्धा समजावून सांगितले आहे ब्राह्मण जीवनाचे मुख्य खजिने आहेत - संकल्प, समय आणि श्वास. तुमचा एक-एक श्वास देखील खूप अमूल्य आहे. एकही श्वास साधारण नसावा, व्यर्थ नसावा. भक्तीमध्ये म्हणतात ना - ‘श्वासोश्वास आपल्या इष्टची आठवण करा’. श्वास सुद्धा व्यर्थ जाऊ नये. ज्ञानाचा खजिना, शक्तींचा खजिना… हे तर आहेतच. परंतु मुख्य हे तीन खजिने संकल्प, समय, आणि श्वास - आज्ञे प्रमाणे सफल होतात का? व्यर्थ तर जात नाहीत ना? कारण व्यर्थ गेल्याने जमा होत नाही. आणि जमेचे खाते या संगमावरच भरायचे आहे. भले सतयुग, त्रेतामध्ये श्रेष्ठ पद प्राप्त करायचे आहे नाहीतर द्वापर, कलियुगामध्ये पूज्य पद प्राप्त करायचे आहे परंतु दोन्ही करीता जमा मात्र या संगमावरच करायचे आहे. या हिशोबाने विचार करा कि संगम काळातील जीवन, छोट्याशा जन्मातील संकल्प, समय, श्वास किती अमूल्य आहेत? यामध्ये निष्काळजी बनू नका. जसा आला तसा दिवस घालवला, दिवस घालवला नाही परंतु एका दिवसामध्ये बरेच काही गमावलेत. जेव्हापण कधी फालतू संकल्प, फालतू वेळ जातो तर असे समजू नका - चला ५ मिनिटे गेली. वाचवा. समया नुसार पहा प्रकृती आपले कार्य किती वेगाने करत आहे. काही ना काही खेळ दाखवत राहते. कुठे ना कुठे खेळ दाखवत राहते. परंतु प्रकृतिपती ब्राह्मण मुलांचा खेळ एकच आहे - ‘उडत्या कलेचा’. तर प्रकृती तर खेळ दाखवते परंतु ब्राह्मण आपल्या उडत्या कलेचा खेळ दाखवत आहात?

कोणा मुलाने बापदादांना ओरिसाच्या समुद्री वादळाचा रिझल्ट लिहून पाठवला की, ‘असे झाले, हे झाले…’ तर तो प्रकृतीचा खेळ तर बघितला. परंतु बापदादा विचारत आहेत की तुम्ही लोकांनी फक्त प्रकृतीचा खेळ पाहिलात का आपल्या उडत्या कलेच्या खेळामध्ये बिझी राहिलात? का फक्त बातम्या ऐकत राहिलात? सर्व बातम्या तर ऐकाव्या सुद्धा लागतात, परंतु जितका बातम्या ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असतो तितका आपल्या उडत्या कलेच्या खेळामध्ये राहण्याचा इंटरेस्ट असतो? काही मुले गुप्त योगी सुद्धा आहेत, अशा गुप्त योगी मुलांना बापदादांची मदत सुद्धा खूप मिळाली आहे आणि अशी मुले स्वतः देखील अचल, साक्षी राहीली आणि वायुमंडळामध्ये सुद्धा वेळेवर सहयोग दिला. जसे स्थूल सहयोग देणारे, मग गव्हर्मेंट असो किंवा आसपासचे लोक असोत सहयोग देण्यासाठी तयार होतात, तसा ब्राह्मण आत्म्यांनी सुद्धा आपला सहयोग - शक्ती, शांती देण्याचा, सुख देण्याचे जे ईश्वरीय श्रेष्ठ कार्य आहे, ते केले का? जसे त्या गव्हर्मेंटने - ‘हे केले, अमक्या देशाने असे केले…’ लगेच प्रचार करू लागतात, तर बाप-दादा विचारत आहेत - तुम्ही ब्राह्मणांनी सुद्धा आपले हे कार्य केले? तुम्ही सुद्धा अलर्ट झाले पाहिजे. स्थूल सहयोग देणे हे सुद्धा जरुरी असते, यासाठी बापदादा मनाई करत नाहीत परंतु जे ब्राह्मण आत्म्यांचे विशेष कार्य आहे, जो इतर कोणीही सहयोग देऊ शकत नाही, असा सहयोग अलर्ट होऊन तुम्ही दिलात? द्यायचा आहे ना! का फक्त त्यांना कपडे हवेत, धान्य हवे? परंतु पहिले तर मनाची शांती पाहिजे, सामना करण्याची शक्ती पाहिजे. तर स्थूल बरोबरच सूक्ष्म सहयोग ब्राह्मणच देऊ शकतात इतर कोणीही देऊ शकत नाही. हे तर काहीच नाही, हि तर रिहर्सल आहे. खरे तर अजून पुढे येणार आहे. त्याची रिहर्सल तुम्हाला सुद्धा बाबा किंवा समय करायला लावत आहे. तर ज्या शक्ती, जे खजिने तुमच्यापाशी आहेत, त्यांना वेळेवर यूज करता येते ना?

