21-07-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, आतापर्यंत तुम्ही ऐकीव गोष्टींवर चालत आला आहात, आता बाबा तुम्हाला डायरेक्ट ऐकवून आप समान नॉलेजफुल बनवत आहेत”

प्रश्न:-
उत्तम पुरुषार्थी मुलांची लक्षणे आणि त्यांच्या अवस्थेचे गायन कसे केले आहे?

उत्तर:-
उत्तम पुरुषार्थी मुले - मदर-फादरना पूर्णपणे फॉलो करतील. आपल्या जीवनाविषयी दया वाटेल. पूर्णपणे अटेन्शन ठेवतील. थोडातरी वेळ काढून बाबांच्या आठवणीमध्ये जरूर बसतील. त्यांच्या अवस्थेचे गायन आहे - अचल, अडोल, स्थिर. त्यांनाच महावीर म्हटले जाते.

गीत:-
भोलेनाथ से निराला…

ओम शांती।
दुनिया भक्तिमार्गामध्ये भगवंताच्या स्तुतीपर फक्त गाणी गात असते. तुम्हा मुलांना आता समजते आहे की, भक्तिमार्गामध्ये आपण देखील त्यांची स्तुती करणारी गाणी गात होतो. आता तेच भोलानाथ सन्मुख आहेत, ‘भोलानाथ’ हा शब्द भक्तिमार्गातील आहे. ज्ञान मार्गाचा शब्द आहे - ‘शिवबाबा’. तुम्ही समजता अनादि पूर्व नियोजित ड्रामा प्लॅन अनुसार आता संगमयुगावर बाबांना येऊन आमच्याकडून हा पुरुषार्थ करवून घ्यायचाच आहे. कल्प-कल्प पुरुषार्थ करवून घेत आले आहेत. तुम्ही मुलांनी किती काळ भक्ती केली आहे, हे देखील सिद्ध करून सांगतात. ज्यांनी सर्वात आधी भक्ती सुरू केली आहे तेच येऊन ज्ञान घेतील आणि मग सूर्यवंशी बनतील. सतयुगामध्ये फक्त एकटे लक्ष्मी-नारायण तर येत नाहीत. त्यांची डिनायस्टी (घराणे) देखील आहे ना. त्याला म्हटले जाते दैवी वर्ण. भारतामध्ये दैवी वर्ण होता. आता आसुरी वर्ण आहे. हा आहे संगम. आता आसुरी वर्णातून दैवी वर्णामध्ये जायचे आहे. बरोबर ही महाभारत लढाई देखील तीच आहे जिचे गायन केले गेले आहे. फक्त ‘शिव’ नावाऐवजी श्रीकृष्णाचे नाव घातले आहे. एका गीतेचे खंडन झाले, तर सर्वच धर्मशास्त्रांचे खंडन होते. मूळ गोष्ट गीतेची आहे. किती ‘गीता पाठशाळा’ अथवा ‘गीता भवन’ अस्तित्वात आहेत! गीता ज्ञान ऐकण्याची पाठशाळा. स्वतः ऐकवणारा नाहीये. जे होऊन जातात त्यांचे नंतर गायन चालते. मुलांना तर रोज बाबा अतिशय प्रेमाने समजावून सांगतात. मुले जाणतात - बाबा प्रेमाचा सागर आहेत. सर्वांना प्रेमाने शिकवतात. बाबा कधीही रागावत नाहीत, नेहमी प्रेमाने समजावून सांगतात. मुलांनो, तुम्ही सतोप्रधान होता आणि मग पुनर्जन्म घेत आला आहात. तुम्ही भारतवासीच मूळ देवी-देवता धर्माचे आहात. हे देखील सांगतात. सर्वात आधी वारसा घेण्यासाठी कोण येणार? ज्यांनी कल्पापूर्वी घेतला आहे, तेच म्हणतील, बाबा तुमच्याशिवाय आमचा दुसरा कोणीही आधार देणारा नाही. बाबा क्षमा देखील तेव्हाच करतील जेव्हा संगमयुग असेल. हे तर मुले जाणतात की रावण राज्य आणि रामराज्य इथेच असते. रावण राज्य आहे म्हणून