03-04-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


प्रश्न:-
श्रेष्ठ भाग्याचा मुख्य आधार कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे?

उत्तर:-
आठवणीच्या यात्रेवर. जो जितकी जास्त आठवण करतो, तितके श्रेष्ठ भाग्य बनवतो. शरीर निर्वाह अर्थ कर्म करत असताना बाबांची आणि वारशाची आठवण करत रहा तर भाग्य श्रेष्ठ बनत जाईल.

गीत:-
तकदीर जगाकर आई हूँ…

ओम शांती।
मुले जेव्हा जन्माला येतात तेव्हा आपल्या सोबत कर्मानुसार नशीब घेऊन येतात. कोणी श्रीमंताकडे, कोणी गरिबाकडे जन्म घेतात. वडिलांनाही समजते की वारस आला आहे. जसे-जसे दान-पुण्य केले आहे, त्यानुसार जन्म मिळतो. आता तुम्हा गोड-गोड लाडक्या मुलांना कल्पानंतर पुन्हा एकदा बाबांनी येऊन समजावून सांगितले आहे. मुले देखील जाणतात की आपण आपले भाग्य घेऊन आलो आहोत. स्वर्गाच्या बादशाहीचे भाग्य घेऊन आलो आहोत, ज्यांनी चांगल्या प्रकारे ओळखले आहे आणि बाबांची आठवण करत आहेत. आठवणीशी भाग्याचा संबंध आहे. जन्म घेतला आहे - तर बाबांची आठवण देखील असायलाच हवी. जितकी आठवण कराल, तितके भाग्य श्रेष्ठ असेल. किती सोपी गोष्ट आहे. सेकंदामध्ये जीवनमुक्ती मिळून जाते. तुम्ही आला आहात सुखधामाचे भाग्य प्राप्त करण्यासाठी. आता प्रत्येक जण पुरुषार्थ करत आहेत. प्रत्येक जण स्वतःला बघत आहे की आपण कसा पुरुषार्थ करत आहोत. जसा मम्मा-बाबा आणि सेवाभावी मुले पुरुषार्थ करतात त्यांना फॉलो केले पाहिजे. सर्वांना बाबांचा परिचय दिला पाहिजे. बाबांचा परिचय दिला की रचनेच्या आदि-मध्य-अंताचा सुद्धा त्यात येईल. ऋषी, मुनी इत्यादी कोणीही रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज देऊ शकत नाहीत. आता तुमच्या बुद्धीमध्ये संपूर्ण चक्र लक्षात राहते. दुनियेमध्ये कोणीही बाबांना आणि वारशाला जाणत नाहीत. तुम्ही मुले आता बाबांना आणि आपल्या भाग्याला जाणता. आता बाबांची आठवण करायची आहे. शरीर निर्वाह अर्थ कर्म सुद्धा करायचे आहे. घरदार सुद्धा सांभाळायचे आहे. कोणी निर्बंधन आहेत तर ते चांगली सेवा करू शकतात. मुले-बाळे कोणीच नसतील तर त्यांना सेवा करण्याचा चांगला चान्स आहे. स्त्रीला पती किंवा मुलांचे बंधन असते. जर मुले नसतील तर बंधनमुक्त झाल्या ना. ते जणू वानप्रस्थी झाले. मग मुक्तीधाममध्ये जाण्यासाठी चांगला संग पाहिजे. भक्तीमार्गामध्ये तर संग मिळतो - साधू इत्यादींचा, निवृत्ती मार्ग वाल्यांचा. ते निवृत्ती मार्गवाले प्रवृत्ती मार्गाचा वारसा देऊ शकत नाहीत. तुम्ही मुलेच देऊ शकता. तुम्हाला बाबांनी रस्ता सांगितला आहे. भारताचा ८४ जन्मांचा इतिहास-भूगोल बसून समजावून सांगा. भारतवासीच ८४ जन्म घेतात. एकाची गोष्ट नाहीये. सूर्यवंशी सो मग चंद्रवंशी, मग वैश्यवंशी... घराण्यामध्ये