22-04-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुमचा हा अति मौल्यवान काळ आहे, यामध्ये तुम्ही बाबांचे पूर्णपणे मदतगार बना, मदतगार मुलेच उच्च पद प्राप्त करतात”

प्रश्न:-
सेवाभावी मुले कोणती बहाणेबाजी करू शकत नाहीत?

उत्तर:-
सेवाभावी मुले हा बहाणा करणार नाहीत की बाबा, इथे गर्मी आहे, इथे थंडी आहे म्हणून आम्ही सेवा करू शकत नाही. थोडी गर्मी झाली किंवा थंडी पडली तर नाजूक बनायचे नाही. असे नाही, आम्ही तर सहनच करू शकत नाही. या दुःखधाम मध्ये दुःख-सुख, थंडी-गर्मी, निंदा-स्तुती सर्व सहन करायचे आहे. बहाणेबाजी करायची नाही.

गीत:-
धीरज धर मनुवा…

ओम शांती।
मुलेच जाणतात की सुख आणि दुःख कशाला म्हटले जाते. या जीवनामध्ये सुख केव्हा मिळते आणि दुःख केव्हा मिळते ते केवळ तुम्ही ब्राह्मणच नंबरवार पुरुषार्थानुसार जाणता. ही आहेच दुःखाची दुनिया. यामध्ये थोड्या वेळासाठी दुःख-सुख, निंदा-स्तुती सर्व काही सहन करावे लागते. या सर्वांमधून पार व्हायचे आहे. कोणाला थोडी गर्मी होते तर म्हणतात आम्हाला थंडीमध्ये रहायचे आहे. आता मुलांना तर गर्मीमध्ये किंवा थंडीमध्ये सेवा तर करायचीच आहे ना. यावेळी हे थोडे-फार दुःख जरी झाले तरी काही नवीन गोष्ट नाहीये. हे आहेच दुःख धाम. आता तुम्हा मुलांना सुखधाममध्ये जाण्यासाठी पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. हा तर तुमचा अति मौल्यवान काळ आहे. यामध्ये बहाणा चालू शकणार नाही. बाबा सेवाभावी मुलांसाठी म्हणतात, जे सेवेला जाणतच नाहीत, ते तर मग काहीच कामाचे नाहीत. इथे बाबा आले आहेत भारतालाच तर काय परंतु विश्वाला सुखधाम बनविण्यासाठी. तर ब्राह्मण मुलांनाच बाबांचे मदतगार बनायचे आहे. बाबा आलेले