13-03-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्हाला श्रीमतावर तत्वांसहित साऱ्या दुनियेला पावन बनविण्याची सेवा करायची आहे, सर्वांना सुख आणि शांतीचा रस्ता सांगायचा आहे”

प्रश्न:-
तुम्ही मुले आपल्या देहाला देखील विसरण्याचा पुरुषार्थ करता त्यामुळे तुम्हाला कोणत्या गोष्टीची आवश्यकता नाही?

उत्तर:-
चित्रांची. जेव्हा चित्राला (देहालाच) विसरायचे आहे तर मग त्या चित्रांची काय आवश्यकता आहे. स्वतःला आत्मा समजून विदेही बाबांची आणि स्वीट होमची आठवण करा. ही चित्रे तर लहान मुलांसाठी अर्थात नवीन लोकांसाठी आहेत. तुम्हाला तर आठवणीमध्ये राहायचे आहे आणि सर्वांना आठवण करून द्यायची आहे. कामधंदा इत्यादी करत असताना सतोप्रधान बनण्यासाठी आठवणीमध्येच राहण्याचा अभ्यास करा.

गीत:-
तकदीर जगाकर आई हूँ…

ओम शांती।
गोड-गोड मुलांनी हे शब्द ऐकले आणि लगेचच आनंदाने रोमांच उभे राहिले असतील. मुले जाणतात इथे आलो आहोत आपले सौभाग्य, स्वर्गाचे भाग्य घेण्यासाठी. असे इतर कुठेही म्हणणार नाहीत. तुम्ही जाणता आपण बाबांकडून स्वर्गाचा वारसा घेत आहोत अर्थात स्वर्ग बनविण्याचा पुरुषार्थ करत आहोत. फक्त स्वर्गवासी बनण्याचाच नाही परंतु स्वर्गामध्ये उच्च ते उच्च पद मिळविण्याचा पुरुषार्थ करत आहोत. स्वर्गाचा साक्षात्कार घडविणारे बाबा आपल्याला शिकवत आहेत. हा देखील मुलांना नशा चढला पाहिजे. भक्ती आता नष्ट होणार आहे. असे म्हटले जाते - ‘भगवान भक्तांचा उद्धार करण्यासाठी येतात’; कारण रावणाच्या बेड्यांमध्ये अडकून पडले आहेत. अनेक मनुष्यांची अनेक मते आहेत. तुम्ही तर जाणले आहे. सृष्टी चक्राचा हा अनादि खेळ पूर्वनियोजित आहे. हे देखील भारतवासी समजतात, खरोखर आपण प्राचीन नव्या दुनियेचे वासी होतो, आता जुन्या दुनियेचे वासी बनलो आहोत. बाबांनी स्वर्ग नवीन दुनिया बनविली, मग रावणाने नरक बनविला आहे. बापदादांच्या मतावर तुम्ही आता स्वतःसाठी नवीन दुनिया बनवत आहात. नवीन दुनियेसाठी शिकत आहात. कोण शिकवत आहेत? ज्ञानाचा सागर, पतित-पावन ज्यांची महिमा आहे. त्या एका शिवाय इतर कोणाचीही अशी महिमा गायली जात नाही. तेच पतित-पावन आहेत. आपण सर्व पतित आहोत. पावन दुनियेची आठवण कोणालाही नाही आहे. आता तुम्ही जाणता - बरोबर ५ हजार वर्षांपूर्वी पावन दुनिया होती. तो भारतच होता. बाकी सर्व धर्म शांतीमध्ये होते. आपण भारतवासी सुखधाम मध्ये होतो. मनुष्याला शांती हवी आहे, परंतु इथे तर कोणी शांत राहू शकणार नाही. हे काही शांतीधाम नाहीये. शांतीधाम आहे निराकारी दुनिया, जिथून आपण येतो. बाकी सतयुग आहे - सुखधाम, त्याला शांतीधाम म्हणता येणार नाही. तिथे तुम्ही पवित्रता, सुख, शांतीमध्ये राहता. कोणताही गोंधळ असत नाही. घरामध्ये मुले भांडण इत्यादी करतात तर त्यांना सांगितले जाते - शांत रहा. तर बाबा म्हणतात - तुम्ही आत्मे त्या शांती देशाचे होता. आता भांडखोर देशामध्ये येऊन बसला आहात. ही गोष्ट तुमच्या बुद्धीमध्ये आहे. तुम्ही बाबांकडून पुन्हा एकदा उच्च ते उच्च पद प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करत आहात. ही शाळा काही कमी थोडीच आहे. गॉडफादरची युनिव्हर्सिटी आहे. साऱ्या दुनियेमध्ये ही मोठ्यात मोठी युनिव्हर्सिटी आहे. यामध्ये सर्वजण बाबांकडून शांती आणि सुखाचा वारसा प्राप्त करतात. एक बाबांशिवाय इतर कोणाचीही महिमा नाहीये. ब्रह्माची महिमा थोडीच आहे. बाबाच यावेळी येऊन वारसा देतात. मग तर सुखच सुख आहे. सुख-शांती देणारे एक बाबाच आहेत. त्यांचीच महिमा आहे. सतयुग त्रेतामध्ये कोणाचीही महिमा असत नाही. तिथे तर राजधानी चालू राहते. तुम्ही वारसा घेता, बाकी सर्व शांतीधाममध्ये राहतात. महिमा कोणाचीही नाही. भले क्राईस्ट धर्म स्थापन करतात, तो तर केलाच पाहिजे. धर्म स्थापन करतात तरी देखील खाली उतरत जातात (पतन होत जाते). मग त्यात कसली महिमा आहे? महिमा फक्त एकाचीच आहे, ज्यांना पतित-पावन, लिबरेटर असे म्हणत बोलावतात. असे तर नाही त्यांना क्राइस्ट, बुद्ध इत्यादी आठवत असतील. आठवण तरी देखील एकाचीच करतात - ‘ओ गॉड फादर’. सतयुगामध्ये तर कोणाचीच महिमा होत नाही. मागाहून या धर्मांची सुरुवात होते तेव्हा मग बाबांची महिमा गातात आणि भक्तीला सुरुवात होते. ड्रामा कसा बनलेला आहे, कसे चक्र फिरते, तर जी बाबांची मुले बनली आहेत तीच जाणतात. बाबा आहेत रचता. नवीन सृष्टी, स्वर्ग रचतात. परंतु सगळेच काही स्वर्गामध्ये येऊ शकत नाहीत. ड्रामाच्या रहस्याला देखील समजून घ्यायचे आहे. बाबांकडून सुखाचा वारसा मिळतो. यावेळी सर्व दुःखी आहेत. सर्वांना परत जायचे आहे नंतर परत सुखामध्ये येतील. तुम्हा मुलांना खूप चांगला पार्ट मिळाला आहे. ज्या बाबांची इतकी महिमा आहे ते आता येऊन सन्मुख बसले आहेत आणि मुलांना समजावून सांगत आहेत. सर्वजण त्यांची संतान आहेत ना. बाबा तर एव्हर हॅपी आहेत. वास्तविक बाबांसाठी असे म्हणू शकत नाही. जर ते हॅप्पी बनले तर त्यांना अन-हॅप्पी देखील बनावे लागेल. बाबा तर या सर्वापासून न्यारे आहेत. जी बाबांची माहिमा आहे तीच महिमा यावेळी तुमची आहे आणि मग भविष्यामध्ये तुमची महिमा वेगळी असेल. जसे बाबा ज्ञानाचे सागर आहेत, तुम्ही देखील आहात. तुमच्या बुद्धीमध्ये सृष्टी चक्राचे ज्ञान आहे. जाणता बाबा सुखाचा सागर आहेत, त्यांच्याकडून अथाह सुख मिळते. यावेळी तुम्ही बाबांकडून वारसा घेत आहात. बाबा मुलांना आता श्रेष्ठ कर्म शिकवत आहेत. जसे हे लक्ष्मी-नारायण आहेत, यांनी जरूर आधीच्या जन्मामध्ये चांगली कर्म केली आहेत ज्यामुळे त्यांनी हे पद मिळविले आहे. दुनियेमध्ये हे कोणी समजत नाही की यांनी राज्य कसे मिळवले?