तर रामराज्य हवे आहे. तुम्ही जेव्हा ‘शिवबाबा’ म्हणता तेव्हा बुद्धी निराकार कडेच जाते, निराकारचीच आठवण येते. आत्माच बाबांना हाका मारते. असे देखील नाही की परमात्मा तुमची हाक ऐकण्याची वाट पाहत बसतात. बाबा म्हणतात - ‘ड्रामा-प्लॅन अनुसार पतितांना पावन बनविण्यासाठी तर मी शरीरामध्ये येतो. असे नाही की तुमची हाक ऐकून मी येतो. भक्ती जेव्हा पूर्ण होते तेव्हा मला यावेच लागते’. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. ती वेळ येते, जेव्हा मुले हाका मारू लागतात. हे तर कुठे लिहिलेले नाहीये की ते कधी येतील? त्यांनी (दुनियावाल्यांनी) कल्पाचा कालावधी चुकीचा लिहून ठेवला आहे. हे चित्र घराघरामध्ये असायला हवे. जेणेकरून रोज बघतील आणि आठवण करतील की, हे बाबा, हे दादा, हा वारसा. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, सतोप्रधान बनण्यासाठी माझी आठवण करा, म्हणजे भेसळ निघून जाईल. ही युक्ती बाबाच समजावून सांगतात. हे बाबा (ब्रह्मा बाबा) देखील म्हणतात - मी देखील पुरुषार्थ करतो. मुलांनो एकमेकांना सावध करून उन्नती प्राप्त करायची आहे. या चित्रांचे स्पष्टीकरण खूप छान आहे. शिवबाबा ब्रह्मा द्वारे स्थापना करत आहेत. समोर महाभारी महाभारत लढाई उभी आहे. इतके अनेक धर्म विनाश होणार, त्यासाठी लढाई जरूर हवी. या गोष्टी मुलांनी विसरता कामा नये. बरोबर, आता कलियुग घोर अंधार आहे. किती प्रचंड लोकसंख्या झाली आहे, जरूर विनाश होणार आहे. सतयुगामध्ये एकच धर्म असेल. जरूर ८४ जन्मांचे चक्र देखील त्यांनीच पूर्ण केले आहे. हे तर सहज आहे. बाकी इतक्या सर्व धर्मांचा विनाश नक्की होईल. आता पुन्हा एका धर्माची स्थापना खरोखर होत आहे. सर्वांचे सद्गती दाता बाबा आहेत. बाबांकडूनच मुलांना वारसा मिळतो. मुले जाणतात - आम्ही जे हे शिक्षण शिकतो ते भविष्य २१ जन्मांसाठी शिकत आहोत. भगवानुवाच - ‘मी तुम्हाला शिकवून २१ जन्मांसाठी स्वर्गाचा मालक बनवतो’. खरोखर सूर्यवंशी, चंद्रवंशी घराण्याची स्थापना होत आहे. जो जितका पुरुषार्थ करेल, तितके उच्च पद प्राप्त करेल; म्हणून शिवबाबा म्हणतात - या मदर-फादरला फॉलो करा. यांना तुम्ही सूक्ष्मवतन, वैकुंठामध्ये देखील पाहता. स्वतःलाही पाहता, आम्ही देखील महाराजा, महाराणी बनतो. वैकुंठाचा देखील साक्षात्कार होतो. मानतात देखील बरोबर भारत वैकुंठ होता, श्रीकृष्णपुरी होती. आज कंसपुरी आहे, उद्या कृष्णपुरी असेल. रात्र बदलून दिवस होणार आहे. हा आहे अर्धा कल्प बेहदचा दिवस आणि अर्धा कल्प बेहदची रात्र. अंधारामध्ये ठोकराच खात राहतात. ब्रह्माची रात्र म्हणजे ब्राह्मणांची रात्र. मग तुम्ही ब्राह्मणापासून देवता बनता. सतयुगामध्ये ब्राह्मण नसतात, देवता असतात.

