22-03-26 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
07.04.2009 ओम शान्ति
मधुबन
‘कारण’ शब्दापासून
मुक्त राहून वर्तनाद्वारे आणि चेहऱ्याद्वारे मुक्ती देणारे मुक्तिदाता बना, सेवेच्या
उमंग-उत्साहा सोबत सदैव बेहदच्या वैराग्य वृत्ती मध्ये रहा
आज बापदादा चोहो
बाजूंची मुले जी डबल मालक आहेत, त्या प्रत्येक मुलाला पहात आहेत. एक तर बाबांच्या
सर्व खजिन्यांचे मालक आहेत आणि दुसरे स्वराज्याचे मालक आहेत. बाबांकडून दोन्हीची
मालकी प्रत्येक मुलाला मिळालेली आहे. बालक देखील आहात आणि मालक देखील आहात. ‘माझे
बाबा’ म्हटले आणि बाबांनी देखील ‘माझा बच्चा’ म्हटले, तर बालक आणि मालक या दोन्हीचा
अनुभव आहे.
आज पुष्कळ मुले आली
आहेत, या वर्षाचा हा लास्ट टर्न आहे. तर आज बापदादांनी प्रत्येकाचा पुरुषार्थ चेक
केला. तर सांगा बरं, काय पाहिले असेल? प्रत्येकाने स्वतःला विचारा की, माझा
पुरुषार्थ कसा आहे? बापदादा सर्व मुलांना पाहून खुश देखील झाले परंतु बाबांची एक आशा
आहे, सांगू का ती काय आहे! बाबांच्या आशेला पूर्ण कराल ना! एकच आशा आहे, सांगू का?
हात वर करा जे आशा पूर्ण करतील! खूप छान. छोटीशी आशा आहे, ती आहे आजपासून एक शब्द
बदली करा, कोणता शब्द? जो वारंवार खाली घेऊन येतो, तो शब्द आहे - “कारण”. या ‘कारण’
शब्दाला परिवर्तन करून कायम ‘निवारण’ शब्दाला धारण करा; कारण आता तुमची सेवा देखील
कोणती आहे? विश्वातील आत्म्यांच्या, सर्वांच्या समस्यांचे कारण निवारण करून, निवारण
करताच निर्वाणधाममध्ये घेऊन जायचे आहे, कारण तुम्ही सर्व मुक्तिदाता आहात. तर जेव्हा
इतरांना देखील मुक्ती देणारे आहात तर स्वतः देखील कारणाला निवारण कराल तेव्हाच
इतरांना मुक्ती देऊ शकाल, निर्वाणधाम मध्ये पाठवू शकाल. तर या एका शब्दाचा फरक करणे
अवघड आहे की सोपे आहे? विचार करा.
आज जे पण आले आहेत
किंवा आपापल्या ठिकाणी बघत आहेत, ऐकत आहेत, त्या सर्वांकडून बापदादा एका शब्दाचे
परिवर्तन इच्छित आहेत; कारण, हे “कारण”च खाली घेऊन येते. ‘कारण’मध्ये तर अर्धा कल्प
राहिलात, आता ‘निवारण’ करण्याची वेळ आहे. निवारण आणि निर्वाण, मुक्ती. तर आज बाबांना
हे देण्याची तुमच्या मध्ये हिंमत आहे? लास्ट टर्न आहे ना, सर्व जण उमंग-उत्साहाने
आले आहेत आणि बापदादा प्रत्येकाला मुबारक देत आहेत. झोपण्याची, जेवण्याची अडचण
देखील आहे परंतु सर्व जण प्रेमाने, स्नेहाच्या विमानाने तुम्हा सर्वांना मधुबनमध्ये
पोहोचवले आहे. बापदादा प्रत्येकाचे प्रेम पाहून, प्रत्येकाला पद्मगुणा हृदयापासून
प्रेम देत आहेत. परंतु प्रेमामध्ये तुम्ही काय करता? ज्याच्यावर प्रेम असते ना,
त्याला प्रेमाने सौगात (भेटवस्तू) देखील दिली जाते. तर आज बापदादा सौगात मध्ये हा
“कारण” शब्द घेऊ इच्छित आहेत. बापदादांची ही आशा पूर्ण करायची आहे ना! मग हात वर करा,
इथेच सोडून जायचे आहे. या गेटमधून बाहेर पडाल तेव्हा हा ‘कारण’ शब्द संपुष्टात आला
पाहिजे. आणि चुकून आला जरी तरी बाबांना दिलेली वस्तू म्हणजे अमानत आहे. तर अमानत
मध्ये काय केले जाते? परत घेतली जाते का? तर सर्वांनी दृढ संकल्प केला आहे? केला
का? पुन्हा एकदा हात वर करा. पाठीमागे बसलेल्यांनी हात हलवा. (आज शांतिवनमध्ये
सुमारे २८-२९ हजार भाऊ-बहीणी आत आणि बाहेर बसून मुरली ऐकत आहेत, सर्व जण हात हलवत
आहेत). अच्छा, खूप छान, कारण आता समयानुसार तुमच्याकडे रांग लागेल. कशासाठी रांग
लागेल? ‘हे मुक्तिदाता, मुक्ती द्या’. तर मुक्ती देणारे मुक्तिदाता पहिले तुम्ही
स्वतः या एका शब्दातून मुक्त व्हाल तेव्हाच तर मुक्ती देऊ शकाल.
