05-03-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, बाबांना ज्ञानी तू आत्मा मुलेच प्रिय आहेत म्हणून बाप समान मास्टर ज्ञानाचा सागर बना”

प्रश्न:-
कल्याणकारी युगामध्ये बाबा सर्व मुलांना कोणती आठवण करून देतात?

उत्तर:-
मुलांनो, तुम्हाला आपले घर सोडून ५००० वर्षे झाली आहेत. तुम्ही ५००० वर्षांमध्ये ८४ जन्म घेतले आहेत, आता हा अंतिम जन्म आहे, वानप्रस्थ अवस्था आहे त्यामुळे आता घरी जाण्याची तयारी करा; नंतर मग सुखधाममध्ये याल. भले गृहस्थ व्यवहारामध्ये राहा परंतु या अंतिम जन्मामध्ये पवित्र बनून बाबांची आठवण करा.

गीत:-
महफिल में जल उठी शमा…

ओम शांती।
मुलांना हे समजले आहे की, भगवान एक आहेत, गॉड इज वन. सर्व आत्म्यांचे पिता एक आहेत. त्यांना परमपिता परमात्मा म्हटले जाते. सृष्टीचे रचयिता आहेत, अनेक असूच शकत नाहीत. या सिद्धांतानुसार मनुष्य स्वतःला भगवान म्हणू शकत नाही. आता तुम्ही ईश्वरीय सेवेच्या निमित्त बनले आहात. ईश्वर नवीन दुनिया स्थापन करत आहेत, ज्याला सतयुग म्हटले जाते, त्यासाठी तुम्ही लायक बनत आहात. सतयुगामध्ये कोणीही पतित राहत नाहीत. आता तुम्ही पावन बनत आहात. बाबा म्हणतात - पतित-पावन मी आहे आणि तुम्हा मुलांना श्रेष्ठ मत देत आहे की, मज आपल्या निराकार पित्याची आठवण केल्याने तुम्ही पतित तमोप्रधानापासून पावन सतोप्रधान बनाल. आठवण रुपी अग्नीद्वारे तुमची पापे नष्ट होतील. साधू इत्यादी तर म्हणतात की, ईश्वर सर्वव्यापी आहे. एका बाजूला म्हणतात - भगवान एक आहे आणि मग इथे तर बरेचजण स्वतःला भगवान म्हणवून घेतात. ‘श्री श्री १०८ जगद्गुरु’ म्हणून संबोधले जातात. आता जगद्गुरु तर एक बाबाच आहेत. साऱ्या जगाला पावन बनविणारे एक परमात्मा साऱ्या दुनियेला दुःखातून लिबरेट करतात. तेच दुःखहर्ता सुखकर्ता आहेत. मनुष्यांना असे म्हटले जाऊ शकत नाही. हे देखील तुम्ही मुलेच समजू शकता. ही आहेच पतित दुनिया. सगळे पतित आहेत. पावन दुनियेमध्ये आहेत यथा महाराजा-महाराणी तथा प्रजा. सतयुगामध्ये पूज्य महाराजा-महाराणी असतात. नंतर भक्तिमार्गामध्ये पुजारी बनतात. सतयुगामध्ये जे महाराजा-महाराणी आहेत त्यांच्या जेव्हा दोन कला कमी होतात तेव्हा त्यांना राजा-राणी म्हटले जाते. या सर्व गोष्टी विस्ताराच्या आहेत, नाहीतर सेकंदामध्ये जीवनमुक्ती आहे. बाबा म्हणतात - भले गृहस्थ व्यवहारामध्ये राहा परंतु हा अंतिम जन्म पवित्र रहा. आता वानप्रस्थ अवस्था आहे. वानप्रस्थ किंवा शांतीधाम एकच गोष्ट आहे. इथे आत्मे ब्रह्म तत्त्वामध्ये राहतात, ज्याला ब्रह्मांड म्हणतात. वास्तविक आत्मे काही अंडाकृती नाही आहेत. आत्मे तर तार्‍याप्रमाणे आहेत. बाबांनी