05-08-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, तुम्ही आपल्या योगबलाद्वारे या जुन्या दुनियेला परिवर्तित करून नवीन बनवता, तुम्ही रुहानी सेवेकरिता प्रकट झाला आहात”

प्रश्न:-
प्रामाणिक आणि सच्च्या पुरुषार्थी मुलांची लक्षणे कोणती असतील?

उत्तर:-
१) प्रामाणिक मुले कधीही आपली चूक लपवणार नाहीत. ती लगेच बाबांना सांगतील. ती अतिशय निरहंकारी असतात. त्यांच्या बुद्धीमध्ये सदैव हाच विचार असतो की, जसे कर्म मी करेन… २) ती कोणाच्या डिस-सर्व्हिसचे (चुकीच्या कृतीचे) वर्णन करत नाहीत. आपल्या सेवेमध्येच व्यस्त राहतात. ते कोणाचाही अवगुण पाहून आपले डोके खराब करत नाहीत.

गीत:-
धीरज धर मनुवा...

ओम शांती।
रुहानी बाबा, गोड-गोड रुहानी मुलांना धीर देतात. जसे लौकिक पिता देखील धीर देतात ना. कोणी आजारी असेल तर त्याला दिलासा देतात की, तुमचे आजारपणाच्या दुःखाचे दिवस आता बदलून सुखाचे दिवस येतील. ते हदचे पिता, हदचा धीर देतात. आता हे तर आहेत बेहदचे पिता जे मुलांना बेहदचा धीर देत आहेत. मुलांनो, आता तुमच्या सुखाचे दिवस येत आहेत. हे फार थोडे दिवस बाकी आहेत. आता तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये राहून इतरांना देखील शिकवा. तुम्ही देखील शिव-शक्ती आहात ना. शिवबाबांची शक्ति-सेना पुन्हा प्रकट झाली आहे. हे गोप (पांडव) देखील आत्मे आहेत. हे सर्व जण शिवबाबांकडून शक्ती घेतात. तुम्ही देखील शक्ती घेता. बाबांनी समजावून सांगितले आहे की, यामध्ये कृपा अथवा आशीर्वादाची कोणती गोष्टच नाही. आठवणीमध्ये राहून शक्ती घेत राहा. आठवणी द्वारेच तुमची विकर्मे विनाश होतील आणि तुम्ही शक्तिशाली बनत जाल. शिवची शक्ति-सेना इतकी सर्वशक्तिवान होती की तिने जुन्या दुनियेला परिवर्तित करून नवीन बनवले. तुम्ही जाणता, योगबलाद्वारे आपण या जुन्या दुनियेला परिवर्तित करतो. मनुष्य बोटाने देखील असा वर इशारा करतात की, अल्लाहची, गॉडची आठवण करा. मुले आता समजतात की, बाबांच्या आठवणीद्वारे हे पाषाणाचे डोंगर अर्थात दुनिया परिवर्तित होईल. आता आपण परिस्तानची स्थापना करत आहोत. बाबा मुलांना समजावून सांगतात - प्रदर्शनीमध्ये भरपूर सेवा करा, मेहनत करा, जो वेळ मिळेल त्यामध्ये बसून शिका. हे अतिशय सोपे आहे. मुलांना सर्व प्रकारचे शिक्षण मिळत राहते. प्रत्येकाच्या कर्मांचा हिशोब आहे. कुमारींची कर्म चांगली आहेत. ज्यांचे लग्न झालेले आहे, त्या म्हणतात - या वेळी आम्ही कुमारिका असतो तर या सर्व बंधनांपासून मुक्त, फ्री बर्ड असतो. कुमारिका फ्री बर्ड्स (मुक्त पक्षांप्रमाणे) आहेत, परंतु खराब संगतीमुळे नुकसान होते. स्त्रीला पती, मुले इत्यादींची किती बंधने आहेत. यामध्ये रूढी-परंपरा इत्यादींची किती बंधने असतात. कुमारींना कोणतीही बंधने इत्यादी नाहीत. आता बॉम्बे मध्ये देखील कुमारी तयार होत आहेत. म्हणतात - आमच्या राज्याची जबाबदारी आम्हीच घेणार. सर्व जण आपल्या राज्यासाठी किती मेहनत करतात. म्हणतात - ‘आमचा गुजरात, आमचा उत्तर प्रदेश…’ तुम्ही आता आपले स्वराज्य घेत आहात. यामध्ये ‘मी अमका आहे, अमुक प्रांताचा