28-04-24    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   23.10.99  ओम शान्ति   मधुबन


“काळाची हाक - दाता बना”


आज सर्व श्रेष्ठ भाग्य विधाता, सर्व शक्तींचे दाता बापदादा चोहो बाजूंच्या सर्व मुलांना पाहून हर्षित होत आहेत. भले मधुबनमध्ये सन्मुख आहेत, किंवा देश-विदेशामध्ये आठवणीमध्ये ऐकत आहेत, पाहत आहेत, जिथे पण बसले आहेत परंतु मनाने सन्मुख आहेत. त्या सर्व मुलांना पाहून बापदादा हर्षित होत आहेत. तुम्ही सुद्धा सर्व हर्षित होत आहात ना! मुले सुद्धा हर्षित आणि बापदादा सुद्धा हर्षित. आणि हाच अंतःकरणातील सदा काळाचा खरा आनंद साऱ्या दुनियेतील दुःखांना दूर करणारा आहे. हा अंतःकरणातील हर्ष आत्म्यांना बाबांचा अनुभव करविणारा आहे कारण बाबा देखील सदैव सर्व आत्म्यांप्रती सेवाधारी आहेत आणि तुम्ही सर्व मुले बाबांच्या सोबत सेवा साथी आहात. साथीदार आहात ना! बाबांचे साथी आणि विश्वातील साऱ्या दुःखांना परिवर्तन करून सदैव आनंदी राहण्याचे साधन देण्याच्या सेवेमध्ये सदैव तत्पर राहता. सदैव सेवाधारी आहात. केवळ ४ तास, ६ तास सेवा करणारे नाही आहात. प्रत्येक सेकंद सेवेच्या स्टेजवर पार्ट बजावणारे परमात्म्याचे साथीदार आहात. आठवण निरंतर आहे, तशीच सेवा सुद्धा निरंतर आहे. स्वतःला निरंतर सेवाधारी अनुभव करता ना? का ८-१० तासाचे सेवाधारी आहात? हा ब्राह्मण जन्मच मुळी आठवण आणि सेवेकरीता आहे. आणखी काही करायचे आहे का? हेच करायचे आहे ना! प्रत्येक श्वास, प्रत्येक सेकंद आठवण आणि सेवा एकत्र आहेत का सेवेचे तास वेगळे आहेत आणि आठवण करण्याचे तास वेगळे आहेत? नाहीत ना! ठीक आहे; तर बॅलन्स आहे का? जर सेवा १०० टक्के आहे तर आठवण देखील १०० टक्के आहे का? दोन्हीचा बॅलन्स आहे? फरक पडतो ना? कर्म योगीचा अर्थच आहे ‘कर्म आणि आठवण’, ‘सेवा आणि आठवण’ - दोन्हीचा बॅलन्स एक समान, समान असला पाहिजे. असे तर नाही की, काही वेळा आठवण जास्त आहे आणि सेवा कमी, किंवा सेवा जास्त आहे आणि आठवण कमी. जसे आत्मा आणि शरीर जोपर्यंत स्टेजवर आहेत तर सोबत-एकत्र आहेत ना. वेगळे होऊ शकतात का? अशीच आठवण आणि सेवा सोबत-एकत्र असावी. आठवण अर्थात बाप समान, स्वतःच्या स्वमानाची सुद्धा आठवण. जेव्हा बाबांची आठवण राहते तेव्हा आपोआपच स्वमानाची देखील आठवण राहते. जर स्वमानामध्ये राहत नाही तर आठवण सुद्धा पॉवरफुल राहत नाही.

