04-11-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आपल्यातील अवगुणांना काढून टाकायचे असेल तर खऱ्या मनाने बाबांना सांगा, बाबा तुम्हाला त्या अवगुणांना काढून टाकण्याची युक्ती सांगतील’’

प्रश्न:-
बाबांचा करंट (शक्ती) कोणत्या मुलांना मिळतो?

उत्तर:-
जी मुले इमानदारीने सर्जनला आपला आजार सांगतात, बाबा त्यांना दृष्टी देतात. बाबांना त्या मुलांची खूप दया येते. आतून वाटते की या मुलाचे हे भूत निघून जावे. बाबा त्यांना करंट देतात.

ओम शांती।
बाबा मुलांना विचारत राहतात. प्रत्येक मुलाने स्वतःला विचारायचे आहे की, बाबांकडून काही मिळाले? कोणत्या गोष्टींची कमतरता आहे? प्रत्येकाने स्वतःमध्ये डोकावून पहायचे आहे. ज्याप्रमाणे नारदाचे उदाहरण आहे, त्याला म्हटले - ‘तू तुझे तोंड आरशात तर बघ - लक्ष्मीला वरण्यालायक आहे?’ तर बाबा देखील तुम्हा मुलांना विचारत आहेत - ‘काय समजता, लक्ष्मीला वरण्या लायक बनले आहात? जर नसाल तर कोण-कोणते अवगुण आहेत? ज्यांना काढून टाकण्यासाठी मुले पुरुषार्थ करतात. अवगुणांना काढून टाकण्याचा पुरुषार्थ करता का करतच नाही? काही जण तर पुरुषार्थ करत राहतात. नवीन मुलांना हे समजावून सांगितले जाते - आपल्यामध्ये पहा कोणता अवगुण तर नाही ना? कारण तुम्हा सर्वांना परफेक्ट बनायचे आहे. बाबा येतातच परफेक्ट बनविण्यासाठी म्हणून एम ऑब्जेक्टचे चित्र (लक्ष्मी-नारायणाचे चित्र) देखील समोर ठेवले आहे. आपल्या मनाला विचारा आपण यांच्यासारखे परफेक्ट बनलो आहोत? ते भौतिक शिक्षण शिकवणारे टीचर इत्यादी तर यावेळी सर्व विकारी आहेत. हे लक्ष्मी-नारायण संपूर्ण निर्विकारी असल्याचा नमुना आहे. अर्धा कल्प तुम्ही यांची महिमा केली आहे. तर आता स्वतःला विचारा - माझ्यामध्ये कोण-कोणते अवगुण आहेत, ज्यांना काढून टाकून मी आपली उन्नती करु शकतो? आणि बाबांना सांगा की, ‘बाबा, माझ्यामध्ये हा अवगुण आहे, जो मला काढता येत नाहीये, काही उपाय सांगा’. रोग केवळ सर्जनद्वारेच बरा होऊ शकतो. काही-काही सहाय्यक सर्जन देखील हुशार असतात. डॉक्टरकडून कंपाउंडर शिकतात, हुशार डॉक्टर बनतात. तर इमानदारीने आपली तपासणी करा - माझ्यामध्ये काय-काय अवगुण आहेत? ज्या कारणामुळे मी समजतो की, हे पद मी प्राप्त करू शकणार नाही. बाबा तर म्हणतील ना - ‘तू यांच्यासारखा बनू शकतोस’. अवगुण सांगाल तेव्हाच तर बाबा सल्ला देतील. रोग तर अनेक आहेत. बऱ्याच जणांमध्ये अवगुण आहेत. कोणामध्ये खूप क्रोध आहे, लोभ आहे… मग त्यांना ज्ञानाची धारणा होऊ शकत नाही, जेणेकरून कोणाला धारणा करवू शकतील. बाबा दररोज खूप समजावून सांगतात. खरे तर इतके समजावून सांगण्याची गरजही वाटत नाही. मंत्राचा अर्थ बाबा