समजावून सांगितले आहे जे काही आत्मे आहेत ते सर्व या ड्रामा मधील ॲक्टर्स आहेत. जसे ॲक्टर्स नाटकामध्ये ड्रेस बदलतात, विविध पार्ट बजावतात, हे देखील बेहदचे नाटक आहे. आत्मे या सृष्टीवर सुरुवातीपासून ५ तत्त्वांनी बनलेल्या शरीरामध्ये प्रवेश करून पार्ट बजावतात. परमात्मा आणि ब्रह्मा, विष्णू, शंकर सर्व ॲक्टर्स आहेत. नाटकामध्ये पार्ट बजावण्याकरिता विविध प्रकारचे ड्रेस मिळतात (शरीरे मिळतात). घरी परमधाममध्ये आत्मे सर्व शरीराशिवाय राहतात. नंतर जेव्हा ५ तत्वांचे शरीर तयार होते, तेव्हा आत्मा त्याच्यामध्ये प्रवेश करते. ८४ शरीरे मिळतात तर नावे देखील तेवढी बदलतात. आत्म्याचे नाव एकच आहे. आता शिवबाबा तर आहेतच पतित-पावन. त्यांना आपले शरीर नाही आहे. शरीराचा आधार घ्यावा लागतो. म्हणतात - माझे नाव ‘शिव’ हेच आहे. भले जुन्या शरीरामध्ये येतो. यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) शरीराचे नाव त्यांचे आपले आहे. यांचे व्यक्त नाव आहे, आणि मग अव्यक्ती नाव दिले गेले आहे. एका धर्माचा दुसऱ्या धर्मामध्ये जातो तेव्हा नाव बदलतो ना. तुम्ही देखील शूद्र धर्मातून बदलून ब्राह्मण धर्मामध्ये आला आहात तर नाव बदलले आहे. तुम्ही लिहिता - शिवबाबा व्हाया ब्रह्माबाबा. शिवबाबा परमपिता परमात्मा आहेत, त्यांचे नाव बदलत नाही. शिवबाबा ब्रह्माद्वारे आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करत आहेत. जो प्राय: लोप झाला आहे; जे पावन पूज्य होते तेच पतित पुजारी बनतात. ८४ जन्म पूर्ण केले आहेत. आता पुन्हा देवी-देवता धर्म स्थापन होत आहे. गायले गेले आहे - परमपिता परमात्मा येऊन ब्रह्माद्वारे पुन्हा स्थापना करत आहेत तर जरूर ब्राह्मण पाहिजेत. ब्रह्मा आणि ब्राह्मण कुठून आले? शिवबाबा येऊन ब्रह्माद्वारे ॲडॉप्ट करतात. म्हणतात - ‘तुम्ही माझे आहात’. शिवबाबांची मुले तर आहातच आणि मग ब्रह्माद्वारे नातवंडे होता. साऱ्या प्रजेचा पिता तर एकच आहे. एवढी सारी मुले कुमार-कुमारी आहेत. त्यांना शिवबाबा ब्रह्माद्वारे ॲडॉप्ट करतात. लोकांना हे ठाऊक थोडेच आहे. बाबा येऊन आदि सनातन देवी-देवता धर्म स्थापन करतात. तर असे नाही की नव्याने येत राहतात. जसे दाखवतात प्रलय झाला आणि मग पिंपळाच्या पानावर सागरामध्ये बाळकृष्ण आला… आता या तर सर्व कहाण्या तयार केल्या आहेत. हा दुनियेचा इतिहास-भूगोल रिपीट होत राहतो. आत्मा अमर आहे. त्यामध्ये पार्ट देखील अमर आहे. पार्ट कधीही झिजत नाही. सतयुगामध्ये तीच लक्ष्मी-नारायणाची सूर्यवंशी राजधानी चालत येते. कधीही बदलत नाही. दुनिया नव्यापासून जुनी जुन्यापासून नवीन होत राहते. प्रत्येकाला अविनाशी पार्ट मिळालेला आहे.

