31-07-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, शिवबाबांना ही देखील लालसा नाही (अपेक्षा नाही) की, मुले मोठी झाली की माझी सेवा करतील; ते कधीही वयोवृद्ध होत नाहीत, एक बाबाच निष्काम सेवाधारी आहेत”

प्रश्न:-
भोलानाथ शिवबाबा आम्हा सर्व मुलांचा खूप मोठा ग्राहक आहे - तो कसा?

उत्तर:-
बाबा म्हणतात - मी इतका भोळा ग्राहक आहे की तुमच्या सर्व जुन्या गोष्टी खरेदी करतो आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला सर्व नव्या-नव्या गोष्टी देतो. तुम्ही म्हणता - ‘बाबा, हे तन-मन-धन सर्व तुमचे आहे’; तर त्याच्या बदल्यात तुम्हाला सुंदर शरीर मिळते, अपार धन मिळते.

गीत:-
भोलेनाथ से निराला…

ओम शांती।
हे गाणे भक्तिमार्गामध्ये गातात. जी काही गाणी आहेत ती सर्व भक्तिमार्गातील आहेत, त्यांचा देखील अर्थ बाबा समजावून सांगतात. मुले समजतात की भोलानाथ कोणाला म्हटले जाते. देवतांना भोलानाथ म्हणणार नाहीत. गायले गेले आहे - सुदाम्याने दोन मुठी पोहे दिले, तर महाल मिळाले. ते देखील किती काळासाठी? २१ जन्मांसाठी. आता मुले समजतात की बाबा येऊन बरोबर भारतवासीयांना हिरे-माणकांचे महाल देतात. कशाच्या बदल्यात देतात? मुले म्हणतात - ‘बाबा, हे तन-मन-धन सर्व तुमचे आहे. तुम्हीच दिलेले आहे’. एखाद्याला मूल झाले तर म्हणतात - भगवंताने दिले. धनासाठी देखील म्हणतात - भगवंताने दिले. हे कोण म्हणत आहे? आत्मा. भगवान अर्थात बाबांनी दिले. बाबा म्हणतात - सर्व काही तुम्हाला आता द्यावे लागेल. त्याच्या बदल्यात मी तुम्हाला खूप सुंदर शरीर ट्रान्सफर करून देईन, अपार धन देईन. परंतु कोणाला देतील? नक्की मुलांनाच देतील. लौकिक पित्याकडून अल्पकाळासाठी धन मिळाले आहे. बेहदचे बाबा आम्हाला बेहदचा वारसा देतील. बाबा समजावून सांगत आहेत - ज्ञान आणि भक्तीमध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. भक्तीमध्ये जे काही मिळते ते अल्पकाळासाठी मिळते. धन आहे तर सुख आहे. धन नसेल तर मनुष्य किती दुःखी होतात. मुले जाणतात, बाबा आम्हाला अमर्याद संपत्ती देत आहेत त्यामुळे आनंद होतो. सुखधाममध्ये तर सुखाची काही कमतरता नाही. प्रत्येकाला आपले-आपले राज्य आहे. त्याला म्हटले जाते पवित्र गृहस्थ-आश्रम. तर बाबा किती भोळे आहेत, घेतात काय आणि देतात काय! बाबा किती छान ग्राहक आहेत! तसे देखील मुलांचे तर बाबा ग्राहकच आहेत. मुलगा जन्माला आला आणि सर्व मालमत्ता त्याची होते. ते असतात हदचे ग्राहक. हे आहेत बेहदचे भोलानाथ. बेहदच्या मुलांचे ग्राहक. बाबा म्हणतात - ‘मी परमधामहून आलो आहे. जुने सर्व काही तुमच्याकडून घेऊन नवीन दुनियेमध्ये तुम्हाला सर्व काही देतो म्हणून मला ‘दाता’ म्हटले जाते’. यांच्यासारखा दाता देखील दुसरा कोणीच नाही. निष्काम सेवा करतात. बाबा म्हणतात - मी निष्कामी आहे. मला कोणत्याही प्रकारची लालसा (अपेक्षा) नाही. असे तर म्हणत नाही की, ‘मी तुमचे पालनपोषण केले आहे, म्हणून आता वृद्ध पित्याची काळजी घेणे हे तुम्हा मुलांचे कर्तव्य आहे’. नाही. हा नियम असतो की, पित्याच्या वृद्धापकाळात त्यांच्या मुलांनी त्यांची काळजी घ्यावी. हे बाबा तर कधीच वृद्ध होत नाहीत, सदैव तरुण असतात. आत्मा कधी वृद्ध होत नाही. हे तर जाणता लौकिक पिता मुलांकडून अपेक्षा ठेवतात की मी म्हातारा झालो की मुले आमची सेवा करतील. भले सर्व काही मुलांना देतात तरीही मुलांकडून सेवा तर घेतात. हे शिवबाबा म्हणतात - ‘मी आहेच मुळी अभोक्ता’. मी कधी खातच नाही. मी येतोच केवळ मुलांना नॉलेज देण्यासाठी. सुप्रीम रूह बसून आत्म्यांना समजावून सांगतात. आत्माच ऐकते, प्रत्येक गोष्ट आत्मा करते. संस्कार देखील आत्माच घेऊन जाते ज्याच्या आधारावर शरीर मिळते. इथे मनुष्यांची अनेक मते आहेत. कोणी म्हणतात आत्माच परमात्मा आहे. त्याच्यावर अजिबात लेप-छेप लागत नाही (कर्माचा प्रभाव पडत नाही). आत्मा निर्लेप आहे असे म्हणतात. जर आत्मा निर्लेप असती तर मग ‘पाप-आत्मा’, ‘पुण्य-आत्मा’ असे का म्हणतात? जर आत्मा निर्लेप आहे तर ‘पाप-शरीर’, ‘पुण्य-शरीर’ असे म्हटले पाहिजे.