स्वमान अर्थात बाप समान. संपूर्ण स्वमान आहेच - ‘बाप समान’. आणि अशा आठवणीमध्ये राहणारी मुले नेहमीच दाता असणार. ‘लेवता’ नाहीत, ‘देवता’, म्हणजे देणारा. तर आज बापदादा सर्व मुलांची दाता-पणाची स्टेज चेक करत होते की दात्याची मुले कितपत दाता बनली आहेत? जसे बाबा कधीही घेण्याचा संकल्प करू शकत नाहीत, देण्याचा करतात. जरी म्हणतात देखील कि, सर्व काही जुने द्या, तरी देखील जुन्याच्या बदल्यात नवीन देतात. घेणे म्हणजे बाबांचे देणे. तर वर्तमान वेळी बापदादांना मुलांचा एक टॉपिक खूप चांगला वाटला. तो कोणता टॉपिक? विदेशचा टॉपिक आहे. कोणता? (कॉल ऑफ टाइम)

तर बापदादा पाहत होते कि मुलांसाठी समयाची कोणती हाक आहे (काळाची गरज काय आहे)! तुम्ही पाहता विश्वासाठी, सेवेसाठी, बापदादा सेवेचे सोबती तर आहेतच. परंतु बापदादा बघतात कि मुलांसाठी आता काळाची कोणती हाक आहे? तुम्ही सुद्धा समजता ना कि काळाची कोणती हाक आहे? स्वतःसाठी विचार करा. सेवेसाठी भाषण तर केलेत, करत देखील आहात ना! तथापि, स्वतःकरता स्वतःलाच विचारा कि माझ्यासाठी काळाची कोणती हाक आहे? वर्तमानकाळाची हाक कोणती आहे? तर बापदादा पाहत होते कि आजच्या काळानुसार प्रत्येक वेळी, प्रत्येक मुलाला दाता-पणाची स्मृती आणखी वाढवायची आहे. भले मग स्व-उन्नती प्रती दाता-पणाचा भाव, किंवा सर्वांप्रती स्नेह इमर्ज रूपामध्ये दिसून यावा. कोणी कसाही असो, काहीही असो, परंतु मला द्यायचे आहे. तर दाता सदैवच बेहदच्या वृत्तीवाला असेल, हदवाला नाही आणि दाता सदैव संपन्न, भरपूर असेल. दाता नेहमीच क्षमेचा मास्टर सागर असेल. त्यामुळे जे हदचे स्वतःचे संस्कार किंवा दुसऱ्यांचे संस्कार आहेत ते इमर्ज होणार नाहीत, मर्ज होतील. मला द्यायचे आहे. कोणी देवो अथवा न देवो, परंतु मला दाता बनायचे आहे. कोणत्याही संस्काराच्या अधीन झालेली परवश आत्मा आहे, त्या आत्म्याला मला सहयोग द्यायचा आहे. तर कोणाचाही हदचा संस्कार तुम्हाला प्रभावीत करणार नाही. कोणी मान देईल, कोणी देणार नाही; त्याने दिला नाही, परंतु मला द्यायचा आहे. असे दाता-पण आता इमर्ज पाहिजे. मनामध्ये भावना तर आहे परंतु… हे ‘परंतु’ येऊ नये. मला करायचेच आहे. कोणते असे वर्तन किंवा बोल जे तुमच्या कामाचे नाहीत, चांगले वाटत नाहीत, त्याला घेऊच नका. खराब वस्तू घेतली जाते का? मनामध्ये धारण करणे अर्थात घेणे. बुद्धीमध्ये सुद्धा नको. बुद्धीमध्ये ती गोष्ट गेली ना, ते सुद्धा नको. जर आहेच खराब वस्तू, चांगली नाहीच आहे तर बुद्धीने आणि मनाने स्वीकारू नका म्हणजेच धारण करू नका. घेण्याऐवजी आणखीनच शुभ भावना, शुभ कामना, दाता बनून द्या. घेऊ नका; कारण आताच्या समयानुसार जर मन आणि बुद्धी रिकामे नसेल तर निरंतर सेवाधारी बनू शकणार नाही. मन किंवा बुद्धी जेव्हा कोणत्याही गोष्टींमध्ये बिझी झाले तर सेवा काय करणार? मग जसे लौकिकमध्ये कोणी ८ तास, कोणी १० तास काम करतात, तसे इथे सुद्धा होईल. ८ तासाचे सेवाधारी, ६ तासाचे सेवाधारी कधी निरंतर सेवाधारी बनू शकणार नाहीत. भले मनसा सेवा करा, नाहीतर वाणीने, किंवा कर्म अर्थात संबंध-संपर्काद्वारे करा. प्रत्येक सेकंद दाता अर्थात सेवाधारी. बुद्धीला रिकामे ठेवल्याने बाबांच्या सेवेचे साथीदार बनू शकाल. मनाला सदैव साफ ठेवल्याने निरंतर बाबांच्या सेवेचे साथी बनू शकता. तुम्हा सर्वांचा वायदा काय आहे? ‘साथ रहेंगे, साथ चलेंगे’. हा वायदा आहे ना? का तुम्ही पुढे रहा आम्ही मागे-मागे येणार? नाही ना? सोबतीचा वायदा आहे ना? तर बाबा सेवेशिवाय राहतात का? आठवणी शिवाय देखील राहत नाहीत. जितके बाबा आठवणीमध्ये राहतात तितके तुम्ही मेहनतीने राहता. राहता, परंतु मेहनतीने, अटेंशन देऊन. आणखी बाबांसाठी आहेच काय? परम आत्म्यासाठी आहेतच आत्मे. नंबरवार आत्मे तर आहेतच. मुलांच्या आठवणी शिवाय बाबा राहूच शकत नाहीत. बाबा, मुलांच्या आठवणी शिवाय राहू शकतात का? तुम्ही राहू शकता? कधी-कधी खोडकर बनता.

