19-07-26    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   18.01.2011  ओम शान्ति   मधुबन


ब्रह्मा बाबांसमान जीवनामध्ये राहून जीवनमुक्त स्थितीचा आनंद घ्या, मनजीत जगतजीत बनून स्नेहाची सौगात द्या


आजचा दिवस विशेष ब्रह्मा बाबांच्या अव्यक्त होण्याचा स्मृतीचा दिवस आहे. सर्व मुलांच्या डोळ्यांमध्ये ब्रह्मा बाबांचा स्नेह सामावलेला आहे. आज चार वाजण्याच्या अगोदरच मुलांचा स्नेह वतनमध्ये पोहोचला. ब्रह्मा बाबांसोबत भेट साजरी करण्यासाठी आणि स्नेहाच्या, आपल्या मनातील स्नेहाच्या खुणा, माळा ब्रह्मा बाबांकडे पोहोचल्या. प्रत्येक माळेच्या सुगंधामध्ये मुलांचा स्नेह सामावलेला होता. प्रत्येक मुलाचे डोळे आणि हास्य, त्यांच्या मनातील गोष्टी बोलत होते. ब्रह्मा बाबा देखील प्रत्येकाला स्नेहाचे रिटर्न देत होते. बाबा पाहत आहेत की अजूनही प्रत्येक बच्चा डोळ्यांच्या भाषेत आपल्या मनातील स्नेह देत आहे कारण हा परमात्म स्नेह प्रत्येक मुलाला सहजच बाबांचा बनविणारा आहे. हा अलौकिक स्नेह ‘माझे बाबा’ या अनुभवाने आपले बनविणारा आहे. हा स्नेह बाबांच्या खजिन्यांचा मालक बनविणारा आहे; कारण मुलांनी म्हटले ‘माझे बाबा’, तर ‘माझे बाबा’ म्हणा आणि सर्व खजिन्यांचे मालक बना. हा स्नेह सेकंदामध्ये देहाचे भान विसरायला लावून देही-अभिमानी बनवतो. बाबांशिवाय इतर काहीही आत्म्याला आकर्षित करत नाही. या दिवसाचे खूप मोठे महत्त्व आहे. केवळ स्मृती दिवसच नाही परंतु समर्थी दिवस आहे; कारण या दिवशी बाबांनी मुलांना विश्व सेवेसाठी स्वतः करावनहार बनून मुलांना करनहार बनविण्याचा तिलक दिला. सन शोज फादर चा करनहार निमित्त बनवले. सेवेमध्ये सफलतेचे साधन स्वतः करावनहार बनले आणि मुलांना करनहार बनवले कारण सेवेमध्ये सफलतेचे साधन - ‘मी करनहार आहे, करावनहार करवून घेत आहे’, ही स्मृती अथवा ही स्थिती खूप आवश्यक आहे. कारण ६३ जन्मांची स्मृती ‘मी’पणा हा देह-अभिमानामध्ये घेऊन येतो. करावनहार करवून घेत आहे, मी निमित्त करनहार आहे या स्मृतीनेच स्वतःला निमित्त समजल्याने देह-अभिमान समाप्त होतो. तर यासाठी मुलांना करनहार बनवले आणि स्वतः करावनहार बनले. करनहार बनल्याने आपोआपच निमित्त आहेत आणि निर्माण बनतात. आता देखील बापदादांनी पाहिले की मुले निमित्त बनून सेवा करतात, तर निमित्त बनून सेवा करणारे जे सेवाधारी आहेत त्यांच्या मस्तकावर सेवेच्या फळाचा तारा चमकत आहे. मेजॉरिटी मुलांची सेवा पाहून बापदादा खुश आहेत म्हणून अशा मुलांना विशेष ब्रह्मा बाबा ‘वाह बच्चे वाह!’ असे म्हणत मुबारक देत आहेत.