समजावून सांगतात. पिता तर एकच आहेत. बेहदच्या बाबांची आठवण करायची आहे आणि त्यांच्याकडून हा वारसा प्राप्त करून आपल्याला असे बनायचे आहे. इतर शाळांमध्ये ५ विकारांना जिंकण्याची गोष्टच नसते. ही गोष्ट आताच होते जेव्हा बाबा येऊन समजावून सांगतात. तुमच्यामध्ये जी भुते आहेत, जी दुःख देतात, ती स्पष्टपणे सांगाल तर त्यांना काढून टाकण्याची बाबा युक्ती सांगतील. ‘बाबा, ही-ही भूते मला हैराण करतात’. भूत काढणाऱ्याला स्पष्टपणे सांगितले जाते ना. तुमच्यामध्ये काही ते भूत नाहीये. तुम्ही जाणता ही ५ विकार रुपी भूते जन्म-जन्मांतरीची आहेत. पाहिले पाहिजे माझ्यामध्ये कोणते भूत आहे? त्याला काढण्यासाठी मग सल्ला घेतला पाहिजे. डोळे देखील खूप धोका देणारे आहेत, यासाठी बाबा म्हणतात - ‘स्वतःला आत्मा समजून इतरांना देखील आत्मा समजण्याची प्रॅक्टिस करा’. या युक्तीने तुमचा हा रोग निघून जाईल. आपण सर्व आत्मे आहोत तर आत्मा भाऊ-भाऊ झालो; शरीर तर नाही. हे देखील जाणता आपण सर्व आत्मे परत जाणार आहोत. तर स्वतःला पहायचे आहे - मी सर्वगुण संपन्न बनलो आहे? नाहीतर माझ्यामध्ये कोणते अवगुण आहेत का? तर बाबा देखील त्या आत्म्याला बसून पाहतात, याच्यामध्ये हे अवगुण आहेत तर त्याला करंट देतील. या मुलाचे हे विघ्न निघून जावे. जर सर्जन पासूनच लपवत रहाल तर मग करू तरी काय शकणार? तुम्ही आपले अवगुण सांगत रहाल तर बाबा देखील सल्ला देतील. जसे तुम्ही आत्मे बाबांची आठवण करता - ‘बाबा, तुम्ही किती गोड आहात! आम्हाला कोणापासून कोण बनवता!’ बाबांची आठवण करत रहाल तर भूते पळून जात राहतील. कोणते ना कोणते भूत आहे जरूर. बाबा सर्जनला सांगा, ‘बाबा, आम्हाला यासाठी युक्ती सांगा’. नाही तर खूप नुकसान होईल, सांगितल्याने बाबांना देखील दया वाटेल - ही मायेची भूते यांना त्रास देत आहेत. भुतांना पळवून लावणारे तर एक बाबाच आहेत. युक्तीने पळवून लावतात. समजावून सांगितले जाते - ‘या ५ भूतांना पळवून लावा’. तरीही सर्वच भूते काही पळून जात नाहीत. कोणामध्ये एखादे खास भूत राहून जाते, कोणामध्ये कमी असतात. परंतु भूते आहेत जरूर. बाबा पाहतात यांच्यामध्ये हे भूत आहे. दृष्टी देताना आतमध्ये विचार चालतो ना. हा तर खूप चांगला बच्चा आहे आणि बाकीचेपण सर्व चांगले-चांगले गुण याच्यामध्ये आहेत परंतु बोलत काहीच नाही, कोणाला ज्ञान समजावून सांगू शकत नाही. मायेने जसाकाही गळा बंद केला आहे, याचा गळा उघडला तर इतरांची देखील सेवा करू लागेल. दुसऱ्यांचीच सेवा करताना मग आपली सेवा, शिवबाबांची सेवाच करत नाहीत. शिवबाबा स्वतः सेवा करण्याकरिता आले आहेत, ते म्हणतात - ‘या जन्म-जन्मांतरीच्या भुतांना पळवून लावायचे आहे’.

