08-04-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही देह-अभिमानाचा दरवाजा बंद करा म्हणजे मग मायेची वादळे येणे बंद होईल”

प्रश्न:-
ज्या मुलांची बुद्धी विशाल असते, त्यांची लक्षणे सांगा.

उत्तर:-
१) त्यांच्या बुद्धीमध्ये पूर्ण दिवस सेवेचेच विचार चालत राहतील. २) ते सेवेशिवाय राहू शकणार नाहीत. ३) त्यांच्या बुद्धीमध्ये असेल की कसे साऱ्या विश्वावर घेराव घालून सर्वांना पतितापासून पावन बनवावे. ते विश्वाला दुःखधाम पासून सुखधाम बनविण्याची सेवा करत राहतील. ४) ते अनेकांना आप समान बनवत राहतील.

ओम शांती।
रुहानी बाबा गोड-गोड मुलांना बसून समजावून सांगत आहेत - मुलांनो, स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा तर तुमची सर्व दुःखे कायमसाठी नष्ट होतील. स्वतःला आत्मा समजून सर्वांना भाऊ-भाऊ या दृष्टीने बघाल तर मग देहाची दृष्टी, वृत्ती बदलून जाईल. बाबा देखील अशरीरी आहेत, तुम्ही आत्मा देखील अशरीरी आहात. बाबा आत्म्यांनाच बघतात, सर्व आत्मे अकाल तख्तावर विराजमान आहेत. तुम्ही देखील आत्मा भाऊ-भाऊ या दृष्टीने बघा, यामध्ये खूप मेहनत आहे. देहाच्या भानामध्ये आल्यानेच मायेची वादळे येतात. हा देह-अभिमानाचा दरवाजा बंद करा म्हणजे मग मायेची वादळे येणे बंद होईल. हे देही-अभिमानी बनण्याचे शिक्षण साऱ्या कल्पामध्ये या पुरुषोत्तम संगमयुगावर बाबाच तुम्हा मुलांना देतात.

तुम्ही गोड-गोड अतिप्रिय मुलेच जाणता की आता आपण नरकाचा किनारा सोडून पुढे जात आहोत, हे मधले पुरुषोत्तम संगमयुग एकदम वेगळे आहे. मधल्या समुद्रामध्ये तुमची बोट आहे. तुम्ही ना सतयुगी आहात, ना कलियुगी आहात. तुम्ही आहात पुरुषोत्तम संगमयुगी सर्वोत्तम ब्राह्मण. संगमयुग असतेच मुळी ब्राह्मणांचे. ब्राह्मण आहेत शिखर. हे ब्राह्मणांचे खूप छोटेसे युग आहे. हे एकाच जन्मासाठीचे युग असते. हे आहे तुमच्या आनंदाचे युग. आनंद कोणत्या गोष्टीचा आहे? स्वयं भगवान आपल्याला शिकवत आहेत! अशा स्टुडंट्सना किती आनंद होईल! तुमच्या बुद्धीमध्ये आता संपूर्ण चक्राचे ज्ञान आहे. आता हम सो ब्राह्मण आहोत नंतर मग हम सो देवता बनणार. सर्वात पहिले आपल्या घरी स्वीट होममध्ये जाणार नंतर मग नवीन दुनियेमध्ये येणार. आपण ब्राह्मणच स्वदर्शन चक्रधारी आहोत. आपणच ही बाजोली (कोलांटी उडीचा खेळ) खेळतो. या विराट रूपाला देखील तुम्ही ब्राह्मण मुलेच जाणता, पूर्ण दिवस या गोष्टी बुद्धीमध्ये आठवत राहिल्या पाहिजेत.

