10-05-26 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
30.01.2010 ओम शान्ति
मधुबन
चारही विषयांमध्ये
स्वमानाचे अनुभवी स्वरूप बनून अनुभवाच्या ऑथॉरिटीला कार्यामध्ये लावा
आज ब्राह्मण संसाराचे
रचयिता बापदादा आपल्या चोहो बाजूंच्या ब्राह्मण संसाराला पाहत आहेत. प्रत्येक
ब्राह्मण संपूर्ण संसारामध्ये एक विशेष आत्मा आहे. कोटींमध्ये कोणी आहे कारण साधारण
तनामध्ये आलेल्या बाबांना ओळखले आहे. बापदादा देखील मनात भरलेल्या मुलांना मनापासून
हृदयातील प्रेम देत आहेत. प्रत्येक बच्चा स्वतःला बाबांचा लाडका, हृदयामध्ये बाबांना
सामावून ठेवलेला असा अनुभव करत आहात! बाबांसाठी प्रत्येक बच्चा अतिशय लाडका आणि
सर्वांचा प्रिय आहे. तुम्हा सर्व मुलांचे सर्व आत्म्यांप्रती चॅलेंज आहे की, आम्ही
योगी जीवन वाले आहोत. केवळ योग लावणारे नाही परंतु योगी जीवनवाले आहोत. जीवन काही
दोन-चार तासांचे नसते. जीवन शाश्वत असते. तर चालता-फिरता, कर्म करताना योगी जीवन
वाले निरंतर योगी आहेत. भले योगामध्ये बसलेले असोत किंवा कोणतेही कर्म करत असोत,
कर्मयोगी आहेत. जीवनाचे ध्येयच आहे - सदैव योगी. असे आपले योगी जीवन, नॅचरल जीवन
अनुभव करता का? बापदादा प्रत्येक मुलाच्या मस्तकावर चमकणारे भाग्य पाहत आहेत. काय
पाहत आहेत? माझे प्रत्येक मूल स्वमानधारी, स्वराज्य अधिकारी आहे. का? जिथे स्वमान
आहे तिथे देहभान येऊच शकत नाही. आदि पासून अंता पर्यंत, आत्ता पर्यंत बापदादांनी
प्रत्येक मुलाला विविध स्वमान दिले आहेत. जर आता देखील त्या स्वमानांची आठवण कराल
आणि एक-एक स्वमानाची माळ जपत जाल तर अनेक स्वमान स्वरूप बनून, स्वमानामध्ये लवलीन
होऊन जाल. परंतु बापदादांना मुलांची एक गोष्ट अजूनही आवडत नाही, ती माहित आहे कोणती?
जेव्हा एखादे मूल म्हणते की, आम्हाला स्वमानामध्ये स्थित होण्यासाठी कधी-कधी मेहनत
करावी लागते, इच्छा आहे परंतु कधी-कधी मेहनत करावी लागते; तर सर्वशक्तिवान बाबा
मुलांची मेहनत पाहू शकत नाहीत कारण जिथे मोहब्बत (प्रेम) असते तिथे मेहनत नसते. जिथे
मेहनत आहे तिथे प्रेमामध्ये कमतरता आहे.
आज अमृतवेलेला
बापदादांनी चोहो बाजूंच्या ब्राह्मणांकडे, मग ते देशात असो किंवा परदेशात असो फेरी
मारली तेव्हा काय पाहिले? काही मुले स्वमानामध्ये बसली आहेत, विचार करत आहेत की मी
बापदादांच्या दिलतख्तनशीन आहे, विचारही करत आहेत, स्वमानामध्ये स्थित होण्याचा
पुरुषार्थ सुद्धा करत आहेत परंतु कमतरता काय दिसली? स्वमान लक्षात आहे, विचार करत
आहेत, परंतु स्वमान स्वरूप बनून, अनुभवी मूर्त बनून, अनुभवाच्या ऑथॉरिटी स्वरूप
बनण्यामध्ये कमतरता दिसून आली कारण ऑथॉरिटी तर खूप आहेत परंतु सर्वात मोठी ऑथॉरिटी
अनुभवाची ऑथॉरिटी आहे आणि ही स्वमानाची अनुभूती ऑलमाइटी ऑथॉरिटीने दिली आहे. तर
मेहनत करत आहे परंतु अनुभव स्वरूप बनलेला नाही. तर बापदादांनी हे पाहिले की बसतात,
विचारही करतात परंतु अनुभव स्वरूप फार थोडे आहेत. अनुभवामध्ये कोणत्याही प्रकारचा
देह-अभिमान थोडा सुद्धा स्वतःकडे आकर्षित करू शकत नाही. तर अनुभव स्वरूप बनणे, कर्म
करताना देखील कर्मयोगीच्या अनुभव स्वरूपामध्ये हरवून जाणे, याची अजून आवश्यकता आहे.
