26-02-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - सुख देणाऱ्या एका बाबांचीच आठवण करा, या थोड्या वेळामध्ये योगबल जमा करा तर शेवटी खूप कामी येईल”

प्रश्न:-
बेहदच्या वैरागी मुलांनो, तुम्हाला कोणती स्मृती सदैव राहिली पाहिजे?

उत्तर:-
हा आपला छी-छी चोला (विकारी शरीर) आहे, याला सोडून परत घरी जायचे आहे - ही स्मृती सदैव रहावी. बाबा आणि वारसा हेच लक्षात रहावे, दुसरे काहीही आठवता कामा नये. हे आहे बेहदचे वैराग्य. कर्म करताना आठवणीमध्ये राहण्याचा असा पुरुषार्थ करायचा आहे की डोक्यावरून पापांचे ओझे उतरले पाहिजे. आत्मा तमोप्रधानापासून सतोप्रधान बनावी.

ओम शांती।
बाबा मुलांना दररोज खूप सोप्या गोष्टी समजावून सांगतात. ही आहे ईश्वरीय पाठशाळा. गीतेमध्ये देखील म्हणतात - भगवानुवाच. ईश्वर पिता सर्वांचा एकच आहे. सगळेच भगवान होऊ शकत नाहीत. हो, सर्वजण एका पित्याची मुले होऊ शकतात. हे जरूर बुद्धीमध्ये आले पाहिजे की बाबा स्वर्ग, नवीन दुनिया स्थापन करणारे आहेत. त्या बाबांकडून आपल्याला स्वर्गाचा वारसा जरूर मिळाला असेल. भारतातच शिवजयंती गायली जाते. परंतु शिवजयंती कशी होते, हे तर बाबाच येऊन समजावून सांगतात. बाबा कल्पाच्या संगमयुगावर येतात मुलांना पुन्हा पतितापासून पावन बनविण्यासाठी अर्थात वारसा देण्यासाठी. या वेळी सर्वांना रावणाचा शाप आहे, म्हणून सर्व दुःखी आहेत. आता कलियुगी जुनी दुनिया आहे. हे नेहमी लक्षात ठेवा की आपण ब्रह्मा मुखवंशावळी ब्राह्मण आहोत. जे कोणी स्वतःला ब्रह्माकुमार-कुमारी समजतात, त्यांनी जरूर हे समजले पाहिजे की आपण कल्प-कल्प डाडेकडून (आजोबांकडून) ब्रह्माद्वारे वारसा घेतो. इतकी असंख्य मुले इतर कोणालाच असू शकत नाहीत. ते आहेत सर्वांचे पिता. ब्रह्मा देखील त्यांची संतान आहेत. सर्व मुलांना वारसा आजोबांकडून मिळतो. त्यांचा वारसा आहे सतयुगाची राजधानी. हे बेहदचे बाबा जर का स्वर्गाचे रचयिता आहेत, तर जरूर आम्हाला स्वर्गाची राजाई मिळाली पाहिजे. परंतु हे विसरून गेले आहेत की, आपल्याला स्वर्गाची बादशाही मिळाली होती. परंतु ती निराकार बाबा कसे देतील, जरूर ब्रह्मा द्वारे देतील. भारतामध्ये यांचे राज्य होते. आता कल्पाचा संगम आहे. संगमावर ब्रह्मा आहेत, तेव्हाच तर ‘बी.के.’ म्हणून संबोधले जातात. अंधश्रद्धेची काही गोष्ट असू शकत नाही. हे दत्तक घेणे आहे. आपण ब्रह्माकुमार-कुमारी आहोत. ब्रह्मा, शिवबाबांचा मुलगा आहे, आणि आपल्याला शिवबाबांकडून पुन्हा स्वर्गाची बादशाही मिळत आहे. यापूर्वी देखील मिळाली होती, ज्याला ५ हजार वर्षे झाली आहेत. आपण देवी-देवता धर्माचे होतो. शेवटपर्यंत वृद्धी होत राहते. जसे क्राईस्ट आला, ख्रिश्चन धर्म आजपर्यंत आहे. वाढ होतच राहते. ते जाणतात की क्राईस्टद्वारे आपण ख्रिश्चन बनलो आहोत. आजपासून २ हजार वर्षांपूर्वी क्राईस्ट आला होता. आता त्यांची वृद्धी होत आहे. सर्वप्रथम सतोप्रधान, नंतर रजो, आणि मग तमोमध्ये यायचेच आहे. तुम्ही सतयुगामध्ये सतोप्रधान होता, नंतर रजो, तमोमध्ये आला आहात. तमोप्रधान सृष्टी पुन्हा सतोप्रधान जरूर होते. नवीन दुनियेमध्ये आदि सनातन देवी-देवता धर्म होता. मुख्य धर्म चार आहेत. तुमचा धर्म अर्धा कल्प चालतो. इथे देखील तुम्ही त्या धर्माचेच आहात. परंतु विकारी असल्याकारणाने तुम्ही स्वतःला देवी-देवता म्हणू शकत नाही. तुम्ही आदि सनातन देवी-देवता धर्माचे होता परंतु वाम-मार्गामध्ये गेल्यामुळे तुम्ही पतित झाला आहात, म्हणून स्वतःला हिंदू म्हणता. आता तुम्ही ब्राह्मण बनला आहात. उच्च ते उच्च आहेत शिवबाबा. त्यानंतर तुम्ही ब्राह्मण आहात. तुमचा ब्राह्मणांचा उच्च ते उच्च वर्ण आहे. तुम्ही ब्रह्माची संतान बनला आहात. परंतु वारसा ब्रह्माकडून मिळत नाही. शिवबाबा ब्रह्मा द्वारे स्वर्गाची स्थापना करत आहेत. तुमच्या आत्म्याने आता बाबांना ओळखले आहे. बाबा म्हणतात की, माझ्याद्वारे मला जाणल्याने संपूर्ण सृष्टीचक्राच्या आदि, मध्य, अंताचे नॉलेज समजू शकाल. ते ज्ञान फक्त मलाच आहे. मी ज्ञानाचा सागर, आनंदाचा सागर, पवित्रतेचा सागर आहे. २१ जन्म तुम्ही पवित्र बनता, नंतर विषयसागरामध्ये पडता. आता ज्ञानाचा सागर बाबा तुम्हाला पतितापासून पावन बनवितात. गंगेचे पाणी काही पावन बनवू शकत नाही. स्नान करायला जातात, परंतु ते पाणी काही पतित-पावन नाही. या नद्या तर सतयुगामध्ये सुद्धा आहेत आणि कलियुगातही आहेत. पाण्यात काहीच फरक नसतो. म्हणतात देखील - “सर्वांचा सद्गती दाता एक राम.” तेच ज्ञानाचा सागर पतित-पावन आहेत.