गोड मुलांनो, तुमचा हा खूप सुंदर परिवार आहे, तर तुम्हा प्रत्येकाला खूप-खूप प्रेमळ बनले पाहिजे. बाप देखील गोड आहेत तर मुलांना देखील असे गोड बनवत आहेत. कधीही कोणावर रागावता कामा नये. मनसा, वाचा, कर्मणा कोणालाही दुःख द्यायचे नाही. बाबा कधी कोणाला दुःख देत नाहीत. जितकी बाबांची आठवण कराल तितके गोड बनत जाल. बस्स, या आठवणीनेच बेडा पार होईल - ही आहे आठवणीची यात्रा. आठवण करत-करत व्हाया शांतीधाम सुखधाम मध्ये जायचे आहे. बाबा आलेलेच आहेत मुलांना कायमचे सुखी बनविण्याकरिता. भूतांना पळवून लावण्याची युक्ती बाबा सांगत आहेत की, माझी आठवण कराल तर ही भूते निघत जातील. कोणत्याही भूताला सोबत घेऊन जाऊ नका. कोणामध्ये भूत असेल तर माझ्याकडे सोडून जा. तुम्ही म्हणताच मुळी की, ‘बाबा, येऊन आमच्यातील भूतांना काढून पतितापासून पावन बनवा’. तर बाबा किती गुल-गुल (फूल) बनवत आहेत. बाबा आणि दादा दोघेजण मिळून तुम्हा मुलांचा शृंगार करत आहेत. माता-पिताच मुलांचा शृंगार करतात ना. ते आहेत हदचे पिता, हे आहेत बेहदचे पिता. तर मुलांनी खूप प्रेमाने चालायचे आहे आणि चालवायचे आहे. सर्व विकारांचे दान द्यायचे आहे, ‘दे दान तो छुटे ग्रहण’. यामध्ये कोणताही बहाणा इत्यादीची गोष्ट नाहीये. प्रेमाने तुम्ही कोणालाही वश करू शकता. प्रेमाने स्पष्ट करून सांगा, प्रेम खूप गोड गोष्ट आहे - सिंहाला, हत्तीला, प्राण्यांना देखील मनुष्य प्रेमाने वश करतात. ते तर तरीही आसुरी मनुष्य आहेत. तुम्ही तर आता देवता बनत आहात. तर दैवी गुण धारण करून खूप-खूप गोड बनायचे आहे. एकमेकांना भाऊ-भाऊ अथवा भाऊ-बहिणीच्या दृष्टीने बघा. आत्मा, आत्म्याला कधी दुःख देऊ शकत नाही. बाबा म्हणतात - गोड मुलांनो, मी तुम्हाला स्वर्गाचे राज्य-भाग्य देण्यासाठी आलो आहे. आता तुम्हाला जे हवे आहे ते घ्या. मी तर तुम्हाला विश्वाचा मालक डबल मुकुटधारी बनविण्यासाठी आलो आहे. परंतु मेहनत तुम्हाला करायची आहे. मी काही कोणाला ताज घालणार नाही. तुम्हाला स्वतःच्या पुरुषार्थानेच स्वतःला राजतिलक द्यायचा आहे. बाबा पुरुषार्थाची युक्ती सांगतात की अशा प्रकारे स्वतःला विश्वाचा मालक, डबल मुकुटधारी बनवू शकता. अभ्यासावर पूर्ण लक्ष द्या. कधीही शिक्षण सोडू नका. कोणत्याही कारणाने रुसून शिक्षणाला सोडून द्याल तर खूप-खूप तोटा होईल. फायदा आणि तोट्याला तपासत रहा. तुम्ही ईश्वरीय युनिव्हर्सिटीचे स्टुडंट आहात, स्वयं ईश्वर बाबांकडून शिकत आहात, शिकून पूज्य देवता बनत आहात. तर स्टुडंटला देखील असे रेग्युलर बनले पाहिजे. स्टुडंट लाईफ इज द बेस्ट. जितके शिकाल, शिकवाल आणि मॅनर्स सुधाराल तितकेच बेस्ट बनाल.

गोड मुलांनो, आता तुमची रिटर्न जर्नी आहे, जसे सतयुगापासून त्रेता, द्वापर, कलियुगा पर्यंत खाली उतरत आला आहात तसे आता तुम्हाला आईरन एज्ड पासून वर गोल्डन एज्ड पर्यंत जायचे आहे. जेव्हा सिल्व्हर एज्ड पर्यंत पोहोचाल तेव्हा मग या कर्मेंद्रियांची चंचलता नष्ट होईल म्हणून जितकी बाबांची आठवण कराल तितके तुम्हा आत्म्यांमधून रजो, तमोची गंज निघत जाईल आणि जितकी गंज निघत जाईल तितके चुंबक बाबांचे आकर्षण वाढत जाईल. आकर्षण वाटत नसेल तर जरूर गंज लागलेली आहे. पूर्ण गंज निघून प्युअर सोने बनतील - ही आहे अंतिम कर्मातीत अवस्था.