बाबा म्हणतात - ‘तुम्ही मुले आता हे असे बनत आहात. तुमच्या बुद्धीमध्ये हे येते की आपण असे (लक्ष्मी-नारायण) होतो मग परत हे (पतित) बनतो. बाबा बसून कर्म-अकर्म-विकर्माची गती समजावून सांगतात ज्यामुळे आपण असे बनतो. श्रीमत देतात तर श्रीमताला जाणून घेतले पाहिजे ना. श्रीमताद्वारे साऱ्या दुनियेला, तत्व इत्यादी सर्वांना श्रेष्ठ बनवतात. सतयुगामध्ये सर्वजण श्रेष्ठ होते. तिथे कोणतीही अराजकता अथवा वादळ इत्यादी नसतात. ना जास्त थंडी, ना गर्मी. सदैव वसंत ऋतू असतो. तिथे तुम्ही किती सुखी असता. ते लोक गातात देखील - खुदा बहिश्त अथवा हेवन स्थापन करतात. तर त्यामध्ये उच्च पद मिळविण्याचा पुरुषार्थ केला पाहिजे. नेहमी गायले जाते फॉलो मदर-फादर. बाबांची आठवण केल्याने विकर्म विनाश होतील. आणि मग फादर सोबत आपण आत्मे एकत्र जाऊ. श्रीमतावर चालून प्रत्येकाला रस्ता सांगायचा आहे.

बेहदचे बाबा आहेत स्वर्गाचे रचयिता. आता तर नरक आहे. जरूर नरकामध्येच स्वर्गाचा वारसा दिला असणार. आता ८४ जन्म पूर्ण होत आहेत, मग परत आपल्याला पहिला जन्म स्वर्गामध्ये घ्यायचा आहे. तुमचे एम ऑब्जेक्ट समोर उभे आहे. असे बनायचे आहे. हम सो लक्ष्मी-नारायण बनतात, वास्तविक या चित्रांची काही गरज नाही. जे कच्चे आहेत, वारंवार विसरून जातात, म्हणून चित्रे ठेवली जातात. कोणी श्रीकृष्णाचे चित्र ठेवतात. श्रीकृष्णाला बघितल्याशिवाय आठवण करू शकत नाहीत. सर्वांच्या बुद्धीमध्ये चित्र तर राहते ना. तुम्हाला कोणतेही चित्र लावण्याची आवश्यकता नाही. तुम्ही स्वतःला आत्मा समजता, तुम्हाला स्वतःचे चित्र (आपला देह) सुद्धा विसरायचे आहे. देहा सहित सर्व नाती विसरायची आहेत. बाबा म्हणतात - तुम्ही आशिक आहात एका माशुकचे. माशुक बाबा म्हणतात माझी आठवण करत रहा तर विकर्म विनाश होतील. अशी अवस्था असावी की, जेव्हा शरीर सुटेल तेव्हा असे वाटेल की, मी या जुन्या दुनियेला सोडून आता बाबांकडे जात आहे. ८४ जन्म पूर्ण झाले, आता जायचे आहे. बाबांनी आदेश दिला आहे - माझी आठवण करा. बस्स, बाबांची आणि स्वीट होमची आठवण करा. बुद्धीमध्ये आहे की मी आत्मा शरीराशिवाय होते, मग इथे पार्ट बजावण्यासाठी शरीर धारण केले आहे. पार्ट बजावता-बजावता पतित बनलो आहोत. हे शरीर तर आहे जुनी जुत्ती. आत्मा पवित्र बनत आहे. पवित्र शरीर काही इथे मिळू शकत नाही. आता आपण आत्मे परत आपल्या घरी जाणार. आधी प्रिन्स-प्रिन्सेस बनणार आणि मग स्वयंवरा नंतर लक्ष्मी-नारायण बनणार. मनुष्यांना हेच ठाऊक नाही आहे की राधा-कृष्ण कोण आहेत? दोघेही वेगवेगळ्या राजधानीचे होते नंतर मग त्यांचे स्वयंवर होते. तुम्ही मुलांनी ध्यानामध्ये स्वयंवर बघितले आहे. सुरुवातीला खूप साक्षात्कार होत होते कारण पाकिस्तानमध्ये तुम्हाला आनंदात ठेवण्यासाठी हा पार्ट चालत होता. शेवटी तर आहेच मारामारी. भूकंप इत्यादी खूप होतील. तुम्हाला साक्षात्कार होत