11-04-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“अंतर्मुखी मुलांनो -
ज्ञान रूप अवस्थेमध्ये राहून या महावाक्यांना धारण करा तेव्हाच आपले आणि इतर
आत्म्यांचे कल्याण करू शकाल” (दादींच्या डायरीमधून)
ओम शांती।
प्रत्येक पुरुषार्थी मुलाने प्रथम अंतर्मुखी अवस्था अवश्य धारण करायची आहे.
अंतर्मुखतेमध्ये खूप मोठे कल्याण सामावलेले आहे, या अवस्थेमुळेच अचल, स्थिर,
धैर्यवत (खंबीर), निर्मान-चित्त इत्यादि दैवी गुणांची धारणा होऊ शकते आणि संपूर्ण
ज्ञानमय अवस्था प्राप्त होऊ शकते. अंतर्मुख न झाल्यामुळे ती संपूर्ण ज्ञानमय अवस्था
प्राप्त होत नाही कारण जी काही ‘महावाक्ये’ सन्मुख ऐकली जातात, जर त्यांना खोलात
जाऊन ग्रहण केली नाहीत, ती महावाक्ये ऐकून फक्त रिपीट केली तर ती ‘महावाक्ये’,
‘वाक्ये’ होतात. ज्ञानरूप अवस्थेमध्ये राहून जी महावाक्ये ऐकली जात नाहीत, त्या
महावाक्यांवर मायेची सावली पडते. आता अशी मायेच्या अशुद्ध व्हायब्रेशनने भरलेली
महावाक्ये ऐकून फक्त रिपीट करण्यामुळे स्वतःबरोबरच इतरांचे कल्याण होण्याच्या ऐवजी
अकल्याण होते, म्हणून माझ्या मुलांनो, एकदम अंतर्मुखी बना.
तुमचे हे मन
मंदिरासारखे आहे. जसा मंदिरातून नेहमी सुगंध येतो तसे मन-मंदिर जेव्हा पवित्र बनते
तेव्हा संकल्प देखील पवित्र इमर्ज होतात. जसे मंदिरामध्ये फक्त पवित्र
देवी-देवतांचीच चित्रे ठेवली जातात, राक्षसांची नाहीत. तसे तुम्ही मुलांनी आपल्या
मन आणि हृदयरूपी मंदिराला सर्व ईश्वरीय गुणांच्या मूर्तींनी सजवा. ते गुण आहेत -
निर्मोह, निर्लोभ, निर्भय, धैर्यवत (खंबीरता), निरहंकार, इत्यादी कारण ही सर्व
तुमचीच दिव्य लक्षणे आहेत. तुम्हा मुलांना आपल्या मन-मंदिराला प्रकाशित करायचे आहे
अर्थात संपूर्ण शुद्ध बनवायचे आहे. जेव्हा मन-मंदिर प्रकाशित होईल तेव्हाच आपल्या
प्रकाशमय प्रिय वैकुंठ देशामध्ये जाऊ शकाल. तर आता आपल्या मनाला उज्वल बनविण्याचा
प्रयत्न करायचा आहे आणि मनासहित विकारी कर्मेंद्रियांना वश करायचे आहे. परंतु फक्त
आपलीच नाही परंतु इतरांसाठी सुद्धा ही दिव्य सेवा करायची आहे.
खरे तर सेवेचा अर्थ
खूप सूक्ष्म आणि महीन (गुंतागुंतीचा) आहे. असे नाही की कोणाची चुक झाली तर त्यासाठी
त्याला फक्त सावध करणे इथं पर्यंतच सेवा आहे. परंतु नाही, तुमची योगशक्ती सूक्ष्म
रीतीने त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्या अशुद्ध संकल्पांना भस्म करणे, हीच
सर्वोत्तम खरी सेवा आहे आणि त्याच सोबत स्वतःवर देखील लक्ष ठेवायचे आहे. जर कोणता
अशुद्ध संकल्प केवळ वाणीमध्ये अथवा कर्मणामध्येच नाही परंतु मनसामध्ये जरी काही
अशुद्ध संकल्प उत्पन्न होत असेल तर त्याचे व्हायब्रेशन इतरांपर्यंत जाऊन सूक्ष्म
रीतीने अकल्याण करतात, ज्याचे ओझे स्वतःवर येते आणि तेच ओझे बंधन बनते; म्हणून
माझ्या मुलांनो, स्वतः सावध रहा आणि मग इतरांच्यासाठी तीच दिव्य सेवा करा, हेच
तुम्हा सेवाधारी मुलांचे अलौकिक कर्तव्य आहे. अशी सेवा करणाऱ्यांना मग स्वतःसाठी
कोणत्याही सेवेची अपेक्षा ठेवण्याची गरज नसते. भले कधी काही नकळत चूक जरी झाली तरी
तिला आपल्या बुद्धीच्या योगबळाद्वारे कायमसाठी करेक्ट करा (दुरुस्त करा). असा तीव्र
पुरुषार्थी थोडा जरी इशारा मिळाला तरी ताबडतोब त्याला ओळखून परिवर्तन करतो आणि
भविष्यातही सतर्क राहून लक्ष ठेवून चालतो, हेच विशाल-बुध्दी मुलांचे कर्तव्य आहे.