बापदादांची हीच इच्छा
आहे की आता या वर्षाचा होमवर्क हाच असावा की मला मुक्त बनून मुक्ती द्यायची आहे;
कारण दिवसेंदिवस समस्या खूप वाढणार आहेत. तर समस्या समाधान रूपामध्ये बदलावी. मेहनत
आणि वेळ समस्या मिटविण्यासाठी लागू नये. तुम्हाला तुमच्या भक्तांची आणि काळाची हाक
ऐकू येत नाही काय! तर आता समयानुसार कोणते परिवर्तन करणे आवश्यक आहे? कारण आता
प्रत्येकाला अनुभवी मूर्त बनून कोणता ना कोणता अनुभव करून देण्याची आवश्यकता आहे.
तर बाबांची आता अशी इच्छा आहे की तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यावरून, वर्तनातून असे
स्पष्ट दिसावे की ही मुक्तिदात्याची मुले मुक्ती देणारी आहेत. तुमच्या मस्तकातून
चमकणाऱ्या ताऱ्याचा अनुभव व्हावा. फक्त ऐकवल्याने नाही परंतु चेहऱ्यावरूनच हा अनुभव
व्हावा कारण अनुभव जवळ घेऊन येतो. तर हा अनुभव चेहऱ्यामधून आणि वर्तनातून दाखवा. जसे
पहा सायन्सची साधने अनुभव करवितात ना, आता उन्हाळ्याचा सिझन आहे तर गर्मीचा आणि
थंडीचा अनुभव करून देत आहेत ना. जेव्हा सायन्सची साधने अनुभवी बनवतात तर काय
सायलेन्सची पॉवर, शक्तीचा अनुभव करवू शकत नाही काय! तर बापदादा आता मुलांकडून हीच
अपेक्षा करत आहेत की, अनुभवाच्या स्थितीमध्ये स्थित राहून नयनांमधून, मस्तकातून
कोणत्या ना कोणत्या शक्तीचा अनुभव करवा. ऐकलेली गोष्ट, ऐकताना चांगली वाटते परंतु
नंतर एखादी समस्या आली तर विसरूनही जातात. परंतु अनुभव आयुष्यभर विसरला जात नाही.