कुमार काय करणार? शक्ती जमा आहेत? शांतीची शक्ती जमा आहे? यूज करता येते ना? हात तर खूप छान वर करतात, आता प्रॅक्टिकलमध्ये दाखवा. साक्षी होऊन बघायचे सुद्धा आहे, ऐकायचे सुद्धा आहे आणि सहयोग सुद्धा द्यायचा आहे. शेवटाला जेव्हा खरा पार्ट सुरु होईल, त्यामध्ये साक्षी आणि निर्भय होऊन बघितले देखील पाहिजे आणि पार्ट सुद्धा बजावला पाहिजे. कोणता पार्ट? दात्याची मुले, दाता बनून आत्म्यांना जे हवे आहे ते देत रहा. तर मास्टर दाता आहात ना? स्टॉक जमा करा, जितका स्टॉक तुमच्यापाशी असेल तितकेच दाता बनू शकणार. शेवटपर्यंत स्वतःसाठीच जमा करत राहिलात तर दाता बनू शकणार नाही. अनेक जन्म जे श्रेष्ठ पद प्राप्त करायचे आहे, ते प्राप्त करू शकणार नाही, म्हणूनच एक गोष्ट म्हणजे - आपल्याकडे स्टॉक जमा करा. शुभ भावना, श्रेष्ठ कामनेचे भांडार सदैव भरपूर हवे. आणि दुसरे म्हणजे - ज्या विशेष शक्ती आहेत, त्या शक्ती ज्यावेळी, ज्याला जे हवे आहे ते देऊ शकाल. आता समयानुसार फक्त आपल्या पुरुषार्थामध्ये संकल्प आणि वेळ द्या, त्याच बरोबर दाता बनून विश्वाला सुद्धा सहयोग द्या. आपला पुरुषार्थ तर ऐकवला - अमृतवेळेलाच हा विचार करा कि, मी आज्ञाधारक मुलगा आहे! प्रत्येक कर्मासाठी आज्ञा दिलेली आहे. सकाळी कसे उठावे, कसे झोपावे, कसे खावे, कर्मयोगी कसे बनावे. अशा प्रत्येक कामासाठी आज्ञा दिली गेली आहे. आज्ञाधारक बनणे हेच बाप समान बनणे आहे. बस्स, श्रीमतावर चाला, ना मनमत, ना परमत; काहीही ॲडिशन (मिक्स) नसावे. कधी मनमतावर, कधी परमतावर चालाल तर मेहनत करावी लागेल. सोपे होणार नाही कारण मनमत, परमत उडू देणार नाही. मनमत, परमत हे ओझे आहे आणि ओझे उडू देणार नाही. श्रीमत डबल लाईट बनवते. श्रीमतावर चालणे अर्थात सहज बाप समान बनणे. श्रीमतवर चालणाऱ्याला कोणतीही परिस्थिती खाली घेऊन येऊ शकत नाही. तर श्रीमतानुसार चालता येते का?

ठीक आहे, तर कुमार आता काय करणार? निमंत्रण मिळाले. स्पेशल पाहुणचार झाला. बघा, किती लाडके झाले आहात. तर आता पुढे काय करणार? रेस्पॉन्ड (प्रतिसाद) देणार का तिथे गेलात कि तिथले आणि इथे आलात कि इथले? असे तर नाही ना? इथे तर खूप मजेत आहात. मायेच्या हल्ल्यापासून वाचले आहात, असा कोणी आहे ज्याला इथे मधुबनमध्ये सुद्धा माया आली? असा कोणी आहे ज्याला मधुबनमध्ये सुद्धा मेहनत करावी लागली? सेफ आहात, चांगले आहे. बापदादा सुद्धा खुश होतात. अशी वेळ येईल जेव्हा युथ ग्रुपकडे गव्हर्मेंटचे सुद्धा लक्ष जाईल परंतु तेव्हा जाईल जेव्हा तुम्ही विघ्न-विनाशक बनाल. ‘विघ्न-विनाशक’ कोणाचे नाव आहे? तुम्हा लोकांचे आहे ना! विघ्नांना हिम्मत होता कामा नये, जी कुमारांचा सामना करतील, तेव्हा म्हणणार विघ्न-विनाशक. विघ्नांची हार भले व्हावी, परंतु वार करू नये. विघ्न-विनाशक बनण्याची हिम्मत आहे? कि तिथे (घरी) जाऊन पत्र लिहिणार - ‘दादी, तिथे (मधुबनमध्ये) खूप छान होतो परंतु माहीत नाही काय झाले!’ असे तर लिहिणार नाही ना? हीच खुशखबरी लिहा - ठीक आहे, खूप चांगला आहे, विघ्न-विनाशक आहे. बस एक शब्द लिहा. जास्त मोठे पत्र नको. ओ. के. अच्छा.