स्वरूपामध्ये स्थित व्हा, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक सब्जेक्टमध्ये अनुभवी
स्वरूप बना, मग ते ज्ञान, योग, धारणा आणि सेवा असो, चारही सब्जेक्टमध्ये अनुभव
स्वरूप बना. अनुभवी असणाऱ्याला माया देखील हलवू शकत नाही म्हणून बापदादा आज सर्व
मुलांना अनुभवी स्वरूपामध्ये पाहू इच्छित आहेत. ऐकणे आणि विचार करणे यात फरक आहे
परंतु अनुभवी स्वरूप बनणे, जो विचार केला, ज्या स्वमानामध्ये स्थित राहू इच्छिता
त्याच्या अनुभव स्वरूपामध्ये स्थित झाले पाहिजे. अनुभवीला कोणीही डळमळीत करू शकत
नाही कारण स्वमान आणि देहभान, जिथे स्वमान स्वरूप आहे, स्वमानाच्या अनुभवामध्ये
स्थित आहे तिथे देह-भान येऊ शकत नाही. जसे पहा अंधार आहे परंतु तुम्ही लाईटचा स्विच
ऑन करा तर अंधार आपोआप गायब होतो. अंधाराला नाहीसे करण्यासाठी, अंधाराला पळवून
लावण्यासाठी मेहनत करावी लागत नाही. असेच, जेव्हा स्वमानाच्या सीटवर अनुभवाचा स्विच
ऑन होतो तेव्हा कोणत्याही प्रकारचे देह-भान राहत नाही, देह-भान देखील विविध प्रकारचे
आहेत आणि बाबांनी विविध प्रकारचे स्वमानही दिलेले आहेत. स्वमानाला जाणता, पुरुषार्थ
देखील करता परंतु अनुभवाचा पुरुषार्थ करणे आणि अनुभवी स्वरूप बनणे यामध्ये अंतर आहे
म्हणून मेहनत करावी लागते. तर बापदादांना आता समयानुसार पित्या समान बनण्याचे ध्येय
संपन्न करण्याच्या (पूर्ण करण्याच्या) वेळी ही मेहनत करणे चांगले वाटत नाही.
प्रत्येकाने स्वतःला चेक करा की, मी कर्मयोगी जीवनवाला आहे? जीवन नॅचरल आणि शाश्वत
असते, काही क्षणापुरते नसते. असे अनुभवी स्वरूप बना; योगी जीवनाचे जे लक्ष्य आहे,
अनुभवी मूर्त बनण्याचे जे लक्ष्य आहे, ते लक्ष्य पूर्ण झाले आहे? सदैव मस्तकातून
चमकणारा प्रकाश स्वतःला देखील अनुभव व्हावा, स्वतः देखील त्या स्वरूपामध्ये स्थित
असावे, स्मृति स्वरूप असावे, स्मृती (आठवण) करणारा नाही, स्मृती स्वरूप असावा. आणि
स्मृती स्वरूप आहे की नाही, याचे प्रमाण हे आहे की, जिथे स्मृतीचे अनुभवी स्वरूप
असते तिथे स्वतःमध्ये प्रत्येक कार्य करताना सुद्धा समर्थी (शक्ती असल्याचा) अनुभव
होईल. कार्य वेगवेगळी असतील परंतु अनुभव स्वरूपाची स्थिती वेगवेगळी नसावी.
आज बापदादांनी पाहिले
की मेहनत का करावी लागते? अनुभव स्वरूप बनण्यामध्ये नंबरवार पुरुषार्थानुसार पाहिले.