बाबा येऊन ज्ञान समजावून सांगतात, ज्याद्वारे तुम्ही स्वर्गाचे मालक बनता. सतयुग-त्रेतामध्ये भक्ती, शास्त्र इत्यादी काहीही नसते. तुम्ही बाबांकडून सदैव सुखाचा वारसा घेता. असे नाही की तिथे तुम्हाला गंगास्नान करायचे आहे किंवा कोणती यात्रा करायची आहे. तुमची ही आहे रूहानी यात्रा, जी कोणताही मनुष्य शिकवू शकत नाही. बाबा आहेत सर्व आत्म्यांचे पिता, देहधारी पिता तर अनेक आहेत. रूहानी बाबा एकच आहेत. हे पक्के-पक्के लक्षात ठेवा. बाबा देखील विचारतात - तुम्हाला किती पिता आहेत, तर मुले गोंधळून जातात की हे काय विचारत आहेत? पिता तर सर्वांचे एकच असतात. दोन-तीन पिता कसे असतील? बाबा समजावून सांगत आहेत - त्या परमात्मा पित्याची दुःखामध्ये आठवण करता. दुःखामध्ये नेहमी म्हणता - ‘ओ परमपिता परमात्मा, आम्हाला दुःखातून सोडवा’. तर दोन पिता झाले ना - एक देहाचे पिता, दुसरे रुहानी बाबा (आत्म्याचे पिता). ज्यांची महिमा गातात - ‘तुम मात-पिता, हम बालक तेरे... तुम्हरी कृपा से सुख घनेरे’. लौकिक आई-वडिलांकडून असे भरभरून सुख मिळत नाही. जेव्हा दुःख होते, तेव्हा त्या पित्याची आठवण करतात. हे बाबाच असा प्रश्न विचारतात, दुसरा तर कोणी विचारूही शकणार नाही.

