16-11-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, तुमचे वर्तन अतिशय गोड आणि रॉयल असले पाहिजे, क्रोधाचे भूत अजिबात असता कामा नये”

प्रश्न:-
२१ जन्मांचे प्रारब्ध प्राप्त करण्यासाठी मुलांना कोणत्या गोष्टीवर जरूर लक्ष ठेवायचे आहे?

उत्तर:-
या दुनियेमध्ये राहत असताना, सर्वकाही करत असताना, बुद्धीचा योग एका सच्च्या माशुक सोबत असावा. अशी कोणतीही वाईट सवय नसावी ज्यामुळे बाबांची अब्रू जाईल. घरामध्ये राहत असून देखील इतके प्रेमाने राहा जेणेकरून बाकीच्यांना वाटेल की यांच्यामध्ये तर खूप चांगले दैवी गुण आहेत.

गीत:-
जाग सजनियां जाग…

ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुलांनी गाणे ऐकले. याचा अर्थ देखील जरूर मुलांना समजला असेल. बाबा येऊन नवीन-नवीन गोष्टी ऐकवतात. मुलांनी या गोष्टी, नवीन दुनियेतील नवीन युगासाठी ५ हजार वर्षांपूर्वी ऐकल्या होत्या. आता पुन्हा ऐकत आहेत. बाकी मधल्या काळामध्ये फक्त भक्तिमार्गाच्या गोष्टी ऐकल्या आहेत. सतयुगामध्ये या गोष्टी असत नाहीत. तिथे आहे ज्ञान-मार्गाचे प्रारब्ध. आता तुम्ही मुले नवीन दुनियेसाठी खरी कमाई करत आहात. नॉलेजला सोर्स ऑफ इन्कम म्हटले जाते. शिक्षणाद्वारे कोणी बॅरिस्टर, इंजिनियर इत्यादी बनतात. कमाई देखील होते. तुम्ही या शिक्षणाद्वारे राजांचाही राजा बनता. ही किती जबरदस्त कमाई आहे. तुम्हा मुलांना हा निश्चय आहे, जर थोडा जरी संशय असेल तरी पुढे जाता-जाता निश्चय पक्का होत जाईल. सेकंदामध्ये जीवनमुक्ती गायली गेली आहे. बाबांचा बनला आणि वारशाचा मालक बनला. बाबा, जे स्वर्गाचे रचयिता आहेत ते आम्हाला मालक बनविण्याकरिता आले आहेत. मुलांना हा तर निश्चय असला पाहिजे. तुम्ही हे देखील जाणता की, पिता दोन आहेत. एक आहेत - लौकिक पिता, दुसरे आहेत - पारलौकिक पिता; ज्यांना ‘परमपिता परमात्मा’, ‘ओ गॉड फादर’, असे म्हणतात. लौकिक पित्याला कधी परमपिता म्हणणार नाही. सर्वांचे सुख-दाता शांती-दाता ते एकच पारलौकिक पिता आहेत. सतयुगामध्ये सर्वजण सुखी असतात. बाकीचे सर्व आत्मे शांतीधाममध्ये असतात. सतयुगामध्ये तुमच्याकडे सुख-शांती, धन-दौलत, निरोगी काया सर्व काही होते. तर अशा मोस्ट बिलवेड बाबांना सर्वजण हाका मारतात. साधू-संत लोक देखील साधना करतात, परंतु कोणाची साधना करतात हेच जाणत नाहीत. ते ‘ब्रह्म’ची साधना करतात, जेणेकरून आपण ब्रह्म मध्ये विलीन होऊन जाऊ, परंतु असे विलीन तर होऊ शकत नाही. ब्रह्मची आठवण केल्याने पापे थोडीच नष्ट होतील. बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. सर्वशक्तिमान मी आहे की ब्रह्म तत्व आहे ते तर राहण्याचे स्थान आहे? ब्रह्म महत्तत्वामध्ये सर्व आत्मे निवास करतात. तर ब्रह्म-तत्वाला ते लोक भगवान समजले आहेत. जसे भारतवासीयांनी हिंदुस्तानमध्ये राहिल्या कारणाने आपला धर्म हिंदू समजले आहेत. तसे ब्रह्मतत्व या राहण्याच्या स्थानालाच परमात्मा समजले आहेत, ते तर ब्रह्मांड आहे. तिथे आत्मे ज्योतिर्बिंदू अंडाकृतीमध्ये राहतात, त्यामुळे त्याला ब्रह्मांड म्हटले जाते. ही आहे मनुष्य सृष्टी. ब्रह्मांड वेगळे आहे, मनुष्य सृष्टी वेगळी आहे. आत्मा काय आहे, हे कोणालाही ठाऊक नाही. म्हणतात देखील - ‘भ्रकुटी के बीच में चमकता है अजब सितारा’. आणि मग म्हणतात आत्मा अंगुष्ठाकृती आहे. परंतु बाबा म्हणतात - आत्मा अतिशय सूक्ष्म बिंदू आहे. ज्याला या डोळ्यांनी पाहू शकत नाही, त्याला पाहण्यासाठी, पकडण्यासाठी खूप प्रयत्न करतात. परंतु कोणालाही ती पकडता येत नाही.