आता तुम्ही जाणता की सर्व आत्म्यांचे रूहानी बाबा या शरीराद्वारे आम्हा आत्म्यांना शिकवत आहेत. लौकिक मध्ये आत्म्याला बोलवतात देखील ना. म्हणतात - आमच्या बाबांची आत्मा आली, पदार्थाचा आस्वाद घेतला. आत्माच आस्वाद घेते. बाबा काही असे म्हणणार नाहीत. ते तर अभोक्ता आहेत. ब्राह्मणांना खाऊ घालतात, आत्मा येते. कुठे तरी विराजमान तर होत असेल! ब्राह्मणांना खाऊ घालणे भारतामध्ये सर्वसामान्य गोष्ट आहे. आत्म्याला बोलवतात, त्याला प्रश्न विचारतात, मग त्यांच्या बऱ्याच गोष्टी खऱ्या देखील निघतात. हे पितरांना खाऊ घालणे - हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. याबाबतीत कोणतेही आश्चर्य वाटता कामा नये. बाबा ड्रामाचे रहस्य संक्षिप्त रूपात सांगतात.

एवढ्या मोठ्या ड्रामाचे स्पष्टीकरण विस्ताराने तर देऊ शकत नाही. प्रत्येक मुद्दा स्पष्ट करून सांगण्यासाठी तर एक वर्ष लागेल. तुम्हा मुलांना तर अतिशय सोपे ज्ञान दिले जाते. गातात देखील - ‘हे पतित-पावन या, येऊन आम्हाला पावन बनवा’. त्यांचे नावच आहे - पतित-पावन. ब्रह्मा-विष्णू-शंकराला पतित-पावन म्हणू शकत नाही. बाबांनाच ‘पतित-पावन’, ‘लिबरेटर’ म्हणतात. दुःख हर्ता, सुख कर्ता देखील त्यांनाच म्हटले जाते. ते आहेत निराकार. ‘शिव’च्या मंदिरामध्ये जाऊन बघा तिथे शिवलिंग ठेवलेले आहे. तर जरूर चैतन्यमध्ये होते तेव्हाच तर पूजा करतात. या देवता देखील कधीतरी चैतन्य होत्या, तेव्हाच तर त्यांची महिमा आहे. नेहरू चैतन्यमध्ये होते, म्हणूनच तर त्यांचे फोटो ठेऊन महिमा करतात. कोणी चांगले काम करून जातात तर त्यांचे जड चित्र बनवून महिमा करतात. पवित्र असणाऱ्याचीच पूजा करतात. कोणत्याही मनुष्याची पूजा करू शकत नाही. विकारामधून जन्म झाला आहे ना, तर त्यांची पूजा होऊ शकत नाही. पूजा देवतांची होते, जे सदैव पवित्र असतात. तुम्ही जाणता बाबा आले होते, आता पुन्हा संगमावर स्वर्गाची स्थापना करण्यासाठी आले आहेत. मग द्वापरपासून पुन्हा रावण राज्य सुरू होईल. रावण राज्य सुरू झाल्यावर लगेचच ‘शिव’चे मंदिर बनवतात. आतातर ते चैतन्यमध्ये नॉलेज ऐकवत आहेत. ते सत् आहेत, चैतन्य आहेत. त्यांचीच महिमा गातात; निराकारला शरीर तर पाहिजे ना. तर बाबाच येऊन विश्वाला स्वर्ग बनवतात. त्या स्वर्गामध्ये राज्य करण्यासाठी तुम्ही पुरुषार्थ करत आहात. तुम्ही स्वर्गवासी बनत आहात. निराकार परमपिता परमात्मा ज्ञानाचा सागर आहेत. परंतु हे ज्ञान ऐकवणार कसे? म्हणतात - मी या शरीरामध्ये आलो आहे, माझा ड्रामामध्ये हा पार्ट आहे. मी प्रकृतीचा आधार घेतो. हे (ब्रह्मा बाबा) जे पहिल्या नंबरचे आहेत यांच्याच अनेक जन्मांतील अंतिम जन्माच्या अंताला मी येऊन प्रवेश करतो आणि यांचे नाव ब्रह्मा ठेवतो. आधी हे सर्व भट्टीमध्ये होते तेव्हा खूप जणांना नावे दिली होती. परंतु खूपजण नंतर मग सोडून