13-01-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - पतिता पासून पावन बनविणाऱ्या बाबांवर तुमचे खूप-खूप प्रेम असायला पाहिजे, पहाटे उठून सर्वात पहिले म्हणा - शिवबाबा गुडमॉर्निंग”

प्रश्न:-
ॲक्युरेट आठवणीसाठी कोणत्या धारणा पाहिजेत? ॲक्युरेट आठवण करणाऱ्याचे लक्षण काय असेल?

उत्तर:-
ॲक्युरेट आठवणीसाठी धैर्यता, गंभीरता आणि समज पाहिजे. या धारणांच्या आधारे जे आठवण करतात त्यांची आठवण, आठवणीला मिळते आणि बाबांकडून करंट यायला लागतो. त्या करंटमुळे आयुष्य वाढेल, निरोगी बनत जाल. हृदय एकदम शीतल बनेल, आत्मा सतोप्रधान बनत जाईल.

ओम शांती।
बाबा म्हणतात गोड मुलांनो, ततत्त्वम् अर्थात तुम्ही आत्मे देखील शांत स्वरूप आहात. तुम्हा सर्व आत्म्यांचा स्वधर्म आहेच मुळी शांती. शांतीधाम मधून इथे येऊन मग टॉकी बनता (बोलायला लागता). ही कर्मेंद्रिये तुम्हाला मिळतात पार्ट बजावण्याकरिता. आत्मा छोटी-मोठी होत नाही. शरीर छोटे-मोठे होते. बाबा म्हणतात - मी काही शरीरधारी नाहीये. मला मुलांना समक्ष भेटण्यासाठी यावे लागते. समजा जसा पिता आहे, त्याच्यापासून मुले जन्म घेतात, तर तो मुलगा असे म्हणणार नाही की मी परमधामहून जन्म घेऊन माता-पित्याला भेटण्यासाठी आलो आहे. भले एखादी नवीन आत्मा कोणत्याही शरीरामध्ये येते, किंवा कोणती जुनी आत्मा कोणाच्या शरीरामध्ये प्रवेश करते तर असे म्हणणार नाही की माता-पित्याला भेटायला आलो आहे. त्या आत्म्याला आपोआप माता-पिता मिळतात. इथे ही आहे नवी गोष्ट. बाबा म्हणतात - मी परमधामहून येऊन तुम्हा मुलांसमोर प्रकट झालो आहे. मुलांना पुन्हा ज्ञान देतो कारण मी नॉलेजफुल, ज्ञानाचा सागर… मी येतो तुम्हा मुलांना शिकविण्याकरिता, राजयोग शिकविण्याकरिता! राजयोग शिकवणारे एक भगवंतच आहेत. कृष्णाच्या आत्म्याचा हा ईश्वरीय पार्ट नाहीये. प्रत्येकाचा पार्ट आपला-आपला आहे. ईश्वराचा पार्ट त्याचा आहे. तर बाबा समजावून सांगत आहेत - गोड मुलांनो, स्वतःला आत्मा समजा. असे स्वतःला समजणे किती गोड वाटते. आम्ही कोण होतो! आता काय बनत आहोत!

हा ड्रामा कसा अद्भुत बनलेला आहे हे देखील तुम्ही आता समजावून सांगता. हे पुरुषोत्तम संगमयुग आहे फक्त एवढे जरी लक्षात राहिले तरी निश्चित होते की, आम्ही सतयुगामध्ये जाणार आहोत. आत्ता संगमावर आहोत मग जायचे आहे आपल्या घरी त्यामुळे पावन तर जरूर बनायचे आहे. आतमध्ये खूप आनंद व्हायला पाहिजे. ओहो! बेहदचे बाबा म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो, माझी आठवण करा तर तुम्ही सतोप्रधान बनाल. विश्वाचे मालक बनाल’. बाबा मुलांवर किती प्रेम करतात. असे नाही की फक्त टीचरच्या रूपामध्ये शिकवतात आणि घरी निघून जातात. हे तर पिता देखील आहेत टीचर देखील आहेत. तुम्हाला शिकवतात. आठवणीची यात्रा देखील शिकवतात.

