12-03-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - हे शिक्षण सोर्स ऑफ इन्कम (मिळकतीचे साधन) आहे, याद्वारे तुम्ही मनुष्यापासून देवता बनता, २१ जन्मांसाठी खरी कमाई होते”

प्रश्न:-
बाबा ज्या गोड-गोड गोष्टी सांगत आहेत, त्या केव्हा धारण होतील?

उत्तर:-
जेव्हा बुद्धीवर परमत किंवा मनमताचा प्रभाव नसेल. जी मुले ऐकीव गोष्टींवर चालतात, त्यांच्या बुद्धीमध्ये धारणा होऊ शकत नाही. ज्ञानाव्यतिरिक्त इतर कोणतीही गोष्ट जर कोणी ऐकवत असेल तर तो जणू शत्रू आहे. खोट्या गोष्टी सांगणारे खूप आहेत म्हणून ‘हियर नो इव्हील, सी नो इव्हील’; मनुष्यापासून देवता बनण्यासाठी एका बाबांच्या श्रीमतावरच चालायचे आहे.

गीत:-
हमारे तीर्थ न्यारे हैं...

ओम शांती।
या गाण्यामध्ये जणू काही आपली महिमा करत आहेत. खरे तर आपली महिमा केली जात नाही. या तर सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. जे भारतवासी खूप बुद्धिमान होते, आता निर्बुद्ध बनले आहेत. आता प्रश्न उठतो की, बुद्धिमान कोण होते? हे कुठेही लिहिलेले नाही. तुम्ही आहात गुप्त. किती वंडरफुल गोष्टी आहेत. एक तर बाबा म्हणतात - मुले, माझ्याद्वारेच मला जाणू शकतात. आणि मग माझ्याद्वारे इतर सर्व काही जाणतात. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचा जो खेळ आहे तोही त्यांना समजतो; इतर कोणीही जाणत नाहीत. आणि एक मुख्य चूक केली आहे की निराकार परमपिता परमात्मा शिव यांच्या ऐवजी श्रीकृष्णाचे नाव टाकले आहे. पहिल्या नंबरचे शास्त्र, ज्याला ‘श्रीमद्भगवत गीता’ म्हणतात तेच चुकीचे ठरले आहे. म्हणून सर्वप्रथम तर हे सिद्ध करायचे आहे की भगवान एक आहे. मग विचारायचे आहे की, गीतेचा भगवान कोण? भारताचा आदि सनातन देवी-देवता धर्म आहे. जर नवीन धर्म म्हटले तर ब्राह्मण धर्मच म्हणू. पहिल्यांदा शिखर आहे ब्राह्मण मग देवता. सर्वात उच्च ते उच्च ब्राह्मण धर्म आहे. ज्या ब्राह्मणांना परमपिता परमात्मा ब्रह्माद्वारे रचतात, तेच ब्राह्मण मग देवता बनतात. मुख्य गोष्ट आहे - भगवान नवीन दुनियेचे रचयिता सर्वांचा पिता आहेत. जरूर नवीन दुनियाच रचतील ना. नवीन दुनियेमध्ये नवा भारत असतो. जन्म देखील भारतामध्येच घेतला आहे. भारतालाच ब्रह्मा द्वारे स्वर्ग बनवत आहेत. तुम्हाला आपले बनवून मग मनुष्यापासून देवता बनविण्याकरिता शिकवतात. आधी तुम्ही शूद्र वर्णाचे होता आणि मग ब्राह्मण वर्णामध्ये आलात नंतर मग दैवी वर्णामध्ये येता. नंतर वृद्धी होत राहते. एका धर्मापासून अनेक धर्म तयार होतात. सर्व धर्मांच्या शाखा-उपशाखा (पोट धर्म) देखील तयार होतात, प्रत्येक धर्मातून तयार होतात. तीन ट्यूब (शाखा) आहेत ना. या आहेत मुख्य. प्रत्येक धर्मातून आपापल्या शाखा तयार होतात. मुख्य आहे फाउंडेशन (देवी-देवता धर्म) त्यानंतर मुख्य आहेत तीन ट्यूब्ज (तीन धर्म). खोड आहे - आदि सनातन देवी-देवता धर्माचे. जे आता सर्व राजयोग शिकत आहात. दिलवाडा मंदिर खूप सुंदर बनलेले आहे, त्यामध्ये सर्व स्पष्टीकरण आहे. मुले इथे बसलेली आहेत, कल्पापूर्वी देखील तुम्ही राजयोगाची तपस्या केली होती. जसे क्राईस्टचे यादगार (स्मारक) ख्रिश्चन देशामध्ये आहे, तसे तुम्ही मुलांनी इथे तपस्या केली आहे म्हणून तुमचे देखील यादगार (स्मृतिरूप) इथे आहे. समजण्यासाठी आहे खूप सोपे, परंतु कोणीही जाणत नाहीत. संन्यासी लोक तर म्हणतात की, ही सर्व कल्पना आहे, जशी जो कल्पना करेल. तुमच्यासाठी देखील म्हणतात - ही चित्रे इत्यादी सर्व तुम्ही कल्पनेने बनविली आहेत. जोपर्यंत बाबांना जाणत नाहीत, तोपर्यंत कल्पनाच समजतात. नॉलेजफुल तर एक बाबाच आहेत ना. तर मुख्य आहे बाबांचा परिचय देणे. ते बाबा आता स्वर्गाचा वारसा देत आहेत. कल्पापूर्वी सुद्धा दिला होता. मग ८४ जन्म घ्यावे लागतात. भारतवासीयांचेच ८४ जन्म असतात. मग संगमयुगावर बाबा येऊन राजधानी स्थापन करतात. तुम्हा मुलांनी बाबांकडूनच समजून घेतले आहे. जेव्हा चांगल्या प्रकारे समजतील, बुद्धीमध्ये पक्के होईल तेव्हा मग आनंद देखील होईल.