बापदादांचे प्रत्येक मुलावर जिगरी प्रेम आहे, तर प्रेम असण्याऱ्यांची मेहनत पाहवत
नाही. मग कोणत्याही सब्जेक्टमध्ये मेहनत करावी लागते, कधी-कधी हा शब्द वापरावा लागतो,
याचे कारण आहे अनुभवी स्वरूप बनण्यामध्ये कमतरता आहे. पुरुषार्थी आहात परंतु स्वरूप
बनलेले नाही आहात. एका सेकंदामध्ये चारही सब्जेक्टमध्ये आपल्या स्वमानाच्या अनुभवी
स्वरूपाची अनुभूती व्हायला हवी, जेणेकरून देह-अभिमान जवळही येऊ शकणार नाही. जसे
प्रकाशासमोर अंधार टिकू शकत नाही. काढावा लागत नाही, तर हे स्वाभाविक आहे की, जिथे
अंधार आहे तिथे प्रकाश कमी आहे अथवा प्रकाशच नाही आहे. तर सर्वात मोठ्यात मोठी
ऑथॉरिटी ही अनुभवाची गायली गेली आहे. अनुभवाला हजारो लोकांनी जरी बदलण्याचा प्रयत्न
केला, तरीही बदलू शकणार नाहीत. जसे तुम्ही सर्वांनी साखरेचा अनुभव घेऊन पाहिला आहे
की ती गोड असते, जर हजारो लोकांनी तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही
स्वतःला बदलू शकाल का? तर जो काही सब्जेक्ट आहे, भले मग तो ज्ञानाचा असो, योगाचा असो,
धारणेचा असो किंवा सेवेचा असो, या चारपैकी कोणा एकात जरी मेहनत करावी लागत असेल, तर
नक्कीच अनुभवाची कमतरता आहे. सेवेच्या सफलतेमध्ये, धारणेमध्ये स्वभाव-संस्कार
परिवर्तनाच्या बाबतीत, योगामध्ये अचल राहण्याच्या बाबतीत अथवा योगी जीवनाची अनुभूती
करण्याच्या बाबतीत जिथे मेहनत आहे किंवा तुम्ही ‘कधी-कधी’ असे म्हणता, तर याचा अर्थ
आहे त्या सब्जेक्टमध्ये तुम्ही अनुभवीमूर्त बनलेले नाही आहात. अनुभव ‘कधी-कधी’ नसतो,
नॅचरल नेचर असते. तर आता ऐकले मेहनत करण्याचे कारण काय आहे? तुम्हाला अनुभव असेल
की, ज्या वेळी तुम्ही अनुभवाच्या सीटवर सेट असता, कोणत्याही वरदानाच्या स्वरूपामध्ये
अनुभवी बनून अनुभव करता, तर त्यावेळी मेहनत करावी लागत नाही, नॅचरल अनुभूती होते,
म्हणून आता समयानुसार सर्व काही अचानक होणार आहे. सांगून होणार नाहीये. जसे आता
प्रकृतीच्या बाबतीत अचानकचा खेळ सुरू आहे, आता आरंभ झाला आहे. नवनवीन गोष्टी अचानक
घडत आहेत, जसे भूकंप झाला, थोड्याच वेळामध्ये लाखो आत्मे निघून गेले, काय त्यांना
माहित होते का की उद्या आपण असू किंवा नसू? असे अनेक ऍक्सीडेन्ट, वेगवेगळ्या ठिकाणी
अचानक व्हायला सुरुवात झाली आहे. एकत्रितरित्या एकाच वेळी अनेकांची तिकीटे कट होत
आहेत (मृत्यू होत आहेत); तर अशा वेळी तुम्ही एव्हररेडी आहात का? असे तर म्हणणार नाही
ना की पुरुषार्थ करत आहे? एव्हररेडी अर्थात कोणतेही वरदान अथवा स्वमानाचा संकल्प
केला आणि स्वरूप बनले; म्हणून बापदादा आज या गोष्टीवर लक्ष वेधून घेत आहेत की,
कोणत्याही वरदानाला फलीभूत करून वरदानाच्या अथवा स्वमानाच्या स्वरूपाचे अनुभवी बनू
शकता का? बनावेच लागेल. प्रयत्न करत आहे, जर प्रयत्न जरी करायचा असेल तर तो आत्ता
पासून करा, कारण दीर्घकाळाचा सरावच वेळेला मदत करेल. पुरुषार्थी नाही, अनुभवी कारण
अनुभवाची ऑथॉरिटी तुम्हा सर्वांना ऑलमाइटी ऑथॉरिटीने दिली आहे. जसे देहभानाचे अनुभवी
आहात, तर काय देहभानाची आठवण करावी लागते की मी अमुक आहे? समजा तुमचे नाव देहाला
दिले गेले आहे, तर देहभान झाले ना की, मी अमुक आहे; मग हजारो लोकांनी जरी तुम्हाला
सांगितले की, तुम्ही अमुक नाही आहात, तुम्ही हे आहात, नाव बदलून सांगितले तर तुम्ही
मान्य कराल? विसराल आपले नाव!