आहे’, हे देखील राहू नये. तुम्ही कोणा विषयीही ईर्ष्या बाळगता कामा नये. कोणाचा अवगुण इत्यादी पाहून डोके खराब होता कामा नये. स्वतःकडे पाहिले पाहिजे की, मी किती आत्म्यांना, बहीणींना, भावांना सुखाचा मार्ग सांगितला आहे! जर मार्ग सांगितला नसेल तर तो काहीच कामाचा नाही. हृदयामध्ये स्थान मिळवू शकत नाही. बापदादांच्या हृदयामध्ये जर स्थान मिळवले नाही तर तख्तावर बसू शकत नाही. बाबा जाणतात की, काही-काही मुलांना सेवेची खूप आवड आहे. त्यांच्यामध्ये जरा सुद्धा देह-अभिमान नाहीये. काही-काही जण तर खूप अहंकारामध्ये राहतात. ते समजतात की, त्यांनी स्वतःवर नव्हे तर बाबांवर कृपा केली आहे. कधीही कोणाचा अवगुण पाहता कामा नये. अमका असा आहे, असे करतो. आजकाल असेही काही हुशार आहेत, जे एकमेकांच्या डिस-सर्व्हिसचे (चुकीच्या कृत्याचे) वर्णन करतात - ‘अमका असे करतो, असा आहे’. अरे, तुम्ही आपली सेवा करा. ब्राह्मण मुलांचे काम आहे सेवेमध्ये व्यस्त राहणे. बाबा बसलेले आहेत, बाबांकडे सर्व समाचार येतात. प्रत्येकाच्या अवस्थेला बाबा जाणतात. सेवा पाहून महिमा देखील करतात. मुलांमध्ये सेवेचा उत्साह आला पाहिजे. प्रत्येकाने या रुहानी सेवेद्वारे आपले कल्याण करायचे आहे. तो काम-धंदा इत्यादी तर जन्म-जन्मांतर करत आला आहात. हा धंदा एखादा विरळा व्यापारीच करेल. बाबा सेवेची अतिशय सोपी पद्धत समजावून सांगतात. कधीही दुसऱ्याची निंदा करू नका. असे अनेक जण करतात. चांगल्या-चांगल्या महारथींना देखील माया नाकाला पकडते. बाबांची आठवण केली नाही तर माया पकडेल. बाबा देखील सांगतात ना - मला साधारण तनामध्ये आलेले पाहून ओळखू शकत नाहीत. बाबांना देखील सल्ला देतात की, असे-असे केले पाहिजे. अवस्था अशी आहे की, बाबांनी एखादी छोटीशी गोष्ट जरी सांगितली तरी लगेच ट्रेटर (विद्रोही) बनतील. बाबांना देखील आपला सल्ला लिहून पाठवून देतात. एक म्हण आहे ना - ‘चूहे लदी…’ (उंदराला हळदीचा तुकडा मिळाला, तर समजला मी वाणी आहे). हे समजत नाहीत की, आपण डिस-सर्व्हिस करत आहोत. चुका तर अनेकांकडून होत राहतात. कधी अवस्था उच्च, तर कधी नीच, हे चालत आले आहे. प्रत्येकाने आपल्या अवस्थेकडे पाहावे. प्रामाणिक मुले आपली अवस्था लगेच सांगतात. काही जण तर आपल्या चुका लपवतात, याबाबतीत खूप निरहंकारीपणा पाहिजे. सेवा वाढविण्यामध्ये व्यस्त राहिले पाहिजे. सदैव हा विचार राहिला पाहिजे - ‘जसे कर्म मी करेन, मला पाहून इतरही करतील’. मी कोणाची निंदा केली तर इतरही निंदा करू लागतील. बऱ्याच जणांच्या हे लक्षात येत नाही. बाबा समजावून सांगतात - तुम्ही आपल्या सेवेमध्ये व्यस्त राहा, नाही तर खूप पश्चात्ताप कराल. अनेक शत्रू देखील बनतात.

तुम्ही आता शूद्रा पासून ट्रान्सफर होऊन (बदली होऊन) ब्रह्मा मुखवंशावली ब्राह्मण बनला आहात. ज्यांच्यामध्ये ५ विकार आहेत, ते आहेत - आसुरी संप्रदायाचे आणि तुम्ही आहात - दैवी संप्रदायाचे. तुम्ही देवता बनण्याकरिता विकारांवर विजय प्राप्त करत आहात. देवता काही इथे नाही आहेत. देवता सतयुगामध्ये असतील. तुम्ही आता दैवी संप्रदायाचे बनत आहात.