हे शिक्षण मिळकतीचे मोठे साधन आहे. शिक्षणामुळेच मनुष्य बॅरिस्टर इत्यादी बनतात; परंतु हे शिक्षण मात्र मनुष्यापासून देवता बनण्यासाठी आहे. किती श्रेष्ठ प्राप्ती आहे. यासारखी प्राप्ती कोणी करून देऊ शकत नाही. ग्रंथामध्ये गायले गेले आहे - ‘मनुष्य से देवता किये करत न लागी वार’. परंतु मनुष्यांची बुद्धी चालत नाही. जरूर तो देवी देवता धर्म प्राय:लोप झाला आहे, म्हणूनच तर लिहितात की, मनुष्यापासून देवता बनले. देवता सतयुगामध्ये होते. त्यांना जरूर भगवंताने संगमयुगावर रचले असेल. कसे रचले? हे कोणी जाणत नाहीत. गुरुनानक ने देखील परमात्म्याची महिमा गायली आहे. त्यांच्यासारखी महिमा कोणीच गायलेली नाही म्हणून ग्रंथ भारतात वाचले जातात. गुरुनानकांचा कलियुगामध्ये अवतार घेतात. ते आहेत धर्मस्थापक. राजाई तर नंतर सुरु झाली आहे. बाबांनी तर हा देवी-देवता धर्म स्थापन केला आहे. खरे तर नवी दुनिया ब्राह्मणांचीच म्हटली पाहिजे. शिखर भलेही ब्राह्मणांचे आहे परंतु राजधानी देवी-देवतांपासून सुरू होते. तुम्ही ब्राह्मण रचले गेले आहात. तुमची काही राजधानी नाही आहे. तुम्ही स्वतःसाठी राज्य स्थापन करता. खूप वंडरफुल गोष्टी आहेत! मनुष्य तर काहीही जाणत नाहीत. सर्वात आधी आपल्याला माहीत झाले मग आपल्याद्वारे इतरांना माहीत होते. तुम्ही शूद्रापासून ब्राह्मण बनला आहात.