बाबा बसून समजाऊन सांगत आहेत - हे देखील जाणता झाड हळूहळू वृद्धीला प्राप्त होते. पाने झडत राहतात. माया विघ्न टाकते. बसल्या-बसल्या विचार बदलतात. ज्याप्रमाणे संन्याशांना घृणा उत्पन्न होते तर एकदम गायबच होतात. ना कोणते कारण, ना काही बोलणे. कनेक्शन तर सर्वांचे बाबांसोबत आहे. मुले तर नंबरवार आहेत. ते देखील बाबांना खरे सांगतील तर त्या उणिवा दूर होऊ शकतात आणि उच्च पद प्राप्त करू शकतात. बाबा जाणतात, बरेचजण तर न सांगितल्यामुळे स्वतःचे खूप नुकसान करून घेतात. कितीही समजावून सांगा परंतु नको तेच काम करू लागतात. माया पकडते. माया रुपी अजगर आहे, सर्वांना पोटामध्ये घालून बसली आहे. दलदलीमध्ये गळ्यापर्यंत अडकलेले आहेत. बाबा किती समजावून सांगतात. इतर कोणती गोष्ट नाही फक्त एवढेच बोला की, ‘दोन पिता आहेत. एक लौकिक पिता तर सदैव मिळतोच, सतयुगामध्ये देखील मिळतो तर कलियुगामध्ये सुद्धा मिळतो. असे नाही की सतयुगामध्ये मग पारलौकिक पिता मिळतो. पारलौकिक पिता तर एकदाच येतात. पारलौकिक पिता येऊन नरकाला स्वर्ग बनवितात. त्यांची भक्ती मार्गामध्ये किती पूजा करतात. आठवण करतात. शिवाची मंदिरे तर भरपूर आहेत. मुले म्हणतात सेवाच नाही आहे. अरे, शिवाची मंदिरे तर जिकडे-तिकडे आहेत, तिथे जाऊन तुम्ही त्यांना विचारू शकता की, ‘यांची पूजा तुम्ही का करता? हे काही शरीरधारी तर नाही आहेत. हे आहेत कोण?’ तर म्हणतील - ‘परमात्मा’. असे यांच्या शिवाय इतर कोणाला म्हणणार नाहीत. तर बोला हे परमात्मा पिता आहेत ना. त्यांना खुदा देखील म्हणतात, अल्लाह सुद्धा म्हणतात. जास्त करून परमपिता परमात्मा म्हटले जाते, त्यांच्याकडून काय मिळणार आहे, हे काही माहित आहे का? भारतामध्ये शिवाचे नाव तर खूप घेतात; शिवजयंती उत्सव देखील साजरा करतात. कोणालाही समजावून सांगणे खूप सोपे आहे. बाबा भिन्न-भिन्न प्रकारे समजावून तर खूप सांगत राहतात. तुम्ही कोणाकडेही जाऊ शकता. परंतु खूप शांतीने, नम्रतेने बोलायचे आहे. तुमचे नाव तर भारतामध्ये खूप पसरलेले आहे. थोडे जरी बोललात तरी लगेच समजतील - हे बी.के. आहेत. गावच्या ठिकाणी तर खूप भोळी लोकं आहेत. तर मंदिरांमध्ये जाऊन सेवा करणे खूप सोपे आहे - ‘या, तर आम्ही तुम्हाला शिवबाबांची जीवन कहाणी ऐकवितो. तुम्ही शिवाची पूजा करता, त्यांच्याकडे काय मागता? आम्ही तर तुम्हाला यांची पूर्ण जीवन कहाणी सांगू शकतो’. दुसऱ्या दिवशी मग लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरामध्ये जा. तुमच्यामध्ये स्फूर्ती असते. मुलांना वाटते खेड्यापाड्यामध्ये सेवा करावी. सर्वांची आपापली समज आहे ना. बाबा म्हणतात - सर्वात पहिले शिवाच्या मंदिरामध्ये जा. नंतर मग लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरामध्ये जाऊन विचारा - यांना हा वारसा कसा मिळाला आहे? या, तर आम्ही तुम्हाला