तुम्हाला गृहस्थ व्यवहारामध्ये, प्रवृत्तीमध्ये राहत असताना देखील कमलपुष्प समान बनायचे आहे. बाबा म्हणतात - गोड मुलांनो, घर-गृहस्थीला देखील सांभाळा, शरीर निर्वाह अर्थ कामकाज देखील करा. त्याचसोबत हे शिक्षण देखील शिकत रहा. गायन देखील आहे - ‘हथ कार डे दिल यार डे’. कामकाज करत असताना एका माशुक बाबांची आठवण करायची आहे. तुम्ही अर्ध्या कल्पाचे आशिक आहात. नवधा भक्तीमध्ये देखील बघा श्रीकृष्ण इत्यादीची किती प्रेमाने आठवण करतात. ती आहे नवधा भक्ती, अटळ भक्ती. श्रीकृष्णाची अटळ आठवण राहते परंतु त्याने काही कोणाला मुक्ती मिळत नाही. हे मग आहे निरंतर आठवण करण्याचे ज्ञान. बाबा म्हणतात - ‘मज पतित-पावन बाबांची आठवण करा तर तुमची पापे नष्ट होतील’; परंतु माया देखील खूप पैलवान आहे. कोणालाच सोडत नाही. मायेकडून वारंवार हार खाल्ल्यामुळे तर मान खाली घालून पश्चाताप केला पाहिजे. बाबा गोड मुलांना श्रेष्ठ मत देतातच मुळी श्रेष्ठ बनण्याकरिता. बाबा बघतात मुले इतकी मेहनत करत नाहीत म्हणून बाबांना दया येते. जर हा अभ्यास आता केला नाहीत तर मग खूप सजा खावी लागेल आणि कल्प-कल्प दीड-दमडीचे पद मिळवत रहाल.

गोड मुलांना बाबा मुख्य गोष्ट समजावून सांगत आहेत की, देही-अभिमानी बना. देहासहित देहाच्या सर्व नात्यांना विसरून मामेकम् (मज एकाची) आठवण करा, पावन देखील जरूर बनायचे आहे. कुमारी जेव्हा पवित्र असते तेव्हा तिच्यासमोर सर्वजण डोके टेकवतात. लग्न केल्यामुळे मग पुजारी बनते. तिलाच सर्वांच्या समोर डोके टेकवावे लागते. कन्या आधी माहेरी असते तर तिला जास्त नात्यांची आठवण येत नाही. लग्नानंतर देहाची नाती देखील वाढत जातात, मग पती, मुलांमध्ये मोह वाढत जातो. सासू-सासरे इत्यादी सर्वांची आठवण येत राहील. आधी तर फक्त आई-वडिलांमध्येच मोह असतो. इथे (ज्ञानामध्ये) तर मग त्या सर्व नात्यांना विसरावे लागते कारण हे एकच तुमचे खरे-खरे माता-पिता आहेत ना. हे आहे ईश्वरीय नाते. गातात देखील - ‘त्वमेव मातश्च पिता त्वमेव…’ हे माता-पिता तर तुम्हाला विश्वाचा मालक बनवत आहेत म्हणून बाबा म्हणतात - मज बेहदच्या बाबांची निरंतर आठवण करा इतर कोणत्याही देहधारी सोबत ममत्व ठेवू नका. पत्नीला कलियुगी पतीची किती आठवण येते, ते तर गटारामध्ये पाडतात. हे बेहदचे बाबा तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जातात. अशा गोड बाबांची खूप प्रेमाने आठवण करत रहा, स्वदर्शन चक्र फिरवत रहा. याच आठवणीच्या बळाद्वारे तुमची आत्मा कांचन बनून स्वर्गाची मालक बनेल. स्वर्गाचे नाव ऐकूनच मन आनंदित होते. जे निरंतर आठवण करतात आणि इतरांना देखील आठवण करवून देत राहतात तेच उच्च पद प्राप्त करतील. हा पुरुषार्थ करता-करता शेवटी तुमची ती अवस्था पक्की होईल. ही तर दुनिया देखील जुनी आहे, देह देखील जुना आहे, देहासहित देहाची सर्व नाती देखील जुनी आहेत. त्या सर्वांमधून बुद्धियोग काढून एका बाबांसोबत जोडायचा आहे, जेणेकरून अंतकाळामध्ये देखील त्या एका बाबांचीच आठवण रहावी दुसरे कोणते नाते आठवत असेल तर मग अखेरीला देखील त्याचीच आठवण येईल आणि पद भ्रष्ट होईल. अंतकाळामध्ये जे बेहद बाबांच्या आठवणीमध्ये राहतील तेच नरापासून नारायण बनतील. बाबांची आठवण असेल तर मग शिवालय काही दूर नाहीये.