तुम्ही मुले जाणता तर आता तुम्हाला भारताला स्वर्ग बनविण्यामध्ये बाबांचा मदतगार देखील बनावे लागेल. बाबा येतातच मुळी भारतामध्ये. शिवजयंती भारतामध्येच साजरी करतात. जसे क्राईस्ट होऊन गेला, तर ख्रिश्चन लोक क्रिसमस साजरा करतात. ते लोक क्राईस्ट कधी आला ते देखील जाणतात. परंतु भारतवासीयांना हे ठाऊक देखील नाही की बाबा कधी आले होते, कृष्ण कधी आला होता? कोणालाही त्यांच्याविषयी काहीही ठाऊक नाही. महिमा सारी श्रीकृष्णाचीच गातात. त्याला पाळण्यामध्ये झोके देतात, त्याचे लाड करतात, परंतु हे जाणत नाही की त्याचा जन्म कधी झाला. म्हणतात - द्वापरमध्ये गीता ऐकवली. परंतु श्रीकृष्ण काही द्वापरमध्ये तर येत नाहीत. लीला आहे ती एका बाबांची. तेव्हाच तर त्यांच्यासाठी म्हणतात - ‘तुम्हरी गत-मत…’ श्रीकृष्ण आहे सतयुगाचा प्रिन्स. अगोदरच मातेला साक्षात्कार होतो की, योगबलाद्वारे बाळ जन्माला येणार आहे. तिथे शरीर देखील असेच साक्षात्काराने सोडतात. एक शरीर सोडून दुसरे घेतात. सापाचे उदाहरण आहे. वास्तविक संन्यासी हे उदाहरण देऊ शकत नाहीत. तुम्ही विकारी लोकांना बसून ज्ञानाची भू-भू करून तमोप्रधानापासून सतोप्रधान बनवता. हा तुमचा धंदा आहे - भू-भू करून मनुष्याला देवता बनवता. कासव इत्यादीचे देखील उदाहरण यावेळचेच आहे. कर्म करून मग जितका वेळ मिळेल बाबांची आठवण करायची आहे. तुम्ही जाणता हा आमचा अंतिम जन्म आहे. आता नाटक पूर्ण होणार आहे, जुने शरीर आहे. याचा कर्मभोग चुकता करायचा आहे. जेव्हा सतोप्रधान बनाल तेव्हा मग कर्मातीत अवस्था होईल, त्यानंतर मग आपण या शरीरामध्ये राहू शकणार नाही. कर्मातीत अवस्था झाली की मग शरीर सोडून देणार आणि मग युद्ध सुरू होईल. मच्छरांसदृश्य सर्व शरीरे नष्ट होऊन आत्मे निघून जातील. पवित्र बनल्याशिवाय तर कोणीही जाऊ शकणार नाही. हे आहे दुःखधाम, रावणाने स्थापन केलेले आणि रामाने स्थापन केलेले आहे - शिवालय. वास्तविक परमात्म्याचे नाव आहे - शिव; राम नाही. सतयुग शिवालयामध्ये सर्व देवताच राहतात. नंतर मग भक्तिमार्गामध्ये शिवच्या प्रतिमेसाठी मंदिर, शिवालय इत्यादी बनवतात. आता शिवबाबांचे हे तख्त आहे (ब्रह्माची भृकुटी तख्त आहे). आत्मा या तख्तावर विराजमान आहे. बाबा देखील इथे बाजूला येऊन विराजमान होतात आणि शिकवतात. कायमचे तर राहणार नाहीत. आठवण करा, तर हे आले. बाबा म्हणतात - मी तुमचा बेहदचा पिता आहे. तुम्हाला वारसा माझ्याकडून मिळणार आहे. ब्रह्मा थोडेच बेहदचे पिता आहेत, त्यामुळे तुम्ही माझी आठवण करा. गोड मुले जाणतात की, बाबा ज्ञानाचा सागर आहेत, प्रेमाचा सागर आहेत. तर तुम्हा मुलांना देखील प्रेमाचा सागर बनायचे आहे. पती-पत्नी एकमेकांवर खरे प्रेम करत नाहीत, ते तर काम-विकारालाच प्रेम समजतात. परंतु बाबांनी सांगितले आहे की काम-विकार महाशत्रू आहे. हा आदि-मध्य-अंत