या देवी-देवतांच्या ८४ जन्मांची कथा ऐकवतो. गावातल्यांना देखील जागे करायचे आहे. तुम्ही जाऊन जर प्रेमाने समजावून सांगाल की, ‘तुम्ही आत्मा आहात, आत्माच बोलते, हे शरीर तर नष्ट होणार आहे. आता आम्हा आत्म्यांना पावन बनून बाबांकडे जायचे आहे. बाबा म्हणतात - माझी आठवण करा’. तर ऐकल्यानेच त्यांना आकर्षण वाटेल. जितके तुम्ही देही-अभिमानी बनाल तितकी तुमच्यामध्ये आकर्षकता येईल. आता इतके या देह इत्यादीपासून, जुन्या दुनियेपासून पूर्णत: वैराग्य आलेले नाही आहे. हे तर जाणता, हे जुने शरीर सोडायचे आहे, याच्यामध्ये कसला मोह ठेवायचा. शरीर असतानाही शरीरामध्ये कोणताही मोह असता कामा नये. आतमध्ये हीच चिंता लागून रहावी की, आता आपण आत्म्यांनी पावन बनून आपल्या घरी जावे. मग ही देखील इच्छा होते - अशा बाबांना सोडायचे कसे? असे बाबा तर पुन्हा कधीच भेटणार नाहीत. तर अशा प्रकारचे विचार केल्याने बाबांची देखील आठवण येईल, घराची देखील आठवण येईल. आता आपण घरी जातो. ८४ जन्म पूर्ण झाले. भले दिवसाचा आपला धंदा इत्यादी करा, गृहस्थ व्यवहारामध्ये तर रहायचेच आहे. त्यामध्ये राहत असताना देखील तुम्ही बुद्धीमध्ये हे ठेवा की, हे तर सर्व काही नष्ट होणार आहे. आता आपल्याला परत आपल्या घरी जायचे आहे. बाबांनी सांगितले आहे - गृहस्थ व्यवहारामध्ये देखील जरूर रहायचे आहे. नाही तर कुठे जाणार? धंदा इत्यादी करा, बुद्धीमध्ये हे लक्षात रहावे - हे तर सर्व काही विनाश होणार आहे. पहिले आपण घरी जाणार आणि मग सुखधाममध्ये येणार. जेव्हापण वेळ मिळेल तेव्हा स्वतःशीच गप्पा मारायच्या आहेत. खूप वेळ आहे, ८ तास धंदा इत्यादी करा. ८ तास आराम सुद्धा करा. बाकी ८ तास बाबांसोबत ही रूहरिहान करून (आत्मिक गप्पा करून) नंतर मग जाऊन सेवा करायची आहे. जितका पण वेळ मिळेल शिवबाबांच्या मंदिरामध्ये, लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरामध्ये जाऊन सेवा करा. मंदिरे तर तुम्हाला खूप मिळतील. तुम्ही कुठेही जाल तर शिवाचे मंदिर जरूर असेल. तुम्हा मुलांसाठी मुख्य आहे आठवणीची यात्रा. व्यवस्थित आठवणीमध्ये रहाल तर तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळू शकते. प्रकृती दासी बनते. त्यांचा चेहरा इत्यादी देखील असा आकर्षित करणारा असतो, काहीही मागण्याची गरज नाही. संन्याशांमध्ये देखील काहीजण एकदम पक्के असतात. बस्स, असे काही निश्चयाने बसतात की, ‘आम्ही ब्रह्म मध्ये जाऊन लीन होणार’. या निश्चयामध्ये खूप पक्के असतात. त्यांना अभ्यास असतो, आपण या शरीराला सोडून जातो. परंतु ते तर आहेत चुकीच्या मार्गावर. खूप मेहनत करतात ब्रह्ममध्ये लीन होण्यासाठी. भक्तीमध्ये साक्षात्कारासाठी किती मेहनत करतात. जीवन सुद्धा देतात. ‘आत्म’घात काही होत नाही, ‘जीव’घात होतो. आत्मा तर आहेच, ती जाऊन दुसरे जीवन अर्थात शरीर घेते.