तर काय ऐकलेत? काळाची हाक आहे - दाता बना. आवश्यकता खूप आहे. संपूर्ण विश्वाच्या आत्म्यांची हि हाक आहे - ‘ओ आमचे इष्ट…’ इष्ट तर आहात ना! कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये सर्व आत्म्यांसाठी इष्ट आहात. तर आता सर्व आत्म्यांची हाक आहे - ‘हे इष्ट देव, देवी परिवर्तन करा’. हि हाक ऐकू येते का? पांडवांना हि हाक ऐकू येते का? ऐकून मग काय करता? हाक ऐकायला येते तर सैलवेशन (मदत) देता का विचार करता - ‘हो, करूया?’ हाक ऐकायला येते? तर काळाची हाक ऐकवता आणि आत्म्यांची हाक फक्त ऐकता? तर इष्ट देवी-देवतांनो, आता आपल्या दाता-पणाचे रूप इमर्ज करा. द्यायचे आहे. कोणतीही आत्मा वंचित राहू नये. नाहीतर तक्रारींच्या माळा गळ्यात पडतील. तक्रार तर करतील ना! तर तक्रारींची माळा घालणारे इष्ट आहात का फुलांची माळा घालणारे इष्ट आहात? कोणते इष्ट आहात? पूज्य आहात ना! असे समजू नका कि, आम्ही तर मागाहून येणारे आहोत. जे मोठे-मोठे आहेत तेच दाता बनणार, आम्ही कुठे बनणार. परंतु नाही, सर्वांना दाता बनायचे आहे.

जे पहिल्यांदाच मधुबनमध्ये आले आहेत त्यांनी हात वर करा. जे पहिल्यांदाच आले आहेत ते दाता बनू शकतात का दुसऱ्या-तिसऱ्या वर्षी दाता बनणार? एक वर्ष झालेले दाता बनू शकतात? (हां जी) खूप छान हुशार आहात. बापदादा हिम्मतीवर सदैव खुश होतात. भले एक महिन्याचा सुद्धा आहे, हे तर एक वर्ष किंवा ६ महिने झालेले असतील परंतु बापदादा जाणतात कि एक वर्ष झालेले आहात किंवा एक महिना झालेले आहात, एका महिन्यामध्ये सुद्धा स्वतःला ब्रह्माकुमार किंवा ब्रह्माकुमारी म्हणवता ना! तर ब्रह्माकुमार आणि ब्रह्माकुमारी अर्थात ब्रह्माबाबांच्या वारशाचे अधिकारी बनलात. ब्रह्माला पिता मानलेत तेव्हाच तर कुमार-कुमारी बनलात ना? तर ब्रह्माकुमार आणि ब्रह्माकुमारी, ब्रह्मा बाबांच्या आणि शिवबाबांच्या वारशाचे अधिकारी बनलात ना! का एक महिना झालेल्यांना वारसा मिळणार नाही? एक महिना झालेल्यांना वारसा मिळतो ना? जर वारसा मिळाला तर देण्यासाठी दाता तर झालात ना! जी वस्तू मिळते ती द्यायला सुरुवात तर केलीच पाहिजे ना.