जन्म घेताच जे नाव
पडले ते देहभान किती पक्के आणि नॅचरल राहते. जर दुसऱ्या कोणाला तुमच्या नावाने
बोलावले, तुम्हाला बोलवायचे नाहीये, परंतु तुमच्या नावाच्या व्यक्तीला बोलावत आहेत,
तर तुमचे कान ते नाव ऐकताच तुमचे लक्ष जाईल की, मला बोलावत आहेत. तर देहभान इतके
पक्के झाले आहे. अशीच देही-अभिमानी, स्वमानधारी, स्वराज्य अधिकारी असल्याची सवय इतकी
पक्की व्हावी. तुम्ही म्हणता ना, आमचे जीवन परिवर्तन झाले आहे तर परिवर्तन काय केले?
देह-भान असणारे स्वमान, स्वराज्य अधिकारी बनलात. तर चेक करा की, मी ज्ञान स्वरूप
बनलो आहे का? की ज्ञान ऐकणारा आणि ऐकविणारा बनलो आहे? ज्ञान अर्थात नॉलेज, नॉलेजचे
प्रॅक्टिकल रूप आहे, नॉलेजला म्हणतात - ‘नॉलेज इज लाइट, नॉलेज इज माइट’; तर ज्ञान
स्वरूप बनणे अर्थात जे काही कर्म कराल, ते लाइट आणि माइट युक्त असेल, यथार्थ असेल.
याला म्हटले जाते ज्ञान स्वरूप बनणे. ज्ञान ऐकविणारा नाही, ज्ञान स्वरूप बनणे. योग
स्वरूप याचा अर्थ आहे कर्मेंद्रिय-जीत बनणे. प्रत्येक कर्मेंद्रियावर स्वराज्यधारी.
याला म्हटले जाते - ‘योग’, अर्थात युक्तियुक्त जीवन. असे जर ज्ञान, योगाचे स्वरूप
असेल, तर प्रत्येक गुणाची धारणा ऑटोमॅटिकली होईल. जिथे ज्ञान, योग आहे, योगयुक्त आहे,
तिथे गुणांची धारणा ऑटोमॅटिकली होईल. नेहमीच आपोआप सेवा होईल. समयानुसार भले मनसा
सेवा करा, किंवा वाचा करा, कर्मणा करा किंवा स्नेह-संबंधांतून करा, सेवा देखील
निरंतर अखंड चालत राहील. नातलग-संपर्कामधील सुद्धा सर्वांची सेवा होते. समजा
ब्राह्मण परिवारातील तुमचा कोणी भाऊ किंवा बहीण थोडी निराश आहे, पुरुषार्थामध्ये
थोडी डल आहे (मंद आहे) किंवा एखाद्या संस्काराच्या वश आहे, अशा संपर्कातील आत्म्याला
तुम्ही उमंग-उत्साह दिला, सहयोग दिला, स्नेह दिला, हे देखील तुमचे सेवेचे पुण्य जमा
होते. पडलेल्याला उचलणे हे पुण्य कर्म म्हणून गायले जाते. तर नातेवाईक आणि
संपर्कामध्ये असणाऱ्यांचीही सेवा करणे हे खऱ्या सेवाधारीचे कर्तव्य आहे. सेवा मिळाली
किंवा सेवा दिली गेली तरच ती सेवा आहे, असे नाही. सेवा स्वतः मनसा, वाचा, कर्मणा
संपर्क-संबंधामध्ये ऑटोमॅटिकली होत राहावी. बऱ्याच वेळा बापदादांनी पाहिले की,
संपर्कामध्ये काही मुले बघतात देखील की यांचा स्वभाव-संस्कार थोडा जसा असायला हवा
तसा नाहीये, परंतु हा तर असाच आहे, हा बदलणार नाही, याची सेवा करणे म्हणजे टाइम
वेस्ट करणे आहे, असा संकल्प करणे योग्य आहे का? जेव्हा तुम्ही मानता की आपण