मुले हे देखील जाणतात की, भारत पवित्र राजस्थान होता नंतर मग अपवित्र राजस्थान बनला आहे. भारत नेहमीच राजस्थान राहिला आहे. राजाई चालत आली आहे इतर धर्मियांची सुरुवातीपासूनच राजाई चालत नाही. भगवानच राजाई स्थापन करतात. भगवानच येऊन राजयोग शिकवतात. ते निराकार, ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर… आहेत. तुम्ही जाणता बाबांकडून आपल्याला वारसा मिळत आहे. तर नक्कीच आपल्या पुरुषार्थाचीच बाकी आहे. जितका जो पुरुषार्थ करेल, जितका इतरांना मार्ग दाखवेल. बाबा म्हणतात - मज पित्याची आठवण करा तर तुम्ही पतितापासून पावन बनून पावन दुनियेचे मालक बनाल, किती सोपे आहे. लौकिक आई-वडील जर ज्ञानात असतील तर मुलांना सुद्धा आप समान बनवले पाहिजे. आई-वडील खरी कमाई करत असतील तर मुलांकडूनही खरी कमाई करून घेतली पाहिजे. काही-काही मुले चांगली असतात. म्हणतात - आम्ही रूहानी शिक्षण शिकून घराघरात हा संदेश देत राहू. बाबा देखील म्हणतात की, पैगंबर आणि मेसेंजर मी आहे, तुम्हाला मेसेज देतो की घरी चला; इतर धर्म स्थापक तर येऊन फक्त आपापला धर्म स्थापन करतात. मी सर्वांना मेसेज देतो की आता परत जायचे आहे. ही दुनिया आता राहण्या लायक राहिलेली नाही. माझी आठवण करा तर पावन बनाल. तुम्ही पावन होता, मग रावणाने पतित बनवले आहे. मी पुन्हा पावन बनविण्याकरिता आलो आहे. थोड्याच वेळात हे बॉम्ब इत्यादींचा वापर सुरु होईल तेव्हा समजतील ही तीच महाभारत लढाई आहे. तर जरूर भगवान देखील असतील. परंतु ते समजतात गीतेचा भगवान श्रीकृष्ण आहे. किती गोंधळ आहे. गोंधळलेले नसते तर भगवंताला येण्याची काय गरज होती. भक्तिमार्गाला भूलभुलैयाचा खेळ म्हटले जाते. आता बाबा म्हणतात - ‘माझी आठवण केल्याने सर्व चुका संपून जातील’. आधी स्वतःला देह समजत होता. आता स्वतःला देही (आत्मा) समजता. बाबा हीच ताकीद देतात की, ‘मुलांनो, देही-अभिमानी बना’. इथे तुम्ही बाबांच्या सन्मुख बसला आहात. तिथे सेंटर्सवर मुली (बहिणी) बसून समजावून सांगतील की, शिवबाबा असे म्हणतात. इथे तर डायरेक्ट बाबा सांगतात - मी आत्म्यांसोबत बोलतो. तुम्ही मुले जाणता बाबा यांच्याद्वारे (ब्रह्मा बाबांद्वारे) आम्हाला समजावून सांगत आहेत. हा अत्यंत शुभ असा मेळावा आहे. बाबा म्हणतात - ‘निरंतर माझी आठवण करा’. बाबांकडून आपल्याला स्वर्गाचा वारसा घ्यायचा आहे. बाबा आणि स्वर्गाची आठवण करायची आहे. कोणतेही विकर्म करायचे नाही. जर विकर्म कराल तर ते शंभर पटीने वाढेल. विकर्म करवून घेणारी आहे माया, तिच्यावर विजय मिळवायचा आहे म्हणून हनुमान महावीरची कथा आहे. तुम्ही हनुमान महावीर आहात ना. आम्ही तर बाबांचे बनलो आहोत. तर माया आम्हाला पराभूत करू शकत नाही. आता बाबांची आठवण करता-करता सतोप्रधान, विकर्माजीत बनाल. नाही बनलात तर आपले पद भ्रष्ट कराल. पुरुषार्थी मुले जी असतात ती आपल्या जीवनाबद्दल दया (कल्याणाची भावना) बाळगतात. काहीही झाले तरी, ते आठवणीच्या यात्रेमध्ये राहतील, अचल-अडोल-स्थिर राहतील. विनाश तर होणारच आहे. सर्वांचे काका, चाचा, मामा, गुरू, गोसावी इत्यादी सगळे नष्ट होतात. सद्गुरू म्हणतात - ‘मी तुम्हाला सोबत घेऊन जाणारा आहे’. मनुष्य तर पूर्णपणे अंधकारात आहेत, तुम्ही जाणता शिवबाबा आपल्याला सोबत घेऊन जातील. म्हणतात ना - ‘काळाने खाऊन टाकले’. परंतु मी तर तुम्हाला शांतिधाम मध्ये घेऊन जातो. आत्मा शरीर सोडून निघून जाते. काळ घेऊन जात नाही, आत्म्याला बाहेर पडावे लागते. आता तर मी स्वतः तुम्हाला परत घेऊन जाण्यासाठी आलो आहे. बाबा काही मारण्यासाठी आले आहेत का? नाही. तुम्हाला जुने शरीर सोडायचे आहे. आत्मा तमोप्रधानपासून सतोप्रधान बनणार आहे. आता ५ तत्वे देखील तमोप्रधान आहेत, त्यामुळे शरीरे देखील अशीच (रोगी) बनतात. तिथे सतोप्रधान तत्वांनी तुमची शरीरे देखील गोरी बनतील.

