10-11-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, आपले भाग्य श्रेष्ठ बनवायचे असेल तर रूहानी सेवेची आवड ठेवा, सर्वांना ज्ञान-धनाचे दान करत राहा”

प्रश्न:-
रूहानी बाबा असे कोणते श्रीमत देतात, जे आजपर्यंत कोणा मनुष्याने दिलेले नाही?

उत्तर:-
बाबा म्हणतात - माझ्या रूहानी मुलांनो, तुम्ही रूहानी सेवेमध्ये दधीचि ऋषींप्रमाणे हाडे अर्पण करा (जीव तोडून सेवा करा). बाबांकडून जी अविनाशी ज्ञान-रत्ने मिळाली आहेत त्यांचे दान करा. हीच खरी सेवा आहे. अशी सेवा करण्याचे मत कोणीही मनुष्य देऊ शकत नाही. रूहानी सेवा करणारे आनंदाने नाचत राहतील. भाग्य श्रेष्ठ बनत जाईल.

गीत:-
बदल जाए दुनिया...

ओम शांती।
मुलांनी गाण्याच्या दोन ओळी ऐकल्या. त्यांनी तर गाणे बनवले आहे. जसे कोणाचा साखरपुडा होतो तर हे पक्केच असते की, ते वाग्दत्त वधू-वर कधीही एकमेकांना सोडणार नाहीत. कोणी असे विरळे असतात की ज्यांचे आपसात पटत नाही तर सोडून सुद्धा देतात. इथे तुम्ही मुले कोणाशी प्रतिज्ञा करत आहात? स्वयं ईश्वराशी, ज्यांच्याशी तुम्हां मुलांचा किंवा सजणींचा साखरपुडा झाला आहे. परंतु असे, जे तुम्हाला विश्वाचा मालक बनवतात त्यांना देखील सोडून देतात. इथे तुम्ही मुले बसला आहात. तुम्ही जाणता आता बेहदचे बापदादा आले की आले. ही अवस्था जी तुमची इथे असते, ती बाहेर सेंटरवर होऊ शकत नाही. इथे तुम्ही समजता बापदादा आले की आले. बाहेर सेंटरवर समजाल की बाबांनी वाजवलेली मुरली आली की आली. इथे आणि तिथे यामध्ये खूपच फरक असतो, कारण इथे बेहदच्या बापदादांच्या सन्मुख तुम्ही बसला आहात. तिथे तुम्ही सन्मुख नसता. सन्मुख जाऊन मुरली ऐकावी अशी इच्छा असते. इथे मुलांच्या बुद्धीमध्ये येते की बाबा आले की आले. जसे बाकीचे इतर सत्संग असतात, तिथे समजतात की, अमुक स्वामी येईल. परंतु हा विचार सुद्धा सर्वांच्या मनात एकरस येत नाही. कोणाला आपला नातेवाईक आठवेल. बुद्धी एका गुरु सोबत सुद्धा टिकत नाही. कोणी विरळाच असेल जो स्वामीच्या आठवणीमध्ये बसला असेल. इथे देखील असेच आहे. असे नाही की सगळेच शिवबाबांच्या आठवणीमध्ये राहतात. बुद्धी पळत राहते. मित्र-नातेवाईक आठवतात. पूर्ण वेळ एकाच शिवबाबांच्या सन्मुख राहण्यामध्ये तर अहो सौभाग्य. स्थायी आठवणीमध्ये तर कोणी विरळेच राहतात. इथे शिवबाबांच्या सन्मुख राहण्यामध्ये तर खूप आनंद वाटला पाहिजे. अतींद्रिय सुख गोपी वल्लभच्या गोप-गोपींना विचारा, हे इथलेच गायन केले गेलेले आहे. इथे तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये बसला आहात. तुम्ही जाणता - आता आपण ईश्वराचे बनलो आहोत, नंतर मग दैवी मांडीवर (ओटीमध्ये) असणार. भले कोणाच्या बुद्धीमध्ये सेवेचे विचार चालतात की, या चित्रामध्ये ही दुरुस्ती करावी, हे लिहावे. परंतु चांगली मुले असतील ती समजतील की, आता तर फक्त बाबांकडूनच ऐकायचे आहे, ते इतर कोणताही संकल्प येऊ देणार नाहीत. बाबा ज्ञान-रत्नांनी झोळी भरण्यासाठी आले आहेत. तर बाबांशीच बुद्धियोग लावायचा आहे. धारणा करणारे नंबरवार तर असतातच. कोणी चांगल्या रीतीने धारण करतात, कोणी कमी धारण