बापदादांनी एक कारण
पाहिले. रिझल्ट सुद्धा पाहिला, एक रिझल्ट पाहून खूप-खूप शुभेच्छा दिल्या. कोणता
रिझल्ट? आजपर्यंत सेवेचा उमंग-उत्साह चांगला आहे. तर बापदादा मुबारक देखील देत आहेत,
सेवा वाढवतात सुद्धा आणि चांगले प्लॅन सुद्धा बनवतात, रिझल्ट सुद्धा यथाशक्ती मिळतो;
परंतु एका गोष्टीचा अनुभव करवून देण्यासाठी स्वतःकडे लक्ष द्यावे लागेल. जसे तुमची
सेवा आता प्रसिद्ध होत चालली आहे. आनंदीत सुद्धा होत असतात आणि आजकाल इंटरेस्ट
सुद्धा वाढत आहे. तर बाकी आता अनुभव करून देण्याची विधी कोणती आहे? ती आहे -
उमंग-उत्साहा सहित, जितका उमंग तितकीच समयानुसार आता बेहदची वैराग्य वृत्ती देखील
पाहिजे. पुरुषार्थामध्ये कोणी समस्या रूप बनतो तर त्याचे कारण आहे बेहदच्या वैराग्य
वृत्तीचा अभाव. आता बेहदचे वैराग्य पाहिजे. बेहदचे वैराग्य सदाकाळ चालते. जर
समयानुसार वैराग्य येत असेल तर समय नंबर वन होतो आणि तुम्ही नंबर टू होता. समयाने
तुम्हाला वैराग्य दिले. बेहदचे वैराग्य सदाकाळ असते. एका बाजूला उमंग-उत्साह, आनंद
आणि दुसऱ्या बाजूला बेहदचे वैराग्य. बेहदचे वैराग्य कायम न राहण्याचे कारण काय?
बापदादांनी पाहिले की, कारण आहे देह-अभिमान. ‘देह’ शब्द सर्व गोष्टींमध्ये येतो -
जसे देहाचे संबंध, देहाचे पदार्थ, देहाचे संस्कार, देह शब्द सर्वांमध्ये येतो आणि
विशेष देह-अभिमान कोणत्या गोष्टीमध्ये येतो, जो देही-अभिमानीमधून देह-अभिमानामध्ये
घेऊन येतो, बापदादांनी आतापर्यंत हे चेक केले की, मूळ कारण जुने संस्कार खाली घेऊन
येतात. संस्कार नष्ट केले आहेत परंतु कोणता ना कोणता संस्कार नेचरच्या रूपामध्ये
अजूनही गडबड करतो. जसे देह-अभिमानाचे नेचर नॅचरल झाले आहे, तसे देही-अभिमानीचे नेचर
नॅचरल झालेले नाहीये. म्हणतात - ‘आम्ही तर नष्ट केले आहे’, परंतु पूर्ण बीजाला भस्म
केलेले नाही आहे. म्हणूनच वेळ आल्यावर पुन्हा ते देहभानाचे संस्कार इमर्ज होतात. तर
आता आवश्यकता आहे या देहभानाच्या नेचरला शक्तिशाली देही-अभिमानीपणाच्या शक्तीद्वारे
वंशा सहित नष्ट करण्याची; कारण मुले म्हणतात - आमची इच्छा नसते परंतु कधी-कधी तो
संस्कार बाहेर पडतो. का बाहेर पडतो? अंश आहे तेव्हाच तर तो वंश होऊन बाहेर येतोच.
तर आता आवश्यकता आहे शक्ती स्वरूप बनण्याची, याचा आधार आहे आपणच आपल्याला चेक करा
की कोणत्याही स्वरूपामध्ये अंश मात्र देखील जुन्या देहभानाचा संस्कार शिल्लक तर
राहिलेला नाही ना? आणि तो नष्ट होईल बेहदच्या वैराग्य वृत्तीने. सेवा पाहून ऐकून
बापदादा खुश आहेत परंतु आता बाबांची हीच इच्छा आहे की जशी सेवेची फलक आणि झलक (नशा
आणि तेज) आता लोकांना दिसून येत आहे. सेवेचा अनुभव होतो, तसा बेहदच्या वैराग्य
वृत्तीचा प्रभाव पडावा कारण आजकाल सेवेद्वारे तुमची प्रशंसा वाढेल, प्रकृती तुमची
दासी होईल. अनुभव कराल, साधने वाढतील परंतु बेहदच्या वैराग्य वृत्तीमुळे साधन आणि
साधनेचा बॅलन्स राहील. जसे तुम्ही लोक प्रवृत्तीमध्ये राहणाऱ्यांना दृष्टांत देता
की सर्व काही करत कर्मयोगी कमलपुष्प समान राहा. तसे तुम्हाला देखील सर्वांना सेवा
करताना, साधन उपलब्ध असताना, साधना आणि साधन यांचा बॅलन्स राहील. तर आजकाल अधिकच्या
सेवेसोबत बेहदची वैराग्य वृत्ती सुद्धा आवश्यक आहे. चालता-फिरताना देखील अनुभव
व्हावा की हे विशेष आत्मे आहेत. फक्त योगाला बसलेले असतानाच नाही, भाषण करतेवेळीच
नाही परंतु चालता-फिरता सुद्धा तुमच्या मस्तकामधून शांतीची, शक्तीची, आनंदाची
अनुभूती व्हावी कारण समयानुसार आता काळ बदलत जाणार आहे.