ब्रह्मा बाबा विशेष आनंदी देखील होत आहेत आणि या पुढे देखील निमित्त बनून सेवेला पुढे वाढविण्यासाठी मुबारक देत आहेत. अजूनही ब्रह्मा बाबा मुलांना आपल्यासारखे फरिश्ता स्थितीमध्ये राहण्यासाठी इशारे देत आहेत. बापदादांनी पाहिले आहे की मुलांचे अटेंशन आहे की सदैव जसे ब्रह्मा बाबा जीवनात राहूनही जीवनमुक्त होते, इतकी जबाबदारी असूनही एवढ्या मोठ्या परिवाराला सांभाळणे, सर्वांना योगी जीवनवाले बनविणे, एवढ्या मोठ्या सेवेची जबाबदारी सांभाळणे, सेवेमध्ये नेहमी पुढे करणे, सर्व काही जबाबदारी असूनही जीवनमुक्त स्थितीच्या आनंदामध्ये राहिले, म्हणून भक्तिमार्गामध्ये ब्रह्माचे आसन कमल-आसन दाखवतात. जीवनमुक्त बनून आता जीवनमुक्त स्थितीचा आनंद घेतला आणि तुम्हा सर्व मुलांना देखील तसेच बनवले. अजूनही तुम्हा मुलांना फरिश्ता बनण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या सांगून आप समान बनवू इच्छित आहेत.

बापदादांनी पाहिले की, प्रत्येक मुलाचे लक्ष्य खूप चांगले आहे, कोणालाही विचारले की तुमचे लक्ष्य काय आहे तर काय सांगता? लक्षात आहे का काय सांगता? पित्यासमान बनायचेच आहे. तर पित्यासमान काय बनणार? याच जीवनामध्ये जीवनमुक्त जीवनाचा सॅम्पल बनणार. बापदादांनी पाहिले आहे की बाबा जो होमवर्क देतात, त्यामध्ये अटेंशन तर देतात, अनुभव सुद्धा करतात, परंतु नियमितपणे करत नाहीत. आता देखील जे काम दिले होते, त्याचा रिपोर्ट बऱ्याच मुलांनी पुरुषार्थ करून एक-एक महिना अटेंशन दिले आहे. अनेक झोनचा रिपोर्ट एका महिन्याच्या रिझल्टमध्ये चांगला सुद्धा आला आहे. ज्यांनी रिपोर्ट पाठवला आहे, ज्या झोनने पाठवला आहे, त्यांना बापदादा - ‘वाह बच्चे वाह!’ असे म्हणत मुबारक देत आहेत, परंतु बापदादांना आता काय हवे आहे? आता बापदादांना प्रत्येक मुलाकडून हेच हवे आहे की, आता जे कधी-कधी ठीक राहता, परंतु बाबांना नेहमीच तसे हवे आहात. योगी देखील चांगले बनले आहात परंतु निरंतर योगी बनवू इच्छित आहेत. अलीकडेच बापदादांनी मुलांना एक काम सुद्धा दिले होते की, ही स्थिती कायम टिकून राहण्यासाठी दर तासाला स्वतःकरिता कोणत्या ना कोणत्या युक्तीचा अवलंब करा, जेणेकरून ‘कधी-कधी’ हा शब्द बदलून ‘सदैव’ हा शब्द येईल. आता बापदादांना हेच हवे आहे - जशी एक म्हण आहे - ‘मन जीते जगतजीत’, मनाला जो संकल्प द्याल तेच करेल. का? जसे इतर कर्मेंद्रिये जेव्हा पाहिजे, जसे पाहिजे तसे करतात ना! अगदी तसेच मनाला देखील जी ऑर्डर तुम्ही द्याल तेच करेल. अभ्यास करता, परंतु कधी-कधी करतही नाही. बापदादांना आता हेच हवे आहे की मनाला शक्तींच्या लगामाने जसे चालवू इच्छिता तसे चालवा. जे गायन आहे - ‘मन जीते जगतजीत’, ते कोणाचे गायन आहे? तुम्हा मुलांचेच तर गायन आहे. प्रत्येक कल्प केले आहे तेव्हाच तर गायन आहे कारण जसे इतर कर्मेंद्रियांना ‘माझी’ म्हणता तसेच मनाला देखील ‘माझे’ म्हणता. ‘माझे’ म्हणणे अर्थात मालक बना. मनामध्ये जो संकल्प करू इच्छिता, जेवढा वेळ तो संकल्प करू इच्छिता यासाठी मन बांधील आहे, कारण ते ‘माझे’ आहे. तर बापदादा या स्नेहाच्या दिवशी हाच होमवर्क देऊ इच्छित आहेत की, जो संकल्प करू इच्छिता तोच चालावा, जर तुम्ही शुद्ध संकल्प करू इच्छिता तर तो शुद्ध संकल्प व्यर्थ संकल्पाला नष्ट करेल. योग लावण्याची इच्छा आहे आणि संस्कारांमुळे व्यर्थ संकल्प चालत राहतील, किंवा योगाची सिद्धी मिळत नसेल, तर हे आता थांबले पाहिजे. जर एक तास योग लावू इच्छिता तर मनाने तुम्हाला डिस्टर्ब करू नये. आत्मा मालक आहे, मन मालक नाहीये, मन तर आत्म्याचा साथीदार आहे. तर साथीदाराला प्रेमाने ऑर्डर करा, मनजीत बना कारण बापदादांकडे बऱ्याच मुलांचा समाचार येतो - वारंवार व्यर्थ संकल्प येतात. इच्छा नसतानाही येतात. तर मग याला मालक म्हणणार का! तर ब्रह्मा बाबांवर स्नेह आहे ना, मग बाबा आज प्रेमापोटी आपल्या मनातील इच्छा सांगत आहेत की, आता मनजीत जगतजीत बनायचेच आहे. तर ब्रह्मा बाबांना ही स्नेहाची सौगात द्याल ना! स्नेहामध्ये काय दिले जाते? गिफ्ट दिली जाते ना! तर आज ब्रह्मा बाबा, मुलांना ही सौगात देण्यासाठी सांगत आहेत. तयार आहात? तयार आहात? हात वर करा. तर आता जेव्हा कधीही ऑर्डर कराल तर आजपासून व्यर्थ संकल्प येऊ द्यायचे नाहीत, हे करू शकता? आज दोन तास, चार तास योगाच्या स्थितीमध्ये राहून कर्म देखील करा, योगही लावा, करू शकता का? करू शकता, करणार ना? चला आता बीती सो बीती (झाले ते झाले), परंतु आता जर का ऑर्डर केली की, आजच्या दिवशी व्यर्थ संकल्पांना फुलस्टॉप, तर ते करावे लागेल ना.