येतात, नंबरवार तर असतातच ना. भारताचा पहिल्या नंबरचा प्रिन्स आहे - श्रीकृष्ण, ज्याला पाळण्यात झुलवतात. दुसऱ्या नंबरला झुलवतच नाहीत कारण कला (शक्ती) कमी झाली. जो पहिला नंबर आहे, त्याचीच पूजा होते. मनुष्यांना समजत नाही की श्रीकृष्ण एक आहे की दोन-तीन आहेत. श्रीकृष्णाची डिनायस्टी (घराणे) चालते, हे कोणालाच ठाऊक नाहीये. पूजा फक्त नंबर वनची होते. मार्क्स तर नंबरवारच मिळतात. तर पुरुषार्थ केला पाहिजे की, का नाही आपण पहिल्या नंबरमध्ये यावे. मम्मा-बाबांना फॉलो करावे, त्यांची राजधानी प्राप्त करावी. जे चांगली सेवा करतील ते चांगल्या महाराजाच्या घरी जन्म घेतील. तिथे तर आहेतच महाराजा-महाराणी. त्याकाळात कोणते राजा-राणीचे टायटल नसते. ते नंतर सुरू होते. द्वापर पासून जेव्हा पतित बनतात तेव्हा त्यांच्यामध्ये मोठी संपत्ती असणाऱ्याला ‘महाराजा’ म्हटले जाते मग राजाची उपाधी कमी होते. नंतर मग जेव्हा भक्तीमार्ग सुरू होतो तेव्हा गरीब, श्रीमंतामध्ये फरक तर असतोच ना. आता तुम्ही मुलेच शिवबाबांची आठवण करता आणि त्यांच्याकडून वारसा घेत आहात. इतर सत्संगांमध्ये मनुष्य बसून कथा ऐकवतात, मनुष्य, मनुष्याला भक्ती शिकवतात. ते ज्ञान देऊन सद्गती करू शकत नाहीत. वेद, शास्त्रे इत्यादी सर्व आहेत भक्तीमार्गाची. सद्गती तर ज्ञानानेच होते. पुनर्जन्मालाही मानतात. असे मधूनच काही कोणी घरी परत जाऊ शकत नाही. शेवटीच बाबा येऊन सर्वांना घेऊन जातात. एवढे सर्व आत्मे कुठे जाऊन थांबतील? सर्व धर्मांचे सेक्शन तर वेगवेगळे आहेत ना. तर हे देखील समजावून सांगायचे आहे. हे कोणालाही माहीत नाही आहे की आत्म्यांचे देखील झाड आहे. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये संपूर्ण झाडाचे ज्ञान राहते. आत्म्यांचे झाड देखील आहे, जीव आत्म्यांचे सुद्धा झाड आहे. मुले जाणतात की आपण हे जुने शरीर सोडून घरी जात आहोत. “मी आत्मा” या शरीरापासून वेगळी आहे - हे समजणे म्हणजे जणू जिंवतपणी मरणे. ‘आप मुये मर गई दुनिया’ (आपण मेल्यावर जग मेले). मित्र, नातेवाईक इत्यादी सर्वांना सोडले. आधी पूर्ण शिक्षण घेऊन पदाचे अधिकारी बनून मग जायचे आहे. बाबांची आठवण करणे तर खूप सोपे आहे. भले कोणी आजारी असो, त्यांना देखील सांगत राहिले पाहिजे की शिवबाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. जे पक्के योगी आहेत त्यांच्यासाठी लवकर मरणे (शरीर सोडणे) देखील चांगले नाही; कारण ते योगामध्ये राहून रूहानी सेवा करतात. मरून गेले तर सेवा करू शकणार नाहीत. सेवा केल्याने स्वतःचे उच्च पद बनवत राहतील आणि भाऊ-बहिणींची सेवा देखील होईल. ते देखील बाबांकडून वारसा प्राप्त करून घेतील. आपण आपापसामध्ये भाऊ-भाऊ आहोत, एकाच बाबांची मुले आहोत.