अशा विश्वाचा मालक बनविणाऱ्या, पतितापासून पावन बनविणाऱ्या बाबांवर खूप प्रेम असायला हवे. पहाटे उठता क्षणीच सर्वात पहिले शिवबाबांना गुडमॉर्निंग केले पाहिजे. गुडमॉर्निंग अर्थात आठवण कराल तर अतिशय आनंदात रहाल. मुलांनी आपल्या मनाला विचारायचे आहे आम्ही सकाळी उठून बेहदच्या बाबांची किती आठवण करतो? मनुष्य भक्ती देखील पहाटेच करतात ना! भक्ती किती प्रेमाने करतात. परंतु बाबा जाणतात कितीतरी मुले अंतःकरणापासून, उत्कट प्रेमाने आठवण करत नाहीत. पहाटे उठून बाबांना गुड मॉर्निंग करा, ज्ञानाच्या चिंतनामध्ये रहा तर आनंदाचा पारा चढलेला राहील. बाबांना गुड मॉर्निंग केले नाहीत तर पापांचे ओझे कसे उतरेल? मुख्य आहेच मुळी आठवण, याद्वारे भविष्यासाठी तुमची भरपूर कमाई होते. कल्पकल्पांतर ही कमाई कामी येईल. अतिशय संयमाने, गांभीर्याने आणि समजून घेऊन आठवण करायची असते. ढोबळ मनाने तर फक्त असे म्हणतात की, आम्ही बाबांची खूप आठवण करतो परंतु अचूकपणे आठवण करणे यामध्ये मेहनत आहे. जे बाबांची जास्त आठवण करतात त्यांना जास्त करंट मिळतो कारण आठवणीला आठवण मिळते. योग आणि ज्ञान दोन गोष्टी आहेत. योगाचा सब्जेक्ट वेगळा आहे, खूप अवघड सब्जेक्ट आहे. योगामुळेच आत्मा सतोप्रधान बनते. आठवणी शिवाय सतोप्रधान होणे असंभव आहे. चांगल्या प्रकारे प्रेमाने बाबांची आठवण कराल तर आपोआप करंट मिळेल, निरोगी बनाल. करंट मुळे आयुष्य देखील वाढते. मुले आठवण करतात तेव्हा बाबा देखील सर्चलाईट देतात. तुम्हा मुलांना बाबा किती मोठा खजिना देतात!

गोड मुलांनी हे पक्के लक्षात ठेवायचे आहे की, शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत. शिवबाबा पतित-पावन देखील आहेत. सद्गती दाता देखील आहेत. सद्गती अर्थात स्वर्गाचे राज्य देतात. बाबा किती गोड आहेत. किती प्रेमाने मुलांना बसून शिकवतात. बाबा दादांद्वारे (ब्रह्मा बाबांद्वारे) आम्हाला शिकवतात. बाबा किती गोड आहेत. किती प्रेम करतात. काही त्रास देत नाहीत. फक्त म्हणतात - ‘माझी आठवण करा आणि चक्राची आठवण करा’. बाबांच्या आठवणीमध्ये हृदय एकदम शांत, शीतल झाले पाहिजे. एका बाबांचीच आठवण सतावत राहिली पाहिजे कारण बाबांकडून केवढा मोठा वारसा मिळतो. स्वतःला पाहिले पाहिजे की, बाबांवर माझे किती प्रेम आहे? माझ्यामध्ये कितपत दैवी गुण आहेत? कारण तुम्ही मुले आता काट्यांपासून फूल बनत आहात. जितके-जितके योगामध्ये रहाल तितके काट्यांपासून फूल, सतोप्रधान बनत जाल. फूल बनल्यावर मग इथे राहू शकणार नाही. फुलांचा बगीचा आहेच मुळी स्वर्ग. जे पुष्कळ काट्यांना फूल बनवतात त्यांनाच खरी सुगंधीत फुले म्हणणार. कधी कोणाला काटा टोचणार नाहीत. क्रोध सुद्धा मोठा काटा आहे, अनेकांना दुःख देतात. आता तुम्ही मुले काट्यांच्या दुनियेतून किनाऱ्यावर आला आहात, तुम्ही आहात संगमावर. जसे माळी फुलांना काढून वेगळ्या फुलदाणीमध्ये ठेवतात तसेच तुम्हा फुलांना देखील आता संगमयुगी भांड्यामध्ये वेगळे ठेवलेले आहे. मग तुम्ही फुले स्वर्गामध्ये निघून जाल, कलियुगी काटे भस्म होतील.