बाबा म्हणतात - भक्तीमार्गामध्ये भक्त ज्या-ज्या भावनेने भक्ती करतात तसा त्यांना साक्षात्कार घडवतो. कोणाला हनुमानाचा, कोणाला गणेशाचा देखील साक्षात्कार घडवतो. त्यांची ती शुभ भावना पूर्ण करतो. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. मग मनुष्य समजतात की, भगवान सर्वांमध्ये आहे म्हणून त्याला सर्वव्यापी म्हणतात. भक्तमाळा देखील आहे, मेल्समध्ये नारद शिरोमणी गायला जातो, फिमेलमध्ये मिराचे गायन आहे. भक्तमाळा वेगळी आहे, रुद्रमाळा वेगळी आहे, ज्ञानाची माळा वेगळी आहे. भक्तांची माळा कधी पूजली जात नाही. रुंड माळा अर्थात वैजयंतीमाळा पूजली जाते. वरती आहे फूल त्यानंतर मेरुदाणा… नंतर आहेत मुले, जी सिंहासनावर बसतात. वैजयंतीमाळाच विष्णूची माळा आहे. भक्तांच्या माळेचे फक्त गायन होते. या रुद्रमाळेचा तर सर्वजण जप करतात. तुम्ही भक्त नाही तर ज्ञानी आहात. बाबा म्हणतात - ‘मला ज्ञानी तू आत्मा प्रिय वाटतात.’ बाबाच ज्ञानाचा सागर आहेत, तुम्हा मुलांना ज्ञान देत आहेत. माळा देखील तुमची पूजली जाते. ८ रत्नांचे देखील पूजन होते कारण ‘ज्ञानी तू आत्मा’ आहेत तर त्यांची पूजा होते. अंगठी बनवून बोटात घालतात. कारण हेच (८ रत्ने) भारताला स्वर्ग बनवतात. पास विद ऑनर होतात त्यामुळे त्यांचे गायन आहे. नववा मणी मध्यभागी शिवबाबांना ठेवतात. त्यांना म्हणतात नवरत्न. हे आहे सविस्तर स्पष्टीकरण. बाबा तर फक्त एवढेच सांगतात - ‘बाबांची आणि वारशाची आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील आणि तुम्ही घरी निघून जाल. पतित आत्मे पावन दुनियेमध्ये जाऊ शकत नाहीत. इथे सर्व पतित आहेत. देवतांची शरीरे तर पवित्र निर्विकारी आहेत. ते आहेत पूज्य, यथा राजा-राणी तथा प्रजा पूज्य आहे. इथे सर्व आहेत पुजारी. तिथे दुःखाचा प्रश्नच नाही. त्याला म्हटले जाते स्वर्ग, सुखधाम. तिथे सुख, संपत्ती, शांती सर्व काही होते. आता तर काहीही नाही आहे म्हणूनच याला नरक, आणि त्याला स्वर्ग म्हटले जाते. आपण आत्मे शांतीधाममध्ये राहणारे आहोत. तिथून पार्ट बजावण्याकरिता येतो. पूर्ण ८४ जन्म भोगावे लागतात. आता दुःखधाम आहे मग आम्ही शांतीधाममध्ये जाणार आणि नंतर मग सुखधाममध्ये येणार. बाबा आपल्याला सुखधामचा मालक बनविण्याकरिता, मनुष्यापासून देवता बनविण्याकरिता आपल्या कडून पुरुषार्थ करवून घेत आहेत. तुमचे हे आहे संगमयुग. बाबा म्हणतात मी कल्पाच्या संगमयुगावर येतो, युगे-युगे नाही. मी संगमयुगामध्ये एकदाच सृष्टीला परिवर्तित करण्याकरिता येतो. सतयुग होते, आता कलियुग आहे तर पुन्हा सतयुग आले पाहिजे, हे आहे कल्याणकारी संगमयुग. सर्वांचे कल्याण होणार आहे, सर्वांना रावणाच्या जेलमधून सोडवतात. त्यांना दुःखहर्ता, सुखकर्ता म्हटले जाते. इथे सारी दुनिया दु:खी आहे. तुम्ही पुरुषार्थ करता सुखधाममध्ये जाण्याकरिता. सुखधाममध्ये जायचे असेल तर पहिले शांतीधाममध्ये जावे लागेल. तुम्हाला पार्ट बजावता-बजावता ५००० वर्षे झाली आहेत.

