06-06-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“ गोड मुलांनो - बाबा बागवान आहेत, या बागवानाकडे तुम्हा मा ळ्यांना खूप चांगली-चांगली सुगंधित फूले आणायची आहेत, असे फूल आणू नका जे कोमेजलेले असेल’’

प्रश्न:-
बाबांची नजर कोणत्या मुलांवर पडते, कोणावर पडत नाही?

उत्तर:-
जी चांगली सुगंध देणारी फूले आहेत, अनेक काट्यांना फूल बनविण्याची सेवा करतात, त्यांना पाहून बाबा खुश होतात. त्यांच्यावरच बाबांची दृष्टी जाते आणि ज्यांची वृत्ती घाणेरडी आहे, डोळे दगा देतात, त्यांच्यावर बाबांची दृष्टी देखील पडत नाही. बाबा तर म्हणतील, मुलांनो फूल बनून अजून अनेकांना फूल बनवा तेव्हा हुशार माळी म्हटले जाल.

ओम शांती।
बागवान बाबा बसून आपल्या फूलांना पाहतात कारण बाकी सर्व सेंटर्सवर तर फूले आणि माळी आहेत, इथे तुम्ही बागवानापाशी येता आपला सुगंध देण्यासाठी. तुम्ही फूले आहात ना. तुम्ही देखील जाणता, बाबा देखील जाणतात - काट्याच्या जंगलाचे बीजरूप आहे रावण. तसे तर साऱ्या झाडाचे बीज एकच आहे परंतु फूलांच्या बगीच्याला मग काट्यांचे जंगल बनविणारा देखील जरूर असेल. तो आहे रावण. तर आता ठरवा बाबा, बरोबर सांगत आहेत ना. देवतारूपी फूलांच्या बगीच्याचे बीजरूप आहेत बाबा. तुम्ही आता देवी-देवता बनत आहात ना. हे तर प्रत्येकजण जाणतो की आपण कोणत्या प्रकारचे फूल आहोत. बागवान देखील इथेच येतात फूलांना बघण्यासाठी. ते तर सर्व आहेत माळी. ते देखील अनेक प्रकारचे माळी आहेत. त्या (स्थूल) बगीच्याचे देखील भिन्न-भिन्न प्रकारचे माळी असतात ना. कोणाचा ५०० रुपये पगार असतो, कोणाचा १०००, कोणाचा २००० रुपये. जसा मुगल गार्डनचा माळी जरूर खूप हुशार असेल. त्याचा पगार देखील जास्त असेल. हा तर बेहदचा मोठा बगीचा आहे, त्यामध्ये देखील अनेक प्रकारचे नंबरवार माळी आहेत. जे खूप चांगले माळी असतात ते बगीच्याला खूप चांगले शोभिवंत बनवितात, चांगली फूले लावतात. गव्हर्मेंट हाऊसचे मुगल गार्डन किती सुंदर आहे. हा आहे बेहदचा बगीचा. बागवान एकच आहे. आता काट्याच्या जंगलाचे बीज आहे रावण आणि फूलांच्या बगीच्याचे बीज आहेत शिवबाबा. वारसा मिळतो बाबांकडून. रावणाकडून वारसा मिळत नाही, तो जसा काही शाप देतो. जेव्हा शापित होतात तेव्हा जो सुख देणारा आहे त्याची सर्वजण आठवण करतात; कारण तो आहे सुखदाता, सदैव सुख देणारा. माळी देखील भिन्न-भिन्न प्रकारचे आहेत, बागवान येऊन माळ्यांना देखील बघतात की, हे कसा छोटा-मोठा बगीचा बनवतात. कोण-कोणती फूले आहेत, ते देखील लक्षात येते. कधी-कधी खूप चांगले-चांगले माळी देखील येतात, त्यांच्या फूलांची सजावट देखील बऱ्याचदा खूप चांगली असते. तर बागवानाला देखील खुशी होते - ओहो! हा माळी तर खूप चांगला आहे. फूले देखील चांगली-चांगली आणली आहेत. हे आहेत बेहदचे बाबा आणि त्यांच्या आहेत बेहदच्या गोष्टी. तुम्ही मुले मनामध्ये समजता की, बाबा अगदी सत्य सांगत आहेत. अर्धाकल्प चालते रावण राज्य. फुलांच्या बगीच्याला, काट्यांचे जंगल रावण बनवतो. जंगलामध्ये काटेच काटे असतात. खूप दुःख देतात. बगीच्यामध्ये काटे थोडेच असतात, एकही नसतो. मुले जाणतात. रावण देह-अभिमानामध्ये घेऊन येतो. मोठ्यात मोठा काटा आहे देह-अभिमान.