गोड मुले जाणतात पारलौकिक पित्याकडून आम्हाला अविनाशी वारसा मिळतो. जी सच्ची मुले आहेत, ज्यांचे बापदादांवर पूर्ण प्रेम आहे ते खूप आनंदात रहातील. आम्ही विश्वाचे मालक बनत आहोत. होय, पुरुषार्थानेच विश्वाचे मालक बनता येते, फक्त बोलून नाही. जी अनन्य मुले आहेत त्यांना हे सदैव लक्षात राहील की, आम्ही आमच्यासाठी पुन्हा तेच सूर्यवंशी, चंद्रवंशी राज्य स्थापन करत आहोत. बाबा म्हणतात - ‘गोड मुलांनो, जितके तुम्ही अनेकांचे कल्याण कराल तितकेच तुम्हाला त्याचे प्रतिफळ मिळेल. अनेकांना मार्ग दाखवाल तर अनेकांचे आशिर्वाद मिळतील’. ज्ञानरत्नांनी झोळी भरून मग दान करायचे आहे. ज्ञानसागर तुम्हाला रत्नांच्या थाळ्या भरभरून देत आहेत. जे मग दान करतात तेच सर्वांना प्रिय वाटतात. मुलांना आतून किती आनंद व्हायला पाहिजे. जी बुद्धीवान मुले असतील ती तर म्हणतील आम्ही बाबांकडून पूर्ण वारसा घेणार, एकदम चिकटून बसतील. बाबांवर खूप प्रेम असेल कारण जाणतात की, प्राण-दान देणारे बाबा मिळाले आहेत. ज्ञानाचे असे वरदान देतात ज्याद्वारे आम्ही कोणा पासून कोण बनतो. इनसॉल्व्हंट पासून सॉल्व्हंट (पतितापासून पावन) बनतो, इतके खजिने भरून टाकतात. जितकी बाबांची आठवण कराल तितके प्रेम राहील, आकर्षण वाटेल. सुई स्वच्छ असते तर चुंबकाकडे खेचली जाते ना. बाबांच्या आठवणीने गंज निघून जाईल. एका बाबांव्यतिरिक्त इतर कोणाचीही आठवण येऊ नये. जसे पत्नीचे पतीवर किती प्रेम असते. तुमचा देखील साखरपुडा झाला आहे ना. साखरपुड्याचा आनंद काही कमी असतो का? शिवबाबा म्हणतात - ‘गोड मुलांनो, तुमचा साखरपुडा माझ्याबरोबर झाला आहे, ब्रह्माबरोबर साखरपुडा झालेला नाहीये. साखरपुडा पक्का झाला आहे तर मग त्यांच्याच आठवणीने बेचैन झाले पाहिजे’.

बाबा समजावून सांगत आहेत - ‘गोड मुलांनो, चूक करू नका. स्वदर्शन चक्रधारी बना, लाइट हाऊस बना’. स्वदर्शन चक्रधारी बनण्याची चांगली सवय झाली म्हणजे मग तुम्ही जणूकाही ज्ञानाचा सागर व्हाल. जसे स्टुडंट शिकून टीचर बनतात ना. तुमचा उद्योगच हा आहे. सर्वांना स्वदर्शन चक्रधारी बनवा तेव्हाच चक्रवर्ती राजा-राणी बनाल म्हणून बाबा मुलांना नेहमी विचारतात स्वदर्शन चक्रधारी होऊन बसला आहात का? बाबा देखील स्वदर्शन चक्रधारी आहेत ना. बाबा आले आहेत तुम्हा गोड मुलांना परत घेऊन जाण्याकरिता. तुम्हा मुलांशिवाय मला देखील जणू बेचैनी होते. जेव्हा येण्याचा वेळ जवळ येतो तेव्हा बेचैनी होते. बस्स, आता आपण जावे, मुले खूप बोलावत आहेत, खूप दुःखी आहेत. दया येते. आता तुम्हा मुलांना घरी यायचे आहे. मग तिथून तुम्ही आपोआप सुखधाममध्ये निघून जाल. तिथे मी तुमचा साथीदार बनणार नाही. आपल्या अवस्थेनुसार तुमची आत्मा निघून जाईल.