हे माझ्या प्राणांनो,
परमात्म्याद्वारे रचलेल्या या अविनाशी राजस्व ज्ञान यज्ञाप्रति तन, मन, धनाला
संपूर्ण रीतीने स्वाहा करण्याचे रहस्य अत्यंत सूक्ष्म आहे. ज्या क्षणी तुम्ही म्हणता
की, ‘मी तन, मन, धनासहित यज्ञामध्ये स्वाहा करून अर्थात अर्पण होऊन मरण पावलो आहे’,
त्या क्षणापासून तुमचे स्वतःचे काहीही राहत नाही. त्यामध्ये देखील पहिले तनाला आणि
मनाला संपूर्ण रीतीने सेवेमध्ये लावायचे आहे. जर का सर्व काही यज्ञाप्रति अथवा
ईश्वराप्रती आहे तर मग स्वतःकरिता काहीही राहू शकत नाही. धनसुद्धा तुम्ही व्यर्थ
घालवू शकत नाही. मन देखील अशुद्ध संकल्प-विकल्पांकडे धावू शकत नाही कारण
परमात्म्याला अर्पण केले आहे. आता परमात्मा तर आहेतच शुद्ध, शांत स्वरूप. त्यामुळे
अशुद्ध संकल्प स्वतःच शांत होतात. जर मनाला मायेच्या हातात देता तर मायेची व्हरायटी
रूपे असल्याकारणाने अनेक प्रकारचे विकल्प उत्पन्न करून माया मनरूपी घोड्यावर बसून
स्वारी करते. जर कोणत्या मुलाला अजूनपर्यंत सुद्धा संकल्प-विकल्प येत असतील तर समजले
पाहिजे की मन अजून पूर्ण रीतीने स्वाहा झालेले नाहीये अर्थात ईश्वरीय मन बनलेले
नाहीये; त्यामुळे माझ्या त्यागी मुलांनो, या गूढ रहस्यांना समजून कर्म करताना साक्षी
होऊन स्वतःकडे बघत अतिशय सावधगिरीने चालायचे आहे.
स्वयं गोपी वल्लभ
आपल्या प्रिय गोप-गोपिकांना समजावून सांगत आहेत की तुम्हा प्रत्येकाचे वास्तविक खरे
प्रेम कोणते आहे! माझ्या प्राणांनो, तुम्हाला एकमेकांच्या प्रेमाने भरलेल्या
सूचनांचा स्वीकार करायचा आहे कारण जितके आवडते फूल, तितकीच श्रेष्ठ पालना. फुलाला
अमूल्य बनविण्याकरिता माळ्याला काट्यांमधून बाहेर काढावेच लागते. तसे तुम्हाला
देखील जेव्हा कोणी सतर्क करतो तेव्हा समजले पाहिजे की जणूकाही त्याने माझी पालना
केली अर्थात माझी सेवा केली. त्या सेवेला अथवा पालनेला मान द्यायचा आहे, हीच
संपूर्ण बनण्याची युक्ती आहे. हेच ज्ञानयुक्त आंतरिक खरे प्रेम आहे. या दिव्य
प्रेमामध्ये एकमेकांप्रति खूप आदर असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये पहिले स्वतःला
सावध करायचे आहे, हीच निर्माण-चित्त अती मधुर अवस्था आहे. असे प्रेमपूर्वक
चालल्यामुळे तुम्हाला जणूकाही इथेच सतयुगातील ते सुंदर दिवस आतून अनुभवास येतील.
तिथे तर हे प्रेम नैसर्गिक असते परंतु या संगमाच्या सुमधुर वेळी एकमेकांसाठी सेवा
करण्याचे हे अती गोड रमणिक प्रेम आहे, हेच शुद्ध प्रेम जगामध्ये गायले गेले आहे.