जर बाबा समजून कनेक्शन जोडलेत तर एका दिवसामध्ये सुद्धा वारसा घेऊ शकता. असे नाही कि, ‘हो, चांगले आहे, कोणती तरी शक्ती आहे, कळत तर आहे…’ असे नाही. वारशाची अधिकारी त्यांची संतान बनते. समजणारे, बघणारे नाहीत. जर एका दिवसामध्ये सुद्धा हृदयापासून बाबा मानले तरीही वारशाचा अधिकारी बनू शकतो. तुम्ही सर्व लोक तर अधिकारी आहात ना? तुम्ही लोक तर ब्रह्माकुमार-कुमारी आहात ना का अजून बनत आहात? बनले आहात का बनण्यासाठी आला आहात? तुम्हाला कोणीही बदलू शकत नाही ना? ब्रह्माकुमार-कुमारी ऐवजी फक्त कुमार-कुमारी बना, होऊ शकत नाही का? ब्रह्माकुमार आणि कुमारी बनण्यामध्ये किती फायदे आहेत? केवळ एका जन्माचाच फायदा नाही तर अनेक जन्मांचा फायदा आहे. पुरुषार्थ अर्धा जन्म, पाव जन्माचा आणि प्रारब्ध आहे अनेक जन्मांचे. फायदाच फायदा आहे ना!