बाबा म्हणतात - ‘मी पुन्हा सतयुगी आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करतो. तुम्हीच ८४ जन्म भोगले आहेत. तुम्ही आपल्या धर्माला विसरला आहात इतर कोणीही आपल्या धर्माला विसरलेले नाहीत. तुम्ही आता जाणता - आपण मूळचे देवी-देवता धर्माचे इतके श्रेष्ठ होतो आणि मग इतके आपण नीच कसे बनलो. बाबा बसून कल्प-कल्प तुम्हालाच समजावून सांगतात. तुम्ही मग इतरांना समजावून सांगत राहाल. आता ८४ चे चक्र पूर्ण होत आहे, विनाश समोर उभा आहे. स्वर्गाचा मालक बनण्यासाठी स्वतःला लायक बनवायचे आहे. ते बनायचे आहे आठवणीद्वारे. पहाटे उठून बाबांची आठवण करा. बाबा, आश्चर्य आहे - तुम्ही कसे येता. कसे तुम्ही समोर बसून बोलत आहात. त्या आहेत ऐकीव भक्तिमार्गाच्या गोष्टी. आता तर आम्हा आत्म्यांना तुम्ही बाबा भेटले आहात, आत्म्याला बाबा भेटतात तर त्या प्रेमाने येऊन भेटतात. मुले बाबांना खूप प्रेमाने भेटतात. इथे तर ते निराकार बाबा गुप्त आहेत म्हणून बाबा नेहमी म्हणतात यांना (ब्रह्मा बाबांना) भेटता तेव्हा शिवबाबांची आठवण करून भेटा. मनुष्य तर काहीच जाणत नाहीत. तुमच्यामध्ये देखील जे कोणी जाणतात, माझे बनून मग विसरून जातात. देह-अभिमानामध्ये येतात. प्रतिज्ञा देखील करतात - ‘बाबा मी तुमचा झालो आहे’. पुरुष असो अथवा स्त्री दोघांचीही आत्मा म्हणते. परंतु शरीरामध्ये आहे तर पुरुष म्हणतो - ‘मी तुमचा झालो’ आहे. स्त्री म्हणेल - ‘मी तुमची झाले आहे’. बाबा आम्ही तुमच्याकडून पूर्ण वारसा घेणार. पूर्णपणे आठवण करणार. आठवणीशिवाय गंज निघू शकत नाही, तमोप्रधानापासून सतोप्रधान बनू शकत नाही. सतयुगामध्ये तुम्हाला अखंड, अटल, सुख-शांती, संपत्तीचे २१ जन्म राज्य मिळते. स्वर्गाचे रचयिता बाबा जरूर आपला वारसा देणार. गातात देखील - ‘परवाह है पार ब्रह्म में रहने वाले परमपिता परमात्मा की’. ते तर एकदाच येतात. या देखील समजून घेण्याच्या गोष्टी आहेत ना. कित्येकांना तर या समजतसुद्धा नाहीत, थोडे मोठे युद्ध सुरू होईल तेव्हा त्यांचे डोळे उघडतील. वास्तविक हा यज्ञ रचलेला आहे. लढाई देखील आहे. या यज्ञा विषयी कोणाला माहित सुद्धा नाहीये. रुद्र ज्ञान यज्ञ रचलाच यासाठी होता की विनाश व्हावा. ते मग यज्ञ रचतात की विनाश होऊ नये, शांती स्थापित व्हावी. हा यज्ञ तरी देखील रचतील. त्यांना हे माहीत नाहीये की विनाश झाला तर मग काय होईल? आता तुम्ही मुले संपूर्ण विश्वाच्या आदि-मध्य-अंताला जाणता. सर्वांच्या बेहदच्या जन्म कहाणीला जाणता. असा कोणीही नाही, जो म्हणेल की, ‘मी परमपिता परमात्म्याची जीवन कहाणी सांगतो’. परमात्म्यालाच सर्वजण बोलावतात ना. सतत आठवण करत असतात. म्हणतात ना - ‘भगवंताने हे मूल दिले’, ‘असे केले’. काही जण असे समजतात की, ज्याची वस्तू होती, त्याने ती घेतली. असेही काही ज्ञानी पुरुष असतात. अनेक प्रकारचे मनुष्य आहेत. आता तुम्हाला बाबा भेटले आहेत तर बाबांचीच आठवण करायची आहे. आठवण केल्यानेच कमाई होते. तुम्ही विष्णुपुरीचे मालक बनाल. तुम्ही सतयुगापासून कलियुगाच्या अंतापर्यंत संपूर्ण चक्राला जाणता. तुमच्या बुद्धीमध्ये हुबेहूब तसेच आहे, जसे बाबांच्या बुद्धीमध्ये आहे म्हणून त्यांना ज्ञानाचा सागर, नॉलेजफुल म्हटले जाते. आता तुम्ही बाबांकडून वारसा घेत आहात. तुम्ही मुलांनी अचल, स्थिर राहिले पाहिजे. असे नाही की माया येऊन वारंवार तुमची स्थिती दोलायमान करेल. लाजाळूचे झाड बनता कामा नये. बाबांची आठवण न केल्यामुळे कोमेजून जातात. बाबांची आठवण करण्याचा पुरुषार्थ तुम्ही करत आहात. वेळ समीप येईल आणि मग तुम्ही पाहाल की, आपला पुरुषार्थ आता पूर्ण झाला. अंत आला. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) रूहानी शिक्षण शिकून खरी कमाई करायची आहे आणि इतरांनाही तसे करण्यास प्रेरित करायचे आहे. घरी जाण्याचा संदेश सर्वांना द्यायचा आहे. आता कोणतेही विकर्म करायचे नाही.