आज योगामध्ये हेच लक्ष्य ठेवा, त्यानुसार संपूर्ण दिवसाचा पुरुषार्थ करावा लागेल ना! बाबांवरील स्नेहापोटी, बाबा जे सांगतील ते करायचे आहे. व्यर्थ संकल्प बंद, याची युक्ती आहे - ब्रह्मा बाबांनी दिलेल्या प्रेमाची अंतःकरणापासून आठवण करा. भले मग साकारमध्ये पाहिले असेल अथवा नसेलही परंतु बुद्धीबळाने तर सर्वांनी पाहिले आहे ना! पाहिले आहे की नाही पाहिले? जे म्हणतात - ‘मी बाबांचे प्रेम पाहिले आहे, मी ब्रह्मा बाबांची पालना पाहिली आहे आणि त्या आधारावरच मी पुढे जात आहे…’ त्यांनी हात वर करा. अच्छा. हात वर करून तर खुश केले. बापदादांना आनंद आहे, हिंमत तर ठेवली आहे ना. परंतु जेव्हा कधी कोणतीही शक्ती कमी होईल ना तेव्हा नेहमी पित्याच्या नात्याने, किती नाती आहेत, कधी पिता, कधी मूल देखील बनतात. कधी पिता तर कधी सखा देखील बनतात त्यामुळे एकतर नाते आठवा अथवा झालेल्या प्राप्तींना आठवा, प्राप्ती आणि नाते. जसे आज अंतःकरणापासून आठवण करत आहात ना! अशी आठवण केल्याने प्रेम उत्पन्न होईल. आज देखील सर्वांच्या मनामध्ये ब्रह्मा बाबांवरील प्रेम उचंबळून येत आहे ना! मग जेव्हा काही खाली-वर होईल तेव्हा नात्याची आणि प्राप्तींची आठवण करा. बाबा प्रत्येक मुलासोबत सहयोगी आहेत, फक्त तुम्ही आठवण करा. तर समजले आज काय करायचे आहे? ‘मनजीत जगतजीत’ हे जे गायन आहे, ते स्वरूप धारण करायचे आहे. मनाला ऑर्डरने चालवा. आता थोडे फ्री सोडले आहे ना, म्हणून ते आपले काम करते. आता अटेन्शन द्या. मन माझ्या ऑर्डरप्रमाणे चालावे, तुम्ही मनाच्या ऑर्डरनुसार चालायचे नाही. वाटते की ज्ञानाच्या गोष्टींचे मनन-चिंतन करावे आणि येतात फालतू गोष्टी. तर काय झाले? मन मालक बनले की तुम्ही मालक बनलात? तर सर्वांना हे होमवर्क समजले ना! ‘मन-जीत’ बनायचे आहे. मनाला जी ऑर्डर कराल, ती ऑर्डर मन मानेल, जरूर मानेल, फक्त अटेंशन द्यावे लागेल, बस्स. मातांनो किंवा टीचर्स, हे होऊ शकते ना? होऊ शकते का? टीचर्स हात वर करा. टीचर्स हात वर करत आहेत. जर समजत असाल की, हे होऊ शकते तर हात हलवा. पहिली लाइन हात तर हलवा. भाईलोक हात हलवा. वाह! मग तर ब्रह्मा बाबांना स्नेहाची सौगात दिली, याची मुबारक असो, मुबारक असो.