गेले त्यामुळे नाव ठेवण्याचा काय फायदा? तुम्ही ती नावे बघाल तर आश्चर्य वाटेल. एकाच वेळी एकत्र सर्व किती रमणिक नावे आली. संदेशी नाव घेऊन येत होती. ती यादी देखील जरूर ठेवायला पाहिजे. संन्यासी देखील जेव्हा संन्यास करतात तेव्हा त्यांचे देखील नाव बदलते. घरदार सोडून देतात. तुम्ही घरदार सोडत नाही. तुम्ही येऊन ब्रह्माचे बनता. शिवबाबांचे तर आहातच. तुम्ही त्यांना ‘बाप-दादा’ म्हणता. संन्याशांचे असे नसते. भले नाव बदलतात परंतु बापदादा मिळत नाहीत. त्यांना फक्त गुरु मिळतो. हठयोगी हदचे संन्यासी आणि राजयोगी बेहदचे संन्यासी यांच्यामध्ये दिवस-रात्री इतका फरक आहे. गायले देखील जाते - ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. त्यांचे (संन्याशांचे) देखील वैराग्य आहे परंतु त्यांचे घरादाराचे वैराग्य आहे. तुमचे सर्व दुनियेचे वैराग्य आहे. त्यांना माहीतच नाहीये की सृष्टी परिवर्तित होते. तुमचे आहे बेहदचे वैराग्य. ही सृष्टी नष्ट होणार आहे. तुमच्यासाठी नवीन दुनिया बनत आहे. तिथे (परमधाम मध्ये) जायचे आहे, परंतु पावन बनल्याशिवाय तर तिथे जाऊ शकत नाही. मनाला पटते की बरोबर नव्या दुनियेमध्ये देवी-देवतांचे राज्य होते, जे आता बाबा स्थापन करत आहेत. तुम्ही जाणता की शिवबाबांची आठवण केल्याने आपण पुण्य-आत्मा बनणार. आहे खूप सोपे, परंतु आठवण विसरायला होते. भक्तिमार्गाच्या चाली-रिती अगदीच वेगळ्या आहेत. परत आपल्या घरी तर कोणीही जाऊ शकत नाही. सर्वांना पुनर्जन्म जरूर घ्यायचा आहे. घरी जाण्याची वेळ एकच आहे. अमक्याला मोक्ष प्राप्त झाला, या तर थापा आहेत. बाबा म्हणतात - कोणतीही आत्मा मधूनच परत जाऊ शकत नाही. नाहीतर सर्व खेळच बिघडून जाईल. प्रत्येकाला सतो, रजो, तमोमध्ये नक्की यायचे आहे. मोक्षाची अपेक्षा ठेऊन तर खूपजण येतात, परंतु समजावून सांगितले जाते - मोक्ष नसतोच. हा तर अनादि पूर्व नियोजित ड्रामा आहे. तो कधीही बदलू शकत नाही. माशी इथून उडत गेली तर पुन्हा ५ हजार वर्षानंतर अशीच जाईल. हे तर जाणता की बाबा किती भोळे आहेत. पतित-पावन बाबा आपल्या परमधामहून पार्ट बजावण्याकरिता येतात. हा ड्रामा कसा बनलेला आहे, या ड्रामामध्ये कोण-कोण मुख्य आहेत, हे सर्वकाही तेच समजावून सांगतात. जसे म्हणतात ना की, या दुनियेमध्ये सर्वात श्रीमंत कोण आहे? त्यांची क्रमवारीने नावांची यादी काढतात. तुम्ही जाणता, सर्वात श्रीमंत कोण आहेत? ते म्हणतील अमेरिका. परंतु तुम्ही जाणता - स्वर्गामध्ये सर्वात श्रीमंत हे लक्ष्मी-नारायण बनतात. तुम्ही पुरुषार्थ करता भविष्याकरिता, सर्वात जास्त श्रीमंत बनण्याकरिता. ही रेस (शर्यत) आहे. या लक्ष्मी-नारायणा इतके श्रीमंत दुसरे कोणी असेल तरी का? अल्लाह अवलदीनची देखील कथा रचून सांगतात. टाळी वाजवली आणि कुबेराचा खजिना प्रकट झाला. खूप तऱ्हेतऱ्हेची नाटके बनवतात.

आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे की, हे शरीर सोडून आपण स्वर्गामध्ये जाऊ. आम्हाला कुबेराचा खजिना मिळेल. बाबा म्हणतात - माझी आठवण केल्याने माया एकदम पळून जाईल. बाबांची आठवण करत नाहीत त्यामुळे मग माया त्रास देते. म्हणतात - ‘बाबा, आम्हांवर मायेची खूप वादळे येतात’. ठीक आहे, बाबांची खूप प्रेमाने आठवण करा म्हणजे मग वादळे नाहीशी होतील. बाकी ही नाटके इत्यादी सगळी बसून बनवली आहेत. अशी काहीही गोष्ट नाही. बाबा किती सोपी गोष्ट सांगतात - फक्त बाबांची आठवण करा तर तुमच्यामधील अशुद्धता निघून जाईल, बाकी काही त्रास देत नाहीत. आत्मा जी पवित्र खरे सोने होती, ती आता खोटी (अपवित्र) बनली आहे, आता पुन्हा या आठवणीच्या अग्नीद्वारे पुन्हा खरी (पवित्र) बनेल. सोने अग्नीमध्ये टाकल्याशिवाय पवित्र होऊ शकत नाही तर याला देखील योग-अग्नी म्हणतात. आहे तर आठवण करण्याची गोष्ट. ते लोक (हठयोगी) तर अनेक प्रकारचे हठयोग शिकवतात. तुम्हाला तर बाबा म्हणतात - उठता-बसता माझी आठवण करा. विशिष्ट आसनामध्ये बसून तुम्ही किती वेळ माझे स्मरण करू शकाल? इथे तर चालता-फिरता काम करत असताना आठवणीमध्ये राहायचे आहे. भले आजारी असाल, तरीही तुम्ही इथे आडवे पडून देखील बाबांची आठवण करू शकता. शिवबाबांची आठवण करा आणि चक्र फिरवा, बस्स. त्यांनी, (दुनियावाल्यांनी) मग लिहिले आहे - ‘गंगा तट असावा, मुखामध्ये अमृत असावे’. आता गंगेच्या किनारी तर गंगाजलच मिळते, म्हणून मनुष्य हरिद्वारमध्ये जाऊन बसतात. बाबा तर म्हणतात - तुम्ही कुठेही बसा, भले आजारी असाल फक्त बाबांची आठवण करा. स्वदर्शन चक्र फिरवत रहा तेव्हा शरीरातून प्राण निघावा. याची प्रॅक्टिस करावी लागेल. त्या भक्तिमार्गाच्या गोष्टींमध्ये आणि या ज्ञानमार्गाच्या गोष्टींमध्ये किती दिवस-रात्री इतका फरक आहे. बाबांच्या आठवणीने तुम्ही स्वर्गाचे मालक बनाल. ते (दुनियावाले) तर सैनिकांसाठी म्हणतात की, जो युद्धाच्या मैदानामध्ये वीर मरण प्राप्त करतो तो स्वर्गामध्ये जातो. वास्तविक युद्ध तर हेच आहे. त्यांनी कौरवांचे आणि पांडवांचे सैन्य दाखवले आहे. महाभारत युद्ध झाले, परंतु नंतर मग काय झाले? रिझल्ट काहीच नाही. एकदम घोर अंधार आहे, काहीही समजत नाहीत, म्हणून अज्ञान अंध:कार म्हटले जाते. बाबा मग दुनियेला प्रकाशीत करण्यासाठी आले आहेत. त्यांना ज्ञानाचा सागर, नॉलेजफुल म्हटले जाते. आता तुम्हाला देखील सर्व ज्ञान मिळाले आहे. ते आहे मूलवतन, जिथे तुम्ही आत्मे राहता, त्याला ब्रह्मांड देखील म्हटले जाते. इथे (दुनियेमध्ये) रुद्र-यज्ञ रचतात तर बाबांच्या बरोबरीने तुम्हा आत्म्यांची देखील पूजा करतात कारण तुम्ही अनेकांचे कल्याण करता. बाबांसोबत तुम्ही भारताची खास आणि दुनियेची आम रूहानी सेवा करता म्हणून बाबांसोबत तुम्हा मुलांचे देखील पूजन होते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) मायेच्या वादळांना पळवून लावण्यासाठी बाबांची खूप-खूप प्रेमाने आठवण करायची आहे. आत्म्याला योग-अग्नीद्वारे खरे-खरे सोने बनवायचे आहे.