बाबांनी रात्री देखील समजावून सांगितले होते की, कोणाची दृष्टी विकारी आहे, तर कोणाची थोडीशी विकारी दृष्टी आहे. कोणी नवीन-नवीन देखील येतात जे अगोदर खूप चांगले चालतात, समजतात विकारामध्ये कधीच जाणार नाही, पवित्र राहणार. त्यावेळी स्मशानी वैराग्य येते. मग तिथे (घरी) गेले कि मग विकारात जातात. दृष्टी घाणेरडी होते. इथे ज्यांना चांगली-चांगली फूले समजून बागवानाकडे (बाबांकडे) घेऊन येतात की, ‘बाबा, हे खूप चांगले फूल आहे’, काही-काही माळी कानामध्ये येऊन सांगतात की, हे अमके फूल आहे. माळी तर जरूर सांगतीलच ना. असे नाही की बाबा अंतर्यामी आहेत, माळी प्रत्येकाची वर्तणूक सांगतात की, ‘बाबा, यांची दृष्टी चांगली नाही आहे, यांचे वर्तन तितकेसे चांगले नाही आहे, यांचे वर्तन १०-२० टक्के सुधारले आहे’. मुख्य आहेत डोळे, जे खूप धोका देतात. माळी येऊन बागवानाला सर्व काही सांगतील. बाबा प्रत्येकाला विचारतात - ‘सांगा, तुम्ही कोणती फूले आणली आहेत?’ काही गुलाबाची फूले असतात, काही मोगऱ्याची, काही धोत्र्याची देखील घेऊन येतात. इथले खूप सावध राहतात. जंगलामध्ये जातात तर मग कोमेजून जातात. बाबा बघतात की, हे कोणत्या प्रकारचे फूल आहेत. माया देखील अशी आहे जे माळ्यांना देखील अगदी जोराने थप्पड लगावते, ज्याने माळी देखील काटे बनतात. बागवान येतात तेव्हा सर्वात आधी बगिच्याला बघतात, आणि मग बाबा बसून त्यांचा शृंगार करतात. मुलांनो, सावध रहा, कमी-कमजोरी काढून टाकत रहा, नाही तर मग खूप पश्चाताप कराल. बाबा आले आहेत तुम्हाला लक्ष्मी-नारायण बनविण्यासाठी, त्या ऐवजी आपण नोकर बनायचे का! आपली तपासणी करावी लागते, आपण असे उच्च लायक बनलो आहोत का? हे तर जाणता काट्याच्या जंगलाचे बीज रावण आहे, फुलांच्या बगीच्याचे बीज आहेत - राम. या सर्व गोष्टी बाबा बसून सांगतात. बाबा तरी देखील शाळेच्या अभ्यासाची महिमा करतात, ते शिक्षण तरी देखील चांगले आहे, कारण त्यामध्ये सोर्स ऑफ इन्कम आहे. एम ऑब्जेक्ट सुद्धा आहे. हि देखील पाठशाळा आहे, यामध्ये एम ऑब्जेक्ट आहे. अजून कुठेही अशा प्रकारचे एम ऑब्जेक्ट नसते. तुमचे एकच एम (उद्देश) आहे नरा पासून नारायण बनण्याचे. भक्तिमार्गामध्ये सत्यनारायणाची कथा अनेकदा ऐकतात, प्रत्येक महिन्यामध्ये ब्राह्मण बोलावतात, ब्राह्मण गीता ऐकवतात. आजकाल तर गीता सगळेच ऐकवतात. सच्चा-सच्चा ब्राह्मण तर कोणीच नाहीये. तुम्ही आहात सच्चे-सच्चे ब्राह्मण. सच्च्या पित्याची मुले आहात. तुम्ही खरी-खरी कथा ऐकविता. सत्यनारायणाची कथा देखील आहे, अमर कथा देखील आहे, तिजरीची कथा सुद्धा आहे. भगवानुवाच - मी तुम्हाला राजांचाही राजा बनवितो. ते लोक गीता तर ऐकवत आले आहेत. मग राजा कोणी बनले का? असा कोणी आहे जो म्हणेल की, ‘मी तुम्हाला राजांचाही राजा बनवेन, मी स्वतः बनणार नाही?’ असे कधी ऐकले आहे? हे एकच बाबा आहेत जे मुलांना बसून समजावून सांगतात. मुले जाणतात इथे बागवानाकडे रिफ्रेश होण्यासाठी येतात. माळी देखील बनतात, फूल देखील बनतात. माळी तर जरूर बनायचे आहे. वेगवेगळ्या प्रकारचे माळी आहेत. सेवा केली नाहीत तर चांगले फूल कसे बनाल? प्रत्येकाने आपल्या मनाला विचारा की मी कोणत्या प्रकारचे फूल आहे? कोणत्या प्रकाराचा माळी आहे? मुलांना विचार सागर मंथन करावे लागेल. ब्राह्मणी जाणतात - माळी देखील तऱ्हेतऱ्हेचे असतात ना. काही चांगले-चांगले माळी देखील येतात, ज्यांचा खूप चांगला बगीचा असतो. ज्या प्रमाणे चांगला माळी तर बगीचा देखील चांगला बनवितात. चांगली-चांगली फूले घेऊन येतात, ज्यांना पाहून मन खुश होते. काहीजण मग हलकी फूले घेऊन येतात. बागवान समजतात हे कोणते पद प्राप्त करतील. अजून वेळ तर बाकी आहे. एका-एका काट्याला फूल बनविण्यासाठी मेहनत करावी लागते. काहीजण तर फूल बनूच इच्छित नाहीत, काटाच राहणे पसंत करतात. डोळ्यांची वृत्ती खूप घाणेरडी असते. इथे येतात तरी देखील त्यांच्यामधून सुगंध येत नाही. बागवानाला वाटते माझ्या समोर फूल बसेल तर चांगले आहे, ज्याला पाहून खुश होतो. पाहतो की वृत्ती अशी आहे तर त्याच्यावर नजर सुद्धा टाकत नाहीत; म्हणून एकेकाला बघतात, हि माझी फूले कोणत्या प्रकारची आहेत? किती सुगंध देतात? काट्या पासून फूल बनले आहेत की नाही? प्रत्येकजण स्वतः देखील समजू शकतो की आपण कितपत फूल बनलो आहोत? पुरुषार्थ करतो का? मुले वारंवार सांगतात - ‘बाबा, आम्ही तुम्हाला विसरून जातो. योगामध्ये राहू शकत नाही’. अरे, आठवण नाही केलीत तर तुम्ही फूल कसे बनणार? आठवण करा तर पापे नष्ट होतील, जेव्हा फूल बनून मग इतरांना देखील फूल बनवाल, तेव्हा तुमचे नाव माळी ठेवू शकतो. बाबा माळ्यांची मागणी करत असतात. आहेत कोणी माळी? का नाही माळी बनू शकत? बंधन तर सोडायला पाहिजे. आतून उत्साह आला पाहिजे. सेवेचा उमंग आला पाहिजे. आपले पंख स्वतंत्र करण्यासाठी मेहनत केली पाहिजे. ज्याच्यावर खूप प्रेम असते, त्याला सोडायचे असते का? बाबांच्या सेवेमध्ये जोपर्यंत फूल बनून इतरांना फूल बनवले नाहीत तर मग उच्च पद कसे प्राप्त कराल? २१ जन्मांसाठी उच्च पद आहे. महाराजा, राजा, खूप श्रीमंत देखील आहेत. आणि मग नंबरवार कमी श्रीमंत देखील आहेत, प्रजा देखील आहे. तर ठरवा, आता आपण काय बनायचे? जो आता पुरुषार्थ कराल तेच कल्प-कल्पांतर बनाल. आता पूर्ण जोर देऊन पुरुषार्थ करावा लागेल. नरा पासून नारायण बनले पाहिजे, जे चांगले पुरुषार्थी असतील ते अमलात आणतील. रोजची कमाई आणि घाट्याला चेक करायचे असते. केवळ १२ महिन्यांची गोष्ट नाही, रोज आपला घाटा आणि फायदा काढला पाहिजे. घाटा होऊ देता कामा नये. नाहीतर थर्ड क्लास बनाल. शाळेमध्ये देखील नंबरवार तर असतात ना.