करतात. बुद्धियोग इतर ठिकाणी पळत राहिला तर धारणा होणार नाही. कच्चे बनाल. एक-दोन वेळा मुरली ऐकली, धारणा झाली नाही तर तीच सवय पक्की होते. आणि मग कितीही ऐकत राहिला, तरीही धारणा होणार नाही. कोणाला हे ज्ञान ऐकवू शकणार नाहीत. ज्याला धारणा होईल त्याला सेवेची आवड असेल, उड्या मारत राहील की, आपण जाऊन धन-दान करावे; कारण हे धन एका बाबांशिवाय इतर कोणाकडेच नाहीये. बाबा हे देखील जाणतात की, सर्वांनाच धारणा होऊ शकणार नाही. सगळेच काही एकसारखे श्रेष्ठ पद प्राप्त करू शकत नाहीत, म्हणून बुद्धी इतर ठिकाणी भटकत राहते. भविष्यातले भाग्य इतके श्रेष्ठ बनू शकत नाही. मग कोणी स्थूल सेवेमध्ये आपली हाडे देतात (जीव तोडून सेवा करतात), सर्वांना राजी (संतुष्ट) करतात. जसे भोजन बनवतात, खाऊ घालतात, हा देखील विषय आहे ना. सेवेची ज्यांना आवड असेल ते तोंडाने बोलल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मग बाबा पाहतात देखील की कुठे देह-अभिमान तर नाही आहे ना? मोठ्यांचा आदर ठेवतात की नाही. मोठ्या महारथींचा तर आदर राखायलाच हवा. हां, कधी-कधी एखादा छोटा देखील हुशार बनतो, तर असेही होते की मोठ्यांना देखील त्याचा मान राखावा लागतो, कारण त्याची बुद्धी गॅलप करते (अभ्यासातील गॅप भरून काढून वेगाने पुढे जाते). सेवेची आवड पाहून बाबा तर खुश होतील ना की, हे चांगली सेवा करतील. पूर्ण दिवस प्रदर्शनी समजावून सांगण्याची देखील प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रजा देखील पुष्कळ बनणार आहे ना. लाखोंनी प्रजा पाहिजे. अजून तर कोणता उपाय नाहीये. सूर्यवंशी, चंद्रवंशी राजा-राणी, प्रजा सर्व इथेच बनणार आहेत; तर किती सेवा केली पाहिजे. मुलांच्या बुद्धीमध्ये आहे आता आपण ब्राह्मण बनलो आहोत. घर-गृहस्थीमध्ये राहिल्याने प्रत्येकाची अवस्था आपापली असते ना. घरदार काही सोडायचे नाहीये. बाबा म्हणतात - भले घरामध्ये राहा, परंतु बुद्धीमध्ये हा ठाम निश्चय असला पाहिजे की, ही जुनी दुनिया नष्ट झाल्यातच जमा आहे. आमचे आता बाबांसोबत काम आहे. हे देखील जाणतात - कल्पापूर्वी ज्यांनी हे ज्ञान घेतले होते, तेच आता घेतील. सेकंद-सेकंद अगदी हुबेहूब रिपीट होत आहे. आत्म्यामध्ये हे ज्ञान आहे ना. बाबांकडे देखील ज्ञान आहे. तुम्हा मुलांना देखील बाबांसारखे बनायचे आहे, पॉइंट्स धारण करायचे आहेत. सगळेच पॉईंट्स काही एका वेळी सांगितले जात नाहीत. लक्ष्य पक्के ठेवले जाते. विनाश देखील समोर उभा आहे. हा तोच विनाश आहे. सतयुग, त्रेतामध्ये काही युद्ध इत्यादी होत नाही. ते तर नंतर जेव्हा अनेक धर्म होतात, सैन्याची संख्या वाढते तेव्हा युद्ध सुरू होते. सर्व प्रथम आत्मे सतोप्रधान मधून खाली घसरतात, आणि मग सतो, रजो, तमोमध्ये येतात. हे सर्व लक्षात ठेवायचे आहे की, कसे राज्य स्थापन होत आहे. इथे बसला आहात तर हे बुद्धीमध्ये ठेवायचे आहे. शिवबाबा येऊन आम्हाला खजिना देतात, ज्याला बुद्धीमध्ये धारण करायचा आहे. चांगली-चांगली मुले नोट्स काढतात. नोट्स काढणे चांगले आहे, त्यामुळे बुद्धीमध्ये टॉपिक्स येतील, आज या टॉपिक वर समजावून सांगणार.