तर बापदादांनी
वेळोवेळी इशारा तर दिलाच आहे परंतु आज बापदादा विशेष एक तर बेहदच्या वैराग्याकडे
इशारा देत आहेत, यासाठी आता स्वतःला चेक करून देही-अभिमानी बनण्यामध्ये जे
देह-अभिमानाचे विघ्न आहे, अनेक प्रकारच्या देह-अभिमानाचा अनुभव तुम्हाला आहे, त्याचे
परिवर्तन करा. आणि दुसरी गोष्ट स्वतःसाठी दीर्घ काळाचा देखील विचार करा. दीर्घ
काळाचा अभ्यास हवा. दीर्घ काळाचा पुरुषार्थ, दीर्घ काळाचे प्रारब्ध. आत्ता जर दीर्घ
काळावर कमी लक्ष द्याल तर अंतिम काळामध्ये दीर्घ काळ जमा करू शकणार नाही. टू-लेटचा
बोर्ड लागेल, म्हणूनच बापदादा आज दुसऱ्या वर्षासाठी होमवर्क देत आहेत. हा
देह-अभिमान सर्व समस्यांचे कारण बनतो आणि मग मुले रमणीक आहेत ना, तर बाबांनाही
दिलासा देतात की, वेळ आल्यावर आम्ही ठीक होऊ. बापदादा म्हणतात की, वेळ तुमचा टीचर
आहे काय? वेळ आल्यावर ठीक व्हाल तर मग तुमचा टीचर कोण झाला? वेळ तुमची रचना आहे आणि
तो तुमचा टीचर व्हावा, हे चांगले वाटेल का? त्यामुळे समयाला तुम्ही जवळ आणायचे आहे.
तुम्ही समयाला समीप आणणारे आहात, तुम्ही समयावर अवलंबून राहणारे नाही. समयाला टीचर
बनवू नका.
तर बापदादा आज
वारंवार हाच इशारा देत आहेत की स्वतःला चेक करा, वारंवार चेक करा आणि परिवर्तन करा.
दीर्घ काळाचे परिवर्तन, दीर्घ कालीन प्रारब्धाचे अधिकारी बनविते. त्यामुळे एखादा
कोणी भले आतापर्यंत सुस्तावलेला पुरुषार्थी जरी असेल परंतु लास्ट नंबरच्या मुलावर
देखील बाबांचे प्रेम आहे. प्रेम आहे म्हणूनच तर बाबांचा बनला आहे, बाबांना ओळखले आहे,
‘माझे बाबा’ तर म्हणतो आहे; त्यामुळे समयावर सोडून देऊ नका. वेळ येणार नाही,
आपल्यालाच संपूर्णतेची वेळ जवळ आणायची आहे. बापदादांच्या विश्व परिवर्तनाच्या
कार्यामध्ये तुम्ही सर्व साथीदार आहात. एकटे बाबा कार्य करू शकत नाहीत, मुलांची
सोबत आहे. बाबा तर म्हणतात - आधी मुले, पुढे मुले. तर आता दुसऱ्या वर्षी जर यायचेच
असेल तर हा होमवर्क करून ठेवाल! करणार? हां, हात वर करा. अच्छा. पाठीमागचे सुद्धा
हात वर करत आहेत.