तुम्हा मुलांना आता हे ज्ञान समजावून सांगण्याची संधी मिळते. प्रदर्शनीमध्ये समजावून सांगत रहा. प्रदर्शनी आणि जत्रेमध्ये प्रत्येकाच्या नाडीचा (अवस्थेचा) अंदाज येतो. प्रोजेक्टरद्वारे तर कोणाला समजावून सांगू शकणार नाही. सन्मुख समजावून सांगितल्यानेच समजू शकतील. प्रदर्शनी आणि जत्रा ही चांगली साधने आहेत; त्यामध्ये लिहू देखील शकता. जत्रांमध्ये प्रदर्शनी करण्याची आवड असली पाहिजे. नियमित अभ्यास केल्यानेच नशा चढेल. बंधनामध्ये असाल तर घरी राहून बाबांची आठवण करत राहा, तर मग विकर्म विनाश होतील. घरी बसून देखील आठवण करणे चांगले आहे. परंतु आठवण करणे, ही मुलांसाठी खूप कठीण गोष्ट झाली आहे. बाबा, ज्यांच्याकडून २१ जन्मांचा वारसा मिळतो, त्यांची आठवण करत नाहीत. उत्तम भाषण करणारे चांगले-चांगले महारथी देखील बाबांची आठवण करत नाहीत. पहाटे उठूही शकत नाहीत. उठले तरी बसल्यावर डुलक्या काढतात. आठवण करण्यासाठी पहाटेचीच वेळ चांगली आहे. भक्तिमार्गामध्ये देखील पहाटे उठून आठवण करतात. त्यांची तर उतरती कला आहे. इथे तर आहेच चढण्याची गोष्ट. माया किती विघ्न आणते. पहाटे उठून बाबांची आठवण केली नाही तर धारणा कशी होईल, विकर्म विनाश कशी होतील? बाकी फक्त मुरली चालवणे, ते तर लहान मुले देखील शिकून समजावून सांगू लागतात. हे शिक्षण मोठ्यांसाठी आहे. किती मोठी युनिव्हर्सिटी आहे! आपल्याला शिकविणारे कोण आहेत - याचा मुलांना नशा राहत नाही. माया कोणाला धोका देत असेल तर आपण त्यांच्याकडे न पाहता आपल्या सेवेमध्ये व्यस्त राहावे. बाबांकडे सर्व समाचार येत राहतात. कोणी मग देह-अभिमानामध्ये येऊन समजतात, हे असे करतात, ते तसे करतात, दुसऱ्यांचीच निंदा करण्यात वेळ वाया घालवतात. तुमचे काम सेवेमध्ये व्यस्त राहणे आहे. कोणतीही गोष्ट असेल तर बाबांना इशारा दिला, बस्स. परचिंतन करता कामा नये. मुलांनी दिवस-रात्र सेवेमध्ये व्यस्त राहिले पाहिजे. तुमचा धंदाच हा आहे. दररोज प्रदर्शनीमध्ये समजावून सांगा की, हे शिवबाबा आहेत, हे प्रजापिता ब्रह्मा आहेत. कल्पापूर्वी देखील प्रजापिता ब्रह्माचे गायन आहे. प्रजापिता ब्रह्मा द्वारा मनुष्य-सृष्टी रचतात. याचा अर्थ असा नाही की, रचनेच्या पूर्वी मनुष्यच नव्हते. मनुष्य-सृष्टी रचतात अर्थात काट्यांना फूल बनवतात. ब्रह्मा द्वारे सृष्टी रचतात, तर वर थोडीच सृष्टी रचतील! ब्रह्मा तर इथेच असेल ना. किती स्पष्ट करून समजावून सांगितले जाते.