बाबा म्हणतात - मी तुम्हाला किती खजिना दिला होता. सतयुग, त्रेतामध्ये तुमच्याकडे अगणित धन होते, मग वाम मार्गामध्ये गेल्यामुळे ते धन कमी होत गेले. आनंद देखील कमी होत गेला. काही ना काही विकर्म होऊ लागली. उतरता-उतरता कला कमी होत जातात. सतोप्रधान, सतो, रजो,

तमो या स्टेजेस असतात ना. सतोमधून रजोमध्ये येतात तर असे नाही की पटकन येतात. तमोप्रधानतेमध्ये देखील हळू-हळू उतरता, त्याच्यामध्ये देखील सतो, रजो, तमो स्टेजेस येतात. पटकन तमोप्रधान होत नाहीत. हळू-हळू शिडी उतरत जातात. कला कमी होतात. आता झेप घ्यायची आहे. तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे आहे, याच्यासाठी फार थोडा वेळ शिल्लक आहे. गायले देखील आहे - ‘चढे तो चाखे वैकुंठ रस’. कामविकाराचा फटका बसतो तेव्हा मग एकदम तुकडे-तुकडे होतात. हाड्नहाड तुटून जाते; जणू काही कोणी मनुष्य आपला जीवघात करतात. आत्मघात नाही, जीवघात म्हटले जाते. तसा हा देखील आत्म्याचा घात होतो. केलेली कमाई सर्व बरबाद होते. इथे तर बाबांकडून वारसा घ्यायचा आहे, बाबांची आठवण करायची आहे कारण बाबांकडून बादशाही मिळते. स्वतःला विचारायचे आहे की आम्ही बाबांची आठवण करून भविष्यासाठी किती कमाई केली? किती आंधळ्यांची काठी बनलो? घरोघरी संदेश द्यायचा आहे की, ही जुनी दुनिया परिवर्तित होत आहे. बाबा नवीन दुनियेसाठी राजयोग शिकवत आहेत. शिडीच्या चित्रामध्ये दाखवले आहे, हे बनण्यासाठी मेहनत करावी लागते. पूर्ण दिवस विचार चालत राहतात की, असे काहीतरी सोपे बनवावे जेणेकरून कोणीही सहज समजू शकेल. सर्व दुनिया तर येणार नाहीये. देवी-देवता धर्माचेच येतील. तुमची सेवा तर खूप चालणार आहे. तुम्ही जाणता - आपला अभ्यास केव्हापर्यंत चालणार! ते (दुनियावाले) तर कल्पाचे आयुर्मान लाखो वर्षे समजतात. तर शास्त्र इत्यादी ऐकवतच राहतात. समजतात जेव्हा अंत होईल तेव्हा सर्वांचा सद्गती दाता येईल; मग आमचे जे शिष्य आहेत त्यांची गति होईल. आणि मग आम्ही देखील जाऊन ज्योतीमध्ये विलीन होऊ. परंतु असे तर काही होत नाही. तुम्ही जाणता - आम्ही अमर बाबांकडून खरी-खरी अमर कथा ऐकत आहोत. तर अमर बाबा जे म्हणतात ते मानायला सुद्धा हवे. फक्त म्हणतात - माझी आठवण करा आणि पवित्र बना. नाहीतर खूप शिक्षा भोगावी लागेल, पद देखील कनिष्ठ दर्जाचे मिळेल. सेवेमध्ये मेहनत करायची आहे. जसे दधीचि ऋषींचे उदाहरण आहे, हाडे सुद्धा सेवेमध्ये देऊन टाकली. आपल्या शरीराचा विचार सुद्धा न करता सेवेमध्ये राहायचे आहे, याला म्हटले जाते - हड्डी सेवा आणि दुसरी आहे - रूहानी हड्डी सेवा. रूहानी सेवा करणारे रूहानी नॉलेजच ऐकवत राहतील. ज्ञान-धन दान करत आनंदामध्ये नाचत राहतील. दुनियेमध्ये जे मनुष्य सेवा करतात ती आहे भौतिक सेवा. बसून शास्त्रे ऐकवतात, ती काही रूहानी सेवा नाहीये. रूहानी सेवा फक्त बाबाच शिकवतात. स्पिरिच्युअल बाबाच येऊन स्पिरिच्युअल मुलांना (आत्म्यांना) शिकवतात. तुम्ही आता, सतयुगी नव्या दुनियेमध्ये जाण्याची तयारी करत आहात. तिथे तुमच्याकडून कोणतेही विकर्म होणार नाही. ते आहे रामराज्य. तिथे असतातच फार थोडे. ते थोडे मनुष्य येऊन शिकतील. आता रावणराज्यामध्ये तर सर्व दुःखी आहेत ना. हे सर्व नॉलेज तुमच्या बुद्धीमध्ये नंबरवार पुरुषार्था अनुसार आहे. सर्व नॉलेज या शिडीच्या चित्रामध्ये दर्शविण्यात आले आहे. ही चित्रे बनविण्यासाठी तशी मशिनरी पाहिजे. त्या गव्हर्मेंटची दररोज किती वर्तमानपत्रे छापली जातात. केवढी उलाढाल चालते. इथे तर सर्व हातांनी बनवावे लागते.