तुम्हा प्रत्येक
चैतन्य फुलांना प्रत्येक क्षणी हर्षितमुख होऊन रहायचे आहे कारण निश्चय-बुद्धी असल्या
कारणाने तुमच्या नसा-नसांमध्ये संपूर्ण ईश्वरीय ताकद भरून राहिलेली आहे. अशी आकर्षण
शक्ती आपला दिव्य चमत्कार अवश्य दाखवते. जशी छोटी निर्दोष मुले शुद्ध, पवित्र
असल्यामुळे सदैव हसत रहातात आणि आपल्या रमणिक चरित्राने सर्वांना खूप आकर्षित करतात.
तसे तुम्हा प्रत्येकाचे असे ईश्वरीय रमणिक जीवन असले पाहिजे, त्यासाठी तुम्हाला
कोणत्याही युक्तीने आपल्या आसुरी स्वभावावर विजय प्राप्त करायचा आहे. जेव्हा कोणाला
बघता की हा क्रोध विकाराच्या वश होऊन माझ्या समोर येत आहे तर त्याच्यासमोर ज्ञान
रूप होऊन एखाद्या बाळाप्रमाणे गोड हसत रहा तर तो स्वतः शांतचित्त होईल अर्थात
विस्मृती स्वरूपामधून स्मृतीमध्ये येईल. भले त्याला कळले जरी नाही, परंतु सूक्ष्म
रीतीने त्याच्यावर विजय मिळवून मालक बना, हीच मालक आणि बालकपणाची सर्वोच्च शिरोमणी
विधी आहे.
ईश्वर जसा संपूर्ण
ज्ञानस्वरूप आहे तसाच मग संपूर्ण प्रेमस्वरूप देखील आहे. ईश्वरामध्ये दोन्ही
गुणधर्म सामावलेले आहेत परंतु पहिले ज्ञान, नंतर प्रेम. जर कोणी पहिले ज्ञान रूप
बनल्याशिवाय फक्त प्रेम रूप बनतो तर ते प्रेम अशुद्ध खात्यामध्ये घेऊन जाते त्यामुळे
प्रेमाला मर्ज करून पहिले ज्ञान रूप बनून विविध रूपांमध्ये आलेल्या मायेवर विजय
प्राप्त करून नंतर मग प्रेमरूप बनायचे आहे. जर ज्ञानाशिवाय प्रेमामध्ये याल तर कधी
विचलित सुद्धा व्हाल. जसे - जर का कोणी ज्ञानरूप बनल्याशिवाय ध्यानामध्ये जातात तर
कित्येकदा मायेमध्ये अडकतात. म्हणून बाबा म्हणतात - मुलांनो, हे ध्यान देखील एक
प्रकारे सुताची बेडी आहे; परंतु ज्ञान रूप बनून नंतर ध्यानामध्ये गेल्याने खूप
मजेशीर अनुभव येतो. तर पहिले आहे ज्ञान, नंतर आहे ध्यान. ध्यानिष्ठ अवस्थेपेक्षा
ज्ञानिष्ठ अवस्था श्रेष्ठ आहे त्यामुळे माझ्या मुलांनो, आधी ज्ञान रूप बनून नंतर मग
प्रेम इमर्ज करायचे आहे. ज्ञानाशिवाय फक्त प्रेम या पुरुषार्थी जीवनामध्ये विघ्न
आणते.
साक्षीपणाची अवस्था
अती गोड, रमणिक आणि सुंदर आहे. या अवस्थेवरच पुढचे सारे जीवन अवलंबून आहे. जसे
कोणाला कोणते शारीरिक भोग भोगावे लागतात त्या वेळी तो जर साक्षी, सुखरूप अवस्थेमध्ये
राहून ते भोगतो तेव्हा मागील कर्मांचे भोग चुकते सुद्धा करतो आणि त्याच सोबत
भविष्यासाठी सुखाचा हिशोब देखील बनवतो. तर हा साक्षीपणाचा सुखरूप अवस्थेचा संबंध
भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्हींशी आहे. तर हे रहस्य समजल्यावर कोणीही असे म्हणणार नाही
की माझा हा सुंदर वेळ फक्त चुकतू करण्यात निघून गेला. नाही, हाच सुंदर पुरुषार्थाचा
काळ आहे ज्यावेळी दोन्ही कार्ये संपूर्ण रीतीने साध्य होतात. अशी दोन्ही कार्ये
साध्य करणारा तीव्र पुरुषार्थीच अतींद्रिय सुख किंवा आनंद अनुभवत राहतो.