तर तुम्ही मुलांनी सेवेची खूप चांगली आवड ठेवा तर बाबा देखील आठवतील. इथे देखील मंदिरे भरपूर आहेत. तुम्ही पूर्णपणे योगमध्ये राहून कोणालाही काहीही सांगाल, तर कोणताही अवांतर विचार येणार नाही; तर योग असणाऱ्याचा बाण पूर्णत: लागतो (ज्ञान मनाला भिडते). तुम्ही खूप सेवा करू शकता. प्रयत्न करून पहा, परंतु अगोदर आपल्या मनामध्ये पहायचे आहे - माझ्यामध्ये कोणते मायेचे भूत तर नाही ना? मायेची भूते असणारे थोडेच यशस्वी होऊ शकतील. सेवा तर पुष्कळ आहे. बाबा (ब्रह्मा बाबा) तर जाऊ शकत नाहीत ना, कारण बाबा सोबत आहेत. बाबांना (शिवबाबांना) मी कुठे कचऱ्यामध्ये घेऊन जाणार! कोणा सोबत बोलणार! बाबा तर फक्त मुलांशीच बोलू इच्छितात. तर मुलांनी सेवा करायची आहे. गायन देखील आहे - ‘सन शोज फादर’. बाबांनी मुलांना हुशार तर बनवले ना. चांगली-चांगली मुले आहेत ज्यांना सेवेची आवड असते. म्हणतात आम्ही खेड्यापाड्यात जाऊन सेवा करणार. बाबा म्हणतात - भले करा. फक्त फोल्डिंगची चित्रे सोबत असावीत. चित्रांशिवाय कोणालाही समजावून सांगणे अवघड वाटते. रात्रं-दिवस हाच विचार असतो - आपण इतरांचेही जीवन कसे बनवायचे? आपल्यामध्ये जे अवगुण आहेत त्यांना कसे दूर करून, आपली उन्नत्ती करावी. तुम्हाला आनंद देखील होतो. बाबा हा ८-९ महिन्यांचा मुलगा आहे. असे खूप निघतात. लगेच सेवेच्या लायक बनतात. प्रत्येकाला हा देखील विचार येतो की आपण आपल्या गावाला जागृत करावे, आपल्या बरोबरीच्या भावांची सेवा करावी. चॅरिटी बिगिन्स ऍट होम. सर्विसची खूप आवड पाहिजे. एकाच जागी थांबायचे नाही. फेरी मारत रहावी. टाइम तर फार थोडा आहे ना. त्यांचे (साधू-संन्याशांचे) किती मोठ-मोठे आखाडे (मठ) बनतात. अशी आत्मा येऊन प्रवेश करते जी बसून काही ना काही शिकवण देते तर मग तिचे नाव होते. हे तर बेहदचे बाबा बसून शिकवण देतात कल्पापूर्वी प्रमाणे. हा रुहानी कल्पवृक्ष वाढत राहील. निराकारी झाडातून (परमधाम वरून) नंबरवार येत राहतात. शिवबाबांची खूप मोठी माळा किंवा झाड बनलेले आहे. या सर्व गोष्टींची आठवण केल्याने देखील बाबांचीच आठवण येईल. उन्नती लवकर होईल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
आपणच आपल्याशी गप्पा मारायच्या आहेत की, हे जे काही आपण पाहतो आहोत हे सर्व विनाश होणार आहे, आम्ही आपल्या घरी जाणार आणि मग सुखधाममध्ये येणार.

वरदान:-
अटळ निश्चयाद्वारे सहज विजयाचा अनुभव करणारे सदा हर्षित, निश्चिंत भव निश्चयाची निशाणी आहे - सहज विजय. परंतु निश्चय सर्व गोष्टींमध्ये पाहिजे. फक्त बाबांवर निश्चय नाही तर आपल्या स्वतःवर, ब्राह्मण परिवारावर, आणि ड्रामाच्या प्रत्येक दृश्यावर संपूर्ण निश्चय असावा, छोट्याशा गोष्टीने निश्चय ढळणारा नसावा. नेहमी हीच स्मृती रहावी की विजयाची भावी टळू शकत नाही, अशी निश्चय बुद्धी मुले - ‘काय झाले, का झाले…’ या सर्व प्रश्नांच्याही पलीकडे सदैव निश्चिंत, कायम हर्षित राहतात.

बोधवाक्य:-
वेळ वाया घालावण्यापेक्षा लगेच निर्णय घेऊन सोक्षमोक्ष लावा.