प्रकृतीला देखील सतोप्रधान बनविणारे आहोत, प्रकृतीला आणि तो मनुष्य-आत्मा आहे,
ब्राह्मण म्हटला जातो परंतु संस्कारांच्या वश आहे. जर प्रकृतीचे संस्कार बदलण्याचे
चॅलेंज केले आहे, मग तो तर प्रकृतीपासून बनलेला पुरुष आहे, आत्मा आहे. तुमच्या
नात्यामध्ये आहे. तर खरा सेवाधारी आपल्या सेवेचे पुण्य कमावण्यासाठी शुभ भावना
अवश्य ठेवेल. हा तर असाच आहे, हा बदलूच शकत नाही, ही शुभ भावना नाहीये, ही सूक्ष्म
घृणा भावना आहे. शेवटी आपलाच भाऊ आहे किंवा बहीण आहे; आणि तसेही ‘माझे बाबा’ तर
म्हणतो ना! तर खरा सेवाधारी शुभ भावना देण्याच्या सेवेमधून सुद्धा पुण्य कमावेल.
पडलेल्याला अजून पाडायचे नाही, तर उचलायचे. सहयोग देणे, यालाच म्हणणार - खरा
सेवाधारी, पुण्य आत्मा. तर असे स्वतःला चेक करा इतका सेवेचा उमंग-उत्साह आहे का?
याला म्हटले जाते अनुभवाची ऑथॉरिटी असणारा. तर आता बापदादांची हीच इच्छा आहे की,
अनुभवी मूर्त बना, अनुभवाच्या ऑथॉरिटीला कार्यामध्ये लावा.
चारही विषयांमध्ये जे
स्वतःला अनुभवी स्वरूप बनून अनुभवाच्या ऑथॉरिटीला कार्यामध्ये लावतील, जी काही
कमतरता असेल ती भरून काढतील, इतके स्वतःवर लक्ष देतील त्यांनी हात वर करा. मनाचा
हात उंचावत आहात ना! शरीराचा हात नको, मनाचा हात वर करा. मनाचा हात वर करा; कारण
बापदादा शिवरात्रीला रिझल्ट घेतील. मनामध्ये कोणाच्याही कमतरतेचा संस्कार तुमच्या
शुभ भावनेला कमी करू नये. त्याचा संस्कार तर कमकुवत आहे परंतु तो इतका पॉवरफुल आहे
की जो तुमच्या शुभ भावनेला कमी करतो आहे. म्हणून जसे ब्रह्मा बाबांनी काय नाही
पाहिले, काय नाही केले, (अनेक गोष्टी पाहिल्या, अनेक गोष्टी केल्या) जबाबदार असून
देखील शेवटच्या क्षणी शुभ भावना, शुभ कामनेच्या तीन शब्दांमध्ये सर्वांना शिकवण
देऊन गेले.
आठवते आहे ना! ते तीन
शब्द आठवतात ना? स्वतः देखील निराकारी, निरहंकारी, निर्विकारी याच स्थितीमध्ये
अव्यक्त झाले. कोणालाही कर्मभोगाची जाणीव होऊ दिली नाही, कोणाला वाटले की कर्मभोग
समाप्त होत आहे? काय झाले? अव्यक्त झाले. असे ब्रह्मा बाप समान फरिश्ता भव चे वरदान,
जे बाबांनी करून दाखवले, फॉलो ब्रह्मा बाबा. जसे तुम्ही म्हणता - ‘माझे बाबा’, तसे
बाबा काय म्हणतात? माझी मुले आहेत. अशी शुभ भावना आपसामध्ये परिवारासाठी देखील असणे
आवश्यक आहे. स्वभाव पाहू नका. बाबा जाणतात की, भाव-स्वभाव आहेत, परंतु भाव-स्वभावा
पोटी प्रेमाला नष्ट करू नये, नात्याला संपवू नये किंवा कार्यामध्ये यश कमी करणे हे
योग्य नाही. परिवार आहे. कोणता परिवार आहे? प्रभु परिवार, परमात्म परिवार आहे.