या व्हरायटी विराट
ड्रामाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हा मुलांना पूर्णतः निश्चय असला पाहिजे कारण
हा पूर्व नियोजित ड्रामा खूपच इमानदार आहे. बघा, हा ड्रामा प्रत्येक जीव,
प्राण्याकडून त्यांचा पार्ट पूर्ण रीतीने बजावून घेतो. भले कोणी चुकीचा आहे, तर तो
चुकीचा पार्ट सुद्धा पूर्ण रीतीने बजावतो. हे देखील ड्रामामध्ये आधीच नोंदवलेले आहे.
जेव्हा चूक आणि बरोबर दोन्हीही ड्रामाच्या प्लॅनमध्ये लिहिलेले आहेत तर मग कोणत्याही
गोष्टीमध्ये संशय घेणे, हे ज्ञान नाही कारण प्रत्येक ॲक्टर आपला-आपला पार्ट बजावत
आहे. जसे चित्रपटामध्ये अनेक भिन्न-भिन्न नाव-रूपधारी ॲक्टर्स आपला-आपला अभिनय
करतात तेव्हा त्यांना पाहून कोणाविषयी द्वेष वाटेल आणि कोणाबद्दल आनंद होईल, असे
काही होत नाही. कारण माहीत आहे की हा एक खेळ आहे, ज्यामध्ये प्रत्येकाला आपापला
चांगला अथवा वाईट पार्ट मिळालेला आहे. तसेच या अनादि बनलेल्या चित्रपटाला देखील
साक्षी होऊन एकरस अवस्थेमध्ये हर्षितमुख राहून बघत राहायचे आहे. संघटनमध्ये हा
पॉईंट खूप चांगल्या प्रकारे धारण करायचा आहे. एकमेकांना ईश्वरीय रूपामध्ये बघायचे
आहे. जाणीवपूर्वक ज्ञान घेऊन सर्व ईश्वरीय गुणांची धारणा करायची आहे. आपल्या लक्ष्य
स्वरूपाच्या स्मृती द्वारे शांत-चित्त, निर्मान-चित्त, धैर्यवत (खंबीरता), गोडवा,
शीतलता इत्यादी सर्व दैवी गुण इमर्ज करायचे आहेत.
धैर्यवत अवस्था धारण
करण्याचे मुख्य फाउंडेशन आहे - वेट अँड सी (थांबा आणि बघा). हे माझ्या प्रिय मुलांनो,
‘वेट’ अर्थात धीर धरणे, ‘सी’ अर्थात बघणे. आपल्या अंतःकरणामध्ये खंबीरतेचा गुण धारण
करून नंतर मग या बाहेरील विराट ड्रामाला साक्षी होऊन बघायचे आहे. जोपर्यंत कोणतेही
रहस्य ऐकण्याची वेळ जवळ येत नाही तोपर्यंत धैर्यवत गुणाची (खंबीरतेच्या गुणाची)
धारणा करायची आहे. वेळ आल्यावर त्या खंबीरतेच्या गुणामुळे कोणतेही रहस्य ऐकताना
कधीही विचलित होणार नाही, म्हणून माझ्या पुरुषार्थी प्राणांनो, थोडे थांबा आणि पुढे
जात रहस्ये बघत चला. याच धैर्यवत अवस्थेद्वारे सर्व कर्तव्ये संपूर्ण रीतीने साध्य
होतात. हा गुण निश्चयाशी निगडित आहे. असे निश्चयबुध्दी साक्षी दृष्टा होऊन प्रत्येक
खेळ हर्षित चेहऱ्याने बघत आंतरिकरित्या खंबीरपणे आणि अडोल-चित्त राहतात; हीच
ज्ञानाची परिपक्व अवस्था आहे, जी शेवटी संपूर्णतेच्या वेळी प्रॅक्टिकल मध्ये राहते
आणि म्हणूनच दीर्घकाळापासून या साक्षीपणाच्या अवस्थेमध्ये स्थित राहण्यासाठी
परिश्रम करायचे आहेत.
जसे नाटकामध्ये ॲक्टरला
आपला मिळालेला पार्ट पूर्ण बजावण्यासाठी आधीपासूनच रिहर्सल (रंगीत तालीम) करावी
लागते, तशी तुम्हा प्रिय फुलांना सुद्धा येणाऱ्या भयानक परीक्षांमध्ये योगबळाद्वारे
पास होण्यासाठी आधीपासूनच रिहर्सल जरूर करायची आहे. परंतु दीर्घकाळापासून जर हा
पुरुषार्थ केलेला नसेल तर त्या वेळी घाबरून नापास व्हाल, त्यामुळे पहिले आपले
ईश्वरीय फाउंडेशन पक्के ठेवून दैवीगुणधारी बनायचे आहे.