मधुबनची सुद्धा विशेषता बाप-दादांपाशी पोहोचली. मधुबनवाल्यांनी आपले चार्ट पाठवले आहेत. बाप-दादांकडे पोहोचले आहेत. बापदादा सर्व मुलांना, आज्ञा मानणारे आज्ञाधारक मुलांच्या नजरेने बघतात. विशेष कार्य मिळाले आणि एव्हररेडी बनून केले आहे, याची विशेष मुबारक देत आहेत. अच्छा प्रत्येकाने आपला चार्ट स्पष्ट लिहिला आहे. (दादींना) तुम्ही सुद्धा त्यांचा रिझल्ट पाहून क्लास घ्या. आपल्या अवस्थेचा चार्ट चांगला लिहिला आहे. बापदादा तर मुबारक देतच आहेत. सच्च्या दिलावर सच्चा साहेब राजी असतो. अच्छा.

चोहो बाजूंच्या बापदादांच्या आज्ञाधारक मुलांना, सदैव विघ्न-विनाशक मुलांना, सदैव श्रीमतवर सहजपणे चालणाऱ्या, मेहनती पासून मुक्त राहणाऱ्या, सदैव मजेमध्ये उडणारे आणि उडविणारे, सर्व खजिन्यांच्या भांडाराने भरपूर राहणाऱ्या अशा बाबांच्या समीप आणि समान राहणाऱ्या मुलांना खूप-खूप प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. कुमारांना सुद्धा विशेष अथक आणि एव्हररेडी, सदैव उडत्या कलेमध्ये उडणाऱ्यांना बापदादांची विशेष प्रेमपूर्वक आठवण.

(बाप-दादांनी डायमंड हॉलमध्ये बसलेल्या सर्व भाऊ-बहिणींना दृष्टी देण्यासाठी हॉलमध्ये फेरी मारली)

बापदादांचे प्रत्येक मुलावर खूप-खूप-खूप प्रेम आहे. असे समजू नका कि आमच्यावर बापदादांचे प्रेम कमी आहे. तुम्ही कदाचित विसरून सुद्धा जाल परंतु बाबा निरंतर प्रत्येक मुलाची माळा जपत असतात कारण प्रत्येक मुलाची विशेषता कायम बापदादांच्या समोर असते. कोणताही मुलगा विशेष नाही, असे नाहीये. प्रत्येक मुलगा विशेष आहे. बाबा एकाही मुलाला कधीच विसरत नाहीत, तर सर्वांनी स्वतःला; विशेष आत्मा आहे आणि विशेष कार्यासाठी निमित्त आहे, असे समजून पुढे जात रहा. अच्छा.

वरदान:-
सदैव आत्मिक स्थितीमध्ये राहून दुसऱ्याच्या देखील आत्म्याला पाहणारे रुहानी रुहे गुलाब भव

रुहे गुलाब अर्थात ज्याच्यामध्ये सदैव आत्मिक सुगंध आहे. आत्मिक सुगंध असणारे जिकडे पाहतील, ज्याला पाहतील तर त्याच्या आत्म्याला बघतील, शरीराला नाही. तर स्वतः देखील सदैव आत्मिक स्थितीमध्ये रहा आणि दुसऱ्यांच्या देखील आत्म्याला पहा. जसे बाबा उच्च ते उच्च आहेत, तसा त्यांचा बगीचा देखील सर्वात उच्च आहे, ज्या बगिच्यातील विशेष शृंगार रुहे गुलाब तुम्ही मुले आहात. तुमचा आत्मिक सुगंध अनेक आत्म्यांचे कल्याण करणारा आहे.

सुविचार:-
मर्यादा सोडून कोणाला सुख दिलेत तर ते सुद्धा दुःखाच्या खात्यामध्ये जमा होईल.