आहेत तर त्यांच्या मतावर चालले पाहिजे. भारत जो स्वर्ग होता तो आता नरक आहे, त्याला मग स्वर्ग बनवायचा आहे. हे देखील आता माहीत झाले आहे. सतयुगामध्ये या पवित्र राजांचे राज्य होते, खूप सुखी होते मग अपवित्र राजे देखील बनतात, ईश्वर अर्थ दान-पुण्य केल्याने, तर त्यांना सुद्धा ताकद मिळते. आता तर आहेच प्रजेचे राज्य. परंतु हे काही भारताची सेवा करू शकत नाहीत. भारताची किंवा दुनियेची सेवा तर एक बेहदचे बाबाच करतात. आता बाबा मुलांना म्हणतात - ‘गोड मुलांनो, आता माझ्या सोबत मदतगार बना’. किती प्रेमाने समजावून सांगतात, देही-अभिमानी मुले समजतात. देह-अभिमानी काय मदत करू शकतील कारण मायेच्या कैदेमध्ये अडकलेले आहेत. आता बाबांनी डायरेक्शन दिले आहे की सर्वांना मायेच्या कैदेतून, गुरूंच्या कैदेतून सोडवा. तुमचा धंदाच हा आहे. बाबा म्हणतात - माझे जे चांगले मदतगार बनतील, पद देखील तेच प्राप्त करतील. बाबा स्वतः सन्मुख म्हणतात - मी जो आहे, जसा आहे, साधारण असल्या कारणाने मला पूर्ण ओळखत नाहीत. बाबा आपल्याला विश्वाचे मालक बनवतात, हे जाणत नाहीत. हे लक्ष्मी-नारायण विश्वाचे मालक होते, हे देखील कोणाला माहित नाही. आता तुम्ही समजता की, कसे यांनी राज्य मिळवले आणि कसे गमावले. मनुष्यांची तर अगदीच तुच्छ-बुद्धी आहे. आता बाबा आले आहेत सर्वांच्या बुद्धीचे कुलूप उघडण्यासाठी, पत्थर-बुद्धिपासून पारस-बुद्धी बनविण्यासाठी. बाबा म्हणतात - आता मदतगार बना. लोक खुदाई खिदमतगार (ईश्वरीय सेवाधारी) म्हणतात परंतु मदतगार काही बनतच नाहीत. खुदा येऊन ज्यांना पावन बनवतात त्यांनाच म्हणतात की, आता इतरांना आप समान बनवा. श्रीमतावर चाला. बाबा आले आहेत पावन स्वर्गवासी बनविण्यासाठी.