ज्ञानस्वरूप
स्थितीमध्ये स्थित राहिल्यामुळे स्वतःच शांत रूप अवस्था होते. जेव्हा ज्ञानी तू
आत्मा मुले, एकत्र बसून मुरली ऐकतात तेव्हा चारी दिशांना शांतीचे वातावरण निर्माण
होते कारण ते कोणतेही महावाक्य ऐकतात तेव्हा अंतर्मनाच्या तळाला जातात. असे तळाला
गेल्यामुळे त्यांना आंतरिक शांतीची एक गोड अनुभूती होते. आता याच्यासाठी खास बसून
काही मेहनत करायची नाहीये, परंतु ज्ञानाच्या अवस्थेमध्ये स्थित राहिल्याने हा गुण
अनायासे येतोच. तुम्ही मुले जेव्हा पहाटे उठून एकांतामध्ये बसता तेव्हा शुद्ध विचार
रूपी तरंग उत्पन्न होतात, त्यावेळी खूप उपराम अवस्था असायला हवी. आणि मग आपल्या
स्वतःच्या शुद्ध संकल्पामध्ये स्थित झाल्यामुळे बाकी सर्व संकल्प आपोआप शांत होतील
आणि तुमचे मन अमन होईल (शांत होईल). कारण मनाला वश करण्यासाठी देखील काही शक्ती तर
अवश्य पाहिजे. म्हणून सर्वप्रथम आपल्या लक्ष्य स्वरूपाच्या शुद्ध संकल्पाला धारण करा.
जेव्हा तुमचा आंतरिक बुद्धियोग नियमानुसार असेल, तेव्हा तुमची ही निरसंकल्प अवस्था
स्वतः होईल. अच्छा!
गोड-गोड ज्ञान गुलजारी,
ज्ञान सिताऱ्यांप्रती प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याचा
आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आपल्या
लक्ष्य स्वरूपाच्या स्मृतिद्वारे शांत-चित्त, निर्मान-चित्त, धैर्यवत (खंबीरता),
गोडवा, शीतलता इत्यादी सर्व दैवी गुण धारण करायचे आहेत.
२) निश्चयबुध्दी
साक्षी दृष्टा होऊन या खेळाला हर्षित चेहऱ्याने बघत आंतरिक खंबीरपणे आणि अडोल-चित्त
रहायचे आहे. दीर्घकाळापासून या साक्षीपणाच्या अवस्थेमध्ये स्थित राहण्याचा
पुरुषार्थ करायचा आहे.
वरदान:-
एकच मार्ग आणि
एकाशीच नाते ठेवणारे संपूर्ण फरिश्ता भव
निराकार अथवा साकार
रूपामध्ये बुध्दीची संगत अथवा नाते एका बाबांशी पक्के असावे तेव्हाच फरिश्ता बनाल.
ज्यांचे सर्व संबंध अथवा नाती एकाशीच आहेत तेच सदैव फरिश्ते आहेत. जसे गव्हर्नमेंट
रस्त्यावर बोर्ड लावतात की, ‘हा रस्ता बंद आहे’, असे सर्व रस्ते बंद करा म्हणजे मग
बुध्दीचे भटकणे बंद होईल. बापदादांचा हाच आदेश आहे की, अगोदर सर्व रस्ते बंद करा.
यामुळे सहजच फरिश्ता बनाल.
बोधवाक्य:-
सदैव सेवेच्या
उमंग-उत्साहामध्ये राहणे - हेच मायेपासून सेफ्टीचे साधन आहे.
हे अव्यक्त इशारे -
महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.
तुमचे बोलणे आणि
स्वरूप दोन्ही सुसंगत असले पाहिजेत, बोल स्पष्ट सुद्धा असावेत, त्यामध्ये स्नेह
देखील असावा, नम्रता आणि मधुरता देखील असावी. सत्यता सुद्धा असावी परंतु त्याचबरोबर
नम्रतेचे स्वरूप असावे, याच स्वरूपा द्वारे तुम्ही बाबांना प्रत्यक्ष करू शकाल.
निर्भय असावेत परंतु शब्द मर्यादेच्या आत असावेत. जेव्हा या दोन्ही गोष्टींचा
बॅलन्स साधला जाईल तेव्हा चमत्कार दिसून येतील. तेव्हा मग तुमचे बोल कठोर न वाटता,
गोड वाटतील.