२) बेहदचे वैरागी बनून या जुन्या दुनियेला विसरून जायचे आहे. दुनिया परिवर्तीत होत आहे, नवीन दुनियेमध्ये जायचे आहे त्यामुळे या जुन्या दुनियेपासून संन्यास घ्यायचा आहे.

वरदान:-
पदोपदी सावधगिरी बाळगून पद्मांची कमाई जमा करणारे पद्मपति भव

बाबा मुलांना खूप उच्च स्थितीमध्ये राहण्याची पूर्व-सूचना देत आहेत; त्यामुळे आता या वेळी थोडे सुद्धा बेसावध राहायचे नाही. आता तर पावलो-पावली सावध राहून, प्रत्येक पावलामधे पद्मांची कमाई करत पदमपती बना. जसे नाव आहे ‘पद्मा-पदम भाग्यशाली’ तर तशी कर्म देखील असावीत. एकही पाऊल पद्मांच्या कमाई विना जाऊ नये. तर अतिशय विचारपूर्वक श्रीमतानुसार प्रत्येक पाऊल उचला. श्रीमतामध्ये मनमत मिक्स करू नका.

बोधवाक्य:-
मनाला ऑर्डरप्रमाणे चालवा म्हणजे मग ‘मनमनाभव’ची स्थिती आपोआप राहील.

हे अव्यक्त इशारे - ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.

आठवणीला शक्तिशाली बनविण्याकरिता विस्तारामध्ये जात असताना सार-स्थितीच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये, विस्तारामध्ये सार विसरून जायला नको. खा-प्या, सेवा करा परंतु न्यारेपणाला विसरू नका. साधना अर्थात शक्तिशाली आठवण. बाबांसोबत निरंतर हृदयाचे नाते असावे. केवळ योग मध्ये बसणे, याला काही साधना म्हणत नाहीत; परंतु जसे तुम्ही शरीराने बसता, तसे तुमचे हृदय, मन, बुद्धी एका बाबांवर एकाग्र होऊन, बाबांच्या सानिध्यात स्थित होऊन बसले पाहिजे. अशी एकाग्रताच ज्वाळेला प्रज्वलित करेल.