10-01-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - बाबा तुम्हाला ज्ञान योगाचा खुराक खाऊ घालून तुमचे जबरदस्त पालन पोषण
करतात, तर सदैव आनंदी आणि प्रफुल्लित रहा आणि श्रीमतानुसार सर्वांचे कल्याण करत
रहा”
प्रश्न:-
या संगमयुगावर
तुमच्याकडे सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती आहे, ज्याची काळजी घ्यायची आहे?
उत्तर:-
या सर्वोत्तम ब्राह्मण कुळामध्ये तुमचे हे जीवन अतिशय मौल्यवान आहे, त्यामुळे या
शरीराची जरूर काळजी घ्यायची आहे. असे नाही, हा देह तर मातीचा पुतळा आहे, कधी एकदा
नष्ट होईल! नाही. याला जिवंत ठेवायचे आहे. कोणी आजारी पडतात तर त्यांच्यावर नाराज
होता कामा नये. त्यांना बोला - तुम्ही शिवबाबांची आठवण करा. जेवढी आठवण कराल तेवढी
पापे नष्ट होतील. त्यांची सेवा केली पाहिजे, जीवंत रहावा, शिवबाबांची आठवण करत रहावा.
ओम शांती।
ज्ञानाचा तिसरा नेत्र देणारे रुहानी बाबा बसून रुहानी मुलांना समजावून सांगतात.
ज्ञानाचा तिसरा नेत्र बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही देऊ शकत नाही. आता तुम्हा मुलांना
ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. आता तुम्ही मुले जाणता की, ही जुनी दुनिया
परिवर्तित होणार आहे. बिचारे मनुष्य जाणत नाहीत की, दुनियेचे परिवर्तन करणारा कोण
आहे आणि आणि कसे परिवर्तन करतात! कारण त्यांना ज्ञानाचा तिसरा नेत्रच नाहीये. तुम्हा
मुलांना आता ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे ज्याद्वारे तुम्ही सृष्टीच्या
आदी-मध्य-अंताला जाणले आहे. ही आहे ज्ञानाची सॅक्रीन. सॅक्रीनचा एक थेंब देखील खूप
गोड असतो. ज्ञानाचा एकच शब्द आहे - ‘मनमनाभव’. हा शब्द किती गोड आहे. स्वतःला आत्मा
समजून बाबांची आठवण करा. बाबा शांतीधाम आणि सुखधामचा रस्ता सांगत आहेत. बाबा आले
आहेत मुलांना स्वर्गाचा वारसा देण्याकरिता. तर मुलांना किती आनंद झाला पाहिजे.
म्हणतात देखील - ‘खुशी जैसी खुराक नहीं’. जे सदैव आनंदी आणि प्रफुल्लित राहतात
त्यांच्याकरिता हा जसा काही खुराक आहे. २१ जन्म आनंदात राहण्याचा हा जबरदस्त खुराक
आहे. हा खुराक नेहमी एक दोघांना खाऊ घालत रहा. ही आहे एक दोघांची जबरदस्त खातिरी (पालना
करणे). अशी खातिरी इतर कोणीही मनुष्य, मनुष्याची करू शकत नाही.
तुम्ही मुले
श्रीमतावर सर्वांची रूहानी खातिरी करता. खरी-खरी खुश-खैराफत (कल्याण) देखील यातच आहे
की, कोणालाही बाबांचा परिचय देणे. गोड मुले जाणतात बेहदच्या बाबांद्वारे आपल्याला
जीवनमुक्तीची सौगात मिळते. सतयुगामध्ये भारत जीवनमुक्त होता, पावन होता. बाबा अतिशय
पौष्टीक खुराक देतात तेव्हा तर गायन आहे - ‘अतीन्द्रिय सुख पूछना हो तो गोप-गोपियों
से पूछो’. हा ज्ञान आणि योगाचा किती फर्स्ट क्लास वंडरफुल खुराक आहे आणि हा खुराक
फक्त एका रुहानी सर्जनकडेच आहे. इतर कोणालाही या खुराका विषयी माहिती देखील नाही आहे.
बाबा म्हणतात - ‘गोड मुलांनो, तुमच्यासाठी तळ हातावर सौगात घेऊन आलो आहे. मुक्ती,
जीवनमुक्तीची ही सौगात माझ्याकडेच असते. कल्प-कल्प मीच येऊन तुम्हाला ही सौगात देतो
मग रावण हिरावून घेतो. तर आता तुम्हा मुलांचा आनंदाचा पारा किती चढलेला असला पाहिजे.