ब्रह्माला देखील आत्ता बाबांकडून माहीत होते. एकाला सांगितले की मुलांना सुद्धा सांगायचे असते. त्यांच्या तनाद्वारे तुम्हा मुलांना बसून समजावून सांगतात. या आहेत अनुभवाच्या गोष्टी. शास्त्रांमधून तर कोणी काहीही समजू शकणार नाही. बाबा म्हणतात - पूर्ण कल्पामध्ये एकदाच मी असाच येऊन समजावून सांगतो, इतर अनेक धर्मांचा विनाश आणि एका धर्माची स्थापना करतो, हा ५ हजार वर्षांचा खेळ आहे. तुम्ही मुले जाणता आपण ८४ जन्म घेतले आहेत. विष्णूच्या नाभीतून ब्रह्मा दाखवतात. ब्रह्मा आणि विष्णू ही कोणाची मुले आहेत? दोघेही शिवबाबांची मुले आहेत. ते आहेत रचयिता, हे आहेत रचना. या गोष्टींना कोणीही समजू शकत नाही. एकदम नवीन गोष्ट आहे. बाबा देखील म्हणतात - या नवीन गोष्टी आहेत. कोणत्याही शास्त्रांमध्ये या गोष्टी असू शकत नाहीत. ज्ञानाचे सागर बाबा आहेत, तेच गीतेचे भगवान आहेत. भक्तिमार्गामध्ये शिवजयंती सुद्धा साजरी करतात. सतयुग, त्रेतामध्ये साजरी करत नाहीत. तर जरूर संगमावरच येत असतील! या गोष्टी तुम्ही समजत जाता आणि समजावून सांगत राहता. हे ज्ञान समजावून सांगणाऱ्या बाबांची जी महिमा आहे, ती मुलांची असली पाहिजे. तुम्हाला देखील मास्टर ज्ञानाचा सागर बनायचे आहे. प्रेमाचा सागर, सुखाचा सागर इथे बनायचे आहे. कोणाला दुःख द्यायचे नाही. अतिशय गोड बनायचे आहे. तुम्ही जे एकदम कडू, विषासारखे होता ते आता तुम्ही व्हाईसलेस (निर्विकारी) ब्राह्मण बनत आहात. ईश्वराची संतान बनत आहात. विशश पासून (विकारी पासून) व्हाईसलेस (निर्विकारी) देवता बनत आहात. अर्धे कल्प तुम्ही पतित बनता-बनता आता तर अगदी जडजडीभूत अवस्थेमध्ये आहात. सडलेल्या, कापडयांना जोरात आपटले तर फाटून चिंध्या-चिंध्या होतात. इथे देखील ज्ञानाचे फटके मारा तर पुर्जा-पुर्जा (तुकडे-तुकडे) होतात. काही कपडे इतके मळके आहेत की स्वच्छ करण्यासाठी खूप वेळ लागतो. मग तिथे देखील कनिष्ठ पद मिळते. बाबा धोबी आहेत. सोबत तुम्ही देखील मदतगार आहात. धोबी देखील नंबरवार असतात. इथे देखील नंबरवार आहेत. धोब्याने कपडे चांगले धुतले नाहीत तर म्हणतील ना की, हा तर जणू हजाम आहे. आजकाल कपडे साफ धुवायला शिकले आहेत. पूर्वी खेडेगावात तर खूप मळके कपडे धुतले जात होते… ही कला देखील बाहेरील ठिकाणाहून आली आहे. बाहेरगावचे थोडा मान देतात. पैसे इत्यादीची मदत करतात. जाणतात की हे खूप उच्च कुळातील आहेत. आता खाली घसरले आहेत (पतन झाले आहे). ज्यांचे पतन झाले आहे त्यांची दया येते ना. बाबा म्हणतात - तुम्हाला किती श्रीमंत बनविले होते. मायेने काय हालत केली आहे. तुम्ही आता समजता आपण विजयी माळेमधले होतो, आणि मग ८४ जन्म घेऊन आता आपण काय बनलो आहोत. आश्चर्य आहे ना. तुम्ही समजावून सांगू शकता की, तुम्ही भारतवासी तर स्वर्गवासी होता. भारतच स्वर्ग होता. मग खाली घसरत-घसरत (पतन होत-होत) नरकवासी देखील बनावे लागले. आता बाबा म्हणतात - पवित्र बनून स्वर्गवासी बना. मनमनाभव. शिवभगवानुवाच - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. आठवणीच्या यात्रेद्वारे तुमची सर्व पापे नष्ट होतील. शास्त्रांमध्ये लिहिले आहे - पट्टराणी बनविण्यासाठी श्रीकृष्णाने पळवून नेले. तुम्ही सर्व शिकत आहात, पट्टराणी बनत आहात; परंतु या गोष्टींना कोणीही समजू शकत नाही. आता बाबांनी येऊन मुलांना समजावून सांगितले आहे. बाबा म्हणतात - ‘मी कल्प-कल्प तुम्हाला समजावून सांगण्याकरिता येतो. तर पहिले भगवान एक आहे, हे सिद्ध करून नंतर मग गीतेचा भगवान कोण आहे ते सांगा. राजयोग कोणी शिकवला आहे? भगवानच ब्रह्मा द्वारे स्थापना करतात मग विनाश नंतर मग पालना करतात. हे जे ब्राह्मण आहेत तेच मग देवता बनतात. या गोष्टी लक्षात देखील त्यांच्याच येतील ज्यांनी कल्पापूर्वी समजून घेतले आहे. सेकंद बाय सेकंद जे झाले ते या वेळेपर्यंत समजतील. ड्रामामध्ये तुम्हाला खूप पुरुषार्थ करायचा आहे. हे तर मुले समजतात की आता आमची ती अवस्था अजून झालेली नाहीये. वेळ लागेल. कर्मातीत अवस्था झाली तर मग सर्व नंबरवन मध्ये पास होतील, मग तर लढाई सुद्धा सुरू होईल. आपसामध्ये (कलह) चालूच राहतील. तुम्ही जाणता जिकडे बघावे तिकडे युद्धाची तयारी करत आहेत. सगळीकडे तयारी करत आहेत. तुम्ही जे काही दिव्य दृष्टीने बघितले आहे ते पुन्हा या डोळ्यांनी बघायचे आहे. विनाशाचा साक्षात्कार केला आहे, तोच पुन्हा डोळ्यांनी बघाल. स्थापनेचा देखील साक्षात्कार केला आहे मग प्रत्यक्षात राज्य देखील बघाल. तुम्हा मुलांना तर खूप आनंद झाला पाहिजे. हे तर जुने शरीर आहे. योगाद्वारे आत्मा पवित्र बनेल, मग हे जुने शरीर देखील सोडायचे आहे. ८४ जन्मांचे चक्र पूर्ण होत आहे, मग जरूर सर्वांना नवीन शरीरे मिळतील. या देखील समजण्यासारख्या खूप सोप्या गोष्टी आहेत. समजावून सांगू देखील शकता, कलियुगानंतर सतयुग जरूर असेल. अनेक धर्मांचा विनाश जरूर होईल. पुन्हा आदि सनातन देवी-देवता धर्माच्या स्थापनेसाठी बाबांना यावे लागेल. आता तुम्ही देवता बनण्यासाठी ब्राह्मण बनला आहात. दुसरे कोणी होऊ शकत नाहीत. तुम्ही जाणता आपण शिवबाबांचे बनलो आहोत, शिवबाबा आम्हाला वारसा देत आहेत.