गोड-गोड मुले जाणतात - आपले बीज आहेत वृक्षपती, ज्यांच्या येण्याने आपल्यावर बृहस्पतीची दशा बसते. मग रावण राज्य येते तर राहूची दशा बसते. ते एकदम हाइयेस्ट, ते एकदम लोएस्ट. एकदम शिवालया पासून वेश्यालय बनवतात. आता तुम्हा मुलांवर आहे बृहस्पतीची दशा. आधी नवीन वृक्ष असतो. मग अर्ध्या नंतर जुना सुरु होतो. बागवान देखील आहेत, माळी देखील वृद्धीला प्राप्त होत राहतात. बागवानाकडे घेऊन येतात. प्रत्येक माळी फूले घेऊन येतात. कोणी तर अशी चांगली फूले घेऊन येतात, बाबांकडे जावे म्हणून अगदी तळमळत असतात. कशा-कशा युक्त्या करून मुली येतात. बाबा म्हणतात - ‘खूप चांगले फूल आणले आहे’. भले माळी सेकंड क्लास आहे, माळ्यापेक्षा फूले चांगली असतात - खूप तळमळतात कि शिवबाबांकडे जावे, जे बाबा आपल्याला इतके उच्च विश्वाचे मालक बनवितात. घरामध्ये मार खाते तरी देखील म्हणते, ‘शिवबाबा माझे रक्षण करा’. त्यांनाच खरी द्रौपदी म्हटले जाते. पास्ट जे झाले ते मग रिपीट होणार आहे. तुम्ही काल बोलावले होते ना, आज बाबा आले आहेत वाचविण्यासाठी; बाबा युक्त्या सांगतात - असे-असे भूं-भूं करा. तुम्ही आहात भ्रमरी, ते आहेत किडे. त्यांच्यावर भूं-भूं करत रहा. बोला, ‘भगवानुवाच - काम महाशत्रू आहे. त्याला जिंकल्याने विश्वाचे मालक बनता’. कधी ना कधी अबलांचे बोलणे मनाला लागते, आणि मग शांत होतात. म्हणतात - ठीक आहे, भले जा, असे बनविणाऱ्याकडे जा. माझ्या भाग्यामध्ये नाही, तू तरी जा. द्रौपदी अशा बोलावतात. बाबा लिहितात भूं-भू करा. काही-काही स्त्रिया देखील अशा असतात ज्यांना शूर्पणखा, पुतना म्हटले जाते. पुरुष त्यांना भूं-भूं करतात, ती किडा बनते, विकाराशिवाय राहू शकत नाही. बागवानाकडे तऱ्हेतऱ्हेचे येतात, काही विचारू नका. काही-काही कन्या देखील काटा बनतात; म्हणून बाबा म्हणतात तुमची जन्मपत्रीका सांगा (भूतकाळातील सर्व गोष्टी सांगा). बाबांना सांगितले नाहीत लपवलात, तर ते वाढत जाईल. खोटे चालणार नाही. तुमची वृत्ती खराब होत जाईल. बाबांना सांगितल्याने तुम्ही वाचाल. खरे सांगायला हवे, नाहीतर एकदम महारोगी बनाल. बाबा म्हणतात - ‘जे विकारी बनतात त्यांचे तोंड काळे होते’. पतित म्हणजे काळे तोंड. कृष्णाला देखील श्याम-सुंदर म्हणतात. कृष्णाला देखील काळा बनवला आहे. रामाला, नारायणला देखील काळे दाखवतात. अर्थ काहीच समजत नाहीत. तुमच्याकडे तर नारायणाचे गोरे चित्र आहे, तुमचे तर हे एम ऑब्जेक्ट आहे. तुम्हाला काळा नारायण थोडाच बनायचे आहे. हि मंदिरे जी बनवली आहेत, ते (देवता) असे नव्हते. विकारामध्ये गेल्याने मग काळे तोंड होते. आत्मा काळी झाली आहे. आयरन एजड पासून गोल्डन एजडमध्ये जायचे आहे. सोन्याची चिडिया बनायचे आहे. ‘काली कलकत्तेवाली’, असे म्हणतात. किती भयंकर चेहरा दिसतो काही विचारू नका. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, हा सर्व आहे भक्तीमार्ग. आता तुम्हाला ज्ञान मिळाले आहे’. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपले पंख स्वतंत्र करण्यासाठी मेहनत करायची आहे, बंधनातून मुक्त होऊन हुशार माळी बनायचे आहे. काट्यांना फूल बनविण्याची सेवा करायची आहे.