तुम्हा मुलांना हा नशा राहिला पाहिजे की, आम्ही रूहानी युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहोत. आम्ही गॉडली स्टुडंट आहोत. आम्ही मनुष्या पासून देवता अथवा विश्वाचे मालक बनण्यासाठी शिकत आहोत. याद्वारे आम्ही सर्व मिनिस्ट्री पास करतो. आरोग्याचे शिक्षण देखील शिकतो, चरित्र सुधारण्याचे देखील नॉलेज शिकतो. हेल्थ मिनिस्ट्री, फूड मिनिस्ट्री, लँड मिनिस्ट्री, बिल्डिंग मिनिस्ट्री सर्व यामध्ये समाविष्ट आहेत (आरोग्य मंत्रालय, अन्न मंत्रालय, भूमी मंत्रालय, इमारत मंत्रालय हे सर्व या शिक्षणा अंतर्गत येते).

गोड-गोड मुलांना बाबा बसून समजावून सांगतात जेव्हा कोणत्या सभेमध्ये भाषण करता किंवा कोणाला ज्ञान समजावून सांगता तेव्हा वारंवार बोला - ‘स्वतःला आत्मा समजून परमपिता परमात्म्याची आठवण करा. या आठवणीनेच तुमची विकर्मे नष्ट होतील. तुम्ही पावन बनाल’. क्षणोक्षणी याची आठवण करायची आहे. परंतु हे देखील तुम्ही तेव्हाच सांगू शकाल जेव्हा स्वतः आठवणीमध्ये असाल. या गोष्टीची मुलांमधे खूप कमतरता आहे. तुम्हा मुलांना आंतरिक आनंद होत राहील, आठवणीमध्ये रहाल तेव्हाच दुसऱ्यांना समजावून सांगण्याचा परिणाम होईल. तुमचे बोलणे जास्त असता कामा नये. आत्म-अभिमानी होऊन थोडे जरी समजावून सांगाल तरी देखील बाण लागेल (मनाला भिडेल). बाबा म्हणतात झाले ते झाले. आता पहिले स्वतःला सुधारा. स्वतः आठवण करणार नाही, दुसऱ्यांना सांगत रहाल, अशी चलाखी चालणार नाही. आतून मन नक्कीच खात असेल. बाबांवर पूर्ण प्रेम नाही त्यामुळे श्रीमतानुसार चालत नाहीत. बेहदच्या बाबांसारखे शिक्षण तर इतर कोणीही देऊ शकत नाही. बाबा म्हणतात - ‘गोड मुलांनो, या जुन्या दुनियेला आता विसरा. नंतर शेवटी तर हे सर्व विसरायचेच आहे. बुद्धी शांतीधाममध्ये आणि सुखधाममध्ये जाते. बाबांची आठवण करता-करता बाबांकडे निघून जायचे आहे. पतित आत्मा काही जाऊ शकत नाही. ते आहेच पावन आत्म्यांचे घर. हे शरीर ५ तत्त्वांनी बनलेले आहे. तर ५ तत्त्वे इथे राहण्यासाठी आकर्षित करतात कारण आत्म्याने जणू काही ही मालमत्ता घेतलेली आहे, त्यामुळे शरीराबद्दल आसक्ती निर्माण झाली आहे. आता यातून मोह काढून टाकून आपल्या घरी निघून जायचे आहे. तिथे तर ही ५ तत्वे काही नाही आहेत. सतयुगामध्ये देखील शरीर योगबलाद्वारे बनते. प्रकृती सतोप्रधान असते त्यामुळे आकर्षित करत नाही. दुःख असत नाही. या अति सूक्ष्म गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. इथे ५ तत्त्वांची शक्ती आत्म्याला आकर्षित करते त्यामुळे शरीर सोडण्याची इच्छा होत नाही. नाहीतर याचा अजूनच आनंद झाला पाहिजे. पावन बनून शरीर असे सोडाल, जणू लोण्यातून केस निघावा. तर शरीरामधून, सर्व गोष्टींमधून मोह पूर्णतः काढून टाकायचा आहे, यांच्याशी आपला काहीही संबंध नाही. बस्स, आम्ही बाबांकडे जातो. या दुनियेमध्ये आपले सामान तयार करून आधीच पाठवलेले आहे. बरोबर तर नेऊ शकत नाही. फक्त आत्म्यांना जायचे आहे. शरीरसुद्धा इथेच सोडून दिले आहे. बाबांनी नव्या शरीराचा साक्षात्कार घडवला आहे. हीरे-माणकांचे महाल मिळतील. अशा सुखधाम मध्ये जाण्यासाठी किती मेहनत केली पाहिजे. थकून जाता कामा नये. रात्रं-दिवस खूप कमाई करायची आहे; म्हणून बाबा म्हणतात - ‘निद्रेला जिंकणाऱ्या मुलांनो मामेकम् (मज एकाची) आठवण करा आणि विचार सागर मंथन करा’. ड्रामाचे रहस्य लक्षात ठेवल्यामुळे बुद्धी एकदम शीतल होते. जी मुले महारथी मुले असतील ती कधीही डगमगणार नाहीत. शिवबाबांची आठवण कराल तर ते काळजी सुद्धा घेतील.