बाबा म्हणतात - माझी आठवण करा म्हणजे विकर्म विनाश होतील. आधीही असेच म्हटले होते. कोणालाही समजावून सांगू शकता की, अहो ताई किंवा दादा, तुमची आत्मा तमोप्रधान बनली आहे. जी सतोप्रधान होती ती आता पुन्हा तमोप्रधान पासून सतोप्रधान बनून सतोप्रधान दुनियेमध्ये जायचे आहे. आत्म्याला सतोप्रधान बनवायचे आहे आठवणीच्या यात्रेद्वारे. आठवणीचा पूर्ण चार्ट ठेवला पाहिजे. ज्ञानाचा चार्ट ठेवू शकणार नाही. बाबा तर ज्ञान देतच राहतात. तपासणी करायची आहे की, आपल्यावर जे विकर्मांचे ओझे आहे, ते कसे उतरेल म्हणूनच आठवणीचा चार्ट ठेवला जातो. आपण किती तास आठवण केली? मूलवतनला देखील आठवण करतो आणि मग नवीन दुनियेलाही आठवण करतो. उलथापालथ होणार आहे. त्याची देखील तयारी होत आहे. बॉम्ब्स इत्यादी देखील बनत जातील. एकीकडे म्हणतात की आम्ही असे-असे मृत्यूसाठी सामान बनवत आहोत. दुसरीकडे म्हणतात मृत्यूचे सामान बनवू नका. समुद्राच्या तळाला सुद्धा मारण्याचे सामान ठेवले आहे, वर येऊन बॉम्ब्स टाकून पुन्हा समुद्रामध्ये निघून जातील. अशा प्रकारच्या वस्तू बनवत राहतात. हे आपल्याच विनाशासाठी करत आहेत. मृत्यू समोर उभा आहे. इतके मोठे-मोठे बंगले बनवत आहेत. तुम्ही जाणता की हे सर्व मातीत मिसळणार आहे. ‘किनकी दबी रही धूल में…’ युद्ध जरूर होणार. प्रयत्न करून सर्वांचे खिसे रिकामे करतील. चोर सुद्धा किती घुसतात. युद्धावर किती खर्च करतात. हे सर्व मातीत मिसळणार आहे. घरे इत्यादी सर्व कोसळतील. बॉम्ब्स इत्यादी पडल्याने सृष्टीचे ३ भाग खलास होतात. बाकी एक भाग वाचतो. भारत एका भागामध्ये आहे ना. बाकी तर सर्व नंतर आलेले आहेत. आता फक्त भारत खंडाचाच भाग वाचेल. मृत्यू तर सर्वांचा होणारच आहे तर मग का नाही आपण बाबांकडून पूर्ण वारसा घ्यावा म्हणूनच बाबा म्हणतात - लौकिक नातेवाईकांशी देखील तोड निभावायची आहे. बाकी बंधन नसेल तर बाबा सल्ला देतील की तुम्ही सेवेला का लागत नाही स्वतंत्र आहात तर अनेकांचे भले करू शकता. अच्छा बाहेर कुठे गेला नाहीत तर आपल्या मित्र-नातेवाईकांवरच दया केली पाहिजे. आधी म्हणत होता ना की, ‘बाबा, दया करा’. आता तर तुम्हाला रस्ता मिळाला आहे तर इतरांवरही दया केली पाहिजे, जसे बाबा दया करतात. बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. संन्यासी लोक तर हठयोग इत्यादीची किती मेहनत करतात. इथे तर हे काहीच नाही. फक्त आठवण करा म्हणजे पापे भस्म होतील, यामध्ये कसलाच त्रास नाही. फक्त आठवणीच्या यात्रेची गोष्ट आहे. उठा-बसा, कर्मेंद्रियांनी भले कर्म देखील करा, फक्त बुद्धीचा योग बाबांसोबत लावा. त्या माशुकचा सच्चा-सच्चा आशिक बनायचे आहे. ते स्वतः म्हणतात की, माझ्या आशिकांनो, माझ्या मुलांनो! भक्तीमार्गामध्ये तर खूप आठवण केली. परंतु आता मज माशुकाची आठवण करा तर तुमची पापे भस्म होतील. मी गॅरंटी करतो. काही-काही गोष्टी शास्त्रांमध्ये आल्या