राहतील. प्रत्येकाला माहिती होईल आपल्याला कोणते पद मिळणार आहे. मग जे कमी शिकलेले असतील ते खूप पश्चाताप करतील. बाबा म्हणतील - ‘तू ना स्वतः शिकलास, ना दुसऱ्यांना शिकवलेस, ना आठवणी मध्ये राहत होतास’. आठवणीनेच सतोप्रधान बनू शकता. पतित-पावन तर बाबाच आहेत. ते म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुमच्यातील भेसळ निघून जाईल. पुरुषार्थ करायचा आहे - आठवणीच्या यात्रेचा. धंदा इत्यादी भले करा. कर्म तर करायचेच आहे. परंतु बुद्धीचा योग तिथे असावा. तमोप्रधानापासून सतोप्रधान इथेच बनायचे आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना तुम्ही माझी आठवण करा तेव्हाच तुम्ही नवीन दुनियेचे मालक बनाल. बाबा जास्त काही त्रास देत नाहीत. तुम्हाला खूप सोपा उपाय सांगतात. सुखधामचा मालक बनण्यासाठी मामेकम् (मज एकाची) आठवण करा. आता तुम्ही आठवण करा - बाबा देखील स्टार आहेत. मनुष्य तर असे समजतात ते सर्वशक्तिमान आहेत, खूप तेजोमय आहेत. बाबा म्हणतात - मी मनुष्य सृष्टीचे चैतन्य बीज रूप आहे. बीज असल्याकारणाने सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणतो. तुम्ही काही बीज नाही आहात, मी बीज आहे म्हणून मला ज्ञानाचे सागर असे म्हणतात. जे मनुष्य सृष्टीचे चैतन्य बीज आहेत त्यांना जरूर माहिती असेल की हे सृष्टीचक्र कसे फिरते. ऋषी-मुनी काही रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणत नाहीत. मुलांना जर ठाऊक असते तर त्यांच्याकडे (बाबांकडे परमधामला) जाण्यासाठी वेळ लागला नसता. परंतु बाबांकडे जाण्याचा रस्ता कोणीही जाणत नाहीत. पावन दुनियेमध्ये पतित जाऊच कसे शकतील म्हणून बाबा म्हणतात - काम महाशत्रूवर विजय मिळवा. हाच तुम्हाला आदि-मध-अंत दुःख देतो. तुम्हा मुलांना किती चांगल्या रीतीने समजावून सांगतात. कोणताच त्रास नाही. फक्त बाबांची आणि वारशाची आठवण करायची आहे. बाबांची आठवण अर्थात योगाद्वारे पापे भस्म होतील. सेकंदामध्ये बाबांकडून बादशाही मिळते. मुले भले स्वर्गामध्ये तर येतील, परंतु स्वर्गामध्ये देखील उच्च पद मिळविणे त्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. स्वर्गामध्ये तर जायचेच आहे. थोडेसे ऐकून देखील समजतील की बाबा आलेले आहेत. आता देखील म्हणतात - ही तीच महाभारत लढाई आहे. जरूर बाबा देखील असतील जे मुलांना राजयोग शिकवितात. तुम्ही सर्वांना जागे करत राहता. जे खूप जणांना जागे करतील ते उच्च पद मिळवतील. पुरुषार्थ करायचा आहे. सगळेच काही एकसारखे पुरुषार्थी असू शकत नाहीत. ही शाळा खूप जबरदस्त आहे. ही आहे वर्ल्डची युनिव्हर्सिटी (साऱ्या दुनियेचे विद्यापीठ). पूर्ण दुनियेला सुखधाम आणि शांतीधाम बनवायचे आहे. असा टीचर कधी असतो का? ‘युनिव्हर्स’ साऱ्या दुनियेला म्हटले जाते. बाबाच साऱ्या युनिव्हर्सच्या मनुष्य मात्रांना सतोप्रधान बनवितात अर्थात स्वर्ग बनवितात.