बाबा म्हणतात - तुम्हाला आपले घर सोडून ५००० वर्षे झाली आहेत. त्यामध्ये तुम्ही भारतवासीयांनी ८४ जन्म घेतले आहेत. आता तुमचा हा अंतिम जन्म आहे, सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. सर्वांना जायचे आहे. गायन देखील आहे - ‘ज्ञानाचा सागर’ अथवा ‘रुद्र’. हा आहे - ‘शिव ज्ञान यज्ञ’. पतित-पावन शिव आहेत, परमात्मा देखील शिव आहेत. ‘रुद्र’ नाव भक्तांनी ठेवले आहे. त्यांचे मूळ नाव एकच ‘शिव’ आहे. शिवबाबा प्रजापिता ब्रह्माद्वारे स्थापना करून घेतात. ब्रह्मा एकच आहेत. हेच पतित आणि मग तेच ब्रह्मा पावन बनतात तेव्हा फरिश्ता बनतात. जे सूक्ष्मवतनमध्ये दाखवतात ते कोणी दुसरे ब्रह्मा नाही आहेत. ब्रह्मा तर एकच आहेत. हे व्यक्त आहेत, ते अव्यक्त आहेत. हे संपूर्ण पावन बनतील तेव्हा तुम्ही त्यांना सूक्ष्मवतनमध्ये बघाल. तिथे हाडामासाचा देह इत्यादी असत नाही.