दुःख देणारा आहे. देवता निर्विकारी होते, तेव्हाच तर म्हणतात - श्रीकृष्णासारखा सारखा मुलगा मिळावा, श्रीकृष्णासारखा पती मिळावा. श्रीकृष्ण पुरीची आठवण करतात ना. आता बाबा कृष्णपुरी स्थापन करत आहेत. तुम्ही स्वतः श्रीकृष्णासारखे अथवा मोहन सारखे बनू शकता. अजूनही प्रिन्स-प्रिन्सेस असतील. तर हे सर्व इथे बनत आहेत. त्यांची देखील लिस्ट असते. माळेचे ८ मणी देखील आहेत, तर १०८ मणी देखील आहेत. माणसे नवरत्नाची अंगठी घालतात. आता हे आठ कोण आहेत? मध्यभागी कोण आहे? हे तुम्हीच जाणता की, सर्वात गोड बाबांद्वारे आपण असे रत्न बनत आहोत. बाबा म्हणतात - मुलांनो, आपसामध्ये अतिशय प्रेमाने वागायचे आहे. नाहीतर बाबांचे नाव बदनाम कराल. आणि मग सद्गुरूची निंदा करणारे ठौर (पद) प्राप्त करू शकणार नाहीत. सर्वांना मंत्र देखील सांगायचा आहे की, एका बाबांची आठवण करा तर अशुद्धता निघून जाईल. घरामध्ये देखील इतके प्रेमाने वागले पाहिजे ज्यामुळे बाकीचे समजतील की यांच्यामध्ये क्रोध नाहीये. खूप प्रेम आहे. दारू, सिगरेट इत्यादी पिणे ही अतिशय वाईट सवय आहे, अशा सर्व वाईट सवयी सोडून दिल्या पाहिजेत. दैवी गुण इथेच धारण करायचे आहेत. राजधानी स्थापन करण्यामध्ये मेहनत घ्यावी लागते. बाकीचे धर्मवाले काही राजधानी स्थापन करत नाहीत. ते वरून एकदम शेवटपर्यंत येत राहतात. तुम्ही २१ जन्मांचे प्रारब्ध घडवत आहात, यामध्ये मायेची खूप वादळे येतील. तरी देखील पुरुषार्थ करून दैवी गुण धारण करायचे आहेत. जर चिडून बोललात तर लोक म्हणतील यांच्यामध्ये भूत आहे. जणू बेहदच्या बाबांची अब्रू घालवलीत. मग असे उच्च पद कसे काय मिळवू शकतील? अतिशय गोड आणि अनासक्त बनायचे आहे. इथे राहून, सर्व काही करत असताना योग एका माशुक सोबत असला पाहिजे. बाबांनी सांगितले आहे - माझी आठवण करा तर पापे भस्म होतील, याला योग-अग्नी म्हटले जाते. इथे हठयोगाची गरज नाही. आपले शरीर तंदुरुस्त ठेवायचे आहे. हे शरीर अतिशय मौल्यवान आहे. भोजन देखील शुद्ध खायचे आहे. देवतांना भोग कसा लावतात. श्रीनाथद्वारेला जाऊन पहा, बंगालमध्ये तर कालीमातेला बकऱ्याचा भोग लावतात. ते आपल्या पितरांना देखील मासे खाऊ घालतात; नाहीतर समजतात की पितर नाराज होतील. कोणीतरी प्रथा सुरू केली आहे, ती चालत राहते. देवी-देवतांच्या राज्यामध्ये कोणतेही पाप होत नाही. ते आहे - रामराज्य. इथे कर्म विकर्म बनते. तिथे कर्म अकर्म बनते. आता हरिद्वारमध्ये जाऊन बसतात. ‘हरी’, श्रीकृष्णाला म्हणतात. आता श्रीकृष्ण तर आहे सतयुगामध्ये. वास्तविक ‘हरी’ हे नाव शिवबाबांचे आहे; दुःख हरणारा तो ‘हरी’. परंतु गीतेमध्ये श्रीकृष्णाचे नाव टाकले आहे, हरी श्रीकृष्णाला समजले आहेत. वास्तविक दुःख हरणारे आहेत - शिवबाबा. हरीचे द्वार सतयुगाला म्हटले जाते. भक्तिमार्गामध्ये जे काही येईल ते बोलत राहतात.