बघा, आज संख्या वाढली
आहे तर बापदादांनी मुलीला (दादींना) इशारा केला की फेरी मारून बघून ये, कुठे-कुठे
अजून झोपलेले आहेत, कसे ओळीने जेवतात. लांबलचक लाईन. परंतु सर्वांच्या चेहऱ्यावर
आनंद आहे - मधुबनमध्ये तर आहोत. परंतु हा आनंद मधुबनमध्येच सोडून जायचा नाही, सोबत
घेऊन जायचा आहे. बापदादांनी वतनमध्ये बसून तुम्हा सर्वांच्या झोपण्याचे, जेवणासाठी
रांगेत उभे असतानाचे दृश्य पाहिले. बापदादांना असा संकल्प येत होता की आत्ताच्या
आत्ता रजाईंची आणि गाद्यांची बरसात व्हावी. परंतु हा देखील आनंदाचा मेळावा आहे आणि
बापदादांनी पाहिले की, जिथे जागा मिळाली, जशी मिळाली तिथे चांगल्या रीतीने राहिले,
बहुतांशी मुले चांगल्या प्रकारे पास आहेत. टाळ्या वाजवा. परंतु हा होमवर्क विसरायचा
नाही, यामध्ये टाळ्या वाजवत नाहीत. बापदादा आणि विशेषतः ब्रह्मा बाबा मुलांना नेहमी
‘मधुबनचा श्रृंगार’ म्हणतात. तर तुम्ही सर्व मधुबन मध्ये आलात, बापदादा देखील साकार
रूपामध्ये एवढ्या मोठ्या परिवाराला पाहून खुश आहेत. सहन करावे लागले आहे, परंतु हे
सहन करणे कायमसाठी सहनशक्ती वाढवेल. सर्वजण आनंदी आहात ना! त्रास तर झाला नाही ना.
आणि पहा एवढा मोठा परिवार असून देखील पाणीही उपलब्ध झाले. सर्वांनी पाणी वापरले ना!
थोडे कमी आहे तर काळजी घ्यावी लागेल परंतु आजकाल गावांमध्ये पिण्याचे देखील पाणी
मिळत नाही, इथे तर तुम्हाला कपडे धुण्यासाठी देखील पाणी मिळाले. आणि इतका मोठा
परिवार पाहून आनंद सुद्धा होतो. पूर्ण कल्पामध्ये बापदादांना हा फखुर (अभिमान) आहे
की एवढा मोठा परिवार कोणाचाही नाहीये. अच्छा.
आज बापदादा टीचर्सना
एका विशेष सेवेची आठवण करून देत आहेत, जे होमवर्क म्हणून करायचे आहे. टीचर्ससाठी
होमवर्क आहे की, टीचरने नेहमी स्वतःला बापदादांचे सच्चे साथी, समीपचे साथी, आपल्या
द्वारे बाबांना प्रत्यक्ष करणाऱ्या अशाच दिसून याव्या आणि कोणीही तुम्हाला पाहिल तर
त्यांना आश्चर्य वाटावे की, ‘यांना घडविणारा कोण! यांचे देखील पिता, शिक्षक, सद्गुरू
कोण आहेत!’ तुमच्यामध्ये तुम्हाला न पाहता, बाबांना पाहावे. याच स्वमानामध्ये हे
६-७ महिने जे मिळणार आहेत त्यामध्ये हा होमवर्क करायचा आहे. मग बापदादा विचारतील
की, प्रत्येकाने किती परसेंटमध्ये केला? जादा समाचार विचारणार नाहीत, किती परसेंट
हा होमवर्क केला? तुमच्यामध्ये तुम्ही दिसू नये, परंतु बाबा दिसावेत. यात सर्व धारणा
समाविष्ट होतात. मधुबनवाल्यांना देखील बापदादा प्रेमपूर्वक आठवण तर देतच आहेत. परंतु
चोहो बाजूंच्या मधुबनवाल्यांनी देखील असे समजावे की मधुबनचे एक-एक रत्न विशेष
बाबांना प्रत्यक्ष करण्याच्या निमित्त आहे. तर मधुबनवाल्यांनी पूर्णवेळ अशी मनसा
सेवा, कर्मणा सेवा आणि सर्वांना बाप समान बनविण्याचे उदाहरण बनून दाखवावे. तर
मधुबनवाल्यांनी हा रिझल्ट द्यायचा आहे की, बाप समान बनण्याचा नकाशा स्वतःमध्ये
दाखविला आहे का (बाबांची प्रतिकृती स्वतःमध्ये उतरवली आहे का)? प्रत्येकाच्या
मुखातून निघावे - ‘वाह बाबांची मुले वाह!’ आणि तुम्ही सर्वजण काय करणार? तुम्ही
सर्वांनी स्वतःला नंबरवार नाही परंतु नंबर वन बनण्याचे उदाहरण बनून दाखवा. नंबरवार
बनण्यात मजा नाही, बनायचे असेल तर नंबर वन. नंबरवार बनणे यात काय मोठी गोष्ट! तर
सर्वांनी ‘विन’ आणि ‘वन’ हा रिझल्ट ऐकवायचा आहे. अच्छा.