२) पहाटे उठून प्रेमाने बाबांची आठवण करायची आहे. छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये छुईमुई (लाजाळू) बनायचे नाही. अवस्थेला अचल-अडोल बनवायचे आहे.

वरदान:-
नॉलेजच्या लाईट-माईट द्वारे आपल्या भाग्याला जागृत करणारे सदा सफलतामूर्त भव

जी मुले नॉलेजच्या लाईट आणि माईटद्वारे आदि-मध्य-अंताला जाणून पुरुषार्थ करतात, त्यांना सफलता अवश्य प्राप्त होते. सफलता प्राप्त होणे हे देखील भाग्याचे लक्षण आहे. नॉलेजफुल बनणे हेच भाग्य जागृत करण्याचे साधन आहे. फक्त रचयिता आणि रचनेचे नॉलेज पुरेसे नाहीये, परंतु नॉलेजफुल अर्थात प्रत्येक संकल्प, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कर्मामध्ये ज्ञान स्वरूप असावे, तेव्हाच सफलतामूर्त बनाल. जर पुरुषार्थ योग्य असूनही सफलता दिसत नसेल तर हेच समजले पाहिजे की ही असफलता नाही, अजून परिपक्व बनविण्याचे ते एक साधन आहे.

बोधवाक्य:-
न्यारे (अलिप्त) राहून कर्मेंद्रियांकडून कर्म करवून घ्या तर कर्मातीत स्थितीचा अनुभव सहज करू शकाल.

हे अव्यक्त इशारे - ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.

जेव्हा योग करण्यासाठी बसता तेव्हा सामावून घेण्याची शक्ती एका सेकंदामध्ये युज करा. सेवेचे संकल्प देखील सामावून जातील; इतकी शक्ती असावी की स्टॉप म्हटले आणि स्टॉप व्हावे. फुल ब्रेक लागावा, ढीला ब्रेक नाही. जर एका सेकंदाऐवजी जास्त वेळ लागत असेल तर सामावून घेण्याची शक्ती कमजोर आहे असे म्हटले जाईल.