बाबा म्हणतात - मी, जुन्या दुनियेला नवीन बनविण्याकरिता संगमयुगावर येतो. रावण आहे जुना शत्रू. त्याला दरवर्षी जाळतात. किती पैसे खर्च करतात. सर्व वेस्ट ऑफ टाईम, वेस्ट ऑफ मनी आहे. बंगालमध्ये किती देवतांच्या मूर्त्या बनवतात, त्यांना खाऊ-पिऊ घालून, पूजा करून मग जाऊन विसर्जित करतात. यावर एक गाणे देखील आहे. मुलांनी अतिशय गोड बनायचे आहे. कधीही चिडून बोलायचे नाही. बाबांवर कधीही रुसायचे नाही. रुसून जर शिक्षण सोडून दिले तर जणू आपल्याच पायावर कुऱ्हाड मारली. इथे तुम्ही आला आहात विश्वाचा मालक बनण्याकरिता. महाराजा - श्री नारायणाला, महाराणी - श्री लक्ष्मीला म्हटले जाते. बाकी ‘श्री श्री’ हे शिवबाबांचे टायटल आहे. श्री म्हटले जाते देवतांना. श्री अर्थात श्रेष्ठ.

आता तुम्ही विचार करा आपण कोण होतो? मायेने आमचे डोके फिरवून आम्हाला काय बनवले आहे. भारत किती श्रीमंत होता. पुन्हा गरीब कसा बनला? काय झाले? काहीही समजत नाहीत. आता तुम्ही जाणता आपण सो देवता होतो, मग क्षत्रिय बनलो. दुनियावाले म्हणतात - आत्मा सो परमात्मा. नाहीतर ‘हम सो’चा अर्थ किती सोपा आहे. ते लोक म्हणतात - मनुष्याचा फक्त एकच जन्म असतो. परंतु बाबा समजावून सांगत आहेत की, मनुष्याचे ८४ जन्म असतात. त्या ८४ जन्मांमध्ये तुमचा हा संगमातील एक जन्म दुर्लभ आहे. जेव्हा की तुम्ही बेहदच्या बाबांकडून स्वर्गाचा वारसा प्राप्त करता. तुम्ही अतिशय रॉयल पित्याची मुले आहात, तर तुमच्यामध्ये किती रॉयल्टी असली पाहिजे. रॉयल माणसे कधीही जोराने बोलत नाहीत. दुनियेमध्ये घरोघरी किती भांडणे होतात. स्वर्गामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही. हे बाबा (ब्रह्मा बाबा) वल्लभाचारी कुळाचे होते. तरी देखील कुठे ते सतयुगातील देवता आणि कुठे आजकालचे वैष्णव लोक! असे नाही की वैष्णव आहेत तर विकारामध्ये जात नाहीत. रावण राज्यामध्ये सर्व विकारातून जन्म घेतात. सतयुगामध्ये आहेत संपूर्ण निर्विकारी. आता तुम्ही संपूर्ण निर्विकारी बनत आहात; आणि योगबलाद्वारे विश्वाचे मालक बनता. तुमचे वर्तन अतिशय मधुर रॉयल असले पाहिजे. कोणताही वादविवाद अथवा शास्त्रवाद करायचा नाही. ते जेव्हा शास्त्रवाद करण्यासाठी बसतात तर एकमेकांना लाठी देखील मारतात. त्या बिचाऱ्यांचा काहीही दोष नाही. या नॉलेजला जाणतच नाहीत. हे आहे रुहानी नॉलेज, जे रुहानी बाबांकडून मिळत आहे. ते ज्ञानाचा सागर आहेत. त्यांच्या शरीराचे नाव नाही, ते अव्यक्तमूर्त आहेत. म्हणतात - माझे नाव ‘शिव’ आहे. मी स्थूल अथवा सूक्ष्म शरीर घेत नाही. ज्ञानाचा सागर, आनंदाचा सागर मलाच म्हटले जाते. शास्त्रांमध्ये काय-काय लिहिले आहे - हनुमान पवनपुत्र होता. आता पवनापासून मुलगा कसा जन्म घेऊ शकतो! मग परमात्म्यासाठी म्हणतात - कच्छ-मच्छ अवतार, किती शिव्या दिल्या आहेत. बाबा येऊन तक्रार करतात की, तुम्ही आसुरीमतामुळे मला इतक्या शिव्या दिल्या आहेत. २४ अवतारांनी पोट भरले नाही म्हणून मग कणाकणामध्ये, दगडा-मातीमध्ये ठोकून दिले आहे. ही सर्व शास्त्रे द्वापर पासून बनली आहेत. सुरुवातीला फक्त शिव ची पूजा होत असे. गीता देखील नंतर बनवली गेली आहे. आता बाबा समजावून सांगत आहेत - हा सर्व अनादि खेळ आहे. आता मी आलो आहे तुम्हाला विश्वाचा मालक बनविण्याकरिता, तर बाबांना पूर्णपणे फॉलो केले पाहिजे ना. लक्षणं देखील चांगली असली पाहिजेत. हे देखील वंडर आहे ना. कलियुगाच्या अंताला काय आहे आणि मग सतयुगामध्ये काय पहाल! कलियुगामध्ये भारत पतित आहे, सतयुगामध्ये भारत पवित्र आहे. त्यावेळी इतर कोणताही खंड नसतो. हा गीता एपिसोड रिपीट होत आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपण रॉयल पित्याची मुले आहोत त्यामुळे आपले वर्तन अतिशय रॉयल ठेवायचे आहे. मोठ्याने बोलायचे नाही. अतिशय गोड बनायचे आहे.