बाबा म्हणतात - हा अंतिम जन्म पवित्र बना तर पवित्र दुनियेचे मालक बनाल. हे नॉलेज कोणाकडेच नाहीये. म्हणतील या शिडीच्या चित्रामध्ये इतर धर्मांबद्दलची माहिती कुठे काय आहे? ती देखील या गोळ्याच्या चित्रामध्ये दाखवली आहे. नवीन दुनियेमध्ये तर ते येतच नाहीत. त्यांना शांती मिळते. भारतवासीच स्वर्गामध्ये होते ना. भारतामध्येच बाबा राजयोग शिकविण्यासाठी येतात म्हणून भारताचा ‘प्राचीन राजयोग’ सर्वजण पसंत करतात. या चित्रावरून ते स्वतःच समजतील, खरोखर नवीन दुनियेमध्ये फक्त भारतच होता. स्वतःच्या धर्मालासुद्धा ओळखतील. जसे क्राईस्ट धर्म स्थापन करण्यासाठी आला. यावेळी तो सुद्धा बेगर (याचक) रूपामध्ये आहे, सर्व तमोप्रधान आहेत. हे रचता आणि रचनेचे किती मोठे नॉलेज आहे. तुम्ही सांगू शकता की, आम्हाला कोणाच्याही पैशांची गरज नाही. पैशांचे आम्ही काय करणार! तुम्ही हे ऐका आणि इतरांना हे ज्ञान ऐकवण्यासाठी ही चित्रे इत्यादी छापून घ्या. या चित्रांचा उपयोग करायचा आहे. हॉल बनवा, जिथे हे नॉलेज ऐकवले जाईल; बाकी आम्ही पैसे घेऊन काय करणार! तुमच्याच घराचे कल्याण होणार आहे. तुम्ही फक्त प्रबंध करा, खूप लोक येऊन ऐकतील. रचना आणि रचयित्याचे नॉलेज तर खूप चांगले आहे. हे तर मनुष्यांनीच समजून घ्यायचे आहे, विदेशी लोक हे नॉलेज ऐकून खूप पसंत करतील. खूप आनंदित होतील. समजतील की, आम्ही देखील बाबांशी योग लावला तर विकर्म विनाश होतील. सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे. समजतील की हे नॉलेज गॉडफादर शिवाय इतर कोणीही देऊ शकत नाही. म्हणतात - खुदाने बहिस्थ स्थापन केला. परंतु ते कसे येतात हे कोणालाच माहीत नाहीये. तुमच्या गोष्टी ऐकून खूप आनंदित होतील. मग पुरुषार्थ करून योग शिकतील. तमोप्रधानापासून सतोप्रधान बनण्यासाठी पुरुषार्थ देखील करतील. सेवेसाठी तर खूप विचार केला पाहिजे. भारतामध्ये तुमचे कौशल्य दाखवा, तर बाहेर पाठवतील. नवीन दुनिया बनण्यासाठी काही वेळ थोडाच लागतो, हे मनुष्याला कळेल. कुठेही भूकंप इत्यादी झाला तर दोन-तीन वर्षांमध्ये एकदम नवीन इमारती बनतात. जितके जास्त कारागीर असतील तितक्या लवकर इमारती बनतील. एका महिन्यात सुद्धा इमारत बनवू शकतात. कारागीर, सामान इत्यादी सर्व तयार असेल तर मग बनण्यासाठी वेळ थोडाच लागेल! परदेशामध्ये इमारती कशा बनतात, मिनिट मोटर (एका मिनिटात एक मोटार बनवतात तशा इमारती बनतील). तर स्वर्गामध्ये किती लवकर बनत असतील. तुम्हाला सोने, चांदी पुष्कळ मिळते; खाणींमधून सोने, चांदी, हिरे इत्यादी घेऊन येता. कला तर सर्व शिकत आहेत. विज्ञानाचा किती अहंकार आहे. हेच विज्ञान मग तिथेसुद्धा कामी येईल. इथे (या जुन्या दुनियेमध्ये) शिकणारे तिथे (स्वर्गामध्ये) दुसरा जन्म घेऊन मदतीला येतील. त्यावेळी तर सर्व नवीन दुनिया होऊन जाते, रावणराज्यच नष्ट होते. ५ तत्वे देखील नियमानुसार सेवेमध्ये राहतात. स्वर्ग बनतो. तिथे कोणताही उपद्रव होत नाही. रावण राज्यच नसते, सर्व सतोप्रधान असतात. सर्वात चांगली गोष्ट आहे की बाबांवर खूप प्रेम असायला पाहिजे. बाबा जो फुरना देतात (जे लक्ष्य देतात) त्याला धारण करायचे आहे आणि दुसऱ्यांना दान द्यायचे आहे. जितके दान द्याल तितके जमा होत जाईल. सेवाच केली नाहीत तर धारणा कशी होईल. सेवेमध्ये बुद्धी चालली पाहिजे. सेवा तर पुष्कळ होऊ शकते. करणाऱ्याने करत राहावी. दिवसें-दिवस उन्नती करायची आहे. स्वतःची देखील उन्नती करायची आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपसामध्ये एकमेकांचा आदर ठेवायचा आहे. सेवेची खूप-खूप आवड ठेवायची आहे. ज्ञानरत्नांनी आपली झोळी भरून मग त्याचे दान करायचे आहे.