गोड-गोड अतिप्रिय मुले बेहदच्या बाबांकडे येतातच मुळी रिफ्रेश होण्यासाठी कारण मुले जाणतात बेहदच्या बाबांकडून बेहद विश्वाची बादशाही मिळणार आहे. हे कधीही विसरता कामा नये. त्यांची सदैव आठवण राहिली तर मुलांना अपार आनंद होत राहील. चालता-फिरता हा बॅज वारंवार बघत रहा - एकदम हृदयाशी कवटाळून ठेवा. ‘ओहो! भगवंताच्या श्रीमताद्वारे आपण हे बनत आहोत’. बस्स, बॅचला बघत त्यांच्यावर प्रेम करत रहा. ‘बाबा, बाबा’ करत रहा तर सदैव स्मृती राहील. आपण बाबांद्वारे असे बनत आहोत. बाबांच्या श्रीमतावर चालले पाहिजे ना. गोड मुलांची खूप विशाल बुद्धी असली पाहिजे. पूर्ण दिवस सेवेचेच विचार चालत रहावेत. बाबांना तर ती मुले पाहिजेत जी सेवेशिवाय राहू शकत नाहीत. तुम्हा मुलांना साऱ्या विश्वावर घेराव घालायचा आहे अर्थात पतित दुनियेला पावन बनवायचे आहे. साऱ्या विश्वाला दुःखधाम पासून सुखधाम बनवायचे आहे. टीचरला देखील शिकवताना मजा येते ना. तुम्ही तर आता खूप श्रेष्ठ टीचर बनले आहात. जितका चांगला टीचर, तोच अनेकांना आप समान बनवेल, कधीही थकणार नाही. ईश्वरीय सेवेमध्ये खूप आनंद असतो. बाबांची मदत मिळते. हा खूप मोठा बेहदचा व्यापार देखील आहे, व्यापारी लोकच श्रीमंत बनतात. ते या ज्ञानमार्गामध्ये देखील जास्त उत्साहित असतात. बाबा देखील बेहदचे व्यापारी आहेत ना. सौदा मोठा फर्स्टक्लास आहे परंतु यामध्ये खूप साहस धारण करावे लागते. नवीन-नवीन मुले जुन्या मुलांपेक्षाही पुरुषार्थामध्ये पुढे जाऊ शकतात. प्रत्येकाचे स्वतंत्र भाग्य आहे, तर पुरुषार्थ देखील प्रत्येकाला स्वतंत्र्य करायचा आहे. आपले पूर्ण चेकिंग केले पाहिजे. असे चेकिंग करणारे एकदम दिवस-रात्र पुरुषार्था मध्ये मग्न होतील, म्हणतील - आम्ही आमचा वेळ वाया का घालवावा. जितका होईल आपला वेळ सफल करावा. स्वतःशी पक्की प्रतिज्ञा करतात, आम्ही बाबांना कधीही विसरणार नाही. स्कॉलरशिप घेऊनच सोडणार. अशा मुलांना मग मदत देखील मिळते. अशी देखील नवीन-नवीन पुरुषार्थी मुले तुम्ही बघाल. साक्षात्कार करत राहाल. जसे सुरुवातीला झाले तसेच पुन्हा शेवटी देखील बघाल. जितके जवळ येत जाल तितके आनंदामध्ये नाचत रहाल. तिकडे खुने नाहक खेळ (रक्तरंजित) खेळ देखील सुरु राहील.

तुम्हा मुलांची ईश्वरीय रेस चालू आहे, जितके पुढे पळत जाल तितकी नवीन दुनियेची दृश्ये देखील जवळ येत जातील, आनंद वाढत जाईल. ज्यांना ही दृश्ये जवळ दिसून येत नाहीत त्यांना आनंद सुद्धा होणार नाही. आता तर कलियुगी दुनियेपासून वैराग्य आणि सतयुगी नवीन दुनियेवर खूप प्रेम असले पाहिजे. शिवबाबांची आठवण राहील तर स्वर्गाचा वारसा देखील आठवणीत राहील. स्वर्गाचा वारसा लक्षात राहिला तर शिवबाबा देखील लक्षात राहतील. तुम्ही मुले जाणता आता आपण स्वर्गाच्या दिशेने जात आहोत, पाय नरकाकडे आहेत, डोके स्वर्गाकडे आहे. आता तर लहान-थोर सर्वांचीच वानप्रस्थ अवस्था आहे. बाबांना सदैव हा नशा असतो - ओहो! मी जाऊन हा बाळ श्रीकृष्ण बनणार, ज्याच्यासाठी इनॲडव्हान्स सौगात (भेटवस्तू) देखील पाठवत राहतात. ज्यांना पूर्ण निश्चय आहे त्याच गोपिका सौगात पाठवतात, त्यांना अतींद्रिय सुखाची भासना येते. आम्हीच अमरलोक मध्ये देवता बनणार. कल्पापूर्वी देखील आम्हीच बनलो होतो आणि मग आम्ही ८४ पुनर्जन्म घेतले आहेत. ही बाजोली (हा कोलांटी उडीचा खेळ) जरी लक्षात राहिला तरीही अहो सौभाग्य, कायम परम आनंदामध्ये रहा, खूप मोठी लॉटरी मिळत आहे. ५००० वर्षांपूर्वी देखील आपण राज्यभाग्य मिळवले होते आणि आता पुन्हा उद्या मिळविणार आहोत. ड्रामामध्ये नोंदलेले आहे. जसा कल्पापूर्वी जन्म घेतला होता तसाच घेणार, तेच आपले आई-वडील असतील. श्रीकृष्णाचे जे वडील होते तेच पुन्हा बनतील. अशा प्रकारे जे पूर्ण दिवस विचार करत राहतील ते तर खूप प्रफुल्लित राहतील. विचार सागर मंथन करत नाहीत ते जणू अनहेल्दी आहेत. जसे गाय भोजन खाते तेव्हा पूर्ण दिवस रवंथ करत राहते, रवंथ करतच राहते. जर रवंथ करत नसेल तर असे समजले जाते की ती आजारी आहे; हे देखील असेच आहे.