भक्तीमार्गामध्ये जे काही सण साजरे करतात ते सर्व आता संगमयुगाचे आहेत. सतयुग-त्रेतामध्ये कोणताही सण असत नाही. तिथे तर प्रारब्ध भोगतात. सण सारे इथे साजरे करतात. होळी आणि धुलीवंदन या ज्ञानाच्या गोष्टी आहेत. भूतकाळात घडलेल्या प्रत्येक गोष्टीचे सण साजरे करत आले आहेत परंतु हे सर्व या काळातील आहेत. होळी देखील याच काळातील आहे. या शंभर वर्षांच्या काळात सर्व काम पूर्ण होते. सृष्टी देखील नवीन बनते. तुम्ही जाणता आपण अनेकदा सुखाचा वारसा घेतला आहे आणि मग गमावला आहे. आनंद होतो की, आपण पुन्हा एकदा बाबांकडून वारसा घेत आहोत. इतरांना देखील रस्ता सांगायचा आहे. ड्रामा अनुसार स्वर्गाची स्थापना जरूर होणार आहे. जसे दिवसानंतर रात्र, रात्री नंतर दिवस होतो तसे कलियुगानंतर जरूर सतयुग होणार आहे. गोड-गोड मुलांच्या बुद्धीमध्ये आनंदाने ढोल वाजले पाहिजेत. आता वेळ पूर्ण होत आहे, आपण जातो शांतीधामला. हा अंतिम जन्म आहे. कर्मभोगाच्या यातना देखील आनंदामध्ये हलक्या होतात. काही भोगून, काही योगबलाने हिशोब चुकता होणार आहे. बाबा मुलांना धैर्य देतात, तुमचे कायम सुखाचे दिवस येत आहेत. धंदा इत्यादी देखील करायचा आहे. शरीर निर्वाह अर्थ पैसे तर पाहिजेत ना. बाबांनी समजावून सांगितले आहे - धंदा करणारे लोक धर्माऊ काढतात. समजतात की जास्त धन जमा झाले तर अजून जास्त दान करू. इथे देखील बाबा समजावून सांगतात की, कोणी दोन पैसे जरी दिले तरी त्याला रिटर्नमध्ये २१ जन्मांसाठी भरपूर मिळते. पूर्वी तुम्ही जे दान-पुण्य करत होता त्याचे रिटर्न दुसऱ्या जन्मामध्ये मिळत असे. आता तर २१ जन्मांसाठी फळ मिळते. पूर्वी साधु-संत इत्यादींना देत होता. आता तर तुम्ही जाणता हे सर्व नष्ट होणार आहे. आता मी सन्मुख आलो आहे तर या कार्यामध्ये लावा. तर तुम्हाला २१ जन्मांकरिता वारसा मिळेल. पूर्वी तुम्ही इनडायरेक्ट देत होता, हे आहे डायरेक्ट. बाकीचे तर सर्व तुमचे नष्ट होणार आहे. बाबा सांगत राहतात - पैसे असतील तर सेंटर उघडत जा. वरती शब्द लिहा - ‘सच्ची गीता पाठशाळा’. भगवानुवाच - मामेकम् (मज एकाची) आठवण करा आणि वारशाची आठवण करा. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाप समान महिमा योग्य बनण्यासाठी फॉलो फादर करायचे आहे.