आहेत. भगवंता द्वारे गीता ऐकल्याने तुम्ही जीवनमुक्ती प्राप्त करता. मनुष्या द्वारे गीता ऐकल्याने तुम्ही जीवनबंधनामध्ये आला आहात, शिडी उतरत आला आहात. प्रत्येक गोष्टीवर विचार सागर मंथन करायचे आहे. स्वतःची बुद्धी चालवायची आहे. ही बुद्धीची यात्रा आहे, ज्याद्वारे विकर्म विनाश होतील. वेद, शास्त्र, यज्ञ, तप इत्यादी केल्याने पापे नष्ट होणार नाहीत. खालीच घसरत आला आहात. आता तुम्हाला वर जायचे आहे. फक्त शिडीच्या चित्रावरून कोणी समजू शकणार नाही, जोपर्यंत त्यावर कोणी समजावून सांगत नाही. जसे लहान मुलाला चित्र दाखवून शिकवावे लागते - हा हत्ती आहे. जेव्हा हत्ती बघेल तेव्हा त्याला चित्र देखील आठवेल. जसे तुमच्या बुद्धीमध्ये आले आहे. चित्रामध्ये नेहमी कोणतीही गोष्ट छोट्या आकारामध्ये दाखवली जाते. तुम्ही जाणता की वैकुंठ तर मोठे असेल ना. मोठी राजधानी असेल. तिथे हिरे-माणकांचे महाल असतात, ते मग प्रायः लोप होतात. सर्व गोष्टी नाहीशा होतात. नाहीतर हा भारत गरीब कसा झाला? श्रीमंतापासून गरीब, गरिबापासून श्रीमंत बनायचे आहे. हा ड्रामा पूर्व नियोजित आहे म्हणूनच शिडीच्या चित्राद्वारे समजावून सांगितले जाते, नवीन-नवीन जे येतात त्यांना समजावून सांगितल्याने प्रॅक्टिस होईल, बोलणे सुधारेल. मुलांना सेवा लायक बनवले जाते. बऱ्याच सेंटर्सवर तर खूप मुले अशांती पसरवत राहतात. बुद्धि-योग बाहेर भटकतो त्यामुळे नुकसान करतात. वातावरण खराब करतात. नंबरवार तर आहेत ना. मग बाबा म्हणतील तू शिकला नाहीस, तर आता आपली ही अवस्था बघ. दिवसेंदिवस जास्तच साक्षात्कार होत राहतील. पाप करणाऱ्यांना शिक्षा देखील मिळत राहील. मग म्हणतील - विनाकारण आपण पाप केले. बाबांना सांगून प्रायश्चित्त घेतल्याने काही प्रमाणात कमी होऊ शकते. नाहीतर वृद्धी होत राहील. असे होत राहते. स्वतः देखील अनुभव करतील परंतु मग म्हणतात - ‘काय करू, माझी ही सवय जात नाही, यापेक्षा तर घरी जाऊन राहावे’. काही जण तर चांगली सेवा करतात. काही जण डिस-सर्व्हीस सुद्धा करतात. आपल्या सेनेमध्ये कोण-कोण बहादूर आहेत, ते बाबा बसून नावे सांगतात. बाकी लढाई इत्यादीची इथे गोष्ट नाहीये. या आहेत बेहदच्या गोष्टी. चांगली मुले असतील तर बाबा नक्कीच महिमा देखील करतील. मुलांनी खूप दयाळू, कल्याणकारी बनायचे आहे. आंधळ्यांची काठी बनायचे आहे. सर्वांना रस्ता सांगायचा आहे की बाबांची आठवण करा म्हणजे विकर्म विनाश होतील. ‘पाप आत्मा’ आणि ‘पुण्य आत्मा’ असे म्हणतात ना. असे थोडेच आहे की आतमध्ये परमात्मा आहे किंवा आत्माच कोणी परमात्मा बनते. हे सर्व चुकीचे आहे. परमात्म्याला थोडेच पाप लागते. त्यांचा तर ड्रामामध्ये सेवा करण्याचा पार्ट आहे. मनुष्यच पापात्मा, पुण्यात्मा बनतात. जे सतोप्रधान होते तेच तमोप्रधान बनले आहेत. बाबा त्यांच्या शरीरामध्ये बसून सतोप्रधान बनवत आहेत तर त्यांच्या मतावर चालावे लागेल ना.