२) कधीही बाबांवर अथवा आपसामध्ये रुसायचे नाही. रुसून कधीही शिक्षण सोडायचे नाही. ज्या काही वाईट सवयी आहेत त्यांना सोडायचे आहे.

वरदान:-
फुलस्टॉप द्वारे श्रेष्ठ स्थिती रुपी मेडल प्राप्त करणारे महावीर भव

या अनादि ड्रामामध्ये रुहानी सेनेच्या सैनिकांना कोणी मेडल देत नाही परंतु ड्रामा अनुसार त्यांना श्रेष्ठ स्थिती रुपी मेडल स्वतः प्राप्त होते. हे मेडल त्यांनाच प्राप्त होते जे प्रत्येक आत्म्याचा पार्ट साक्षी होऊन बघत असताना देखील फुलस्टॉपची मात्रा सहजपणे लावू शकतात. अशा आत्म्यांचे फाउंडेशन अनुभवाच्या आधारावर असते, त्यामुळे कोणतीही समस्या रुपी भिंत त्यांना अडवू शकत नाही.

बोधवाक्य:-
प्रत्येक परिस्थिती रुपी डोंगराला पार करून आपले ध्येय प्राप्त करणारे उडता पक्षी बना.

हे अव्यक्त इशारे - ब्रह्माबाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.

एकमेकांच्या गोष्टींना स्वीकारणे, सन्मान देणे, जेव्हा या दोन्ही गोष्टी जमतील तेव्हा मग संपूर्णता आणि सफलता दोन्ही समीप येतील कारण एकमेकांना सन्मान देणे हाच भविष्याचा अधिकार घेणे आहे.