बापदादा समयानुसार वर्तमान वेळी विशेष एका गोष्टीकडे लक्ष वेधून घेत आहेत कारण बापदादा मुलांचा रिझल्ट तर बघत असतात ना! तर रिझल्टमध्ये दिसून आले, हिम्मत खूप चांगली आहे. ध्येय देखील खूप चांगले आहे. ध्येयानुसार अजूनपर्यंत लक्ष्य आणि लक्षण यामध्ये फरक आहे. लक्ष्य सर्वांचे नंबर वनमध्ये येण्याचे आहे, कोणालाही बापदादांनी विचारले कि तुमचे ध्येय २१ जन्मांचे राज्यभाग्य घेण्याचे आहे, सूर्यवंशी बनण्याचे आहे कि चंद्रवंशी? तर सर्वजण कशामध्ये हात वर करतील? सूर्यवंशी मध्ये ना! असा कोणी आहे जो चंद्रवंशी बनू इच्छितो? कोणीच नाही. (एकाने हात वर केला) चांगले आहे, नाही तर ती सीट रिकामी राहील. तर लक्ष्य सर्वांचे खूप चांगले आहे, लक्ष्य आणि लक्षण यामध्ये समानता - त्यावर अटेन्शन देणे जरुरी आहे. त्याचे कारण काय आहे? जे आज ऐकवले कधी-कधी ‘लेवता’ बनतात. ‘असे व्हायला हवे, असे करायला हवे, यांनी मदत करायला हवी, हे बदलले तर मी बदलेन; हि गोष्ट ठीक झाली तर मी ठीक आहे’. हे झाले लेवता बनणे. हा दाता-पणा नाहीये. कोणी देवो अथवा न देवो, बाबांनी तर सर्वकाही दिले आहे. बाबांनी कोणाला थोडे दिले, कोणाला जास्त दिले, असे काही आहे का? एकच कोर्स आहे ना! मग ते ६० वर्षवाले असोत, किंवा एक महिन्यावाले असोत, कोर्स तर एकच आहे. का ६० वर्ष झालेल्यांचा कोर्स वेगळा आहे आणि एक महिना झालेल्यांचा कोर्स वेगळा आहे? त्यांनी देखील हाच कोर्स केला आणि आता देखील तोच कोर्स आहे. तेच ज्ञान आहे, तेच प्रेम आहे, त्याच सर्व शक्ती आहेत. सर्व काही एकसारखे आहे. एकाला १६ शक्ती, दुसऱ्याला ८ शक्ती असे नाही. सर्वांना एकसारखा वारसा आहे. तर बाबांनी जर सर्वांना भरपूर केले तर मग अशी भरपूर आत्मा दाता बनते, घेणारी नाही. मला द्यायचे आहे. कोणी देवो अथवा ना देवो, घेण्यासाठी इच्छुक नाही, देण्यासाठी इच्छुक. आणि जितके द्याल, दाता बनाल तितका खजिना वाढत जाईल. समजा तुम्ही कोणाला स्वमान (आदर) दिला, तर दुसऱ्यांना देणे अर्थात आपला स्वमान (आदर) वाढविणे आहे. देणे, देणे नसते परंतु ‘देणे’ अर्थात ‘घेणे’. घेऊ नका, द्या तर घेणे होईलच. तर समजले - काळाची हाक कोणती आहे? दाता बना. एक शब्द लक्षात ठेवा. काहीही झाले तरी “दाता” शब्द नेहमी लक्षात ठेवा. इच्छा मात्रम् अविद्या. ना सूक्ष्म घेण्याची इच्छा, ना स्थूल घेण्याची इच्छा. ‘दाता’ याचा अर्थच आहे - ‘इच्छा मात्रम् अविद्या’. संपन्न. कोणतीही अप्राप्ती अनुभव होणार नाही जी घेण्याची इच्छा होईल. सर्व प्राप्ती संपन्न. तर ध्येय काय आहे? संपन्न बनण्याचे आहे ना? का जितके मिळेल तितके चांगले? संपन्न बनणेच संपूर्ण बनणे आहे.

आज विदेशींना खास चान्स मिळाला आहे. चांगले आहे. पहिला चान्स विदेशवाल्यांनी घेतला आहे, लाडके झाले ना. सर्वाना मनाई केली आहे आणि विदेशींना निमंत्रण दिले आहे. बापदादांना आठवण तर सर्व मुलांची आहे तरीही डबल विदेशींना पाहून, त्यांची हिम्मत पाहून खुप आनंद होतो. आता वर्तमान समयी इतके डगमगत नाहीत. आता फरक पडला आहे. सुरुवातीला जे प्रश्न होते ना - ‘इंडियन कल्चर आहे, फॉरेन कल्चर आहे…’ आता लक्षात आले आहे. आता ब्राह्मण कल्चरमध्ये आले आहेत. ना इंडियन कल्चर, ना फॉरेन कल्चर, ब्राह्मण कल्चरमध्ये आले. इंडियन कल्चर थोडे कटकट करते परंतु ब्राह्मण कल्चर सहज-सोपे आहे ना! ब्राह्मण कल्चर आहेच मुळी - स्वमानामध्ये रहा आणि स्वराज्य अधिकारी बना. हेच ब्राह्मण कल्चर आहे. हे तर पसंत आहे ना? आता काही प्रश्न तर नाही ना, इंडियन कल्चर कसे जमणार, कठीण आहे? सोपे झाले ना? बघा, तिथे जाऊन म्हणाल - ‘हे थोडे कठीण आहे!’ तिथे जाऊन असे लिहू नका की, ‘सोपे तर म्हटले परंतु हे थोडे कठीण आहे!’ सोपे आहे कि थोडेसे अवघड आहे? जरा सुद्धा अवघड नाही. खूप सोपे आहे. आता सर्व खेळ संपले आहेत म्हणून हसू येते. आता पक्के झाले आहेत. बालपणीचे खेळ आता संपले आहेत. आता अनुभवी बनले आहेत आणि बापदादा बघत असतात कि जितके जुने पक्के होत जातात ना तर जे नवीन येतात ते देखील पक्के होतात. चांगले आहे, एकमेकांना चांगले पुढे घेऊन जातात. प्रयत्न चांगला करतात. आता दादींपाशी किस्से (मजेशीर गोष्टी) घेऊन जात नाही ना. किस्से, कहाण्या दादींकडे घेऊन जाता का? कमी झाले आहे! फरक आहे ना? (दादी जानकी यांना) तर आता तुम्ही आजारी पडू नका. किस्से, कहाण्यांमध्ये आजारी असायचा, त्या तर संपल्या आहेत. छान आहेत, सर्वांमध्ये चांगल्यात चांगला विशेष गुण आहे - मनाची स्वच्छता चांगली आहे. मनात ठेवत नाहीत, बाहेर काढतील. जी गोष्ट असेल, खरे बोलून टाकतील. ‘असे नाही, तसे…’. हे ‘असे आणि तसे’ करत बसत नाहीत, जी गोष्ट आहे ती बोलून टाकतात, हि विशेषता चांगली आहे. म्हणून बाबा म्हणतात - ‘सच्ची और साफ दिल पर बाप राज़ी होता है’. ‘हो’ तर हो, ‘नाही’ तर नाही. असे कधीच म्हणत नाहीत की, ‘बघूया…!’ जबरदस्तीने चालत नाहीत. चालतील तर पूर्ण, नाही तर नाही. अच्छा.