बाबा म्हणतात - मी अनेक जन्मांच्या शेवटच्या जन्मामध्ये प्रवेश करून मनुष्याला देवता बनवतो. तर मुलांनी सेवेमध्ये रात्रं-दिवस मेहनत केली पाहिजे. काम-धंदा इत्यादी मधून थोडा वेळ काढून ही सेवा केली पाहिजे. असे नाही की फुरसतच मिळत नाही. आजारी पडलात तर मग तेव्हा देखील असे म्हणाल का की, सवड नाही! पुरुषार्थ केला पाहिजे. प्रेरणेने काहीही होऊ शकत नाही. भगवंताकडूनच प्रेरणेद्वारे काम होऊ शकत नाही, तर इतरांकडून मग कसे होईल? मनुष्य समजतात की, भगवान काय करू शकत नाहीत! ते मेलेल्याला जिवंत करू शकतात. अरे, भगवंताला तुम्ही म्हणता - ‘हे पतित-पावन, येऊन आम्हाला पतितापासून पावन बनवा’, बस्स दुसरी कोणतीही गोष्ट नाही. असे थोडेच म्हणता की, येऊन मृत व्यक्तीला जिवंत करा. ते आहेतच पतित-पावन. भारत पावन होता ना. बाबा म्हणतात - मी कल्प-कल्प येऊन पावन बनवतो. मग माया येऊन पुन्हा पतित बनवते. आता पुन्हा मी पावन बनविण्याकरिता आलो आहे. किती सोपी गोष्ट सांगतात! वैद्य लोक मोठ्या आजाराला देखील वनौषधींनी बरे करतात, मग त्यांची महिमा देखील होते. कोणाला मूल झाले अथवा धन मिळाले तर म्हणतील, गुरुची कृपा झाली. ठीक आहे, बाळाचा जर मृत्यू झाला तर म्हणतील - भावी (नियती). या सर्व गोष्टींना आता तुम्ही मुलेच समजता. संन्यासी लोक पवित्र बनतात तर त्यांना सन्मान मिळतो. परंतु ते आहेत हठयोगी, ते राजयोग शिकवू शकणार नाहीत. ते संन्यासी आणि आपण गृहस्थी, मग आपण स्वतःला त्यांचे फॉलोअर्स कसे म्हणवून घेऊ शकतो? बाबा तर म्हणतात - मुलांनी तर पूर्णपणे फॉलो करायचे आहे - मनमनाभव. माझी आठवण करा, तर तुम्ही पवित्र बनाल आणि माझ्या सोबत याल. मी तर एव्हर प्युअर (सदा पावन) आहे. मनुष्य, पतित बनवतात आणि बाबा येऊन पावन बनवतात. ते पवित्रता, शांती आणि सुखाचा सागर आहेत. तुम्हाला देखील तसे बनवत आहेत. तुम्ही योगबलाने आत्म्याला पवित्र बनवता. तुम्ही जाणता की, आपल्याला फर्स्टक्लास शरीर मिळणार आहे. मनुष्याला प्रॅक्टिकलमध्ये (प्रत्यक्षात) देवता बनवायचे आहे. असे थोडेच आहे की, फक्त देवतांचे कपडे इत्यादी घातले म्हणजे झाले, स्वतःवर पूर्ण लक्ष द्यायचे आहे. देह-अभिमान येता कामा नये. बाबा, आम्ही तर तुमच्या कडून वारसा घेऊनच सोडू. तुम्ही देखील म्हणता, आम्ही भारताला श्रेष्ठाचारी बनवूनच सोडू. निश्चय असणारेच असे म्हणतात ना. काही जण तर म्हणतात - इतक्या कमी वेळात हे कसे होणार? खरेतर कधीही असा संशय येता कामा नये. संशयामध्ये आल्याने मग सेवेमध्ये सुस्तपणा येतो. वेळ अतिशय थोडा आहे. जितका होऊ शकेल तितका भरपूर पुरुषार्थ केला पाहिजे. थोडेसे युद्ध इत्यादीचे कुठे संकट निर्माण झाले, की मग पहा किती मेहनत करू लागतात. समजतात ना - आम्ही आठवणीमध्ये पूर्णपणे राहत नाही, मग त्या वेळी धडपड सुद्धा करू शकणार नाही. त्या वेळी तर अनेक संकटे इत्यादी असतील. म्हणून बाबा म्हणतात - शक्य तितक्या वेगाने गॅलप करत जा (तीव्र गतीने आगेकूच करा). ही आत्म्यांची शर्यत आहे. बाबा किती चांगल्या रीतीने समजावून सांगतात. निशाण्यापर्यंत जाऊन अर्थात बाबांच्या घरी जाऊन, मग परत नवीन दुनियेमध्ये यायचे आहे. ही अतिशय सूक्ष्म शर्यत आहे. बाबा म्हणतात - मला स्पर्श करून अर्थात मूलवतनमध्ये जाऊन मग परत यायचे आहे. सर्वप्रथम तेच येतील, जे योगयुक्त असतील. सर्वांना वाटते की, आपण मुक्तिधाममध्ये जावे. तर बाबा सांगतात - माझी आठवण करा, तर तुम्ही तिथे निघून जाल. मुक्तिधाम तर सर्वांना आवडते, नंतर मग याल पार्ट बजावण्याकरिता.