आता बाबांनी तुम्हा मुलांना विशाल-बुद्धी बनवले आहे. आता तुम्ही जाणता की राजधानी कशी स्थापन होत आहे. बाबाच ब्रह्मा बाबांच्या तनामध्ये येऊन ब्रह्मा मुख वंशावली मुलांना राजयोग शिकवून देवी-देवता बनवतात. मग पुनर्जन्म घेऊन शिडी उतरतात. आता पुन्हा सर्व रिपीट करायचे आहे. बाबा पुन्हा ब्रह्माद्वारे स्थापना करून घेत आहेत. योगबलाने ५ विकारांवर विजय मिळवून तुम्ही जगतजीत बनता. बाकी युद्ध इत्यादीची काही गोष्ट नाहीये. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बंधनमुक्त बनून बाबांच्या सेवेमध्ये लागायचे आहे, तेव्हाच श्रेष्ठ भाग्य बनेल. दयाळू बनून अनेकांना रस्ता सांगायचा आहे. आंधळ्यांची काठी बनायचे आहे.

२) या शरीरामधून मोह काढून जिवंतपणी मरायचे आहे कारण आता परत घरी जायचे आहे. आजारपणात देखील एका बाबांची आठवण रहावी तेव्हाच विकर्म विनाश होतील.

वरदान:-
कल्याणाच्या भावने द्वारे प्रत्येक आत्म्याच्या संस्कारांना परिवर्तन करणारे निश्चयबुद्धी भव

जसे बाबांच्या बाबतीत १०० टक्के निश्चयबुद्धी आहात, कोणी कितीही विचलित करण्याचा प्रयत्न करेल परंतु ते शक्य होणार नाही, तसेच दैवी परिवाराकडून अथवा संसारी आत्म्यांद्वारे जरी कोणी कशीही परीक्षा घेवो, क्रोधी बनून सामना करो किंवा कोणी इनसल्ट करो, शिवीगाळ करो - तरी देखील विचलित
होऊ शकणार नाही, यामध्ये फक्त प्रत्येक आत्म्याप्रती कल्याणाची भावना असावी, ही भावना त्यांच्या संस्कारांना परिवर्तन करेल. यामध्ये फक्त अधीर व्हायचे नाही, समयानुसार फळ अवश्य निघेल - ही ड्रामाची नोंद आहे.

बोधवाक्य:-
पवित्रतेच्या शक्तीद्वारे आपल्या संकल्पांना शुद्ध, ज्ञान स्वरूप बनवून कमजोरींना समाप्त करा.

हे अव्यक्त इशारे - महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.

वाणीमध्ये सदैव सत्यता आणि मधुरता असेल तर वाणीचे मार्क्स जमा होत राहतील. मधुरतेचा गुण जर जीवनात असेल तर प्रत्येक बोल मोती समान होतील. असे वाटेल की हे जणू बोलत नाही आहेत तर मोत्यांचा वर्षाव होत आहे. ते असे बोल बोलतील की ऐकणारे विचार करतील की असे बोल आपण सुद्धा बोलावेत. सर्वांना असे बोल ऐकून शिकण्याची, फॉलो करण्याची प्रेरणा मिळेल. असे मधुर बोलाचे व्हायब्रेशन सर्वांना स्वतःहून आकर्षित करते.