चोहो बाजूंचे
बापदादांचे दिलतख्तनशीन आणि भृकुटीच्या तख्तनशीन तसेच भविष्याचे देखील राज्य
तख्तनशीन अशा बापदादांच्या सिकीलध्या (अतिप्रिय), पद्म-पद्मपटीने भाग्यवान मुलांना,
सदैव आपल्या नयनांद्वारे रूहानियतचा अनुभव करून देणारे आणि चेहऱ्याद्वारे सदैव
नशीबवान, मन सदैव आनंदाने नाचत रहावे, कोणीही समोर आले, अनुभव करावा की यांच्यासारखा
आनंद कुठेही नाही आहे आणि धडा शिकून जावेत. अशी बाबांची मुले तुम्ही प्रत्येकजण
आपल्या द्वारे बाबांचा परिचय देता, मुखाद्वारे बाबांचा परिचय देता, परंतु
नयनांद्वारे आणि चेहऱ्याद्वारे बाबांचा साक्षात्कार घडविणाऱ्या, अशा चोहो बाजूंच्या
मुलांना, ज्यांनी पत्रे पाठविली आहेत, ई-मेल केले आहे, सर्वांची बापदादांकडे पोहोचली
आहेत, ज्या वेळी तुम्ही संकल्प केला, त्याच क्षणी तो बाबांपर्यंत पोहोचला त्यासाठी
खूप-खूप मुबारक असो. देश-विदेशातील सर्व मुलांना बाबा हृदयापासूनच्या प्रेमाचा
प्रतिसाद देत आहेत. तर चोहो बाजूंच्या मुलांना बापदादा पद्मगुणा हृदयापासून लाड,
हृदयापासून प्रेम देत आहेत आणि सर्वांना नमस्ते म्हणत आहेत.
वरदान:-
कर्म करत
असताना कर्माच्या बंधनापासून मुक्त राहणारे सहजयोगी स्वतः योगी भव
जी महावीर मुले आहेत
त्यांना साकारी दुनियेतील कोणतेही आकर्षण स्वतःकडे आकर्षित करू शकत नाही. ते स्वतःला
एका सेकंदामध्ये न्यारे आणि बाबांचे प्यारे बनवू शकतात. डायरेक्शन मिळताच
शरीरापासून परे अशरीरी, आत्म-अभिमानी, बंधन-मुक्त, योगयुक्त स्थितीचा अनुभव
करविणारेच सहजयोगी, स्वतः योगी, सदा योगी, कर्मयोगी आणि श्रेष्ठ योगी आहेत. ते
जेव्हा पाहिजे तेव्हा, जितका वेळ पाहिजे तितका वेळ आपल्या संकल्पाला, श्वासाला एका
प्राणेश्वर बाबांच्या आठवणीमध्ये स्थित करू शकतात.
सुविचार:-
एकरस स्थितीच्या
श्रेष्ठ आसनावर विराजमान राहणे - हीच तपस्वी आत्म्याची निशाणी आहे.
हे अव्यक्त इशारे:-
“निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा”
असा निश्चय तसेच
स्मृती आणि समर्थी ठेवा की, अनेकदा बाबांचे बनलो आहोत आणि मायाजीत बनलो आहोत, तर आता
बनणे काय कठीण आहे काय! ही स्मृती स्पष्ट नाही आहे का की, मज श्रेष्ठ आत्म्याने
विजयी बनण्याचा पार्ट अनेकदा बजावला आहे? जर स्मृती स्पष्ट नसेल तर यावरून सिद्ध
होते की बाबांच्या समोर स्वतःला अजून स्पष्ट केलेले नाही.