तुम्ही जाणता आपले एकच बाबा, टीचर आणि खरे-खरे सद्गुरु आहेत जे आम्हाला सोबत घेऊन
जातात. मोस्ट बिलवेड (सर्वात प्रिय) बाबांकडून विश्वाची बादशाही मिळते. ही काही छोटी
गोष्ट आहे का! तुम्हा मुलांनी सदैव हर्षित राहिले पाहिजे. गॉडली स्टुडंट लाईफ इज द
बेस्ट. हे आताचेच गायन आहे ना. मग नवीन दुनियेमध्ये तुम्ही सदैव आनंद साजरा करत
रहाल. दुनिया जाणत नाही की खराखुरा आनंद कधी साजरा केला जाणार. लोकांना तर सतयुगाचे
ज्ञानच नाही आहे तर इथेच साजरे करत राहतात. परंतु या जुन्या तमोप्रधान दुनियेमध्ये
आनंद आला कुठून! इथे तर त्राही-त्राही करत राहतात. किती दुःखाची दुनिया आहे.
बाबा तुम्हा मुलांना
किती सोपा रस्ता सांगतात. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमलपुष्प समान रहा. काम-धंदा
इत्यादी करत असताना देखील माझी आठवण करत रहा. ती त्याची आशिक (प्रेयसी) आणि तो तिचा
माशूक (प्रियकर) असतो, इथे ती गोष्ट नाहीये, इथे तर तुम्ही सर्व एका माशुकचे
जन्म-जन्मांतरापासूनचे आशिक होऊन राहिले आहात. बाबा तुमचे कधीच आशिक बनत नाहीत.
तुम्ही त्या माशुकला येण्याकरिता आठवण करत आले आहात. जेव्हा दुःख जास्त होते तेव्हा
जास्त आठवण करतात, तेव्हाच तर गायन आहे - ‘दु:ख में सुमिरण सब करें, सुख में करे न
कोय’. यावेळी जसे बाबा सर्वशक्तिमान आहेत. दिवसेंदिवस माया देखील सर्वशक्तिमान,
तमोप्रधान होत जात आहे; म्हणून आता बाबा म्हणतात - ‘गोड मुलांनो, देही-अभिमानी बना.
स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा आणि त्याच सोबत दैवी गुण देखील धारण करा,
तर तुम्ही असे लक्ष्मी-नारायण बनाल’. या शिक्षणामध्ये मुख्य गोष्ट आहेच मुळी आठवणीची.
सर्वश्रेष्ठ बाबांची अतिशय प्रेमाने, स्नेहाने आठवण केली पाहिजे. ते सर्वश्रेष्ठ
बाबाच नवीन दुनिया स्थापन करणारे आहेत. बाबा म्हणतात - ‘मी आलो आहे तुम्हा मुलांना
विश्वाचा मालक बनविण्याकरिता म्हणून आता माझी आठवण करा तर तुमची अनेक जन्मांची पापे
नष्ट होतील. पतित-पावन बाबा म्हणतात - तुम्ही खूप पतित बनले आहात म्हणून आता तुम्ही
माझी आठवण करा तर तुम्ही पावन बनून पावन दुनियेचे मालक बनाल. पतित-पावन बाबांनाच
बोलावतात ना. आता बाबा आले आहेत तर जरूर पावन बनावे लागेल. बाबा दुःखहर्ता, सुखकर्ता
आहेत. खरोखर सतयुगामध्ये पावन दुनिया होती तर सर्व सुखीच होते. आता बाबा पुन्हा
म्हणतात - ‘मुलांनो, शांतीधाम आणि सुखधामची आठवण करत रहा. आता आहे संगमयुग. खिवैया
(नावाडी) तुम्हाला या किनाऱ्यावरून पलीकडे त्या किनाऱ्यावर घेऊन जातात. नौका कोणती
एक नाहीये, सारी दुनियाच जसे एक मोठे जहाज आहे. त्याला पार घेऊन जातात.
तुम्हा गोड मुलांना
किती आनंदीत झाले पाहिजे. तुमच्याकरिता तर कायम आनंदच आनंद आहे. बेहदचे बाबा आम्हाला
शिकवत आहेत, व्वा! हे तर कधी ना ऐकले, ना वाचले. भगवानुवाच - ‘मी तुम्हा रूहानी
मुलांना राजयोग शिकवत आहे’. तर पूर्णपणे लक्ष देऊन शिकले पाहिजे, धारणा केली पाहिजे.