मोक्ष कोणालाही मिळत नाही. ईश्वरीय इतिहास-भूगोलामध्ये ‘मोक्ष’ हा शब्दच नाही. एका सेकंदामध्ये तुम्हाला जीवनमुक्ती मिळते आणि बाकी सर्व मुक्त होतील. रावण राज्यातून मुक्त व्हायचेच आहे, जो पुरुषार्थ करेल, तोच उच्च पद प्राप्त करेल. मुलांनी अतिशय गोड बनायचे आहे. स्वभाव खूप गोड असला पाहिजे. क्रोधी बनायचे नाही, दुर्वास ऋषीचे नाव आहे ना. या राजऋषींमध्ये देखील काही-काही असे आहेत. नेहमी आपल्या हृदयावर हात ठेवून विचार केला पाहिजे की, मी काय करत आहे! यामुळे मला कोणते पद मिळेल! जर सेवा केली नाही, आप समान बनवले नाही, तर कोणते पद मिळेल? थोड्यामध्ये संतुष्ट व्हायचे नाही. बाबा म्हणतात - मी आलो आहे मुलांना संपूर्ण बादशाही देण्यासाठी. तर हिंमत ठेवून करून दाखवले पाहिजे. केवळ बोलण्याने तर होऊ शकत नाही. बाबांच्या सेवेमध्ये तर हाडे सुद्धा द्यायची आहेत. करतात देखील, आणि मग कुठे देह-अभिमान आल्याने नशा चढतो आणि खाली कोसळतात (पतन होते). माया देखील काही कमी पैलवान नाही. बाबांच्या श्रीमतावर न चालल्याने माया वार करते आणि मग बाबांना सोडचिठ्ठी देतात. बाबा सुखधामचा मालक बनवतात, तर स्वतःवर दया आली पाहिजे. बाबा अतिशय सोपा सल्ला देतात. मायेची वादळे तर खूप येतील परंतु महावीर बनायचे आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सेवेची आवड ठेवून आपले आणि इतरांचे कल्याण करायचे आहे. कोणाच्या डिस-सर्विसचे (वाईट कृत्याचे) वर्णन करायचे नाही. पर-चिंतनामध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही.

२) ईमानदार आणि निरहंकारी बनून सेवा वाढवायची आहे. पहाटे लवकर उठून बाबांची प्रेमाने आठवण करायची आहे. कथनी आणि करनी (बोलणे आणि करणे) एक समान बनवायचे आहे.

वरदान:-
‘मनमनाभव’च्या स्थिती द्वारे मनातील भावनांना जाणणारे सफलता स्वरूप भव

जी मुले मनमनाभवच्या स्थितीमध्ये स्थित राहतात ती इतरांच्या मनातील भावना जाणू शकतात. बोल भले काहीही असोत, परंतु त्याचा भाव काय आहे, ते जाणण्याचा अभ्यास करत जा. प्रत्येकाच्या मनातील भावनांना ओळखल्याने त्यांची जी इच्छा अथवा प्राप्तीची इच्छा आहे, ती पूर्ण करू शकाल. यामुळे ते अविनाशी पुरुषार्थी बनतील, आणि सेवेची सफलता थोड्या वेळामध्ये खूप दिसून येईल आणि तुम्ही पुरुषार्थी स्वरूपा ऐवजी सफलता स्वरूप बनाल.

बोधवाक्य:-
झोपतेवेळी सर्वकाही बाबांच्या हवाली करून रिकामे व्हा, म्हणजे मग व्यर्थ अथवा विकारी स्वप्ने येणार नाहीत.

हे अव्यक्त इशारे - अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.

तुम्ही आत्मे ब्राह्मण जीवनामध्ये असे पवित्र बनता की शरीर देखील आणि प्रकृती देखील पवित्र बनवता; म्हणून शरीर देखील पवित्र आहे तर आत्मा देखील पवित्र आहे. संपूर्ण पवित्र अर्थात अपवित्रतेचा अंशमात्र देखील नसावा, कारण जितकी पवित्रता आहे तितकी ब्राह्मण जीवनाची पर्सनॅलिटी आहे. जर पवित्रता कमी असेल तर पर्सनॅलिटी कमी असते. ही प्युरिटीची पर्सनॅलिटी सेवेमध्ये देखील सहज सफलता मिळवून देईल.