भक्तिमार्गामध्ये तुम्ही गाता - ‘बाबा, तुम्ही याल ना तेव्हा आम्ही तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचे ऐकणार नाही. बाकीचे तर सगळे दुःखच देतात, तुम्हीच सुख देणारे आहात’. तर बाबा येऊन आठवण करून देत आहेत की तुम्ही काय म्हणत होता. तुम्ही जाणता, तुम्हीच ब्रह्माकुमार-कुमारी म्हणून ओळखले जाता. मनुष्य इतका पत्थर-बुद्धी आहे की तो हे देखील समजत नाही की ‘बी.के.’ काय आहेत! मम्मा-बाबा कोण आहेत! हे काही साधू-संत नाही आहेत. साधू-संन्याशांना गुरु म्हणणार, मात-पिता म्हणणार नाही. हे बाबा (शिवबाबा) तर येऊन दैवी धर्माचे राज्य स्थापन करतात. जिथे हे लक्ष्मी-नारायण राजा-राणी राज्य करत होते. सुरुवातीला पवित्र होते नंतर मग अपवित्र बनतात. जे पूज्य होते, तेच मग ८४ जन्म घेतात. आधी बेहदच्या बाबांचा २१ जन्म सुखाचा वारसा मिळतो. कुमारी ती जी २१ कुळांचा उद्धार करेल. हे तुमचे गायन आहे. तुम्ही कुमारी आहात, गृहस्थी नाही. भले वयाने मोठे आहात परंतु मरजीवा बनून, सर्व बाबांची मुले बनला आहात. प्रजापिता ब्रह्माची पुष्कळ मुले आहेत आणि वृद्धी होतच राहील. मग हे सर्व देवता बनतील. हा शिवबाबांचा यज्ञ आहे. याला राजस्व यज्ञ, स्वराज्य प्राप्त करण्याचा यज्ञ म्हटले जाते. आत्म्यांना बाबांकडून स्वर्गाच्या राज्याचा वारसा मिळतो. या राजस्व अश्वमेध ज्ञान यज्ञामध्ये काय करायचे आहे? शरीरा सहित जे काही आहे, ते सर्व अर्पण करायचे आहे अथवा स्वाहा करायचे आहे. या यज्ञातूनच तर तुम्ही पुन्हा राज्य प्राप्त कराल. बाबा आठवण करून देतात की भक्तिमार्गामध्ये तुम्ही गात होता की, ‘ओ बाबा, तुम्ही जेव्हा याल तेव्हा आम्ही बलिहार जाऊ, वारी जाऊ’. आता तुम्ही सर्व स्वतःला ब्रह्माकुमार-कुमारी तर समजता. भले आपल्या गृहस्थ व्यवहारामध्ये रहा, परंतु कमलपुष्प समान पावन राहावे लागेल. स्वतःला आत्मा समजा. आपण बाबांची मुले आहोत. तुम्ही आत्मे आहात - आशिक. बाबा म्हणतात - मी आहे एक माशूक. तुम्ही मज माशूकला बोलावत राहता. तुम्ही अर्ध्याकल्पाचे आशिक आहात, ज्यांना परमपिता परमात्मा म्हटले जाते, ते निराकार आहेत. आत्मा देखील निराकार आहे, जी या शरीराद्वारे पार्ट बजावते. भक्तिमार्गामध्ये देखील तुम्हाला पार्ट बजावायचाच आहे. भक्ती आहेच मुळी रात्र, अंधारात मनुष्य ठोकरा खातात. द्वापर पासून तुम्ही ठोकरा खाल्ल्या आहेत. यावेळी महा-दुःखी झाला आहात. आता जुन्या दुनियेचा अंत आहे. हे पैसे इत्यादी सर्व मातीमध्ये मिसळून जाणार आहेत. भले कोणी करोडपती आहे, राजा आहे, मुले जन्मली की समजेल हे धन माझ्या मुलांसाठी आहे. माझी मुले, नातवंडे खातील. बाबा म्हणतात - काहीही खाणार नाहीत. ही दुनियाच नष्ट होणार आहे. थोडाच वेळ बाकी आहे. विघ्ने तर खूप पडतील. आपापसामध्ये लढतील. अखेरीला तर असे लढतील की रक्ताच्या नद्या वाहतील. तुमची तर कोणाशीच लढाई नाहीये. तुम्ही योगबलामध्ये राहता. तुम्ही आठवणीमध्ये रहाल तर कोणीही तुमच्यासमोर वाईट विचाराने आले तर त्यांना भयंकर साक्षात्कार होईल आणि ते ताबडतोब पळून जातील. तुम्ही शिवबाबांची आठवण कराल आणि ते पळून जातील. जी पक्की मुले आहेत, पुरुषार्थामध्ये राहतात की, माझे तर एक शिवबाबा, दुसरे कोणीही नाही. बाबा समजावून सांगत आहेत की, ‘हथ कार डे…’ (हाताने काम करत रहा, मनाने बाबांची आठवण करत रहा). मुले, घर-संसारही सांभाळायचा आहे. परंतु तुम्ही आत्म्यांनी बाबांची आठवण करा, तर पापांचे ओझे देखील उतरेल. फक्त माझी आठवण करा तर तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल, परंतु नंबरवार पुरुषार्थानुसार. आणि मग तुम्ही सर्व हे शरीर सोडाल, बाबा सर्व आत्म्यांना मच्छरांसदृश्य घेऊन जातील. बाकी साऱ्या दुनियेला सजा भोगायच्या आहेत. भारतामध्ये बाकी थोडे शिल्लक उरतील. त्यासाठी ही महाभारत लढाई आहे. इथे तर खूप वृद्धी होईल. प्रदर्शनी, प्रोजेक्टर इत्यादीद्वारे कित्येकजण ऐकतात, ती प्रजा बनत जाते. राजा तर एकच असतो, बाकी सारी प्रजा असते. वजीर सुद्धा प्रजेमध्येच येतो. भरपूर प्रजा असते. एका राजाची लाखोंच्या अंदाजाने प्रजा असते. तर राजा-राणीला मेहनत करावी लागेल ना.