ज्या मुलांनी प्रेमपूर्वक आठवण पाठविली आहे, बापदादा त्या सर्व मुलांना, ज्यांनी पत्राद्वारे किंवा कोणाच्याही मार्फत प्रेमपूर्वक आठवण पाठविली आहे ती बापदादांनी स्वीकार केली. आणि बापदादा रिटर्नमध्ये सर्व मुलांना दाता-पणाचे वरदान देत आहेत. अच्छा! एका सेकंदामध्ये उडू शकता? पंख पॉवरफुल आहेत ना? बस, ‘बाबा’ म्हटले आणि उडाला. (ड्रिल)

चोहो बाजूंच्या सर्व श्रेष्ठ बाप समान दाता-पणाची भावना ठेवणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना, निरंतर आठवण आणि सेवेमध्ये तत्पर राहणाऱ्या परमात्म सेवेच्या साथी मुलांना, सदैव लक्ष्य आणि लक्षणाला समान बनविणाऱ्या, सदैव बाबांचे स्नेही आणि समान, समीप बनणाऱ्या बापदादांच्या नयनांचे तारे, सदैव विश्व कल्याणाच्या भावनेमध्ये राहणाऱ्या रहमदिल, मास्टर क्षमेचा सागर मुलांना, दूर बसणाऱ्या, मधुबनमध्ये खाली बसणाऱ्या आणि बापदादां समोर बसलेल्या सर्व मुलांना प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
हृदयामध्ये एका दिलारामला सामावून एकाकडून सर्व संबंधांची अनुभूती करणारे संतुष्ट आत्मा भव

नॉलेजला आत्मसात करण्याचे स्थान बुद्धी आहे परंतु माशूकला सामावून घेण्याचे स्थान हृदय आहे. काही-काही आशिक जास्त डोकं चालवतात परंतु बापदादा सच्च्या दिलावर राजी आहेत त्यामुळे हृदयाचा अनुभव हृदयाला कळतो, दिलाराम जाणे. जे अंतःकरणा पासून सेवा करतात किंवा आठवण करतात त्यांना मेहनत कमी आणि संतुष्टता जास्त मिळते. असे अंतःकरणावाले (दिलवाले) सदैव संतुष्टतेची गाणी गातात. त्यांना समया नुसार एकाकडून सर्व संबंधांची अनुभूती होते.

सुविचार:-
अमृतवेलेला प्लेन-बुद्धी होऊन बसा तर सेवेच्या नवीन विधी टच होतील.