व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. शिक्षणामध्ये नंबरवार तर नेहमी असतातच. स्वतःला
पाहिले पाहिजे की, मी उत्तम आहे, मध्यम आहे की कनिष्ठ आहे? बाबा म्हणतात - स्वतःला
पहा मी उच्च पद प्राप्त करण्याच्या लायक आहे? रोज रूहानी सर्विस करतो? कारण बाबा
म्हणतात - ‘मुलांनो, सर्विसएबुल बना, फॉलो करा. मी आलोच आहे सेवेकरिता. रोज सेवा
करतो म्हणूनच तर हा रथ घेतला आहे. यांचा रथ (ब्रह्माबाबांचे शरीर) आजारी पडतो तेव्हा
मग मी यांच्यामध्ये बसून मुरली लिहितो. तोंडाने काही बोलू शकत नाही त्यामुळे मग मी
लिहितो. जेणेकरून मुलांची मुरली मिस होऊ नये तर मी देखील सेवेवर आहे ना. ही आहे
रूहानी सेवा. तर तुम्ही मुले देखील बाबांच्या सेवेमध्ये तत्पर रहा. ऑन गॉड फादरली
सर्विस. जे चांगला पुरुषार्थ करतात, चांगली सेवा करतात त्यांना महावीर म्हटले जाते.
पाहिले जाते कोण महावीर आहेत जे बाबांच्या डायरेक्शन प्रमाणे चालतात? बाबांचा आदेश
आहे, स्वतःला आत्मा समजून भावा-भावाच्या दृष्टीने पहा. या शरीराला विसरा. बाबा
देखील शरीराला पाहत नाहीत. बाबा म्हणतात - मी आत्म्यांना पाहतो. बाकी हे तर ज्ञान
आहे की आत्मा शरीरा शिवाय बोलू शकत नाही. मी देखील या शरीरामध्ये आलो आहे, लोन घेतले
आहे. शरीराद्वारेच आत्मा शिकते. बाबांची बैठक इथे भृकुटीमध्ये आहे. हा आहे अकाल
तख्त. आत्मा अकाल मूर्त आहे. आत्मा कधी लहान-मोठी होत नाही. शरीर लहान-मोठे होते.
जे काही आत्मे आहेत त्या सर्वांचे तख्त हे भृकुटी आहे. शरीरे तर सर्वांची वेगवेगळी
असतात. कोणाचे अकाल तख्त पुरुषाचे आहे, कोणाचे अकाल तख्त स्त्रीचे आहे, कोणाचे अकाल
तख्त मुलाचे आहे. बाबा बसून मुलांना रुहानी ड्रिल शिकवतात. जेव्हा कोणाशी बोलाल तर
पहिले स्वतःला आत्मा समजा. मी आत्मा अमक्या भावाशी बोलत आहे. बाबांचा संदेश देतो
की, शिवबाबांची आठवण करा. आठवणीनेच गंज उतरणार आहे. सोन्यामध्ये जेव्हा धातू मिसळला
जातो तेव्हा सोन्याची किंमत कमी होते. तुम्हा आत्म्यांमध्ये देखील गंज पडल्याने
तुम्ही मूल्यहीन झाले आहात. आता पुन्हा पावन बनायचे आहे. तुम्हा आत्म्यांना आता
ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. त्या नेत्राने आपल्या भावांना पहा. भाऊ-भाऊ
म्हणून पाहिल्याने कर्मेंद्रिये चंचल होणार नाहीत. राज्य-भाग्य घ्यायचे आहे,
विश्वाचे मालक बनायचे आहे तर ही मेहनत करा. आत्मा भाऊ-भाऊ समजून सर्वांना ज्ञान द्या.
तर मग ही सवय पक्की होईल. खरे-खरे ब्रदर्स तुम्ही सर्व आहात. बाबा देखील वरून (परमधाम
मधून) आले आहेत, तुम्ही देखील वरून आले आहात. बाबा मुलांसह सेवा करत आहेत. सेवा
करण्याची बाबा हिंमत देतात. ‘हिम्मते बच्चे मददे बाप…’ तर ही प्रॅक्टिस करायची आहे.