यामध्ये कोणत्याही कारणाने प्रेमाची उणीव असता कामा नये. प्रेम म्हणजे शुभ भावना
जरूर असावी. कसाही असला, परमात्म परिवार आहे. ज्याने मानले की मी प्रभु परिवाराचा
आहे, तर परिवार अर्थात प्रेम. जर परिवारामध्ये प्रेम नसेल तर तो परिवार नाही. हा
एकाचा परमात्म परिवार एकदाच (संगमयुगी) असतो. इतका मोठा परिवार परमात्म्याशिवाय इतर
कोणाचा असूच शकत नाही. तर चेक करा कारण याने देखील पुरुषार्थामध्ये विघ्न येते. तर
जेव्हा विघ्न-मुक्त व्हाल तेव्हाच अनुभवी बनून अनुभवाच्या ऑथॉरिटीद्वारे सर्वांना
अनुभवी बनवाल. अच्छा.
चोहो बाजूच्या मुलांना
पाहून बापदादा खुश होऊन गाणे गातात - ‘वाह बच्चे वाह!’ प्रत्येक मुलाच्या हृदयामध्ये
बाबा आहेत आणि बाबांच्या हृदयामध्ये प्रत्येक मूल आहे. आणि इथे इतका मोठा मधुबन
निवासी परिवार पाहून याचा देखील आनंद होतो - ‘वाह मधुबन वाह!’ सर्वांचे एशलम (आश्रयस्थान)
मधुबनच आहे, म्हणून सर्व जण मधुबन मध्ये धावत येतात. आता बाबांची जी आशा आहे ती
लवकरात लवकर पूर्ण करायची आहे. चारही सब्जेक्टमध्ये अनुभवी स्वरूप बनायचेच आहे.
बापदादा देश-विदेशातील चोहो बाजूंच्या मुलांना, ते कुठेही बसले असले तरी, बघत आहेत.
सर्वजण कसे पाहून हर्षित होत आहेत. ही साधने, हे विज्ञान याच वेळी प्रगती करत आहे,
नवीन-नवीन शोध या दुनियेतील आहेत, परंतु तुमच्या फायद्याची चांगली-चांगली साधने
निर्माण करत आहेत. दूर असूनही सोबत आहात. त्यामुळे वैज्ञानिकांचे देखील अभिनंदन आहे
की त्यांनी साधने तरी बनवली आहेत. अच्छा. देश-विदेशातील सर्व मुलांना खूप-खूप
मनापासून प्रेम आणि आठवण स्वीकार असो आणि विशेष करून अशा विशेष मुलांना नमस्ते.
वरदान:-
नॉलेजच्या
लाइटद्वारे पुरुषार्थाच्या मार्गाला सोपा आणि स्पष्ट करणारे फरिश्ता स्वरूप भव
फरिश्तेपणाच्या
जीवनामध्ये लाइट (प्रकाश) आणि माइट (शक्ती) दोन्ही स्पष्ट दिसून येतात. परंतु लाइट
आणि माइट रूप बनण्यासाठी मनन करण्याची आणि सहन करण्याची शक्ती हवी. मनसा साठी
मननशक्ती आणि वाचा, कर्मणेसाठी सहनशक्ती धारण करा, मग जे काही शब्द बोलाल, किंवा
कर्म कराल ते त्याच्या अनुसारच होईल. जर या दोन्ही शक्ती असतील, तर प्रत्येकासाठी
पुरुषार्थाचा मार्ग सोपा आणि स्पष्ट होईल.
सुविचार:-
व्यर्थ बोलणे अर्थात
अनेकांना डिस्टर्ब करणे.
हे अव्यक्त इशारे -
सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.
तुम्ही मुले मास्टर
प्रकृती-पती आहात, प्रकृतीच्या या खेळाला पाहून हर्षित होत राहा. भले प्रकृती
हादरवून टाकेल, किंवा प्रकृती सुंदर खेळ दाखवेल, परंतु प्रकृती-पती आत्मे
दोन्हीमध्ये साक्षी होऊन खेळ पाहतात आणि खेळाचा आनंद घेतात, घाबरत नाहीत. म्हणून
बापदादा तपस्ये द्वारे साक्षीपणाच्या स्थितीच्या आसनावर अचल, अडोल आणि स्थिर
राहण्याचा विशेष अभ्यास करून घेत आहेत.