शिवजयंती म्हणजेच भारताला वारसा मिळाला. शिवबाबा आले, येऊन काय केले? इस्लामी, बौद्धी इत्यादींनी तर येऊन आपला धर्म स्थापन केला. बाबांनी येऊन काय केले? जरूर स्वर्गाची स्थापना केली. कशी स्थापना केली? कशी स्थापना होते ते तर आता तुम्ही जाणता. मग सतयुगामध्ये हे सर्व विसरून जाल. हे देखील तुम्ही समजता की, २१ जन्मांचा वारसा आत्ता आपण घेत आहोत. हे ड्रामामध्ये नोंदलेले आहे. भले तिथे समजतील हे वडील आहेत, हा मुलगा आहे. मुलाला वारसा मिळतो, परंतु हे प्रारब्ध आत्ताचे आहे. खरी कमाई करून २१ जन्मांसाठी तुम्ही वारसा आता मिळवत आहात. ८४ जन्म तर घ्यायचेच आहेत. सतोप्रधानापासून मग सतो रजो तमोमध्ये याल. याची चांगल्या प्रकारे आठवण केल्याने मग आनंदात देखील रहाल. समजावून सांगण्यासाठी खूप मेहनत लागते. जेव्हा समजतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. जी मुले चांगल्या प्रकारे समजतात, ती मग अनेकांना समजावून सांगत राहतात. काट्यांना फूल बनवत राहतात. हे बेहदचे शिक्षण आहे. वारसा देखील बेहदचा मिळतो. मग याच्यामध्ये त्याग देखील बेहदचा आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना साऱ्या दुनियेचा त्याग करायचा आहे, कारण तुम्ही जाणता ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. आता नवीन दुनियेमध्ये जायचे आहे म्हणून बेहदचा संन्यास करायला लावतात. त्या संन्याशांचा आहे हदचा संन्यास आणि त्यांचा आहे हठयोग. ज्ञानामध्ये तुम्हाला हठ करण्याचा प्रश्नच राहत नाही. हे तर शिक्षण आहे. पाठशाळेमध्ये शिकायचे आहे - मनुष्यापासून देवता बनण्यासाठी. शिव भगवानुवाच - श्रीकृष्ण होऊ शकत नाही. त्याला काही हेवनली गॉडफादर म्हणता येणार नाही. हेवनली प्रिन्स म्हणणार. तर किती गोड-गोड गोष्टी समजून घेण्यासारख्या आणि धारण करण्यासारख्या गोष्टी आहेत! दैवी लक्षण (गुण) देखील पाहिजेत. कधीही ऐकीव गोष्टींवर अवलंबून राहता कामा नये. व्यासाने लिहिलेल्या गोष्टींवर अवलंबून राहता-राहता अगदीच वाईट गति झाली आहे ना. ज्ञानाव्यतिरिक्त इतर काहीही ऐकवत असतील तर समजा - हा आपला शत्रू आहे. दुर्गतीमध्ये घेऊन जातात. कधीही परमतावर चालता कामा नये. मनमतावर किंवा परमतावर चालला तर हा मेला! बाबा समजावून सांगत राहतात - खोट्या गोष्टी सांगणारे तर खूप आहेत. तुम्हाला बाबांकडूनच ऐकायचे आहे. ‘हियर नो इव्हिल, सी नो इव्हिल...’ बापदादा आलेच आहेत मनुष्यापासून देवता बनविण्याकरिता, तर त्यांच्या श्रीमतावर चालले पाहिजे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) इथे बाप समान सुखाचा सागर, प्रेमाचा सागर बनायचे आहे. सर्व गुण धारण करायचे आहेत. कोणालाही दुःख द्यायचे नाही.