मी आत्मा, भावाला शिकवत आहे. आत्मा शिकते ना. याला स्पिरिच्युअल नॉलेज (अध्यात्मिक
ज्ञान) म्हटले जाते, जे रूहानी बाबांकडूनच मिळते. संगमावरच बाबा येऊन हे नॉलेज
देतात की, स्वतःला आत्मा समजा. तुम्ही अशरीरी आला होता मग इथे शरीर धारण करून तुम्ही
८४ जन्म पार्ट बजावला आहे. आता पुन्हा परत जायचे आहे म्हणून स्वतःला आत्मा समजून
भावा-भावाच्या दृष्टीने पहायचे आहे. ही मेहनत करायची आहे. आपली मेहनत करायची आहे,
दुसऱ्याशी आपला काय संबंध! चॅरिटी बिगिन्स ॲट होम अर्थात पहिले स्वतःला आत्मा समजून
मग भावांना समजावून सांगा. तर चांगल्या रीतीने तीर लागेल. हे जौहर भरायचे आहे (ही
शक्ती भरायची आहे). मेहनत कराल तेव्हाच उच्च पद प्राप्त कराल. यामध्ये काही सहन
देखील करावे लागते. जर कोणी उलट-सुलट बोलले तर तुम्ही गप्प रहा. तुम्ही गप्प रहाल
तर मग दुसरा काय करणार! टाळी दोन हाताने वाजते. एकाने मुखाची टाळी वाजवली, दुसरा
गप्प बसेल तर तो आपणच गप्प होईल. टाळीला टाळी दिल्याने आवाज होतो. मुलांना एक
दोघांचे कल्याण करायचे आहे. बाबा समजावून सांगत आहेत - ‘मुलांनो, सदैव आनंदात राहू
इच्छिता तर मनमनाभव’. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. भावांना (आत्म्यांना)
पहा. तर मुलांनी रुहानी यात्रेवर राहण्याची सवय लावायची आहे. तुमच्याच फायद्याची
गोष्ट आहे. बाबांची शिकवण भावांना द्यायची आहे. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हा
आत्म्यांना ज्ञान देत आहे. आत्म्यांनाच पाहतो’. मनुष्य-मनुष्यांशी बोलतील तर
त्यांच्या चेहऱ्याला पाहतील ना. तुम्ही आत्म्याशी बोलता तर आत्म्यालाच पहायचे आहे.
भले शरीराद्वारे ज्ञान देता परंतु यामध्ये शरीराचे भान तोडायचे आहे. तुमची आत्मा
समजते परमात्मा पिता आपल्याला ज्ञान देत आहेत. बाबा देखील म्हणतात - आत्म्यांना
पाहतो, आत्मे देखील म्हणतात आम्ही परमात्मा बाबांना बघत आहोत. त्यांच्याकडून नॉलेज
घेत आहोत, याला म्हटले जाते स्पिरिच्युअल ज्ञानाची आत्म्याची आत्म्यासोबत
देवाण-घेवाण. आत्म्यामध्येच ज्ञान आहे. आत्म्यालाच ज्ञान द्यायचे आहे. ही जशी ताकद
आहे. तुमच्या ज्ञानामध्ये ही ताकद भरली जाईल, तर कोणालाही सांगितल्याने लगेच तीर
लागेल (लगेच काळजाला भिडेल). बाबा म्हणतात - प्रॅक्टिस करून पहा, तीर लागतो ना. ही
नवीन सवय लावायची आहे तेव्हा मग शरीराचे भान निघून जाईल. मायेची वादळे कमी येतील.
वाईट संकल्प येणार नाहीत. क्रिमिनल दृष्टी सुद्धा राहणार नाही. मी आत्म्याने ८४ चा
फेरा मारला. आता नाटक पूर्ण होते. आता बाबांच्या आठवणीमध्ये रहायचे आहे. आठवणीनेच
तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनून, सतोप्रधान दुनियेचे मालक बनाल. किती सोपे आहे.
बाबा जाणतात मुलांना हे शिक्षण देणे हा देखील माझा पार्टच आहे. काही नवीन गोष्ट नाही.