बाबांनी सांगितले होते - ज्या आत्म्यांना शरीर मिळत नाही ते आत्मे भटकत राहतात. त्यांना भूत म्हणतात. जोपर्यंत शरीर मिळत नाही तोपर्यंत भटकत राहतात. काही आत्मे चांगले असतात, काही दुष्ट असतात. तर बाबा प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण देतात. ते ज्ञानाचा सागर आहेत तर जरूर समजावून सांगतील ना. एका सेकंदामध्ये जीवनमुक्ती आहे. अल्फ आणि बे (बाबा आणि बादशाहीची) आठवण करा तर सेकंदामध्ये जीवनमुक्तीचा वारसा मिळेल. किती सोपे आहे. नावच आहे सहज राजयोग. ते (दुनियावाले) समजतात भारताचा योग हा होता. परंतु तो तर संन्याशांचा हठयोग आहे. हा तर अगदीच सोपा आहे. योग अर्थात आठवण. त्यांचा आहे हठयोग. हा आहे सहज. बाबा म्हणतात - मला अशा प्रकारे आठवण करा. कोणते लॉकेट इत्यादी घालण्याची गरज नाही. तुम्ही तर बाबांची मुले आहात. फक्त बाबांची आठवण करा. तुम्ही इथे पार्ट बजावण्यासाठी आला आहात. आता सर्वांना परत घरी जायचे आहे आणि परत येऊन तोच पार्ट बजावायचा आहे. भारतवासीच सूर्यवंशी, चंद्रवंशी, वैश्यवंशी, शूद्रवंशी बनतात. याच्या मधल्या काळामध्ये इतर धर्माचे देखील येतात. ८४ जन्म तुम्हीच घेता. नंतर तुम्हालाच नंबर वनमध्ये जायचे आहे. आणि मग तुम्ही सतयुगामध्ये याल तेव्हा बाकीचे सर्व शांतीधाममध्ये असतील. इतर धर्मवाल्यांचे काही वर्ण नाही आहेत. वर्ण भारताचेच आहेत. तुम्हीच सूर्यवंशी-चंद्रवंशी बनला होता. आता ब्राह्मण वर्णामध्ये आहात. ब्रह्मावंशी ब्राह्मण बनला आहात. या सर्व गोष्टी बाबा बसून समजावून सांगतात. ज्यांच्या बुद्धीमध्ये धारणा होऊ शकत नाही त्यांना बाबा म्हणतात - ‘फक्त बाबांची आठवण करा’. जसे पित्याला जाणल्याने मुलाला माहीत होते की ही प्रॉपर्टी आहे. मुलीला काही वारसा मिळत नाही. इथे तुम्ही सर्व शिवबाबांची मुले आहात, सर्वांचा हक्क आहे. मेल अथवा फिमेल सर्वांचा हक्क आहे. सर्वांना शिकवायचे आहे - शिवबाबांची आठवण करा. जितकी आठवण कराल तेवढी विकर्म विनाश होतील, पतितापासून पावन बनाल. आत्म्यामध्ये जी खाद (भेसळ) पडली आहे ती निघणार कशी? बाबा म्हणतात - योगाद्वारेच तुमच्यातील भेसळ नष्ट होईल. हे पतित शरीर तर इथेच सोडायचे आहे. आत्मा पवित्र बनेल. सर्वजण मच्छरांसदृश्य जातील. बुद्धी देखील म्हणते सतयुगामध्ये फार थोडे असतात. या विनाशामध्ये किती मनुष्य मरतील. बाकी थोडे शिल्लक राहतील. राजे तर थोडे राहतील, बाकी नऊ लाख प्रजा सतयुगामध्ये असते. यावरून गातात देखील ना - नऊ लाख तारे, अर्थात प्रजा. अगोदर झाड छोटे असते नंतर वृद्धी होत जाते. आता तर किती आत्मे आहेत. बाबा येतात आणि सर्वांचा गाईड बनून घेऊन जातात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) योग अग्नीद्वारे विकर्मांच्या भेसळीला भस्म करून पावन बनायचे आहे. आता वानप्रस्थ अवस्था आहे त्यामुळे परत घरी जाण्यासाठी संपूर्ण सतोप्रधान बनायचे आहे.

२) या कल्याणकारी युगामध्ये बाप समान दुःख हर्ता, सुख कर्ता बनायचे आहे.

वरदान:-
सदैव कंबाइंड स्वरूपाच्या स्मृती द्वारे अवघड कार्याला सोपे बनविणारे डबल लाईट भव

जी मुले निरंतर आठवणीमध्ये राहतात ती सदैव बाबा सोबत असल्याचा अनुभव करतात. त्यांच्यासमोर कोणतीही समस्या आली तरी ते स्वतःला कंबाइंड असल्याचे अनुभव करतील, घाबरणार नाहीत. ही कंबाइंड स्वरूपाची स्मृती कोणत्याही अवघड कार्याला सोपे बनवते. कधी कोणती मोठी गोष्ट समोर आली तरी आपले ओझे बाबांना देऊन स्वतः डबल लाईट बना. तेव्हाच फरिश्त्यासमान दिवस-रात्र आनंदाने मनातल्या मनात डान्स करत राहाल.

बोधवाक्य:-
कोणत्याही कारणाचे निवारण करून संतुष्ट राहणारे आणि संतुष्ट करणारेच संतुष्टमणी आहेत.

हे अव्यक्त इशारे:- “निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा” श्रीमताप्रमाणे प्रत्येक पाऊल असावे तेव्हाच सदैव निश्चिंत रहाल आणि निश्चिंत असाल तर नेहमीच योग्य निर्णय द्याल. जेव्हा निर्णय योग्य असेल तर विजयी व्हाल. त्रिकालदर्शी आत्मा नेहमीच निश्चिंत असते कारण तिला निश्चय आहे की आपला विजय झालेलाच आहे.