२) आपणच आपल्याला पहायचे आहे की मी किती सुगंधित फूल बनलो आहे? माझी वृत्ती शुद्ध आहे का? डोळे धोका तर देत नाहीत ना? आपल्या वर्तणुकीचा पोतामेल ठेवून आपल्यातील कमी-कमजोऱ्या काढून टाकायच्या आहेत.

वरदान:-
स्वराज्य अधिकाराच्या नशेमध्ये आणि निश्चयाद्वारे सदैव शक्तिशाली बनणारे सहजयोगी, निरंतर योगी भव

स्वराज्य अधिकारी अर्थात प्रत्येक कर्मेंद्रियावर आपले राज्य. कधी संकल्पामध्ये देखील कर्मेंद्रियांनी धोका देऊ नये. कधी थोडा जरी देह-अभिमान आला तरी जोश किंवा क्रोध पटकन येतो, परंतु जे स्वराज्य अधिकारी आहेत ते नेहमी निरहंकारी, नेहमीच निर्माण बनून सेवा करतात; म्हणून ‘मी स्वराज्य अधिकारी आत्मा आहे’ - या नशेमध्ये आणि निश्चयाने शक्तिशाली बनून मायाजीत सो जगतजीत बना तेव्हा सहजयोगी, निरंतर योगी बनाल.

बोधवाक्य:-
लाईट हाऊस बनून मन-बुद्धीद्वारे लाईट पसरविण्यामध्ये बिझी रहा तर कोणत्याही गोष्टींची भीती वाटणार नाही.