बाबा म्हणतात - सर्व काही करत असताना निरंतर माझी आठवण करा. जसे आशिक-माशूक असतात, त्यांचे दैहिक प्रेम असते. तुम्ही मुले या वेळी आशिक आहात. तुमचा माशूक आलेला आहे. तुम्हाला शिकवत आहेत. शिकता-शिकता तुम्ही देवता बनाल. आठवणीने विकर्म विनाश होतील आणि तुम्ही सदैव निरोगी सुद्धा बनाल. आणि मग ८४ च्या चक्रालाही लक्षात ठेवायचे आहे. सतयुगामध्ये इतके जन्म, त्रेतामध्ये इतके जन्म. आपण देवी-देवता धर्म असणारेच पूर्ण ८४ चे चक्र फिरलो आहोत. पुढे जाऊन तुमची खूप वृद्धी होत जाईल. तुमची सेंटर्स हजारोंच्या अंदाजाने होतील. गल्लो-गल्ली हे ज्ञान समजावून सांगत रहाल की, फक्त बाबांची आणि वारशाची आठवण करा. आता परत चला घरी. हा तर छी-छी चोला (विकारी शरीर) आहे. हे आहे बेहदचे वैराग्य. संन्यासी तर फक्त हदचे घरदार सोडतात. ते आहेत हठयोगी. ते राजयोग शिकवू शकत नाहीत. म्हणतात - ही भक्ती देखील अनादि आहे. बाबा म्हणतात - ही भक्ती तर द्वापरपासून सुरू होते. ८४ पायऱ्या उतरलात आता तुम्ही तमोप्रधान बनला आहात. तुम्हीच देवी-देवता होता. ख्रिश्चन म्हणतील - ‘आम्हीच ख्रिश्चन होतो’. तुम्ही जाणता की आपण सतयुगामध्ये होतो. बाबांनी देवी-देवता धर्म स्थापन केला आहे. जे लक्ष्मी-नारायण होते ते आता ब्राह्मण बनले आहेत. सतयुगामध्ये एक राजा-राणी होते, एकच भाषा होती. हा देखील मुलांनी साक्षात्कार केला आहे. तुम्ही सर्व आदि सनातन धर्माचे आहात. तुम्हीच ८४ जन्म घेता. ते जे म्हणतात आत्मा निर्लेप आहे किंवा ईश्वर सर्वव्यापी आहे - ते चुकीचे आहे. सर्वांमध्ये आत्मा आहे, मग असे कसे म्हणता की आमच्यामध्ये परमात्मा आहे? मग तर सर्वच फादर्स झाले. किती तमोप्रधान बनले आहेत. आधी जे ऐकत होते ते तेच खरे मानत असत. आता बाबा येऊन सत्य सांगत आहेत. तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र देतात, ज्याद्वारे तुम्ही सृष्टीच्या आदि, मध्य आणि अंताला जाणता. अमरकथा देखील हीच आहे. बाकी सूक्ष्मवतनमध्ये कथा इत्यादी काहीच नाहीये. हे सर्व भक्तिमार्गाचे सैपलिंग (कलम) आहे. तुम्ही अमरकथा ऐकत आहात अमर बनण्याकरिता. तिथे तुम्ही आनंदाने एक शरीर सोडून दुसरे जाऊन घ्याल. इथे तर कोणी मरतो तर छाती बडवून रडतात. तिथे आजार इत्यादी नसतात. सदैव एव्हर हेल्दी (कायमचे निरोगी) राहतात. दीर्घायुषी असतात. तिथे पतितपणा असत नाही. आता हे पक्के करायचे आहे की आपण ८४ चे चक्र पूर्ण केले आहे. आता बाबा आपल्याला घेऊन जाण्यासाठी आले आहेत. पावन बनण्याच्या युक्त्या देखील तुम्हाला सांगतात - फक्त मज पित्याची आणि वारशाची आठवण करा. सतयुगामध्ये १६ कला संपूर्ण असतात, नंतर कला कमी होत जातात. आता तुमच्यामध्ये एकही कला राहिलेली नाहीये. बाबा दुःखातून सोडवून सुखामध्ये घेऊन जातात, म्हणून त्यांना लिबरेटर म्हटले जाते. सर्वांना आपल्या सोबत घेऊन जातात. तुमचे गुरु तुम्हाला सोबत थोडेच घेऊन जातात. तो गुरु निघून जातो तर चेला गादीवर बसतो, मग चेल्यांमध्ये खूप गोंधळ माजतो. आपापसामध्ये गादीसाठी भांडतात. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हा आत्म्यांना सोबत घेऊन जाईन’. तुम्ही संपूर्ण बनला नाहीत तर सजा भोगाव्या लागतील आणि पदही भ्रष्ट होईल. इथे राजधानी स्थापन होत आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आठवणीचा असा अभ्यास करायचा आहे जेणेकरून वाईट विचार असणारे समोर येताच त्यांचे परिवर्तन होईल. ‘मेरा तो एक शिवबाबा, दुसरा न कोई…’ याच पुरुषार्थामध्ये रहायचे आहे.