बाबा तुम्हा मुलांना दुःखातून सोडवून शांतीचे दान देतात. तुम्हाला देखील शांतीचे दान द्यायचे आहे. तुमची ही बेहदची शांती अर्थात योगबल इतरांना देखील एकदम शांत करेल. लगेच कळेल, हा आपल्या घरातला आहे की नाही. आत्म्याला लगेच ओढ उत्पन्न होईल - हे आपले बाबा आहेत. नाडी सुद्धा बघावी लागते. बाबांच्या आठवणीमध्ये राहून मग बघा ही आत्मा आपल्या कुळातील आहे? जर असेल तर एकदम शांत होईल. जे या कुळातील असतील त्यांनाच या गोष्टींमध्ये रस वाटेल. मुले आठवण करतात तर बाबासुद्धा प्रेम करतात. आत्म्यावर प्रेम केले जाते. हे देखील जाणतात ज्यांनी खूप भक्ती केली आहे तेच जास्त शिकतील. त्यांच्या चेहऱ्यावरून लक्षात येईल की बाबांवर किती प्रेम आहे. आत्मा बाबांना बघते. बाबा आम्हा आत्म्यांना शिकवत आहेत. बाबासुद्धा समजतात की, मी इतक्या छोट्याशा बिंदू आत्म्याला शिकवत आहे. पुढे जाऊन तुमची ही अवस्था होईल. समजतील, मी भाऊ-भावाला शिकवत आहे. चेहरा बहिणीचा असूनही दृष्टी आत्म्याकडे जाईल. शरीराकडे अजिबात दृष्टी जाऊ नये, यामध्येच खूप मेहनत आहे. या अति सूक्ष्म गोष्टी आहेत. खूप श्रेष्ठ शिक्षण आहे. वजन केले तर या शिक्षणाचे पारडे जास्त वजनदार होईल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपली झोळी ज्ञान-रत्नांनी भरून मग दान सुद्धा करायचे आहे. जे दान करतात ते सर्वांना प्रिय वाटतात, त्यांना अपार आनंद असतो.

२) प्राणदान देणाऱ्या बाबांची अतिशय प्रेमाने आठवण करत सर्वांना शांतीचे दान द्यायचे आहे. स्वदर्शनचक्र फिरवत राहून ज्ञानाचा सागर बनायचे आहे.

वरदान:-
अंतःवाहक शरीराद्वारे सेवा करणारे कर्मबंधनमुक्त डबल लाईट भव

जसे स्थूल शरीराद्वारे साकारी ईश्वरीय सेवेमध्ये बिझी राहता तसे आपल्या आकारी शरीराद्वारे अंतः वाहक सेवा देखील एकत्रच करायची आहे. जशी ब्रह्माद्वारे स्थापनेची वृद्धी झाली तशी आता तुमच्या सूक्ष्म शरीरांद्वारे, शिव-शक्तीच्या कंबाइंड रूपातील साक्षात्काराद्वारे साक्षात्कार आणि संदेश मिळण्याचे कार्य होणार आहे. परंतु या सेवेसाठी कर्म करत असताना देखील कोणत्याही कर्मबंधनापासून मुक्त सदैव डबल लाइट रूपामध्ये रहा.

बोधवाक्य:-
मनन केल्याने जे आनंद रूपी लोणी निघते तेच जीवनाला शक्तिशाली बनविते.

आपल्या शक्तीशाली मन्साद्वारे सकाश देण्याची सेवा करा:-

कोणीही असे म्हणू शकत नाही की, आम्हाला तर सेवेची संधीच नाही. जर कोणी बोलू शकत नसेल तर मन्सा वायुमंडळाद्वारे सुखाची वृत्ती, सुखमय स्थिती द्वारे सेवा करा. तब्येत ठीक नसेल तर घरबल्या सहयोगी बना, फक्त मन्सामध्ये शुद्ध संकल्पांचा साठा जमा करा, शुभ भावनांनी संपन्न बना.