दर ५ हजार वर्षानंतर मला यावेच लागते. मी बांधील आहे. मुलांना बसून समजावून सांगतो
- ‘गोड मुलांनो, रुहानी आठवणीच्या यात्रेमध्ये राहा तर अंत मति सो गती होईल. हा
अंतिम समय आहे ना! मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुमची सद्गती होईल. आठवणीच्या
यात्रेने पाया मजबूत होईल. तुम्हा मुलांना हे देही-अभिमानी बनण्याचे शिक्षण एकदाच
मिळते. किती वंडरफुल ज्ञान आहे. बाबा वंडरफुल आहेत तर बाबांचे ज्ञान देखील वंडरफुल
आहे. कधी कोणी सांगू शकत नाही. आता परत जायचे आहे म्हणून बाबा म्हणतात गोड मुलांनो
ही प्रॅक्टिस करा. स्वतःला आत्मा समजून आत्म्यांना ज्ञान द्या. तिसऱ्या नेत्राने
भाऊ-भाऊंना पहायचे आहे. हीच खूप मेहनत आहे.
हे आहे तुम्हा
ब्राह्मणांचे सर्वोत्तम उच्च ते उच्च कुळ. यावेळी तुमचे जीवन अमूल्य आहे म्हणून या
शरीराची देखील काळजी घ्यायची आहे. तमोप्रधान असल्याकारणाने शरीराचे आयुष्य देखील कमी
होत गेले आहे. आता तुम्ही जितके योगामध्ये रहाल, तितके आयुष्य वाढेल. तुमचे आयुष्य
वाढत-वाढत सतयुगामध्ये १५० वर्षे होईल, म्हणून शरीराची देखील काळजी घ्यायची आहे. असे
नाही हा तर मातीचा पुतळा आहे, कधी एकदा नष्ट होतोय. नाही. याला जिवंत ठेवायचे आहे.
हे अमूल्य जीवन आहे ना! कोणी आजारी पडतात तर त्यांच्यावर नाराज व्हायचे नाही.
त्यांना देखील सांगा - शिवबाबांची आठवण करा. जेवढी आठवण कराल तेवढी पापे भस्म होत
जातील. त्यांची सेवा केली पाहिजे. जिवंत रहा, शिवबाबांची आठवण करत रहा. एवढे तर
समजते ना की, मी बाबांची आठवण करतो. आत्मा आठवण करते, बाबांकडून वारसा घेण्याकरिता.
अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) स्वतःला पहा
मी पुरुषार्थामध्ये उत्तम आहे, मध्यम आहे की कनिष्ठ आहे? मी उच्च पद प्राप्त
करण्यासाठी लायक आहे. मी रूहानी सेवा करतो का?
२) तिसऱ्या
नेत्राद्वारे आत्मा भावाला पहा, भाऊ-भाऊ समजून सर्वांना ज्ञान द्या, आत्मिक
स्थितीमध्ये राहण्याची सवय लावा तर कर्मेंद्रिये चंचल होणार नाहीत.
वरदान:-
ब्रह्मा बाप
समान महा त्यागाद्वारे महान भाग्य बनविणारे फरिश्ता सो विश्व महाराजन भव
फरिश्ता सो विश्व
महाराजन बनण्याचे वरदान त्याच मुलांना प्राप्त होते जी मुले ब्रह्मा बाबांच्या
प्रत्येक कर्म रूपी पावलानुसार पाऊल टाकणारी आहेत, ज्यांची मन-बुद्धि-संस्कार -
नेहमी बाबांसमोर समर्पित आहे. जसे ब्रह्मा बाबांनी याच महात्यागाद्वारेच महान भाग्य
प्राप्त केले अर्थात नंबरवन संपूर्ण फरिश्ता आणि नंबरवन विश्व महाराजन बनले, असे
फॉलो फादर करणारी मुले देखील महान त्यागी अथवा सर्वस्व त्यागी असतील. संस्कार
रूपातील सुद्धा विकारांच्या वंशाचा त्याग करतील.
बोधवाक्य:-
आता सर्व आधार
तुटणार आहेत म्हणून एका बाबांना आपला आधार बनवा.
आपल्या शक्तिशाली
मन्साद्वारे सकाश देण्याची सेवा करा:-
एवढ्या संपूर्ण
प्रकृतीला परिवर्तन करणे, तमोगुणी संस्कारवाल्या आत्म्यांच्या तमोगुणी व्हायब्रेशनला
बदलणे आणि स्वतःला देखील अशा खुने-नाहेक (नाहक रक्तपाताच्या) वायुमंडळाच्या
वायब्रेशन पासून सुरक्षित ठेवणे तसेच त्या आत्म्यांना सहयोग देणे, या विशाल
कार्याकरिता आपल्या मन्साला शुभ भावनांनी संपन्न शक्तिशाली बनवा.