२) हा अंतिम जन्म आहे, आता घरी जायचे आहे त्यामुळे मनातल्या मनात आनंदाचे ढोल वाजत रहावे. कर्मभोगाला कर्मयोगाने अर्थात बाबांच्या आठवणी द्वारे अगदी आनंदाने चुकते करायचे आहे.

वरदान:-
बालक सो मालक या स्मृतीद्वारे सर्व खजिन्यांचे अधिकारी, प्राप्ती संपन्न भव

आपण बाबांच्या सर्व खजिन्यांचे बालक सो मालक आहोत, नॅचरल योगी आहोत, नॅचरल स्वराज्य अधिकारी आहोत, या स्मृतीद्वारे सर्व प्राप्ती संपन्न बना. सदैव हेच गाणे गात रहा की, “पाना था सो पा लिया”. ‘हरवले-सापडले, हरवले-सापडले’, हा खेळ खेळू नका. ‘मी मिळवत आहे, मी मिळवत आहे’, हे अधिकारी असणाऱ्याचे बोल नाहीत. जी संपन्न पित्याची संतान आहेत, सागराची मुले आहेत ती नोकरा प्रमाणे मेहनत करू शकत नाहीत.

बोधवाक्य:-
योगबलाद्वारे कर्मभोगावर विजय प्राप्त करणे - हाच श्रेष्ठ पुरुषार्थ आहे.

हे अव्यक्त इशारे - “निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा”

सर्वात पहिला स्वतःवर पूर्ण फेथ (विश्वास) पाहिजे मग बाप-दादा आणि परिवारातील सर्व आत्म्यांचे विश्वासपात्र बनावे लागते. जितके (फेथफुल) विश्वासपात्र बनून, निश्चय-बुद्धी होऊन कोणतेही कार्य कराल तर फेथफुल असल्यामुळे सक्सेसफुल तर होणारच. फेथफुल असल्यामुळे प्रत्येक कार्य, प्रत्येक संकल्प, प्रत्येक शब्द शक्तिशाली बनेल.