तुम्ही ब्राह्मण मुले जाणता हा आहे मृत्युलोक. बसल्या-बसल्या अचानक मृत्यू होत राहतात तर का नाही आपण अगोदरच मेहनत करून बाबांकडून पूर्ण वारसा घ्यावा आणि आपले भविष्य जीवन बनवावे. मनुष्यांची जेव्हा वानप्रस्थ अवस्था होते तर समजतात आता भक्तीला लागावे. जोपर्यंत वानप्रस्थ अवस्था होत नाही तोपर्यंत पुष्कळ धन इत्यादी कमावतात. आता तुम्हा सर्वांची तर आहेच वानप्रस्थ अवस्था. तर का नाही बाबांचे मदतगार बनायचे. मनाला विचारले पाहिजे आपण बाबांचे मदतगार बनतो. सेवाभावी मुले तर नामीग्रामी आहेत. चांगली मेहनत करतात. योगामध्ये राहिल्याने सेवा करू शकाल. आठवणीच्या ताकदीनेच साऱ्या दुनियेला पवित्र बनवायचे आहे. साऱ्या विश्वाला तुम्ही पावन बनविण्यासाठी निमित्त बनलेले आहात. तुमच्यासाठी मग पवित्र दुनिया देखील जरूर पाहिजे, म्हणून पतित दुनियेचा विनाश होणार आहे. आता सर्वांना हेच सांगत रहा की, देह-अभिमान सोडा. एका बाबांचीच आठवण करा. तेच पतित-पावन आहेत. सर्वजण आठवण देखील त्यांनाच करतात. साधु-संत इत्यादी सर्व बोटाने असा इशारा करतात की परमात्मा एक आहेत, तेच सर्वांना सुख देणारे आहेत. ईश्वर अथवा परमात्मा म्हणतात परंतु त्यांना जाणत कोणीही नाही. कोणी गणेशाची, कोणी हनुमानाची, कोणी आपल्या गुरुची आठवण करत राहतात. आता तुम्ही जाणता ते सर्व आहेत भक्तिमार्गाचे. भक्तिमार्ग देखील अर्धा कल्प चालणार आहे. मोठ-मोठे ऋषी-मुनी सर्व नेती-नेती करत आले आहेत. रचता आणि रचनेला आम्ही जाणत नाही. बाबा म्हणतात - ते काही त्रिकालदर्शी तर नाहीत. बीजरुप, ज्ञानाचे सागर तर एकच आहेत. ते येतात देखील भारतामध्ये. शिव जयंती देखील साजरी करतात आणि गीता जयंती देखील साजरी करतात. तर कृष्णाची आठवण करतात. शिवाला तर जाणतच नाहीत. शिवबाबा म्हणतात - ‘पतित-पावन ज्ञानाचा सागर तर मी आहे’. कृष्णासाठी तर म्हणू शकत नाही. गीतेचे भगवान कोण? हे खूप चांगले चित्र आहे. बाबा ही चित्रे इत्यादी सर्व बनवून घेतात, मुलांच्याच कल्याणाकरिता. शिवबाबांची महिमा तर पूर्णपणे लिहायची आहे. सर्व काही याच्यावर अवलंबून आहे. वरून जे कोणी येतात ते पवित्रच आहेत. पवित्र बनल्या शिवाय कोणीही जाऊ शकत नाही. मुख्य गोष्ट आहे पवित्र बनण्याची. ते आहेच पवित्र धाम, जिथे सर्व आत्मे राहतात. इथे तुम्ही पार्ट बजावता-बजावता पतित बनला आहात. जे सर्वात जास्त पावन होते तेच मग पतित बनले आहेत. देवी-देवता धर्माचे नामो-निशाणच नाहीसे झाले आहे. देवता धर्म बदलून हिंदू धर्म नाव ठेवले आहे. तुम्हीच स्वर्गाचे राज्य घेता आणि मग गमावता. हार आणि जीतचा खेळ आहे. ‘माया ते हारे हार आहे, माया ते जीते जीत आहे’. मनुष्य तर रावणाचे इतके मोठे चित्र किती खर्च करून बनवतात आणि मग एकाच दिवसात नष्ट करतात. शत्रू आहे ना. परंतु हा तर बाहुल्यांचा खेळ झाला. शिवबाबांचे देखील चित्र बनवून पूजा करून मग तोडून टाकतात. देवींची देखील अशीच चित्रे (मुर्त्या) बनवून मग जाऊन बुडवतात (विसर्जित करतात). काहीच समजत नाहीत. आता तुम्ही मुले बेहदच्या इतिहास-भूगोलाला जाणता की या दुनियेचे चक्र कसे फिरते. सतयुग-त्रेताविषयी कोणालाच माहित नाही. देवतांची चित्रे देखील निंदात्मक बनवली आहेत.