छान आहे, बापदादांवरील स्नेह खूप सहयोग देतो. ‘माझे बाबा’, मनापासून म्हटले, तर ‘माझे बाबा’ म्हटले तर मी कोण? बाबांचा सिकीलधा (अति लाडका) बच्चा. सर्वजण किती वेळा म्हणता - ‘माझे बाबा’, ‘माझे बाबा’, किती वेळा म्हणता? बाबा ऐकत असतात ना, सर्व नोट करतात. डबल फॉरेनर्स देखील ऐकत आहेत ना. बापदादांनी पाहिले की संपूर्ण सीझनमध्ये डबल फॉरेनर्सनी हजेरी लावली आहे. मधुबनमध्ये ते प्रत्येक वेळी हजर राहिले आहेत. आता देखील ३५० जण आहेत. आपल्या टर्नमध्ये देखील येतात परंतु प्रत्येक टर्नमध्ये देखील थोडे-थोडे कुठून ना कुठून येतात. तर आता हा रिझल्ट बापदादा देखील पाहत राहतील आणि तुम्ही सर्वांनी देखील साक्षी होऊन आपला स्वतःचा रिझल्ट पाहत राहा. हेच लक्षात ठेवा की बापदादांना मालक बनण्याचे वचन दिले आहे. बापदादा आता मुलांना किमान प्रत्येक झोनला तरी हे कार्य देऊ शकतात की, या झोनने या आठवड्यात किंवा १५ दिवसांत रिझल्ट द्यावा की व्यर्थ संकल्प नाही परंतु जो विषय मनासाठी दिला आहे, तो केला की नाही? हे मंजूर आहे टीचर्स? मंजूर आहे? झोनला कार्य देऊ? टीचर्स हात वर करा.

महाराष्ट्र आहे ना. तर महाराष्ट्राला तर महान कामच देणार ना. बापदादांना प्रत्येक झोनबद्दल प्रेम आहे आणि नेहमी हा विश्वास असतो की ही मुले, बाबांनी सांगितले आणि मुलांनी केले. असे आहे? महाराष्ट्र, जे बाबांनी सांगितले ते केले, असे आहे? महाराष्ट्र वाले हात वर करा. भरपूर जण आहेत. पाऊण क्लास आहे. तर प्रत्येक झोन बाबांच्या आज्ञांचे पालन करणारा आहे, सर्वजण मान हलवत आहेत. बाबांनाही विश्वास आहे की, माझी ही मुले आहेतच मुळी निश्चय-बुद्धी.