२) एका बाबांकडूनच ऐकण्याचा संकल्प ठेवायचा आहे. दुसऱ्या विचारांमध्ये बुद्धीला भटकू द्यायचे नाही.

वरदान:-
विचार करणे आणि कर्म करणे यामधल्या अंतराला संपवणारे स्व-परिवर्तक सो विश्व परिवर्तक भव

कोणताही संस्कार, स्वभाव, बोल आणि संपर्क जो यथार्थ नाही व्यर्थ आहे, त्या व्यर्थला परिवर्तन करण्याची मशिनरी फास्ट करा. विचार केला आणि कर्म केले… तेव्हाच विश्व परिवर्तनाची मशिनरी वेगवान होईल. आता स्थापनेच्या निमित्त बनलेल्या आत्म्यांच्या विचार करणे आणि कर्म करणे यामध्ये अंतर दिसून येत आहे, हे अंतर संपवून टाका; तेव्हाच स्व-परिवर्तक सो विश्व परिवर्तक बनू शकाल.

बोधवाक्य:-
सर्वात भाग्यवान तो आहे ज्याने आपल्या जीवनामध्ये अनुभूतीची गिफ्ट प्राप्त केली आहे.

हे अव्यक्त इशारे - ब्रह्माबाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.

संगमयुगाच्या संपूर्ण स्टेजचे चित्र आहे - फरिश्ता. फरिश्ता एकदम हलका असतो आणि ज्याच्यामध्ये हलकेपणा असतो तो प्रत्येक परिस्थितीमध्ये आपली स्थिती श्रेष्ठ बनवतो. फरिश्ते संकल्पांमध्ये सुद्धा हलके, वाणीमध्ये सुद्धा हलके, कर्म करण्यामध्ये सुद्धा हलके आणि संबंधांमध्ये सुद्धा हलके राहतील; आणि जे हलके असतील ते एका सेकंदामध्ये कोणत्याही आत्म्याच्या संस्कारांना पारखू शकतील. जेव्हा हे सर्व गुण प्रत्येक कर्मामध्ये प्रत्यक्ष दिसून येतील तेव्हा समजा - आता संपूर्णतेची स्टेज जवळ आहे.