बाबा समजावून सांगतात - ‘गोड मुलांनो, विश्वाचा मालक बनण्यासाठी बाबांनी तुम्हाला जे पथ्य सांगितले आहे ते पाळा, आठवणीमध्ये राहून भोजन बनवा, आठवणीमध्ये राहून खा’. बाबा स्वतः म्हणतात - माझी आठवण करा तर तुम्ही पुन्हा विश्वाचे मालक बनाल. बाबा देखील पुन्हा आलेले आहेत. आता विश्वाचा मालक पूर्णपणे बनायचे आहे. फालो फादर-मदर. फक्त फादरच असू शकत नाही. संन्यासी लोक म्हणतात आपण सर्व फादर आहोत. आत्मा सो परमात्मा आहोत, ते तर चुकीचे होते. इथे मदर-फादर दोघेही पुरुषार्थ करतात. फालो मदर-फादर, हे शब्द देखील इथलेच आहेत. आता तुम्ही जाणता जे विश्वाचे मालक होते, पवित्र होते, आता ते अपवित्र आहेत. पुन्हा पवित्र बनत आहेत. आपण देखील त्यांच्या श्रीमतावर चालून हे पद प्राप्त करतो. ते यांच्याद्वारे डायरेक्शन देतात त्यावर चालायचे आहे, फॉलो करत नाहीत तर फक्त बाबा-बाबा म्हणून तोंड गोड करतात. फालो करणाऱ्यांनाच सपूत मुले म्हणणार ना. तुम्ही जाणता मम्मा-बाबांना फॉलो केल्याने आपण राजाईमध्ये जाऊ. ही समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. बाबा फक्त म्हणतात - माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. बस्स, आणि कोणालाही हे समजावून सांगा की, तुम्ही कसे ८४ जन्म घेत-घेत अपवित्र बनला आहात. आता पुन्हा पवित्र बनायचे आहे. जितकी आठवण कराल तर पवित्र होत जाल. खूप आठवण करणारेच नवीन दुनियेमध्ये सर्वात पहिले येतील. मग इतरांना देखील आप समान बनवायचे आहे. प्रदर्शनीमध्ये बाबा-मम्मा समजावून सांगण्यासाठी जाऊ शकत नाहीत. बाहेरून कोणी मोठी व्यक्ती येते तर त्यांना बघण्यासाठी किती पुष्कळ लोक जातात, की हे कोण आले आहेत. हे (शिवबाबा) तर किती गुप्त आहेत. बाबा म्हणतात - मी या ब्रह्मा तनामधून बोलतो, मीच या मुलाचा (ब्रह्मा) रिस्पॉन्सिबल आहे. तुम्ही नेहमी समजा शिवबाबा बोलत आहेत, तेच शिकवतात. तुम्हाला शिवबाबांनाच पहायचे आहे यांना पाहायचे नाही. स्वतःला आत्मा समजा आणि परमात्मा बाबांची आठवण करा. आपण आत्मा आहोत. आत्म्यामध्येच सारा पार्ट भरलेला आहे. हे नॉलेज बुद्धीमध्ये फिरत राहिले पाहिजे. फक्त दुनियावी गोष्टीच बुद्धीमध्ये असतील तर जणू काहीच जाणत नाहीत. एकदम वाईट आहेत. परंतु अशा लोकांचे देखील कल्याण तर करायचेच आहे. स्वर्गामध्ये तर जाल परंतु उच्च पद मिळणार नाही. सजा खाऊन जाल. उच्च पद कसे प्राप्त कराल, ते तर बाबांनी समजावून सांगितले आहे. एक तर स्वदर्शन चक्रधारी बना आणि बनवा. योगी देखील पक्के बना आणि बनवा. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा’. तुम्ही मग म्हणता - ‘बाबा, आम्ही विसरून जातो’. लाज वाटत नाही! असे बरेच आहेत जे खरे सांगत नाहीत, खूप विसरतात. बाबांनी समजावून सांगितले आहे कोणीही आला तर त्यांना बाबांचा परिचय द्या. आता ८४ चे चक्र पूर्ण होते, परत जायचे आहे. राम गयो रावण गयो… याचा देखील अर्थ किती सोपा आहे. जरूर संगमयुग असेल जेव्हा की रामाचा आणि रावणाचा परिवार आहे. हे देखील जाणता सर्व विनाश होईल, बाकी थोडे राहतील. तुम्हाला कसे राज्य मिळते, ते देखील थोडे पुढे चालून सर्व माहित होईल. अगोदरच सर्व काही सांगणार तर नाहीत. मग तर तो खेळच होऊ शकत नाही. तुम्हाला साक्षी होऊन पहायचे आहे. साक्षात्कार होत जातील. या ८४ च्या चक्राला दुनियेमध्ये कोणीही जाणत नाही.

आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे आपण परत जातो. रावण राज्यामधून आता सुट्टी मिळते. मग आपल्या राजधानीमध्ये येणार. बाकी थोडे दिवस आहेत. हे चक्र फिरत राहते ना. अनेकदा हे चक्र फिरलो आहोत. आता बाबा म्हणतात - ज्या कर्म बंधनामध्ये अडकला आहात त्याला विसरून जा. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना विसरत जा. आता नाटक पूर्ण होते, आपल्या घरी जायचे आहे, या महाभारत लढाई नंतरच स्वर्गाचे गेट उघडते; म्हणून बाबांनी म्हटले आहे की, हे नाव तर खूप चांगले आहे - ‘गेट वे टू हेविन’. कोणी म्हणतात युद्धे तर होतच आली आहेत. बोला, मुसळांचे युद्ध (मिसाईल्सचे युद्ध) केव्हा लागले, ही मुसळांची अखेरची लढाई आहे. ५००० वर्षांपूर्वी देखील जेव्हा युद्ध झाले होते तेव्हा हा यज्ञ देखील रचला होता. या जुन्या दुनियेचा आता विनाश होणार आहे. नवीन राजधानीची स्थापना होत आहे.

तुम्ही हे रूहानी शिक्षण शिकता राजाई प्राप्त करण्यासाठी. तुमचा धंदा आहे रूहानी. जिस्मानी विद्या तर उपयोगाला येणार नाही, ही शास्त्रे सुद्धा कामी येणार नाहीत तर का नाही या धंद्यामध्ये गुंतावे. बाबा तर विश्वाचा मालक बनवितात. कोणते शिक्षण घ्यावे, याचा विचार केला पाहिजे. ते (दुनियावाले) तर थोड्याशा डिग्रीसाठी शिकतात. तुम्ही तर शिकता राजाईसाठी. किती रात्रं-दिवसाचा फरक आहे. ते शिक्षण शिकल्याने चणे सुद्धा मिळतील की नाही थोडेच ठाऊक आहे. आणि मधेच जर कोणाचे शरीर सुटले तर चणे सुद्धा गेले. ही कमाई तर सोबत येणारी आहे. मृत्यू तर डोक्यावर उभा आहे. पहिले आपण आपली पूर्ण कमाई तर करूया. ही कमाई करता-करता सारी दुनियाच विनाश होणार आहे. तुमचे शिक्षण पूर्ण होईल तेव्हाच विनाश होईल. तुम्ही जाणता जे काही मनुष्य मात्र आहेत, त्यांच्या मुठीमध्ये आहेत चणे. त्यालाच माकडा प्रमाणे पकडून बसले आहेत. आता तुम्ही रत्न घेत आहात. या चण्यांमधून मोह काढून टाका. जेव्हा चांगल्या रीतीने समजतात तेव्हा चण्याच्या मुठीला सोडतात. हे तर सर्व खाक होणार आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) रुहानी शिक्षण शिकायचे आणि शिकवायचे आहे. अविनाशी ज्ञान रत्नांनी आपली मूठ भरायची आहे. चण्यांच्यामागे (पैशांच्या मागे) वेळ घालवायचा नाही.

२) आता नाटक पूर्ण होते, म्हणून स्वतःला कर्म बंधनांमधून मुक्त करायचे आहे. स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे आणि बनवायचे आहे. मदर-फादरला फॉलो करून राजाई पदासाठी अधिकारी बनायचे आहे.

वरदान:-
संकल्पालाही चेक करून व्यर्थच्या खात्याला समाप्त करणारे श्रेष्ठ सेवाधारी भव

श्रेष्ठ सेवाधारी ते आहेत ज्यांचा प्रत्येक संकल्प पॉवरफुल आहे. कुठेही एकही संकल्प व्यर्थ जाऊ नये, कारण सेवाधारी अर्थात विश्वाच्या स्टेजवर ॲक्ट करणारे. सारे विश्व तुम्हाला कॉपी करते, जर तुम्ही एक संकल्प जरी व्यर्थ घालवलात तर फक्त स्वतःसाठीच केला नाहीत परंतु अनेकांसाठी निमित्त बनलात, म्हणून आता व्यर्थच्या खात्याला समाप्त करून श्रेष्ठ सेवाधारी बना.

बोधवाक्य:-
सेवेच्या वायुमंडळासोबत बेहदच्या वैराग्य वृत्तीचे वायुमंडळ बनवा.

अव्यक्त इशारे - “कंबाइंड रुपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना”

संगमयुग आहेच मुळी कंबाइंड राहण्याचे युग. बाबांपासून वेगळे होऊ शकत नाही. कायमचे साथी आहात. सदैव बाबांसोबत राहणे अर्थात सदैव संतुष्ट राहणे. बाबा आणि तुम्ही नेहमी कंबाइंड असाल तर कंबाइंडची शक्ती खूप मोठी आहे, एका कार्याऐवजी हजार कार्ये करू शकता कारण हजार भुजावाले बाबा तुमच्या सोबत आहेत.