२) स्वराज्य प्राप्त करण्यासाठी शरीरासहित जे काही आहे, ते सर्व अर्पण करायचे आहे. जेव्हा या रुद्र यज्ञामध्ये सर्वकाही स्वाहा कराल तेव्हाच राज्य पद मिळेल.

वरदान:-
सहनशक्तीच्या विशेषतेद्वारे इतरांच्या संस्कारांना परिवर्तन करणारे दृढ संकल्पधारी भव

जसे ब्रह्मा बाबांनी ज्ञानी आणि अज्ञानी आत्म्यांकडून इन्सल्ट (अपमान) सहन करून त्यांना परिवर्तित केले; तर असे फॉलो फादर करा. यासाठी आपल्या संकल्पांमध्ये फक्त दृढतेला धारण करा. असा विचार करू नका की, हे कधीपर्यंत असे चालेल, फक्त सुरुवातीला थोडे वाटते की कसे होणार, कधीपर्यंत सहन करणार. परंतु जर कोणीही तुम्हाला काही बोलत जरी असेल तरी तुम्ही गप्प रहा, सहन करा म्हणजे मग तो देखील बदलेल, फक्त तुम्ही दिलशिकस्त (हताश) होऊ नका.

बोधवाक्य:-
संगमावर सहन करणे, वाकणे हीच सर्वात मोठी महानता आहे.

हे अव्यक्त इशारे:- एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना.

बापदादांची इच्छा आहे की मुलांची अगोदर आपल्या सहकाऱ्यांमध्ये, सेवेमध्ये, वायुमंडळामध्ये एकता असावी; म्हणजे मग एक बल, एक भरोसा, एक मत होईल तेव्हाच सेवेमध्ये सफलता मिळेल. जसे नारळ फोडून, रिबीन कापून उद्घाटन करता, तसे एकमत, एकबल, एक भरोसा आणि एकतेची रिबीन कापा आणि मग सर्वांच्या संतुष्टतेचा, प्रसन्नतेचा नारळ फोडा. ते पाणी धरणीमध्ये टाका आणि मग बघा सफलता किती मिळते ते.