२) ऐकीव गोष्टींवर कधी विश्वास ठेवायचा नाही, परमतावर चालायचे नाही. ‘हियर नो इव्हिल, सी नो इव्हिल…’

वरदान:-
‘मी’पणाच्या ओझ्याला नष्ट करून प्रत्यक्ष फळाचा अनुभव करणारे बालक सो मालक भव

जेव्हा कोणत्याही प्रकारचा ‘मी’पणा येतो तेव्हा डोक्यावर ओझे येते. परंतु जेव्हा बाबा स्वतः ऑफर करत आहेत की सर्व ओझे मला द्या, तुम्ही फक्त नाचत रहा, उडत रहा… मग हा प्रश्न का उठतो की, सेवा कशी होईल, भाषण कसे करायचे? तुम्ही फक्त निमित्त समजून पॉवर-हाऊसशी कनेक्शन जोडून बसा, निराश होऊ नका म्हणजे मग बापदादा सर्व काही स्वतः करून देतील. बालक सो मालक समजून श्रेष्ठ स्टेजवर स्थित रहा, तर प्रत्यक्ष फळाची अनुभूती करत रहाल.

बोधवाक्य:-
ज्ञान दाना सोबतच गुणदान करा तर सफलता मिळत राहील.

हे अव्यक्त इशारे - “निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा”

कशीही अवघड परिस्थिती असो, परंतु खेळ समजल्यामुळे अवघड समस्या देखील हलकी होते. बऱ्याच मुलांमध्ये हिंमत आहे, त्यामुळे कोणतीही गोष्ट झाली तर म्हणतात - हो करू, विचार करू. हिंमत तर आहे परंतु फेथ (विश्वास) नाहीये. फेथफुलचे बोल असे नसतात. फेथफुलचा अर्थच आहे मन, वचन, कर्म प्रत्येक गोष्टीमध्ये निश्चयबुद्धी. त्यांच्या तोंडून कधीही हिंमतहीन बनविणारे शब्द निघू शकत नाहीत.