बेहदचे बाबा आणि दादा दोघांचेही गोड-गोड मुलांवर खूप प्रेम आहे, किती प्रेमाने शिकवत असतात. काळ्या पासून गोरे बनवतात. तर मुलांचा देखील आनंदाचा पारा चढला पाहिजे. पारा चढेल आठवणीच्या यात्रेमुळे. बाबा कल्प-कल्प खूप प्रेमाने सुंदर सेवा करतात. ५ तत्वांसहित सर्वांना पावन बनवतात. किती मोठी बेहदची सेवा आहे. बाबा खूप प्रेमाने मुलांना शिकवण देखील देत राहतात कारण मुलांना सुधारणे पित्याचे आणि टीचरचेच काम असते. बाबांचे आहे श्रीमत, ज्याद्वारेच श्रेष्ठ बनतील. जितके प्रेमाने आठवण करतील तितके श्रेष्ठ बनतील. हे देखील चार्टमध्ये लिहिले पाहिजे की, आम्ही श्रीमतावर चालतो की आपल्या मतावर चालतो? श्रीमतावर चालल्यानेच तुम्ही ॲक्युरेट बनाल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपणच आपल्याशी प्रतिज्ञा करायची आहे की, मी आपला वेळ वाया घालवणार नाही. संगमाचा प्रत्येक क्षण सफल करणार. मी बाबांना कधीही विसरणार नाही. स्कॉलरशिप घेऊनच राहणार.

२) नेहमी हे लक्षात रहावे की आता आपली वानप्रस्थ अवस्था आहे. पाय नरकाकडे, डोके स्वर्गाकडे आहे. बाजोलीची आठवण करून अपार आनंदामध्ये राहायचे आहे. देही-अभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे.

वरदान:-
आपल्या सर्वश्रेष्ठ पोझिशनच्या खुमारी द्वारे (नशे द्वारे) अनेक आत्म्यांचे कल्याण करणारे ऑथॉरिटी स्वरूप भव

आपण ऑलमाईटी ऑथॉरिटीची मुले आहोत - ही आहे सर्वश्रेष्ठ पोझिशन, या पोझिशनच्या खुमारीमध्ये (नशेमध्ये) रहा तर मायेची अधीनता समाप्त होईल. याच ऑथॉरिटीचे स्वरूप बनल्यामुळे कोणत्याही आत्म्याचे कल्याण करू शकता. जे सदैव या खुमारीमध्ये राहतात ते सदाकाळचे राज्यभाग्य प्राप्त करतात. हीच ऑथॉरिटी नेहमी कायम ठेवाल तर विश्व तुमच्या समोर झुकेल, तुम्ही कोणासमोर झुकू शकत नाही.

बोधवाक्य:-
करावनहार बाबांच्या स्मृती द्वारे ‘मी’पणाला समाप्त करा.

हे अव्यक्त इशारे - महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.

मधुरते द्वारे बाबांच्या समिपतेचा साक्षात्कार घडवा. तुमच्या संकल्पामध्ये देखील मधुरता, शब्दामध्ये देखील मधुरता, कर्मामध्ये देखील मधुरता असावी - हीच बाबांची समिपता आहे म्हणून बाबा देखील दररोज म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो’ आणि मुले देखील प्रतिसाद देतात - ‘गोड-गोड बाबा’. हाच रोजचा मधुरतेचा शब्द मधुर बनवितो.