बापदादांची हीच इच्छा आहे की, रोजचे जे महावाक्य ऐकता त्याकडे होमवर्क म्हणून पाहावे. जर रोजच्या मुरलीमध्ये बाबांनी जे सांगितले आणि मुलांनी केले तर त्यांना म्हटले जाते - बाबांची सिकीलधी (लाडकी) मुले, आज्ञाधारक मुले. काय करायचे आहे, ते रोजची मुरली वाचा कारण बापदादांनी पाहिले आहे की मेजॉरिटी मुले मुरलीवर प्रेम करतात. जरी एखादा कोणी मुरलीवर प्रेम करतही नसेल, आणि तरीही असा कोणी बच्चा बापदादांना जर म्हणेल - ‘बाबा, माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे’; परंतु बाबांचे प्रेम कशावर आहे? मुरलीवर. बाबा मुरलीसाठी किती दुरून येतात. कोणी असा टीचर असेल जो इतक्या दुरून केवळ तुम्हाला शिकविण्यासाठी येईल? तर जर बाबांचे प्रेम मुरलीवर आहे, तर मग जो ‘माझे बाबा’ म्हणतो, त्याचे पहिले प्रेम बाबांसोबत बाबांच्या मुरलीवर असले पाहिजे. पहा, ब्रह्मा बाबांनी एक दिवसही मुरली मिस केली नाही. भले मग बॉम्बेला सुद्धा काही विशेष कामासाठी असो किंवा अन्य कारणास्तव जात असत, तेव्हाही ते मुरली लिहित होते आणि मातेश्वरी ती मुरली वाचून दाखवत असत. शेवटच्या दिवशी प्रकृती थोडी नरम होती, सकाळचा क्लास घेतला नाही परंतु संध्याकाळी क्लास घेतल्यानंतर अव्यक्त झाले. तर ब्रह्मा बाबांचे प्रेम कशावर होते? मुरलीवर. जे कोणी समजतात की, माझे बाबांवर प्रेम आहे; तर बाबांचे ज्याच्यावर प्रेम होते, त्यावर मुलांचे देखील प्रेम असायला हवे ना! तर मुरली, दररोज क्लासमध्ये वाचा किंवा ऐका. जर काही अडचण असेल, बहाणा नसेल, काही ठोस कारण असेल तर मग दुसऱ्या कोणाकडूनतरी ऐका. जे समजतात की मुरलीचे इतके महत्त्व ठेवेन, त्यांनी हात वर करा. अच्छा, इथून तर सर्व दिसत आहे, बाबा मागे बसलेल्या तुम्हा सर्वांनाही पाहत आहेत. अच्छा, खूप छान. बाबा अधून-मधून पेपर घेतील की आज कोणी मुरली ऐकली नाही, ते टीचर्सनी लिहून पाठवा. आवडले तर आहे ना? अच्छा. आज ब्रह्मा बाबा प्रत्येक मुलाला भेटून, अतिशय प्रेमाने प्रत्येक मुलाला नयनांद्वारे प्रेम देत आहेत. अच्छा.

डबल विदेशी भाऊ-बहिणींशी संवाद:- परदेशातील मुलांना सेवेचा उमंग-उत्साह चांगला आहे. बापदादा सर्व मुलांना हेच सांगत आहेत की भरपूर सेवा करा कारण काळ कधीही बदलू शकतो. ज्यामुळे सेवा करण्याची इच्छा असूनही तुम्ही ती करू शकणार नाही, अशी वेळही येणार आहे; त्यामुळे जे करायचे आहे ते आताच करा. नंतर नाही, तर आताच. बापदादा नेहमी सांगतात की, उद्यावर सोडू नका. आजवर सुद्धा सोडू नका, आत्ता करा, कारण आता समय आणि पाचही तत्त्वे बाबांकडे येतात, आणि म्हणतात - आम्हाला सांगा, हे दुःख अजून कधीपर्यंत चालणार! स्वतः दुःखी होत आहेत तर काय करणार? मनुष्य आत्म्यांना सुद्धा दुःखी करतील ना म्हणून जे कोणी आले आहेत त्यांनी हा संकल्प करायचा आहे की, जसे ब्राह्मण जीवन आवश्यक आहे तसेच सध्याच्या वेळेनुसार प्रत्येकाला सेवा करणे देखील जरुरी आहे. स्वतः करा किंवा इतरांकडून करवून घ्या. बाकी बापदादांनी जो होमवर्क दिला आहे - मनजीत जगतजीत बनायचेच आहे, हे तर तुमचेच गायन आहे, त्याला रिपीट करायचे आहे. अच्छा.

चोहो बाजूंनी मुलांचे संदेश आले आहेत. चोहो बाजूंनी आलेले प्रेमाचे गोड-गोड भाव अथवा वेगवेगळ्या शब्दांमधील आठवण, चोहो बाजूंनी वेगवेगळी पत्रे आली आहेत, सर्वांना बापदादा प्रतिसाद देत आहेत, प्रत्येक बच्चा प्रेमाने बाबांच्या हृदयामध्ये सामावलेला आहे आणि हे अविनाशी प्रेम सदैव बाबांचे आणि मुलांचे अनादि अविनाशी आहे आणि संपूर्ण संगमयुग बाबांचे आणि मुलांचे असे मिलन देखील निश्चित आहे. अच्छा.

आता जी मुले सन्मुख आहेत अथवा दूर बसूनही पाहत आहेत, बापदादांनी ऐकले आहे की आता तर चोहो बाजूंनी हा प्रयत्न केला आहे की प्रत्येक देशामध्ये सेंटरवर जाऊन सुद्धा टेलिव्हिजनवर पाहतात, ऐकतात, भले मग रात्रीचे कितीही वाजले तरीही पाहतात, ही विज्ञानाची साधने देखील तुमच्यासाठीच निघाली आहेत आणि तुम्हालाच लाभ मिळत आहे. जर सायन्सद्वारे विनाश होणार असेल, तरीही ते तुमच्या राज्यासाठीच करत आहेत. तर चोहो बाजूंच्या स्नेही मुलांना विशेष ब्रह्मा बाबांची प्रेमपूर्वक आठवण, अंतःकरणातून दुलार, हृदयातील प्रेम स्वीकार असो.

वरदान:-
सच्चाई आणि सफाईच्या धारणेद्वारे समीपतेचा अनुभव करणारे संपूर्णमूर्त भव

सर्व धारणांमध्ये मुख्य धारणा आहे सच्चाई आणि सफाई. एकमेकांबद्दल मनामध्ये पूर्णपणे सफाई असावी. जसे स्वच्छ वस्तूमध्ये सर्व काही स्पष्ट दिसून येते, तसे एकमेकांच्या भावना, भाव-स्वभाव स्पष्ट दिसावेत. जिथे सच्चाई-सफाई आहे तिथे समीपता (जवळीकता) आहे. जसे बापदादांच्या समीप आहात तसे आपसामध्ये देखील मनाची समीपता (जवळीकता) असावी. स्वभावातील तफावत नष्ट व्हावी. यासाठी मनाच्या भाव आणि स्वभावाला जुळवून घ्यायचे आहे. जेव्हा स्वभावामध्ये किंचितही फरक राहणार नाही तेव्हा म्हटले जाईल संपूर्णमूर्त.

सुविचार:-
बिघडलेल्याला सुधारणे - हीच सर्वात मोठी सेवा आहे.

हे अव्यक्त इशारे - ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.

योगाला ज्वाला रूप बनविण्याकरिता सेकंदामध्ये बिंदू स्वरूप बनून मन-बुद्धीला एकाग्र करण्याचा अभ्यास वारंवार करा. स्टॉप म्हटले आणि एका सेकंदामध्ये व्यर्थ देह-भानातून मन-बुद्धी एकाग्र व्हावी. अशी कंट्रोलिंग पॉवर संपूर्ण दिवसभरामध्ये यूज करा. पॉवरफुल ब्रेक द्वारे मन-बुद्धीला कंट्रोल करा; मन-बुद्धीला जिथे एकाग्र करू इच्छिता तिथे सेकंदामध्ये एकाग्र व्हावी.

विशेष सूचना -
महिन्याच्या तिसऱ्या रविवारचा योग अभ्यास:-

आज महिन्याचा तिसरा रविवार आहे, सर्व भाऊ-बहिणींनी संघटित रूपाने एकत्र येऊन सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजेपर्यंत आपल्या फरिश्ता स्वरूपाद्वारे भटकणाऱ्या, दुःखी आणि अशांत आत्म्यांना सुख-शांतीची पवित्र किरणे देऊन त्यांना, साहारे दाता परमात्मा बाबांची आठवण करून देण्याची सेवा करा.